श्रीकेशवस्वामी - भाग २०

केशवस्वामींनी मनोभावेंकरून आपल्या कार्यातून हिंदू जनतेस त्यांच्या ठिकाणी आपला धर्म, आपला देश, आपली संस्कृती, आपली भाषा इत्यादिकांसंबंधी जागॄत केले.


० पद ४९५ वें

अखंड आठवतां शिवपायां । भवदुःख गेलें वायां ॥ध्रु॥

म्हणवुनि सुखरुप मी बहु जालों । शिव० पद सेवुनि धालों ॥१॥

शिवासि क्षेम देतां शिव घेतों । शिवमय केवळ होतों ॥२॥

सर्वहि शिव जाला मज पाहीं । केशव म्हणे मी नाहीं ॥३॥

० पद ४९६ वें

सज्जन-सदनासी मी आलों । चिन्मय भूषण ल्यालों ॥ध्रु॥

म्हणवुनि मी जालों शिव पाहीं । द्वैतकथा मज नाहीं ॥१॥

समसुख भजतां शिवराया । सरली ममता माया ॥२॥

शिव मी शिव मी हें किति बोलों । मीपण ग्रासुनि डोलों ॥३॥

सर्व हें मजलागीं शिव भासे । भासे तितकें नासे ॥४॥

यापरि सांपडला शिव आजी । म्हणे केशव मी मजमाजी ॥५॥

० पद ४९७ वें

शिव नेणोनि सांगों मी कैसा काय रे । शिव जाणतां सांगणें सहज राहे रे ॥ध्रु॥

शिव जाणतां नेणतां बोलवेना । ऐसें जाणतां पडली मिठी मौन्या रे ॥१॥

शिव नेणोनि सांगतां नये माय । शिव पावल्या सांगतें लया जाय रे ॥२॥

रूप शिवाचें केशव सांगों जाय रे । गुरुरायें धरिलें मुख पाहे रे ॥३॥

० पद ४८९ वें ( राग - मल्हार)

नेत्रीं ब्रह्माग्नी ज्वाळा । अंगीं चिद्भस्म उधळा ।

आनंदाच्या मुंडमाळा । शोभती कंठीं ॥ध्रु॥

बाप कैलासीचा राव । स्वामी माझा महादेव ।

तयाच्या चरणीं भाव । लागला माझा ॥१॥

वेष्टित सदा सर्प मेळा । संगीं भूत सृष्टीपाळा ।

सर्वाचा जीवनकळा । ईश्र्वरू माय ॥२॥

मस्तकीं निज गंगाबाळा । अर्धांगी पार्वती विमळा ।

शंकराची लीळा । नवल देखिली बाई ॥३॥

भाळीं बोधचंद्र घन । सहजाचें नंदी वाहन ।

निजाचें गजाऽजीन । प्रावर्ण केलें ॥४॥

निरंजन समसानीं वस्ती । नरांचें कपाळ हातीं ।

केशवीं विश्रांति । रूप पाहतां डोळां ॥५॥

० पद ४९९ वें

शिव शिव म्हणती परी शिव नेणती ।

शिवालागीं जाणती ते महासुख पावती ॥ध्रु॥

शिवालागीं जाणती ते महासुख पावती ॥ध्रु॥

शिवालागीं जाणणें हें शिवेंविण नेणें ।

शिवसंगे शिव होणें शिवपायीं तरणें ॥१॥

शिव० पदीं आश्रम हा बांधती ते शिवाश्रम ।

शिवालागीं विश्राम राम ते योगी ॥२॥

शिवें शिव यजितां शिव जालें तत्वतां ।

शिव तें शिव तें आतां केशवस्वामी ॥३

० पद ५०० वें (कांबोध)

सदाशिव तूं शिव तूं निजभावें रे । मग पुढतीं न लागे यावें जावें रे ॥ध्रु॥

जिवा-शिवावेगळा शिव आहे रे । त्यासी शिव तो शिवची स्वयं होय रे ॥१॥

शिव सिवती ते सदा सुखी होती रे । शिवासंगें सबाह्य पालटती रे ॥२॥

गुरुकृपें केशव सीवों गेला रे । तो सहजचि शिव होउनि ठेला रे ॥३॥

० पद ५०१ वें (मस्तानी आरती)

कोन्हाचे अंगी भस्माचा उधळा । कोण्हासवें अखंड भुतांचा पाळा ।

कोणाचीये नेत्रीं वन्हीचे ज्वाळा । कोणाचिये कंठी नरमुंड-माळा ॥ध्रु॥

जयदेव जयदेव जय गंगाधरा । देवां माजी थोर महिमा सागरा ॥१॥

एका बाणें कवण त्रिपुरा वधिलें । चौदा चौकड्याचें राज्य कवणें दिधलें ॥

दुर्घट विष प्राशन कवणें पै केलें । जटाजुटी गंगे कवणें धरीलें ॥

सर्पभूषण अंगी कवणें मिरवीलें । कोणें व्याघ्रचर्मा परिधान केलें ॥३॥

स्मशानीं वास कोणें हा केला । कोण्या देवें मन्मथ जाळीला ।

हिंसक पापी भिल्ल कवणें तारीला । नेणें महिमा शेष वेद परतला ॥४॥

चांडाळिणी कृष्टी कैलासा नेली । ब्रह्मवदना शिक्षा कोणें दाविली ।

विष्णुयोनी करुनी कोणें भोगिली । केशव म्हणे मूढें अगणित तारीलीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP