श्रीकेशवस्वामी - भाग १८

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ४८५ वें

भाग्यमंद लोकां । नाठवे गोविंद । सर्वकाळ छंद । विषयाचा ॥ध्रु॥

छंदी जो वर्णीला । तया नाठवीती । नाना छंद करीती । मूर्खपणें ॥१॥

काय सांगों तया । लागीं वेळोवेळां । भजनमार्गीं डोळा । नुघडती ॥२॥

म्हणोनियां अंतीं । दुर्गती पावती । सायुज्य-संपत्ती । दुरी ठेली ॥३॥

देहबुद्धीच्या वाटे । रीघती नेटापाटे । त्रितापांचे कांटे । भरती अंगीं ॥४॥

तेणें दुःखें होतीं । बहुत राणभरी । प्राणसखा हरी । हारविला ॥५॥

अनाथांचा बंधु । योगियांचा रावो । देवाचाही देवो । निश्र्चयेसीं ॥६॥

संतसंगें प्राणी । तयासी नेणती । अधःपाता जाती । केशव म्हणे ॥७॥

० पद ४८६ वें

विषयसंगति बा । अति हिंपुटी होसी ।

चौऱ्यांशीं लक्ष सोंगें । आवश्यक हे घेसी ।

यालागी विषयांसी । जरी सांडुनी देसी ।

पावशी मोक्ष० पदा । माझी भाक घे ऐसी ॥ध्रु॥

सावधान सावधान । ऐक उघडुनी कान ।

धरूनी अभिमान । नको भरूं बा रान ।

काळ हा सर्प बा रे । तुज झोंबला पाहीं ।

होईं तूं परिक्षिती । वेळु न लव कांहीं ॥१॥

आयुष्य चाललें बा । येथें संदेह नाहीं ।

जाणोनि निजरूप । देहीं होय विदेही ॥२॥

गर्भिंच सुटवलें । त्याचें बारसें काय ।

तैसाचि देह जाणा । भास मात्र पैं आहे ।

आहे तंव हितकारी । काकतालीयन्यायें ।

केशवीं गुरुकृपें । ऐक्य पाहोनि राहे ॥३॥

० पद ४८७ वें

येक प्रपंच जाला होता । ऐसी स्वरूपीं नाहीं वार्तां ।

पुढें होईल मागुता । न घडे सर्वथा गा ॥ध्रु॥

मुळिं प्रपंच जाला नाहीं । पुढें होइल लटके पाहीं ॥

ऐसें जाणोनियां स्थिर राहीं । मग करणें नलगे तुज कांही गा ॥१॥

मिथ्या प्रपंचाचें भान । हेंचि कैचें भवबंधन गा ॥२॥

जो स्पप्नीं मरोनी जाळीला । तो जागृति नाहीं राख जाला ।

तेंवि प्रपंच जेणें देखिला । तोचि जीवन्मुक्त भला गा ॥३॥

रजिं सर्पाचें भासणें । भासतांहि लटिकें ठाणें ।

तैसा प्रपंच देखिला जेणें । त्सासी कैचें येणें जाणें गा ॥४॥

गुरुकृपें केशवीं भावो । तेथें देहभाव नाहीं ठावो ।

जन्ममरण जालें वावो । आतां कैचा देहि संदेहो गा ॥५॥

० पद ४८८ वें

ज्ञान-ध्यानाचें फळ सज्जन । सिद्ध निजात्मसुख-सदन गा ॥ध्रु॥

त्याचें ० पदांबुजीं ठेवी मन । तरी होशील आनंद-घन गा ॥१॥

जें साराचें केवळ सार । ज्याच्या नामेंचि पाविजे पार गा ॥२॥

जें क्षरींच अक्षर पाहीं । ज्यासी केशव ध्यात हृदयीं गा ॥३॥

० पद ४८९ वें

कर्म वेळुची अति दीर्घ काठी । वरी चीत भोवे कोल्हाटी ॥ध्रु॥

अति मीपणें तळपे पाहीं । केव्हां पडेल न कळे कांहीं ॥१॥

वासनेच्या अकोंडा गुंते । खाले डोई वरे पाय कुंथे ॥२॥

वेळु बांधिला पंचविस दोरी । खेळे कोल्हाट त्यांचिया शिरीं ॥३॥

भ्रांति ताट करिं घेउनि खेळे । देहबुद्धीनें अति आंदोळे ॥४॥

केशा म्हणे गुरुकृपें जोडे । तरी खेळचि अवघा मोडे ॥५॥

० पद ४९० वें

विज्ञानदिपक लाविला अंतरीं । प्राणसखा हरी नयनीं पाहे ॥ध्रु॥

हातोहातीं वय वेचेल रे बापा । काळ हा मापारी लागलासे ॥१॥

नरदेह गेलीया मागुतीं हें नाहीं । केशव म्हणे राही निजस्वरूपीं ॥२॥

० पद ४९१ वें

दिसतां मृगांबु हें तंव नाहीं । तैसा भवपुर पाही ॥ध्रु॥

नाहीं नाहीं रे सुजाणा । सांगे सद्गुरुराणा ॥१॥

वंध्या कुमराचा आकारू । तद्धिध हा संसारू ॥२॥

गगन सुमनाचा सुगंधू । तैसा केशवीं भेदू ॥३॥

० पद ४९२ वें

गोड ब्रह्मांड रचना । स्वरूपीं लटिकी जाणा ॥ध्रु॥

संत जाणती अंतरीं । अगाध त्यांची थोरी ॥१॥

मिथ्या बाधू हा मायेचा । परमानंदीं कैंचा ॥२॥

अवघा परतत्त्व अपवादु । केशवराजीं भेदू ॥३॥

० पद ४९३ वें (एकताळी)

अवघें जालें नश्र्वर । तेथें कैंचा ईश्र्वर ॥ध्रु॥

जितुकें डोळा दिसे बा । तितुकें स्वरूपीं नसे बा ॥१॥

ब्रह्मीं नाही ब्रह्मत्व । तेथें कैंचें शिवत्व ॥२॥

आहे नाहीं न साहे । केशव म्हणे ते पाहे ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP