श्रीकेशवस्वामी - भाग १२

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ३११ वें (राग - पावक)

नाशिवंत जाण काया । इची कायंसी माया । मृगांवलहरि हें ।

चित्रतरूची छाया । निर्णयो करिताही । नये येकही आया । यालागीं सांडीं आतां देहबुद्धीचा थाया ॥ध्रु॥

सांगतों तुज बारे । माझ्या जीवींच्या खुणा । स्वरूप सुख घेईं । नरदेह पावना ॥१॥

स्वप्न्नींचा लोक जैसा । नये जागृति भेटी । तैसाची सौंसार,

निजस्वरूप दृष्टी । मीपण वाढवूनी व्यर्थ होतोसी कष्टी । सर्व हें इंद्रजाळ याचि कायसी गोष्टी ॥२॥

गगनसुमनाचा । जेणें गुंफिला तुरा । त्याहुनी त्रिभुवनीं मूर्ख नाहीं दुसरा ।

द्वैतभाव, मनीं कल्पुनी खरा । भोगिशी दुःख बा, तूं काय निदसुरा ॥३॥

वांझेचा कुमरू तो । अति प्रबळ झाला । परिणुनि भीष्म कन्या ।

नित्य भोगूं लागला । गंधर्वनगरी हो । तेथें वास पै केला । त्रिवर्ग

याचिपरी, अघटित घडला ॥४॥

जेव्हांचि देह आहे । सत्य तेव्हांचि नाहीं । आहे नाहीं भ्रम मात्र ।

हाही सांडुनि देई । स्वराज्य निश्र्चयेंसी । सीघ्र साधुनि घेईं ।

सद्गुरुवाक्य बोधें । मग्न केशवीं होई ॥५॥

० पद ३१२ वें

सांगोनी वाक्य कानीं । द्वैतसंग नासीला ।

ठेउनी हात माथा । जीव ब्रह्मचि केला ॥ध्रु॥

सच्चिदानंदरूप । स्वयें बोध संचला ।

सद्गुरु तोचि आम्हां । पूर्वपुण्यें जोडला ॥

लागली प्रीति त्याची । काय बोलूं मी वांचें ।

निःशंक मन माझें । त्यासि देखोनि नाचे ॥१॥

देउनि भेटी जेणें । भेद भंगिला पाहीं ।

रंगलें चित्त माझें । नित्य त्याचिया पाईं ॥

अखंड ध्यान योग । परिपूर्ण हा देहीं ।

देहासी ठाव कैंचा । पहा स्थितीचा ठाईं ॥२॥

अवस्थात्रय जेथें । शून्य होउनि गेलें ।

संपूर्ण तेंची रूप । आम्हांलागुनी केलें ॥

बोलणें डोलणेंही । सहज केशवीं ठेलें ॥३॥

० पद ३१३ वें

जीव ईश्र्वर अभिप्रावो । ऐसा उठिला कळित भावो । त्यासी स्वरूपीं

कैंचा ठावो । हा नेणसीच निर्वाहो गा ॥ध्रु॥

तरी कैसा तूं महानुभावो । तुझें बोलणें अवघेंचि वावोगा ॥१॥

देहत्रयाचें लटिकें भान । तेथें कैचें साध्यसाधन । मिथ्या समाधि

आणि वित्थांन । हें न कळेची त्यांत खूण गा ॥२॥

प्रमेय, प्रमाण, आणि प्रमाता । मुळिं कांहीच नाहीं तत्वतां ।

सिद्ध अखंड निजात्मता । स्वानुभवें न पाहसी आतां गा ॥३॥

असें स्वरूप नित्य निर्मळ । जेथें सबळा शून्य केवळ ।

म्हणे केशव पूर्ण निष्कळ जरि न पवसि तूं प्रांजळ गा ॥४॥

० पद ३१४ वें

रूप द्रष्ट्यांचें नयनीं पाहें । तों द्रष्टाचि होउनि राहे ॥ध्रु॥

हे स्वानुभव कुसरी पाहीं । येथें घडमोडी न चले कांहीं ॥१॥

द्रष्टा पाहुनि द्रष्टा होणें । ऐसें बोलतां लाजिरवाणें ॥२॥

गुरुकृपें केशवीं निष्ठा । दृश्य द्रष्टत्व गिळुनी द्रष्टा ॥३॥

० पद ३१५ वें

सोनियाचे चेंडू केले । परि सोनेंपणें संचलें ॥ध्रु॥

तैसें भासलें चराचर । परी पालट नाहीं पर ॥१॥

रायपुरीचें कारलें केलें । परी गोडीसी नाहीं चुकलें ॥२॥

तंतु नेणोनि पट्ट निर्मिला । तरी तंतुचि तो येकला ॥३॥

निरगोळुनि भासली गार । ते आकारीं निराकार ॥४॥

भेदीं अभेद अभेदीं भेदू । दोहीं वेगळा केशवीं बोधू ॥५॥

० पद ३१६ वें

जळीं भोंवरा जैसा माय । जन्मस्वरूपीं तैसें पाहें ॥ध्रु॥

कैसें निवडुनी परतें काढूं । नम-पल्लव कोठें फाडूं ॥१॥

हनुमंता मनींचा काम । तैसें निर्गुणी हें रूपनाम ॥२॥

अजन्माचें जन्मपत्र । तैसें केशवीं हें भवचित्र ॥३॥

० पद ३१७ वें

जग पृथकाकारें अनेक । पाहतां भासे एक ॥ध्रु॥

तेथें काय जी आम्हीं करावें । दिसे तितुकें ब्रह्म स्वभावें ॥१॥

कर्ता कार्य आणि कर्म । कैसें अवघेंचि झाले ब्रह्म ॥२॥

गुरुकृपें केशवीं कैसे । भिन्न काहींच न दिसे ॥३॥

० पद ३१८ वें

आत्मा सर्वभूती व्यापक । ऐसें नेणोनि बोलती देख ॥ध्रु॥

पूर्ण परमार्थ पाहतां पाहीं । आत्मावेगळें दुसरें नाहीं ॥१॥

जें जें दिसे तितुकें ब्रह्म । हेंचि परमार्थाचें वर्म गा ॥२॥

तेथें व्यापव्यापक दोन्ही । गेले समूळ हरपोनी ॥३॥

केशव म्हणे जग सकळ । तोचि जगदात्मा निखळ ॥४॥

तेथें व्यापव्यापकभावो । दोन्ही सहजचि झाले वावो ॥५॥

० पद ३१९ वें

गूळ सांडोनी गोडी घ्यावी । मीठ सांडुनि चवी चाखावी ॥ध्रु॥

तैसा प्रपंच सांडुनि द्यावा । मग परमार्थ मांडावा ॥१॥

कनक सांडुनी घ्यावी कांती । दीप सांडुनी घ्यावी दीप्ती ॥२॥

रवा कापुराचा सांडावा । म्हणे केशव परिमळ घ्यावा ॥३॥

० पद ३२० वें

देह-बुद्धी विलया गेली । आत्मस्थिती प्रगट झाली ॥ध्रु॥

मार्ग मागील बुडाला । संत मोला प्रगट जाला ॥१॥

क्रिया-कर्म, जालें शून्य । हरपलें, पाप-पुण्य ॥२॥

शून्य सर्वही संकल्प । केशवीं लक्षितां चिद्रूप ॥३॥

० पद ३२१ वें

जें खालुतें ना वरुतें । आंत-बाहेरीं भरलें पुरतें ॥ध्रु॥

तें म्यां सांगावें तुज कैसें । सांगों जातां मीचि नसें ॥१॥

नव्हे स्वदेशी विदेशी । सर्व देशीं तो समरसीं ॥२॥

गुरुकृपें केशवीं पाहे । सांगे तोचि हरपोनि जाय ॥३॥

० पद ३२२ वें

जें कां आनादिचें मूळ । ज्यासि नाहीं याति-कुळ ॥ध्रु॥

तें हो आमुचें जन्मस्थान । निरंजन सनातन ॥१॥

पुण्य-पाप नाहीं जेथें । पावलिया उरी नुरे तेथें ॥२॥

गुरुकृपें केशवीं परम । नित्य निरामय निःसीम ॥३॥

० पद ३२३ वें

मन स्वरूपीं मुरालें । द्वैतभान मोडुनि गेले ॥ध्रु॥

कैंचे समाधी-युत्थान । सहजीं सहजचि आपण ॥१॥

नाहीं दृश्य दर्शन द्रष्टा । तेथें कैचीं कष्टा निष्टा ॥२॥

गुरुकृपें केशवीं भला । येकपणेवीण येकला ॥३॥

० पद ३२४ वें

निरंजनीं केलें घर । बरवें चिद्रुप बिढार ॥ध्रु॥

तेथें अखंड आम्हा थारा । जेथें नाहीं यरझारा ॥१॥

जें दृश्याहुनी परतें । सर्व ० पदांहुनी वरुते ॥२॥

केशव म्हणे आमुचें धाम । जग विख्यात आत्माराम ॥३॥

० पद ३२५ वें

जें कां बोलावें तें नव्हे । न बोलावें तेंही नव्हे ॥ध्रु॥

आतां करावें तें काय । ब्रम्हीं कांहीच न साहे ॥१॥

कांहि नसे रे प्रमाण । श्रुति वाहिलीसे आण ॥२॥

गुरुकृपें केशविं पाहीं । सर्व उपरम वस्तुचा ठाईं ॥३॥

० पद ३२६ वें

मुख्य पितरांचा मी पिता । सर्व देवांचा निज जनिता ॥ध्रु॥

मी रे सर्वांचें निजमूळ । अकुळाचें मी निजकूळ ॥१॥

सूर्य प्रकाश माझेनि योगें । चंद्र उजेड माझेनि आंगें ॥२॥

केशव म्हणे मी आदीची आदी । मज नाहीं आदिमध्य अवधी ॥३॥

० पद ३२७ वें

ब्रह्मजळीं स्नान केलें । तेणें संकल्प अवघे गेले ॥ध्रु॥

कैसें नवल वितले पाहीं । स्नानें शुद्ध जालों पाहीं ॥१॥

स्नान निजांगें करितां संगा । आंग विरोनि जाली गंगा ॥२॥

गुरुकृपें केशवीं स्नानीं । स्नेह स्नाता हरपलीं दोन्ही ॥३॥

० पद ३२८ वें

माघें घालुनी माया अविद्या । संध्यासारुनी होतसे संध्या ॥ध्रु॥

भली होतसे संध्यावळी । त्रिकाळाहुनी वेगळी ॥१॥

सर्व संकल्पासी सारून । केलें देहबुद्धीचें आचमन ॥२॥

निजरूपी ठेवुनी दृष्टी । प्रणवेशी गिळिली प्रमेष्टी ॥३॥

उदो अस्तु गिळुनी अर्ध्य देत । स्वयं आदित्या निज आदित्य ॥४॥

आधिष्ठानीं निज आसन । ब्रह्म गायित्री निज अनुष्ठान ॥५॥

बिजाक्षरीं अक्षरपूर्ण । अक्षरीं अक्षर संपूर्ण ॥६॥

गुरुकृपें केशवीं फळ । आत्मफळीं संध्या सफळ ॥७॥

० पद ३२९ वें

कैसें तर्पण करणें आम्ही । सर्व बाष्कळ तर्पण यामीं ॥ध्रु॥

भलें होताहे तर्पण । ब्रह्मीं ब्रह्म ब्रह्मार्पण ॥१॥

देवर्षि पितर यक । कर्ता तोही तद्रूप देख ॥२॥

नदीसागरा पर्यंतु । निजजीवन जीवना आंतु ॥३॥

सर्व कर्मी निष्कर्म बुद्धी । मुख्य हेचि ब्रह्मसिद्धी ॥४॥

गुरुकृपें केशविं बोधु । सर्वं ब्रह्ममय सिंधु ॥५॥

० पद ३३० वें========================

देवपूजेसी आरंभ केला । तंव भक्त देवोचि जाला ॥ध्रु॥

आतां कोण्हाची करणें पूजा । देव भक्तांसी न दिसे दूजा ॥१॥

देवभक्त दोन्ही येक । तेथें कैंचे पूज्य-पूजक ॥२॥

गुरुकृपें केशवीं भावो । आंत बाहेर यकला देवो ॥३॥

० पद ३३१ वें

भावें पुजूं गेलों देवा । तंव देवचि जालों अवघा ॥ध्रु॥

आतां पूजावें कवणासी । अवघा जाला ऋृषीकेशी ॥१॥

देवभक्त दोन्ही रूपें । दिसे देवोचि निजस्वरूपें ॥२॥

गुरुकृपें केशवीं भावो । अहलें बहलें भरला देवो ॥३॥

० पद ३३२ वें

देव भक्तासी अभिन्न । तऱ्ही होतसे निजपूजन ॥ध्रु॥

कैसें अखंड देवतार्चन । सहजीं सहज घडे अर्चन ॥१॥

पूज्य-पूजक अवघे एक । तरी पूजनीं निज हरीख ॥२॥

गुरुकृपें केशवीं पूजा । आत्माराम घेतसे वोजा ॥३॥

० पद ३३३ वें

देवयात्रेसी जातां भावें । तंव पंथचि देवस्वभावें ॥ध्रु॥

आतां चालावें तंव कैसें । जेथें तेथें देवचि दिसे ॥१॥

धरा-अंबर हे व्यापुनी । अवघा देवो जनीं-वनीं ॥२॥

गुरुकृपें केशवीं पाहीं । देवो आहे देहिं विदेहीं ॥३॥

० पद ३३४ वें

भक्त देवासी पाहों जाय । तंव तो स्वयंचि देव होय ॥ध्रु॥

आतां देव तो कैसे पाहे । देविं देव सहजचि आहे ॥१॥

देव-भक्त जाल्या यक । पाहातां पाहाण्या पडलें ठक ॥२॥

गुरुकृपें केशवीं चट । देव भक्तासी भरला घोंट ॥३॥

० पद ३३५ वें

देव दरुषण जाल्यावरी । भक्त न येची बाहेरी ॥ध्रु॥

कैसें पडलें आळिंगण । देव भक्तांसी अभिन्न ॥१॥

निजभावें होतां भेटी । जाली जिव-शिवा संवसाटी ॥२॥

गुरुकृपें केशवीं क्षेम । अकल्प सुख-संभ्रम ॥३॥

० पद ३३६ वें

देव सिद्धचि सन्मुख आहे । डोळे उघडुनियां तूं पाहे ॥ध्रु॥

देव कोठेंची म्हणसी नाहीं । नाहींपणा देव साक्षी पाही ॥१॥

देव व्यापक सर्वां ठायीं । ऐसें जाणोनियां तूं राहीं ॥२॥

गुरुकृपें केशवीं भावो । तऱ्हि देहिंच भेटे देवो ॥३॥

० पद ३३७ वें

देव भक्त अभिमानसिद्धी । भेद गिळुनी भजनविधी ॥ध्रु॥

शुद्धभजन होतसें कैसें । ऐक्य भावाचेनि समरसें ॥१॥

अभेदेंसी भेद सरला । भेदीं अभेद भेदे लीला ॥२॥

गुरुकृपें केशवीं बोधु । भजनामाजी परमानंदु ॥३॥

० पद ३३८ वें

चित चितपणासी मुके । तेथें सौंसार-गलबल चुके ॥ध्रु॥

संत सामर्थ्य हें बोलती । बोल ग्रासुनि ते डोलती ॥१॥

चितधम असतां पाही । ब्रह्मप्राप्ती सहसा नाहीं ॥२॥

चित नासी चिन्मय भासे । तेथें तन्मय केशव असे ॥३॥

० पद ३३९ वें

मन मारुनि चिद्धन पाहे । जगजीवन सेवुनि राहे ॥ध्रु॥

भवसागर-तारक तो कीं । त्यासि माणुस केलें लोकीं ॥१॥

सुखसागर होउनि खेळे । आंग भरुनी ल्याला डोळे ॥२॥

सर्व डोळियांचा जाला डोळा । पूर्ण केशवस्वामी भोळा ॥३॥

० पद ३४० वें

देव चिंती तो देवासी पावे । देव पावे तो जन्म न पावे ॥ध्रु॥

ऐसें बरवें कळलें पाहीं । देव-भक्तासी भेदचि नाहीं ॥१॥

ऐसें संगी तो देवासी भोगी । देव भोगी तो केवळ योगी ॥२॥

देव सेवि तो देवाचा देवो । त्याचा देहचि केशव देवो ॥३॥

० पद ३४१ वें

देह प्रतीतीनें लटका केला । देव अवघाचि तेणें नेला ॥ध्रु॥

देव नेईजे ऐसा नाहीं । तऱ्ही घेउनि गेला पाही ॥१॥

देव बरवा घालुनि पोटीं । देव होउनि देवपण घोटी ॥२॥

केशा म्हणे नेला देवो । देव ब्रह्मादिकांचा तो हो ॥३॥

० पद ३४२ वें

विलोकितां चराचर । भासे आत्माचि साचार ॥ध्रु॥

परीं तें आकळेना कोणासी । काय कीजे ऐसीयांसी ॥१॥

जें जें भासे तें तें ब्रह्म । हेंचि परमार्थाचें वर्म ॥२॥

केशा म्हणे अखंड पूर्ण । यक आत्माची संपूर्ण ॥३॥

० पद ३४३ वें

समदृष्टि देखणें ज्याचें माय वो । तोचि देखणा बहुत सांगों काय वो ॥ध्रु॥

त्याचे चरणकमळ वंदी माथां वो । ब्रह्मानंदे निववी बाई आतां वो ॥१॥

सम० पदीं राहिला मुक्त जाला वो । समप्राप्ती पावला प्रेमें धाला वो ॥२॥

समसुखें लागली समटाळी वो । सम-समाधी केशवीं सर्व काळीं वो ॥३॥

० पद ३४४ वें

माया रजनीचा अंत वो प्रगटला । हृदयाकाशीं चिदादीत्य उगवला ॥ध्रु॥

तेजोराशी देखिला आजी माय वो । पुंजाळलें नयन सांगों काय वो ॥१॥

बिंबरहित प्रकाशु यकला । दृश्य नहोनि सहज पूर्ण संचला ॥२॥

गुरुकृपें केशवराजीं दर्शन । तेथें जालें त्रिपुटीचें निर्शन ॥३॥

० पद ३४५ वें (राग - देसी)

मिथ्या मरणाचा धाक । व्येर्थची कां धरीजे ॥

जन्मचि मुळीं नाहीं तेथें । कैसेनि पां मरीजे ॥ध्रु॥

असे जाणती ते धन्य । त्यांच्या ० पदरीं बहु पुण्य ॥

असतां देह त्यांचा ते । तंव केवळ चैतन्य ॥१॥

निर्गुण आत्मा तो केवळ । चिन्मय अविनाशी ॥

तत्० पदीं मिळोनियां तो । योगी सेवीती पैं त्यांसी ॥२॥

आनंदघनरूप सद्रुप । निगम बीज साचें ॥

केशव म्हणे बापा तें । पाहतां मी-तूंपण कैंचें ॥३॥

० पद ३४६ वें (राग - मल्हार)

लवणाची मासोळी । धांवोनि पडली जळीं ॥

पतीती सागरीं स्वयं । बुडीजे ऐसियापरी ॥

मग हें मीपण उरी । नुरेचि बापा ॥१॥

वायोसी वेगळा पडे । तरंग जीवनीं बुडे ॥

पुढतीं आपणें घडे । पहिलेपणें ॥२॥

स्वरूपीं प्रतीती नाहीं । तंवचि बोलणें पाही ॥

केशव जालीया कांही । दुसरें नसे ॥३॥

० पद ३४७ वें

डोळियांची भुमीकें । डोळाचि आपणा देखे ॥

देखिलें म्हणतां मुखें । जीभ ना तुटे ॥ध्रु॥

यापरी पाहतां माय । पाहते यकलें आहे ॥

पहाणें तेंचि होये । न पाहाणें ॥१॥

आपणा आपण मुख । सन्मुख ना विन्मुख ॥

तैसें हें पाहणें देख । ठाईंचा ठाईं ॥२॥

जैसे आहे तैसें आहे । कवणें पाहिलें काये ॥

असें हें पाहणें पाहे । केशव म्हणे ॥३॥

० पद ३४८ वें

देवा देवा म्हणोनि मारिसी हांका । परि तो देव तुज नाहीं ठाउका ॥ध्रु॥

वांयाचि देवा म्हणसी काय । देव काय तुजवेगळा आहे ॥१॥

ज्या देवालागीं धांवसी दूरी । तो देव आहे तुज भीतरीं ॥२॥

प्रत्यक्ष देव तो न पडे ठाईं । लटिक्या पाठीं तूं लागशी काई ॥३॥

सबराभरीत देव सर्वत्र असे । तो कां तुजलागीं न दीसे ॥४॥

सद्गुरुकृपें केशवीं पाहीं । अहलें बहलें देवो देहीं विदेहीं ॥५॥

० पद ३४९ वें

रवीकिरणीं मृगतोय जन्मलें जैसें । निरंजनी सर्व भासलें तैसें ॥ध्रु॥

नवल पाहीं रे नवल पाहीं । पाहुं जाणे तेणें पाहिलेंचि नाहीं ॥१॥

रज्जुआंगी जैसा भासला भुजंग । चिदानंदीं तैसें जालें जग ॥२॥

स्थाणुपासुनी चोराधा (?) अवतारू । तैसाचि केशवराजीं संसारू ॥३॥

० पद ३५० वें

उपजोनी पंचान्नें माउली ग्रासीली । ज्ञानें निर्दाळिली तैसी माया ॥ध्रु॥

ज्ञानाचा महिमा न कळे कवणा । ज्ञान दुजेंपणा उरों नेदीं ॥१॥

उपजोनी पावकें ग्रासीलें इंधना । ज्ञानें या अज्ञाना तैसें केलें ॥२॥

उपजोनियां रसें धातु गिळीली जैशी । ज्ञानें अविद्या तैशी आटली जाणा ॥३॥

ज्ञानें अज्ञान गेलें ज्ञानें अज्ञान नेलें । केशवीं संचलें शुद्धबुद्ध ॥४॥

० पद ३५१ वें

सद्गुरुवचनें परतुनी पाहिलें । आपेआप तेथें पाहणें राहिलें ॥ध्रु॥

पाहुं मी काय पाहूं मी काय । पहावया दुजें नाहीं ग माय ॥१॥

चंद्र चंद्राचि वाही जे माथां । यापरी आपणा पाहीजे आतां ॥२॥

काय आहे तेथें पहावें काय । केशवी केशवपणही न साहे ॥३॥

० पद ३५२ वें

प्रत्यक्ष आपुलें स्वरूप जाणिती । संसार नेणती नाहींपणें ॥ध्रु॥

तेची योगीराव तेची महानुभाव । त्सासी म्हणिजे निश्र्चयेंसी देव ॥१॥

जाणीव नेणीव नेणती कांही । कांही नाहीं तेथें पावलें पाहीं ॥२॥

केशव म्हणे जालें विश्रांतीचें धाम । तयालागीं कैचें रूपनाम ॥३॥

० पद ३५३ वें

नाथिलें गारूड वळखिलें जेणें । उगविलें कोडें तयाचें तेणें ॥ध्रु॥

आणिकासी गोवी नुगवे माय । उगवूं जाय तो गुंतुनी राहे ॥१॥

मीपणें उगवीन म्हणतां येथें । गुंतला नाहीं परी तो कुंथे ॥२॥

गारुड नाहीं तेथें उगवीजे कांही । यापरी उगवी तो मुक्त रे भाई ॥३॥

केशव स्वामीशीं रिघावें शरण । त्यावीण आणिक उगवे कवण ॥४॥

० पद ३५४ वें

आदि ना अंत वर्ण ना व्यक्ति । तया ठायीं तें योगीय नांदती ॥ध्रु॥

नवल तयांचें धाम धरीलें । निरालंबी घर तिहीं बांधीलें ॥१॥

द्वैत जेथें वाव येकपणा अभाव । बळकाविला स्वयंभ तो ठाव ॥२॥

आकळितां ना कळे कळणीयां न कळे । केशव म्हणे तेथें एकत्वें राहीले ॥३॥

० पद ३५५ वें

योगी नानापरी कर्में जरी करी । उल्लंघन घाली अकर्मा भीतरीं ॥ध्रु॥

अकर्मी खरा अकर्मी खरा । तयासी नाहीं कर्म कर्मांतरा ॥१॥

कर्माकर्मभाव दोहींचा तो ठाव । जयामाजीं झालें दोन्हीही वाव ॥२॥

कर्म ना अकर्म न कळे त्याचें वर्म । केशव म्हणिजे त्यांते ब्रह्म ॥३॥

० पद ३५६

आहे तें नाहीं म्हणून बोलती । आहेपणासी नाहीं ते स्थापिती ॥ध्रु॥

बापुडे रे जन भुललें कैसें । देखत देखत लागलें पीसें ॥१॥

अमृत सांडुनी मृगांब सेवी । गोडपणें सांगे चिंचेची चवी ॥२॥

आहे तें आहे नाहीं तें नाहीं । नेणोनी केशवीं मुकलों पाहीं ॥३॥

० पद ३५७ वें

सद्गुरुवचनें मरण आलें । निरंजनीं कैसें सरण रचिलें ॥

बोधरवादीय स्मशाना नेलें । निर्गुण भूमिकें पिंजसीं ठेविलें ॥ध्रु॥

नवल मृत्यु कैसा वीतला पाहीं । जन्ममरण पुढें उरीच नाहीं ॥

ब्रह्माग्नी ज्वाळा फांकती आगळा । जाळुनिया पिंड अवघा शून्य केला ॥१॥

ज्ञानजळें स्नान घालुनियां पाहीं । विज्ञान मंत्राग्नी दीधला देहीं ॥

सवेंचि भडाग्नि आत्मचितेचा ठाईं । जळोनियां कांही उरलें नाहीं ॥२॥

म्हणती संतजन धन्य हें निधान । देहत्रयासी जालें विसर्जन ॥

स्वानंदे परिपूर्ण करिताती रुदन । स्वयंप्रकाशें होतसे दहन ॥३॥

यापरी निजतेजें मृत्यु अपरोक्ष । सहज हुत कैसें केलें अपरोक्ष ॥

सद्गुरुकृपें केशवीं प्रत्यक्ष । ब्रह्माग्नी जाला ब्रह्मांड मोक्ष ॥४॥

० पद ३५८ वें

इकुनी तेंची तिकुनी तेंची । जिकुनी पाहसी तीतुनी तेंची ॥ध्रु॥

उघडें नाहीं झांकले नाहीं । आहलें बाहलें तेंचि तें पाही ॥१॥

येथें आहे तेथें आहे । जेथें तूं म्हणशी तेथें आहे ॥२॥

सद्गुरुकृपें केशवीं पाही । पहावया तेथें दुसरें नाहीं ॥३॥

० पद ३५९ वें

आकार बुडोनी ठेला । निराकार लया गेला ॥

मग जो कां उरला । तोचि तूं पाहे ॥ध्रु॥

पाहतां न पाहणें । नुरे ज्याच्या दरुशनें ॥

पावलीया तोची होणें । अंगेंचीं स्वयं ॥१॥

जया नाहीं गांव-शीव । जया नाहीं रूप नांव ॥

भेटतांचि होय वाव । दृश्य हें सर्व ॥२॥

ऐसा देव परात्परू । जया नाहीं पारावारू ॥

स्वानंदे तदाकारू । केशवीं सहज ॥३॥

० पद ३६० वें

स्थूळाचें निरशन । लींगदेह मर्दन ॥

करूनियां ब्रह्मपूर्ण । पावती योगी ॥ध्रु॥

ब्रह्म तेंचि निराकार । निर्गुण निर्विकार ।

होउनि तदाकार । भोगिती सुख ॥१॥

जें पाहतां पाहणें सरं । भेटतां द्वैत नुरे ।

लाधलीयां वृत्ती विरे । निवृत्तीसहीत ॥२॥

सकळांचे जन्मस्थान । निजरूप सनातन ।

केशवीं अवसान । पावला तेथें ॥३॥

० पद ३६१ वें (चाल-खेळ्य़ाची)

जो मायेसी महत्तत्व ग्रासितो रे । तो जनीं-वनीं तत्त्व प्रकाशितो रे ॥ध्रु॥

आम्ही तयाचे बंदीजन जाहलों रे । त्याच्या चरणस्मरणें निवालों रे ॥१॥

जो अहं सोऽहं दोन्ही भेद छेदतु रे । जो त्रिपुटी वेगळें सौख्य बोधितु रे ॥२॥

जो एकपणेंविण येकदाचि नुरे । जो केशवीं सहज बोधें ठेवी तूं रे ॥३॥

० पद ३६२ वें

सागराच्या अंगावरी । सागर क्रीडा करी ॥

नेणोनि तया लहरी । म्हणिजे जैसें ॥ध्रु॥

तैसा स्वरूप होउनि पाहे । स्वरूपीं क्रीडत आहे ॥

तयासी माणुस माय । म्हणिजे कैसे ॥१॥

गगनाचिये खोळे । गगन आपण लोळे ॥

भिन्नत्व पाहतां डोळे । आंधळे होती ॥२॥

वन्हीचिया ज्वाळा । वन्हीवरी सोज्वळ ॥

तेथें भेदासी वेगळा । ठाव कैसा ॥३॥

जन्मोनी जन्मला नाहीं । मरण नेणेचि कांही ॥

केशव म्हणे तो पाहीं । सहज ब्रह्म ॥४॥

० पद ३६३ वें

स्तवन करितां मुखें । वेदही जाले मुके ॥

ऐसीया भूमिके । आरुढलों आम्ही ॥ध्रु॥

सद्गुरुकृपा ऐसी । प्रत्यक्ष फळली कैसी ॥

आम्हीपण आम्हांसी । उरलें नाहीं ॥१॥

आमुचें स्वरूप माय । सांगिजेसें काय आहे ॥

कांही नाहीं तेंची स्वयं । होउनी आसे ॥२॥

निजबोधें अवलीळा । सर्वांग झाला डोळा ॥

केशवीं देखनी कळा । दुजेनवीन ॥३॥

० पद ३६४ वें

देवची असोनि । देव दुऱ्हाविला ॥ केव्हडा पडला घाला । कल्पनेचा ॥ध्रु॥

सांगों मी वो काय । सांगो मी वो काय ॥ वांझेच्या लेकीची सोय । गोष्टी सांगे ॥१॥

स्वयं ब्रह्मयासी । मी जीव म्हणवी ॥ नसतें हें भोगवी । नाना दुःख ॥२॥

दृश्य द्रष्टा दर्शन । नहोनि येकलें ॥ तयासी घातलें । देहबंदीं ॥३॥

जिण्या मरणासी । अंत पहावो जेथें ॥ तयासी मानी येथें । जिणें मरण ॥४॥

आपणचि तरी । खपुष्प वैखरी ॥ नाथिली हे थोरी । दाखविली ॥५॥

संत केशव म्हणे पाहा तया पाहीं ॥ तव मायाचि नाहीं । उपजली तेथें ॥६॥

० पद ३६५ वें

वाळीयलें कर्म । वाळीयलें अकर्म ॥ वाळीयलें निष्कर्म । आजि आम्ही ॥ध्रु॥

वाळीयलें जीव । खोळीयल शीव ॥ वाळीयलें सर्व आजि आम्ही ॥१॥

वाळीयलें सद्रुप । वाळीयलें चिद्रुपा ॥ वाळीयलें आनंद स्वरूप । आजी आम्ही ॥३॥

वाळीयलें मीपण । वाळीयलें तूंपण ॥ केशवीं केशवपण । वाळीयलें ॥४॥

० पद ३६६ वें (चाल - धुम)

फुल गुंफे वास न गुंफे । देहकर्मी तैसें योगी न लिंपे ॥ध्रु॥

देहीचें देहकर्म देहबुद्धि बाधी । देहातीत योगी सहजसमाधी ॥१॥

कमलिनीदळ जळीं । न लिंपे जळ मेळीं । कार्यकर्मी तैसा परब्रह्म न्याहाळी ॥२॥

सर्वीं सर्वातीत सर्वत्र व्याप्त । गुरुकृपें केशवीं निजबोधें अलीप्त ॥३॥

० पद ३६७ वें

गुळाचेनि मीसें । गोडीची दिसे । गोडी पहातां गुळ न दिसे ॥ध्रु॥

तैसा जनीं दिसे जनार्दन । जर्नादनीं न दीसे जन ॥१॥

पटु सबाह्य नांदे तंतु । तंतु पाहतां पटुसी अंतु ॥२॥

कापुरीं परिमळ परीमळीं कापूर । गुरुकृपें केशवीं परी निजधूर ॥३॥

० पद ३६८ वें

अंतरी एक बाहेरीं एक । जेथें जावें तेथें लागलें येक ॥ध्रु॥

यापरी येकें घेतली पाठी । येक जडलें पोटींपाठीं ॥१॥

येकीं येक अनेकीं येक । येकानेकावेगळें येक ॥२॥

सगुणीं येक निर्गुणीं येक । सगुणा-निर्गुणावेगळें येक ॥३॥

देहीं येक विदेहीं येक । देह-विदेहावेगळें येक ॥४॥

सद्गुरुकृपें केशवीं देख । सहजीं सहज संचलें येक ॥५॥

० पद ३६९ वें

सगुणा अंगीं निर्गुण भासे । निर्गुण पाहतां सगुण ग्रासे ॥ध्रु॥

सगुणीं निर्गुण निर्गुणीं सगुण । स्वरूपीं दोहोंची मोडली खूण ॥१॥

सगुण नाहीं निर्गुण काई । सगुण निर्गुण भ्रांतिची ठाईं ॥२॥

गुरुकृपें केशवीं निजसुख पाहटा । आपोआप दोन्ही

मोडल्या वाटा ॥३॥

० पद ३७० वें

भ्रांतीचे आड जमनीक आलें । फेडावया धरी संताचीं पाउलें ॥ध्रु॥

जमनीक फेडा जमनीक फेडा । पाहों द्या निजरूप उघडा ॥१॥

जमनीक फेडा लागतों चरणा । मस्तकीं वाहणा वंदितु असे ॥२॥

गुरुकृपें केशवीं जमनीक फेडिलें । आपेआप निजस्वरूपीं

देखिलें ॥३॥

० पद ३७१ वें

आपला ठेवा आपण भोगावा । आणीकाच्या दैवा हेवा न करीं बा ॥धु्र॥

निढळींची अक्षरें लिहीली निटें । तयासी पालटे ऐसें नाहीं बा ॥१॥

पुढीलाच्या दैवा करिसी धांवधांवी । वारा मवीतां वावी सीणू जैसा ॥२॥

पूर्वी लिहिलें पाही त्सासी पालटू नाहीं । गुरुकृपें केशवीं सहजस्थिती राही ॥३॥

० पद ३७२ वें

अहंकार माया द्वैत उपाधी । नाथिलें संसार मीपणें बाधी ॥ध्रु॥

मीपणा सोडीं मीपणा सोडीं । सहजाची गोडी घेउनी राहे ॥१॥

मीपणाचे पोटीं जन्म-मृत्युकोटी । शिवत्व आणि जे जीवत्वापोटीं ॥२॥

मीपणें मोहो तूंपणें भ्रांती । गुरुकृपें केशवीं दोहोंवेगळी प्राप्ती ॥३॥

० पद ३७३ वें

अंतरीचा सखा अंतरीं पाहावा । आंतबाहेरीं वोळगावा वेळोवेळीं ॥ध्रु॥

जाणीव नेणीव सांडोनी बाहेरी । वोळखीजे अंतरीं गुरुकृपा ॥१॥

अंतरीच्या सुखें सबाह्य अंतरीं । भेटी निरंतरी माधवाची ॥२॥

सद्गुरु कृपादृष्टी केशवराजीं भेटी । चरणकमळीं मीठी पडली सदा ॥३॥

० पद ३७४ वें

येकला येकटु भेटला जुनाटु । अंतरीं तेणेसी सेश पाटु भरीला ग माय ॥ध्रु॥

अतिवृद्ध परी नागर तरुणा । बरवेंपणा काय वानुं ॥१॥

दृष्टी न भरोनी सर्वांगी वसे । रूप नाहीं परी बरवा दीसे ॥२॥

वृद्ध ना तरुणा नित्य नवा जाणा । वोळखिला खुणा मुळींचिया ॥३॥

गुरुकृपें केशवीं बरवया बरवा । अंतरीं भोगितां देहभावा

मुकलीया ॥४॥

० पद ३७५ वें

सद्गुरुचरणीं साधक दक्ष । तळीं पाहोनी वरी भेदिती लक्ष्य ॥ध्रु॥

भेदिलें ग निज लक्ष डोळां । अनुभवसोहळा निच नवा ॥१॥

देखणेंपणवीण देखणें असे । दृश्य नाहीं परी दर्शन होतसे ॥२॥

गुरुकृपें केशवीं देखणा पै जाला । सुखांचा सुकाळ डोळ्यां

केला ॥३॥

० पद ३७६ वें

चंद्राच्या दोंदावरी चांदिनें उठी । परतोनि रिघालें तयाच्या पोटीं ॥ध्रु॥

अवघा चंद्र तेथें चांदिणें काय । स्वयंप्रकाशी भेदु न साहे ॥१॥

स्वयंप्रकाश तेथें चंद्र ना चांदिणें । गुरुकृपें केशवीं सर्वांग देखणें ॥२॥

० पद ३७७ वें

वैखरीचा शब्द सामावला श्रवणीं । निमाला नादु राहिली ध्वनी ॥ध्रु॥

जेथीचा शब्द तेथें निमाला । मागुती वैखरी कैसेनी आला ॥१॥

जेथें निमाला तेथुनी उगवला । गुरुकृप केशवीं अनुभव वीतला ॥२॥

० पद ३७८ वें

ब्रह्म जाणोनिया सांडो म्हणती कर्म । त्याच्या अंगी जडे आधिक कर्म ॥ध्रु॥

भ्रम कर्माचें स्फुरण तचि ब्रह्मपूर्ण । अळंकारी सुवर्ण जयापरी ॥१॥

ब्रह्मेंसी वेगळें कर्म नाहीं । सांडी मांडी कल्पनेचा ठाई ॥२॥

सूर्य मिरवे प्रभा कीं प्रभेसी सूर्य ऊभा । तैसा ब्रह्मीं कर्मशोभा कर्मेंसी ब्रह्मा ॥३॥

तेथें कर्म ब्रह्म भ्रम हा कैंचा काय । ब्रह्मचि सबाह्य उघड नांदे ॥४॥

कर्माचें निजवर्म तेंचि निःखळ ब्रह्म । नेणोनि वाढे भ्रम अज्ञानासी ॥५॥

गुरुकृपें केशवीं निजबोधाचें कर्म । सर्व ब्रह्म तेथें वेगळें कैंचे कर्म ॥६॥

० पद ३७९ वें

कर्मयोगें ब्रह्म नव्हे म्हणती यक । ते नित्य नैमिकित्त आचरिती ॥ध्रु॥

त्यांसी ब्रह्मप्राप्ती दुरी जाली जाण । जे प्रमाणीं अप्रमाण गिवसु पाहती ॥

स्वप्रकाश वस्तु कम केंवी कळे । तमारी उजळे तम कैसा ॥१॥

देहाचे माथा गुणकर्म संस्था । ते देहचि मिथ्या स्वरुपीं जालें ॥

मिथ्या देहाचें कम तणे आकळी ब्रह्म । तो स्वप्न्नीचें सभ्रम जागृती भोगु ॥२॥

ज्ञानाग्निकर्माणि बोले च्रकपाणी । कर्मासी ब्रह्मपणीं ठाव कैसा ॥

गुरुकृपें केशवीं आश्रम वर्ण-धर्म । मिथ्या जाणोनि कर्म पावलें हीत ॥३॥

० पद ३८० वें

गुरुचा बाळक होउनियां । भजनप्रयागा येउनिया ॥ध्रु॥

चिन्मयतीर्थी न्हालों मी । हरि० पदिं निश्र्चळ जालों मी ॥१॥

अक्षय निजवट छायेशीं । हारविलें या मायेशीं ॥२॥

श्रद्धा श्राद्ध हें करुनियां । म्हणे केशव मीपण हरुनियां ॥३॥

० पद ३८१ वें

सत्वर येउनियां शिवसदना । जर्जर केलें मदना ॥ध्रु॥

त्याच्या चरणाची निजगोडी । तोडी भवभय बेडी ॥१॥

चित्सुखसागरिंचे मीन होती । ब्रह्मरसाप्रति घेती ॥२॥

समाधि-गिरीशिखरीं स्थिरावलें । स्व० पदीं उगलें ठेलें ॥३॥

केशव स्वामीसी आकळीलें । त्वं० पद तत्० पद गिळिलें ॥४॥

० पद ३८२ वें

समाधिदयानि हें निजतुर्या । अलक्ष हरिची प्रिया ॥ध्रु॥

ईची क्रिया हें सुखदात्री । निववीं गात्रा मात्रीं ॥१॥

स्मरणें स्मरबाधा निर्दाळी । मंगळदायक बाळी ॥२॥

केवळ माता हे साधूची । केशव महिमा वाची ॥३॥

० पद ३८३ वें

श्रवण मननेंविण निश्र्चळ राहे । जे ठाईं जन्मला तो ठाव पाहे रे ॥ध्रु॥

आकळ लीळा न कळे योगियांची । जाला गुणातीत मूर्ति शिवाची रे ॥१॥

माया ग्रासुनि तारिलें लोकां । तारुनियां लोक उडविलें देखा ॥२॥

गगनाचा अवकाश होउनि ठेला । केशव म्हणे सर्व केशव केला ॥३॥

० पद ३८४ वें

देह असोनि जालों विदेहीं । कर्म करुनी निष्कर्म पाही ॥ध्रु॥

त्यासि कैंचें भवबंधन । जें स्वानुभवेंचि मग्न ॥१॥

प्रालब्ध वर्तिती देहीं । परि अहंकर्तुत्व नाहीं ॥२॥

म्हणे केशव ० पदो० पदीं । ज्यासि निर्विकल्प समाधी ॥३॥

० पद ३८५ वें (सहज चाली)

पाणियाचा मासा झाला । नामरूपा नाहीं आला ॥ध्रु॥

तो पूर्वीच पाणी आहे । त्यासि पारधि साधिला काय ॥१॥

जळीं पारधी टाकी जाळें । तंव त्याचेंचि तोंड काळें ॥२॥

म्हणे केशव अवघा पाणी । मासेयाची नाहीं घाणी ॥३॥

० पद ३८६ वें

मातीभीतरीं नाहीं भीति । भीति पाहतां केवळ माती ॥ध्रु॥

तैसें स्वरूपीं नाही जन । जन अवघे आनंदघन ॥१॥

भीति वेगळें नाहीं चित्र । चित्र पहातां भीती मात्र ॥२॥

सूत्र पाहतां कळा नाहीं । कळारूपें चंद्रचि पाही ॥४॥

म्हणे केशव प्रतिती माझी । मी न बोलोनि बोलिलों आजी ॥५॥

० पद ३८८ वें

सद्गुरुकृपा जाली, निज वस्तु देखिली ।

कल्पनेची मोडली समूळ वाटा ॥

हरपला देहभाव, संकल्पा कैंचा ठाव ।

स्वरूपाचा अनुभव निजबोधें हो ॥ध्रु॥

पाहतां न पाहणें राहिलें पाहणें ॥

डोळियांसी देखणें डोळियानें केंवि ॥

पाहणें न पाहणें नुरे आत्मदरुशनें ।

यालागीं बोलणें नेति नेति हो ॥१॥

स्थूळ ना सूक्ष्म नव्हे सर्व जेथें सामावे ।

तें रूप जाणावें कैसेनी आतां ॥

परा पारूशली प्रमाणें अप्रमाण जालीं ।

दृष्टांति वाईली आन दिसावया हो ॥२॥

सदीं सदत्वु गेलें चिदीं चिदपण ठेलें ॥

आनंदत्व समावलें आनंदामाजी ॥

ऐसीया निजदृष्टी समाधि-युत्थान घोटी ॥

सद्गुरुकृपादृष्टी केशवराजीं हो ॥३॥

सकळांमाजीं असणें । परी तें सकळ नेणें ॥

सकळ जाणिजे जेणें । तेंचि तें ग बाप ॥१॥

गुणासि प्रकाशितें । परी तें गुणापरते ॥

जडासि चेतवितें । तेंचि तें ग बाप ॥२॥

व्यापक अंतर बाह्य । परी त्या रूप नाहीं ॥

नसोनि असणें कांही । तेंचि तें ग बाप ॥३॥

प्रकृतीमाजीं वसत । परी तो साक्षभूत ॥

शब्द जेथुनी स्फुरत । तेंचि तें ग बाई ॥४॥

सहजीं सहज मेळे । चालक परी वेगळे ॥

केशवीं प्रांजळें । तेंचि ते ग बाई ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP