श्रीकेशवस्वामी - भाग ४

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ५४ वें

मी तव तान्हुलें । लडिवाळ संताचें । आतां मज कैचें भवभय ॥१॥

भवभयाची बाधा । बाधी त्या अभक्ता । सद्गुरुच्या भक्ता । काय चाले ॥२॥

सद्गुरुची भक्ती । वाचें रामनाम । चराचरीं सम । भाव ज्यांचा ॥३॥

समभावें वोतलें । स्वरूपीं आथिलें । अंतरी राहीलें । थिरावोनी ॥४॥

अंतरींचे सुख । भोगितां अनुभवें । राहिला स्वभावें । सकळ कर्में ॥५॥

कर्में दुरी ठेलें । करणें सुटलें । मन हरपलें । ठाईंच्या ठाईं ॥६॥

तेथें अनुवादू राहिला । अनुभउ जिराला । बोधु सांठवला । बोधामाजी ॥७॥

तेथें समाधी वित्थान । दोघां विसर्जन । मौनासी महामौन्य । पडोनि ठेलें ॥८॥

गेला कोऽहंभावो । सोऽहंभावासी अभावो । वीसरेसी आठवो । नाठवेची ॥९॥

केशव म्हणे आम्हां । सद्गुरुच्या पायीं । ऐसी दशा पाहीं । प्राप्ति झाली ॥१७॥

० पद ५५ वें

सद्गुरुचे पाय । हेचि दिव्य आम्हां । वर्णवेना महिमा । सत्संगाचा ॥१॥

सत्संगाचें सुख । निजप्रेम अगाध । भोगिती आनंद । भक्तराज ॥२॥

भक्तीवीण न कळे । अनुभवाची गोडी । यालागीं आवडी । भक्ती करा ॥३॥

निजभावें करा । भजन या संतांचे । खत संसाराचें । फाडावया ॥४॥

प्रल्हाद उद्धव । मुनिगण गंधर्व । भजनें हे सर्व । मुक्त झाले ॥५॥

भजनें मुक्त झाले । जड जीव अपार । पावले परपार । संतसंगे ॥६॥

केशव म्हणे संत । तें माझें मोहर । राखेन मी द्वार । जन्मोजन्मीं ॥७॥

० पद ५६ वें

जन्मोजन्मीं जालों । सेवक मी संतांचा । उतराई मी त्यांचा । तऱ्ही नव्हे ॥१॥

संतांसी उतराई । नव्हिजे केल्या कांही । म्हणोनियां पायीं । लोळतसे ॥२॥

संतांची पाउलें । तें माझें वैकुंठ । मुक्ति मूळपीठ । चरण त्यांचे ॥३॥

संतचरणरज । तें माझें भूषण । अभय झालें पूर्ण । भगवंताचें ॥४॥

भगवंताची मूर्ती । तेचि जाणा संत । घालिन दंडवत । वेळोवेळां ॥५॥

संतांवीण देवो । दुजा कोण आहे । तारावया पाहे । हेंचि एक ॥६॥

केशव म्हणे संती । तारियेलें मातें । प्रेम-जीवन भातें ।

देऊनीयां ॥७॥

० पद ५७ वें

पोसना संतांचा । पाळिलों जन्माचा । अंकिला मी त्यांचा । दास सत्य ॥१॥

संत माय-बाप । सोयरे निजाचे । तिहीं मज साचे । सोडवीलें ॥२॥

सोडवीलें संती । संसारापासोनी । स्थापिले चरणी । अखंडीत ॥३॥

चरणीं वासू आम्हां । पूर्व पुण्य भलें । निच नवे सोहळे । आनंदाचे ॥४॥

आनंदाची खानी । संतांची पाउलें । तें मज जोडिलें । भावबळें ॥५॥

जोडी जोडियेला । संतसंग आम्ही । भेटी आत्मारामीं । सर्वकाळ ॥६॥

संत कृपादृष्टी । निर्गुणासी भेटी । ब्रह्मानंदें सृष्टी । हेलावत ॥७॥

ब्रह्मानंदू झाला । सद्गुरुच्या बोलें । सबाह्य कोंदलें । निजरूप ॥८॥

केशव म्हणे माझा । सारथी गुरुरावो । तेणें विश्रांतीचा ठावो । दाखवीला ॥९॥

० पद ५८ वें

वैकुंठीचे वासी । नवस नवसीती । साधुची संगती । होईल केंव्हा ॥१॥

धन्य साधुसंग । साधिती जे नर । भवसिंधु दुस्तर । तरले तेची ॥२॥

साधुसंगे मोक्ष । भेटे सर्वकाळ । विश्रांतीचें मूळ । साधुजन ॥३॥

केशव म्हणे साधु । तेचि निजानंदू । त्यांचे पायीं वेधू । लागो मज ॥४॥

० पद ५९ वें

जया सुखालागीं । अंत नाहीं कांही । फुकट संतापाईं । तें सुख जोडे ॥१॥

म्हणवुनिया संत । वोळगावा निवान्त । याहुनी एकान्त । आणिक नाहीं ॥२॥

कैवल्याचें धाम । संत आत्माराम । सर्वदा विश्राम । साधुसेवा ॥३॥

संतसंगवासी । नित्य मोक्ष त्यांसी । केशव म्हणे ऐसी । प्रतिती माझी ॥४॥

० पद ६० वें

संत पाहों ऐसे । देवासी डोहाळे । मूर्खासी सोहाळे । विषयांचें ॥१॥

काय सांगो किती । हित हे विचारा । संत० पदी थारा । करा वेगीं ॥२॥

संतसंगेंवीण । हिंपुटी होतसा । नेणों हे अवदशा । कैंची आली ॥३॥

केशव म्हणे संत । स्वानंदाचे सिंधु । घेतां तीर्थबिंदु । अमर व्हाल ॥४॥

० पद ६१ वें

रोकडाचि मोक्ष । आणावा घरासी । हे इच्छा मानसीं । तरी संत सेवा ॥१॥

संतांचिया पायीं । मोक्ष क्षेत्रवासी । म्हणवुनी संतांसी । शरण जावें ॥२॥

संत ते भगवंत । जाणावे निभ्रान्त । वेदान्त सिद्धान्त । हेंचि बोले ॥३॥

केशव म्हणे संत । चरणीं मी राहिलों । न मागतां पावलों । मोक्ष० पद ॥४॥

० पद ६२ वें

संतसंगेवीण । सुख जे बोलती । ते कांहींच नेणती । पापरूपी ॥१॥

संत तेची स्वयें । सुखाचें सागर । सत्य हा निर्धार । उपचार नाहीं ॥२॥

संतरूपें सुख । साकारलें जाण । वाहातों मी आण । दुजें नाही ॥३॥

केशव म्हणे किती । सांगिजे या लोकां । संतवेषें देखा । ब्रह्म नांदे ॥४॥

० पद ६३ वें

चला जाउं साधूच्या शेजारा । साधूहूनि न दिसे सोयरा ॥ध्रु॥

प्रेमें तया आळंगु माहेरा । तेणें होय सुख या शरीरा ॥१॥

हेंचि मुख्य सर्वांचे सार वो । येणेंचि बाई पाविजे पार हो ॥२॥

बरवी सय्ये साधूची संगती । संतसंगे पातकें भंगती ॥

संगें वो सये पाविजे श्रीपती । म्हणउनि लागलीं हे रती ॥३॥

संताहुनि न दिसे थोर वो । विश्रांतीचें मूळ तें घर वो ॥

० पद ६४ वें

संतचरणी ठेवीतां मनवो । स्वानंदाचे लाधलें धन हो ॥ध्रु॥

आत्मलाभें कोंदलें जन वो । आतां कांही न दिसे न्यून ॥१॥

सकळ भाग्यें साधूच्या चरणीं । पूर्वपुण्यें फळलें वो साजणी ॥२॥

नारद तुंबरू गाती जे कीर्तनीं । ब्रह्मादिक वेधले चिंतनी ॥३॥

निर्गम नाहीं पावल्या तेथुनां । तेंचि गे मज दीधलें सज्जनीं ॥४॥

संतसंग करितां अल्प वो । द्ग्ध जाला कल्पना कल्प वो ॥

विसरला सर्वही जल्प वो । केशव सांगे प्राप्तीचें रूप वो ॥६॥

० पद ६५ वें

वेदान्तशास्त्र वक्ता । अति निःसीम पाहीं । सिद्धान्त बोलताही । उरी ठेवीत नाही ॥ध्रु॥

लय-लक्ष-ध्यान-मुद्रा । दावि अपुला ठाईं । वेडे वेडेचार केले । परि मोक्ष तो नाही ॥१॥

ते खुण वेगळी बा । येथें विरूळा जाणे । जाणीव ग्रासिली हो ।

त्यासी बाणे तरी बाणे तरी बाणे ॥ अष्टांग-योग जाणे । जाणे मंत्र-यंत्र-कळा ।

प्रबोधशक्ति मेरू । वश्य सिद्धी सकळां ॥

लक्ष्यांश चुकला की । भाग्यमंद आंधळा ।

मी कोण हेंचि नेणे । कळा सर्व विकळा ॥२॥

सारांश हाचि नीका । तुम्ही सावध ऐका । सुखासी मिळवीतें ।

वर्म नातुडे फुकां । देउनी चीत संता ॥ निजतत्त्व ओळखा ॥

जिताचि सुटिकावें । प्राप्ति केशवि देखा ॥३॥

० पद ६६ वें

भक्ति ज्याचिया हृदयी खेळे । शांति ज्याचिया सर्वांगि लोळे ॥ध्रु॥

बोध राहिला ज्याचिया खोळे । त्यासी पहावया भुलले डोळे गा ॥

तें सजन दाखवा वेगीं । ज्ञान वज्रांगिं लेइलें आंगी ॥

जें अलिप्त सर्वही संगी । जें योगेंविण लेइलें आंगी ॥१॥

जे भोगेंविण निजसुख भोगी । जें सांडुनि संसार श्रेय ॥

जें देहिंच होति विदेह । ज्यांसी कांहीच नुरे संदेह ॥

जें आपुलेंचि आपण ध्येय गा ॥२॥

ज्यांसी सर्वत्र समानभावो । ज्यांच्या मतें हा संसार वावो ॥

जें स्वयंभू देवादिदेवो । त्यांचे पाय वंदी केशवो गा ॥३॥

० पद ६७ वें

संत-सज्जन भले भले । ज्ञानगंगेत विरोनि गेले गा ॥ध्रु॥

तें गंगेचे रूप जालें पाही । त्यासी परतोनी देखिलें नाहीं गा ॥१॥

गंगेपासूनि वेगळे होते । तरी सहजचि परतुनि येते गा ॥२॥

म्हणे केशव पावलें सांच । तेथें हरपलें द्वेत आहेच गा (?) ॥३॥

ते गंगेचे रूप जालें पाही ॥

० पद ६८ वें

सुखसागरीं बुडी देती । तरी सुखाचि भरूभरूं घेती ॥ध्रु॥

संत अखंड तृप्त पाहीं । परि लालुचि गेली नाही ॥१॥

सुख सेवि तयाचें मुख । पाहों जातां अधिक भूक ॥२॥

सुखी होउनि सेविती सुख । हेंचि केशवीं निज कौतूक ॥३॥

० पद ६९ वें

पिंड ब्रह्मांडाचि डोई । वेगिं फोडुनि आली आई ॥ध्रु॥

माझी तान्हुली मुक्ताई । इसी उचित द्यावें काई ॥१॥

द्वैत बुद्धिचें फेडुनि पाप । मज केलें माझा बाप ॥२॥

म्हणे केशव केवळ माता । कैसी लेकीं म्हणावें आतां ॥३॥

० पद ७० वें

कोटि ब्रह्मांडाची माता । गाती शतपथ मंगळलता ॥ध्रु॥

तेहि गोचर झाली आतां । संतिं ठेवियला कर माथां ॥१॥

जेथें तर्क मीमांसा आटे । जे अतर्क्य बोधें भेटे ॥२॥

जेथें कुंठित भूधर-वाणी । म्हणे केशव चित्सुखखाणी ॥३॥

० पद ७१ वे

नामरूप मिथ्या करूनि । जग बुडविलें चिन्मय जीवनीं ॥ध्रु॥

संत केवळ घातकी पाहीं । परि पातक त्यांसी नाहीं ॥१॥

अहंभावाची निवटुनि मान । जन्म-मरणाचें निरसलें भान ॥२॥

निजबोधाचे घालुनि फांसे । दोघे गोसावी मारिले कैसे ॥३॥

अति खानोरी अकर्मकारी । गांव दिवसांची जाळिले चारी ॥४॥

म्हणे केशव घातकी मोठे । यासी अंतक कोठुनि भेटे ॥५॥

० पद ७२ वें

निजबोधें निश्र्चळ बुद्धी । सर्व कमीर्र्ं ब्रह्मसमाधी ॥ध्रु॥

तोचि योगी सत्य पाहीं । नित्य मग्न आपुले ठाईं ॥१॥

नातळेचि विधिनिषेधा । सांडि मांडि नेणेचि कदा ॥२॥

म्हणे केशव ब्रह्मळीला । नित्य विचरती स्वलीळा ॥३॥

० पद ७३ वें

थोर महिमान संतांचे । भावें दास्य करावें त्यांचे ॥ध्रु॥

संत कृपा करिती जाण । तैं वाचा फुटे पाषाण ॥१॥

संत तारीन म्हणती ज्यासी । देव खांदा वाहे तयासी ॥

केशव म्हणे सर्वभावें । शरण संतांसी रिघावें ॥२॥

० पद ७४ वें

केलें गर्जन तर्जन । तऱ्ही दंडेळीना मन ॥ध्रु॥

तोचि निज साधु पाहीं । मन ठेवि त्याचे पायीं ॥१॥

नित्य करितां खस्ताविस्ता । अति निर्मळ ज्याच्या चित्ता ॥२॥

जरी केली विटंबना । तरी कोप न ये जाणा ॥३॥

म्हणे केशव निजबोधें । सदा डुल्लत ब्रह्मानंदे ॥४॥

० पद ७५ वें

जया जीवनासी नाहीं अंत । तेथें आंगे रिवाले संत ॥ध्रु॥

मग परतोनि नाहिं बा आले ! जगजीवन स्वयंचि जाले ॥१॥

जगजीवन झाले पाहीं । हाही आठव उरला नाही ॥२॥

जग गा्रसुनी जगजीवन । म्हणे केशव आनंदघन ॥३॥

० पद ७६ वें

संतसंगतीवांचुनि जिणें । भलें त्याहुनी मरणें ॥ध्रु॥

बरवा साधूचा संमंधू । भेटे फुकट ब्रह्मानंदू ॥१॥

संतसंगे-विण जो काळ । तोचि महांकाळ केवळ ॥२॥

केशव सत्संग साधिला । देव धांवोनि हृदयासी आला ॥३॥

० पद ७७ वें

संग साधुचा घडावा । भवसागर आटुनि जावा ॥ध्रु॥

देवा इतुकेंचि मज मागणें । आर्त बंधुनें बरवें देणें ॥१॥

आर्त ऐसी माझी ये पोटीं । क्षेणाक्षणा व्हावी भेटी ॥२॥

केशा म्हणे चित्सुखधामा । उडी हृदयींच घाली रामा ॥३॥

० पद ७८ वें

संतपायीं उदासीन मन । तऱ्ही नाकळे जगजीवन ॥ध्रु॥

ऐसें बोलती वेद-पुराण । कां बा नेणोनी धांवती रान ॥१॥

संत चित्सुख-सागर साचे । पाय त्रैलोका तारका त्यांचे ॥२॥

संतसंगचि श्रीरंग दावी । चित्त केशव पायींच लावी ॥३॥

० पद ७९ वें

सर्व मृग तोय जाणोनि मनीं । निरंजनीं बैसले मुनी ॥ध्रु॥

त्यांच्या पायांची धरिली गोडी । तरी पावशी आनंदकोडी ॥१॥

नित्य भजतां परमानंद । गेले विसरूनीयां भवछंद ॥२॥

आत्मबोधें सुखरूप जालें । म्हणे केशव पूर्ण निवालें ॥३॥

० पद ८० वें

नाही विषयाची प्रीत जया लागी रे । भोगभोगुनी भोगातीत योगी रे ॥ध्रु॥

त्याच्या चरणकमळी चित्त ठेवी रे । आत्मसुख त्याचेनि कृपें सेवी रे ॥१॥

त्याग भोग सहज त्यासी त्याग रे । ब्रह्मादिकां न कळे त्यांचा योग रे ॥२॥

ब्रह्मानंद स्वरूप नित्य संचले । म्हणे केशव तारक त्यांची पाउलें रे ॥३॥

० पद ८१ वें (घाटी-रामकली)

संतवाक्यामृतें अंतरताप हरला । प्रत्यक्ष देखीला नारायण ॥ध्रु॥

मज माझे निजसुख पावलें । भवदुःख नाशलें साधुसंगे ॥१॥

साधुसंगतीचा केव्हाडा अनुभव । देहातीत देव देहीं दिसे. ॥२॥

देहीं देव देखतां देहभाव निरसला । भक्त तो आटला देवामाजी ॥३॥

संतचरण माथां सद्भावें वंदीतां । देवची तत्त्वतां विश्र्वरूप ॥४॥

विश्र्वरूप देव जाणोनी वर्ततां । संसार सर्वथा स्वप्न्नीं नाहीं ॥५॥

संतकृपा फळे तैंच ऐसें कळे । कळलेपण गळे आपणामाजी ॥६॥

तेथें देव भक्तावीण उरलासे आपण । देवचि संपूर्ण केशव म्हणे ॥७॥

० पद ८२

जो कोणाचे गुणदोष पाहेचि ना । जो हृदयी विकार कांही वाहेच ना ॥ध्रु॥

तो साधूंचा मुगुटमणी रे । आम्ही लागतों तयाच्या चरणी रे ॥१॥

जो क्रोधाचा संग कधीं करीच ना । जो भेदासी हातीं धरीच ना ॥२॥

जो स्वसुखावेगळा राहीच ना । म्हणे केशव तयासी कांही साहेचि ना ॥३॥

० पद ८३ (घाटी-जात्याची)

सुखावेगळी मात । नाहीं ज्याच्या गावांत ।

तयाचा सांघात । करी कां ग बाई ये ॥ध्रु॥

आणीकांसी बोलूं नको । हितगुज पुसूं नको ।

वेडी वेडी डुलूं नको । सुखरूप न होता ॥१॥

सुखाची लाविती गोडी । तयाची करावी जोडी ।

जन्ममरणाची बेडी । तुटे तेणें बाई ये ॥२॥

संत ते सुखाची मूर्ती । नासती दुःखाची स्फूर्ती ।

यथार्थ तयाची कीर्ती । आहे मज ठाउकें ॥३॥

सुखाचे सिंधू ते माय । वेळोवेळां सांगू काय ।

सुखाकारणें पाय । धरी त्याचे मस्तकीं ॥४॥

केशवाचे स्वामी तेवो । तयासी सर्वस्व देवो ।

सुखची घेशील घेवो । भाक माझी साजनी ॥५॥

० पद ८४

पापसमुच्चहर्ता रे । केवळ मंगळकर्ता रे ॥ध्रु॥

अपार पुण्य फळला रे । राम सनातन कळला रे ॥१॥

सम्यक निजगतिदायक हा । निरंजन० पदिंचा नायक हा ॥२॥

केशव कवि म्हणे निजबंधु । संतशिरोमणि सुखसिंधु ॥३॥

० पद ८५

संतजनाच्या भुवनालों । भजन-प्रयागीं मग न्हालों ॥ध्रु॥

अपार पावन जालों मी । अक्रिय भूषणें ल्यालो मी ॥१॥

ज्ञानसुधा सेवुनि घालों । अक्षय लाभें निवालों ॥२॥

मति गति ग्रासुनि अति वेगें । केशव प्रभुच्या निजयोगें ॥३॥

० पद ८६(राग-केदार)

समाधी निर्णईंचा निर्धारू । तोचि साक्षात्कारू ॥ध्रु॥

ऐसें जाणती ते निजयोगी । परमानंद भोगी ॥१॥

समाधी हरपली जे ठाईं । तोचि आत्मा पाहीं ॥२॥

समाधी ग्रासुनियां सुख घेणें । केशव स्वामी होणें ॥३॥

० पद ८७

जयासि पहातां हा भव नासे । पाहणें सर्वही भासे ॥ध्रु॥

तो मज दाखविला भगवंत । परमदयाळू संत ॥१॥

अलक्ष परमात्मा अविनाशी । अखिल सुखाचा राशी ॥२॥

रमणिय नामीं जे निर्नामीं । केवळ केशव स्वामीं ॥३॥

० पद ८८ वें

साधुसंगतीचें थोर महीमान । ज्यांच्या दर्शनें मालवे अभिमान ॥

ब्रह्मरूपें करितां त्याचें ध्यान । क्षणमात्रें आकळे आत्मज्ञान रे ॥१॥

काया-वाचा-मानसा नीजभावें । सर्व सांडुनी साधुसी शरण जावें ॥

संतवचन सहसा नुलंघावे । प्राप्ती जालीयांही संतांसी भजावें रे ॥२॥

संत असती वसती जया देशीं । चारी मुक्तां होतिल तेथें दासी ॥

सर्व कामना पुरती संतापाशी । ऐसें जाणोनियां भजावें संतांसी रे ॥३॥

ज्यासी आवडे संत्संगतीचा मेळू । संतदास्यत्वें जे अति प्रेमळू ॥

स्मरणें साधूच्या सदा विव्हळू । ब्रह्मानंद तयांच्या घरचा खेळू रे ॥४॥

संतसेवेचें अखंड आर्त ज्यासी । जिहीं जीवभाव अर्पिला संतांसी ॥

विदेहकैवल्याची प्राप्ती होय त्यांसी । ब्रह्मादिक वंदिताती शिरसी रे ॥५॥

नाना साधनें किमर्थं योगयाग । ब्रह्मप्राप्तीचा उपाय साधुसंग ॥

गुरुकृपें केशवी भजनमार्ग । संतचरणीं समाधि अभंग रे ॥६॥

० पद ८९ वें

ऐसें तरीच भेटती ते साधु । जै निःशेष गळे काम क्रोधू ॥

इच्छा निंदा मालवे गर्व मदू । संत भेटतां स्वरूपीं होय बोधू रे ॥ध्रु॥

शत्रुमित्र दोघेही समान । शांति क्षमा उपजे कृपापूर्ण ॥

जाय देहबुद्धी विरोनि अभिमान । वृत्ती एकाग्र अखंड लागे ध्यान रे ॥१॥

दंभ मोहो नासती निशेष । आशा तृष्णेसी समूळ होय नाश ॥

जाती संकल्प-विकल्प राग-द्वेष । होय वित्सुद्धी स्वयंप्रकाश रे ॥२॥

अनुतापें संतप्त चित्तवृत्ती । विषयसेवनीं इंद्रियां विरक्ती ॥

सदा निर्भय सद्भाव सर्वांभूतीं । भजतां तत्काळ पाविजे ब्रह्मप्राप्ती रे ॥३॥

नित्य विवेक भजन शुद्धमार्ग । दृढ निष्ठा भजन अंतरंग ॥

घडे काम्यकर्मासी परीत्याग । स्तिती निष्कर्म आतुडे ज्ञानयोग रे ॥४॥

अहंता गर्व सांडुनियां आपण । अनन्यभावें संतांसी शरण ॥

गुरुकृपें केशवीं चरण रे चरण । धरितां मस्तकीं स्वानंदसुखधन रे ॥५॥

० पद ९० वें

संत कृपेनें सांगती हीत थोरू । जेथें साक्षेपें देतसे परिहारू ॥

कैसा आत्मविषयीं अंधःकारू । नेघे उ० पदेश यासी मी

काय करूं रे ॥१॥

कैसी अहंता लागली असे पाठी । हीत सांगतां भोंवया पडे गांठी ॥

वरी भिडां न बोले कांही गोष्टी । अतिसंतप्त हृदयीं कोप उठी रे ॥ध्रु॥

स्वतां न कळे न पुसे स्वाभिमानें । पुढीलाचें नाईके जाणपणें ॥

कोठें न माय आपुलीया ज्ञानें । नव्हे उकलू देहबुद्धिचे

नि गुणे रे ॥२॥

विश्र्वासाची अणुमात्र वोल नाहीं । बोल गगनीं न माती कैसे पाहीं ॥

निजविश्रांती स्वप्न्नींही नेणें कांही । ज्ञानगर्वें फुगोनि राही देही रे ॥३॥

शुद्धवैराग्य नावडे निजनिष्ठा । वाहे अंतरी धनमान प्रतिष्ठा ॥

प्राण जातां न मानिती वरिष्ठां । जाणपणाचा उभड अंगिं मोठा रे ॥४॥

ब्रह्मचर्चा करिती संतजन । तेथें भावें न घाली निजमन ॥

युक्तिबळें तेथें काढी दूषण । केवढें प्राणीयांसी सबळ अज्ञान रे ॥५॥

नित्या-नित्य-विवेक हा तव नेणें । कांही कळतां जल्पोचि लागे तेणें ॥

बाह्य मिरवे त्या संताची लक्षणें । जळो व्यर्थ त्या दांभिकाचें जिणें रे ॥६॥

ऐसे दांभिक अभक्त गर्वयुक्त । त्यांसी सर्वथा न जोडे भगवंत ॥

गुरुकृपें केशवीं शरणांगत । त्यांसी तारिता आपण जगन्नाथ रे ॥७॥

० पद ९१ वें

चित्त बोधिं आटतें ॥ अपार प्रेम वाटतें ॥

हृदय फुटेल नेणो ऐसें मज वाटतें ॥१॥

हे गोष्टी नव्हे फुकाची ॥ प्राप्ति महासुखाची ॥

फावलें जयासी धन्य धन्य माता तयाची ॥ध्रु॥

येथींच्या विचारें माय ॥ द्वैत हें विरोनि जाय ॥

आपलें स्वरूप पाहें आपण होउनि राहे ॥२॥

साधुच्या संगती हो ॥ या अर्थी बुडी देती हो ॥

तेचि सुखी होती हो ॥ केशवीं निश्र्चिती हो ॥३॥

० पद ९२ वें

हरिनाम गर्जती हरिरंगी नाचती ॥

हरिप्रेमें डुल्लती पावती सुख ॥१॥

धन्य ते महानुभाव पूर्ण भक्त योगीराव ॥

हरीनें स्व० पदीं ठाव दिधला तयां ॥ध्रु॥

चिंतितां सच्चिदानंदा नेणती हा भवधंदा ॥

स्वरूप संगती मंदा मती जालें गतीच्या ॥२॥

सर्वदा सेविती राम त्यांसी कैंचा क्रोध काम ॥

पावलें विश्रामधाम केशव म्हणे ॥३॥

० पद ९३ वें

संतचरणीं मन निश्र्चळ जालें केवळ ॥ गेली तळमळ तेणें ॥

सर्व प्रकाशक भेटला ॥ भेद खुंटला ॥ आतां डळमळ नेणें ॥

नेणणें-जाणणें जालें जाणणें ॥ ऐसें केलें जेणें ॥ ल्यासि उत्तीर्ण होणें ॥

या रितीं जागृती जाली वो ॥ भ्रांति गेली वो ॥ दशा उजळली पाहे ॥

अवस्थात्रयांची हे बोळवण ॥ उरला आपण ॥ हेंही म्हणणें न साहे ॥ध्रु॥

आदि मध्य अंत तव कांही ॥ जेथें अणु नाहीं ॥ ही संकल्प गेला ॥

व्याप्य-व्यापकभावविरहीत ॥ देव सदोदित ॥ येकायकीं संचला ॥

बोध्य-बोधक शक्ति कायसी ॥ स्वयंप्रकाशी ॥ ऐसा उकलू जाला ॥२॥

शरण जावें कवणकवणासी ॥ सिद्ध अविनाशी ॥ पूर्ण भरला ग माय ॥

उघड बोलणें ऐसें बोलतां ॥ नाही बोलता ॥ कोठें ऐकतों आहे ॥

आहे तें आहे सहज मंगळ ॥ नित्य निर्मळ ॥ हेंही स्फुरणें न साहे ॥

केशव म्हणे अद्वय सं० पदा ॥ भोगि सर्वदा ॥ सुखी सुख न समाय ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP