कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय १५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

मुनी ह्मणे राया अवधारीं ॥ संजय गेलियाउपरी ॥ इकडे धर्म विनंती करी ॥ श्रीकृष्णासी ॥१॥

ह्मणे जैं वनवास प्राप्त जाहला तैं यादवांपरिस गोपाळा ॥ तुवां रक्षिलें कृपाळा ॥ आह्मां बहुतांपरी ॥२॥

आतां कुटूबकलहा पासोनी ॥ रक्षिलें पाहिजे आह्मांलागुनी ॥ तंव धर्मासि ह्मणे चक्रपाणी ॥ सांगें सखया मनोगत ॥३॥

धर्म ह्मणे शार्ड्गपाणी ॥ कौरवांची दुष्ट करणी ॥ मनीं आणिली संजयवचनीं ॥ म्यां साद्यंत ॥४॥

न देतां विभाग किंचित ॥ धृतराष्ट्र समजावूं पाहत ॥ तया पुत्रवशता बहुत ॥ वृथा लोभें गुंतला ॥५॥

तेरावरुषें कष्तलों अती ॥ तरीही राज्यविभाग न देती ॥ आतां हे कष्ट कोणाप्रती ॥ म्यां सांगावे गोविंदा ॥६॥

बंधु माता आणि कांतां ॥ मित्र सोयरे रायां समस्तां ॥ मज न येचि उत्तर देतां ॥ करूं काय ॥७॥

देवा तूं आमचा स्वामी आहेसी ॥ पांच गावें देववीं आह्मांसी ॥ अविस्थळ वृकस्थळ आंसदियेसी ॥ अवस्थान वारुणावत ॥८॥

कसबे अथवा गांव द्यावे ॥ आह्मीं एकत्र रहावें ॥ परि कौरवांचा नाश नव्हे ॥ तें करणें देवराया ॥९॥

जरी ऐसें न होय तरी ॥ निर्धन पुरुष या संसारी ॥ असोनि वोखटे काय न करी ॥ देवराया ॥१०॥

मित्र तरी धनरहितासी ॥ शववत् सांडिती जनवशी ॥ मग तो प्रवतोंनि अनर्थासी ॥ संबंधियं संहारी ॥११॥

तरी तो अनर्थ सर्वथा ॥ येऊं पाहे धृतराष्ट्रमाथां ॥ कां जे आमुची व्यवस्था ॥ तया कळत नाहीं ॥१२॥

आजि पाहें भक्षिजे ऐसें ॥ जयाचे घरीं कांहीं नसे ॥ तो जीवंतचि नव्हे तैसे ॥ जाहलों दीन आह्मी ॥१३॥

अंधासि विचार ऐसा नाहीं ॥ कीं वनवास बहु केला त्यांहीं ॥ तरी आजि देऊं काहीं ॥ नसेल भक्षावयासी ॥१४॥

कोणेपरे पांडव जीवती ॥ हें न देखे दुष्टसंगती ॥ तरी पडेल शोकावर्तीं ॥ ऐसें मज वाटतें ॥१५॥

असो विचारदृष्टी करोनी ॥ आह्मां पांच ग्राम देवोनी ॥ समजावील तरी शोकपासोनी ॥ तरेल तो ॥१६॥

आमुच्याठायीं तयासी ॥ भेद नसावा सर्वाशीं ॥ आमुचे कष्ट तरी वनवासीं ॥ देखिले तुवां ॥१७॥

आह्मां आपुली राज्यश्री घेतां ॥ जरी मृत्यु होईल अनंता ॥ तरी स्वर्गगती सर्वथा ॥ होईल निश्चयें ॥१८॥

परि आदौ नीतिधर्म करावा ॥ युद्धेंविण वांटा मागावा ॥ संग्राम करणें हा जाणावा ॥ शेवटील पक्ष ॥१९॥

कौरव मारूनि बाहेर घालणें ॥ हें उचित नाहीं पांडवांकारणें ॥ दुष्टाचरण परि काय करणें ॥ क्षात्रधर्म एवंविध ॥२०॥

धृतराष्ट्र असे पुत्रांधीन ॥ समजाविना आह्मां लागुन ॥ तरी या संकटीं तुजवांचुन ॥ कोण आमुचा दुःखहर्ता ॥२१॥

यावरी उभयवचनार्थीं ॥ बोलता जाहला श्रीपती ॥ कीं कौरव राज्य देती ॥ परि मृत्युनें नाहीं सोडिलें ॥२२॥

न देतां नाडतील अपायें ॥ परि म्यां शिष्टाईस जावें ॥ तंव बोलिलें धर्मरायें ॥ देवाप्रती ॥२३॥

त्वां जावें दुर्योधनाप्रती ॥ हें रुचत नाहीं माझें चित्तीं ॥ राया देखतां तुझी उक्ती ॥ नायकेल तो ।२४॥

दुष्टांमाजी सुष्टासी ॥ जातांनये निश्चयेंसीं ॥ जरी पावला इंद्रपदासी ॥ परि तो दुष्टचि कीं ॥२५॥

यावरी कृष्ण धर्मासि ह्मणे ॥ तो पापात्मा मी पूर्ण जाणें ॥ परि नीत्यर्थ लागतें जाणें ॥ राज्य मागाया सामोपायें ॥२६॥

जरी ते सर्व मिळोनि मातें ॥ अयुक्त आचरतील तेथें ॥ तरी जाळीन समस्तातें ॥ सामर्थ्याग्नीनें ॥२७॥

तेथें जातां लाभचि असे ॥ वांटा लहिजे वा बोल न बैसे ॥ धर्म ह्मणे जें युक्त असे ॥ तेंचि करावें स्वामिया ॥२८॥

आह्मां उभयताचें हित ॥ देवा तूं जाणसी यथार्थ ॥ यावरी बोलिला अनंत ॥ कीं मनोगत तुझें जाणें मी ॥२९॥

युद्धेंविण मिळेल तें बहुत ॥ हेंचि कीं तुझें मनोगत ॥ आणि संग्राम करणें हा प्रवर्त ॥ दुर्योधनाचा ॥३०॥

परि क्षत्रियें भिक्षा मागावी ॥ हे बोली कोठें नागवी ॥ युद्धीं जयमृत्युस्थिति व्हावी ॥ तो धर्माचि ब्रह्मावाक्यें ॥३१॥

मी हस्तनापुरीं जावोनी ॥ आणीन समस्तांच्या मनी ॥ परि तूं युद्धसामुग्री करोनी ॥ सिद्ध असें युधिष्ठिरा ॥३२॥

त्याविण समोपचारपणें ॥ राज्य नेदिजेल दुर्योधनें ॥ तंव भीमसेन कृष्णासि ह्मणे ॥ ऐकें देवा ॥३३॥

आपण मधुरवाक्य बोलावें ॥ जेणें समजतील कौरवें ॥ परि युद्धाविषई न काढावे ॥ वचनमात्र ॥३४॥

तो दुर्योधन अभिमानी ॥ साध्य नव्हे उग्रवचनीं ॥ मरेल परि निर्वाणी ॥ न सोडी आपुलें मत ॥३५॥

मैत्री होईल बांधवांसी ॥ दोष न लागेल आह्मासी ॥ ऐसें जाणोनि कार्य विशेषीं ॥ करणें देवा ॥३६॥

तंव बोलिला श्रीपती ॥ भीमा कौरवभयें शांती ॥ तुज उपजली असे निश्र्विती ॥ ऐसें मज वाटतें ॥३७॥

पूर्वी युद्धाची अखंडित ॥ तुज होती बुद्धी सत्य ॥ ते गेली परि युद्धाव्यतिरिक्त ॥ क्षत्रियासी जय नाहीं ॥३८॥

ऐसा शब्द आयाकिला ॥ तेणें भीमा आवेश चढला ॥ कृष्ण ह्मणे एतदर्थाचे भला ॥ असे माझा वचनार्थ ॥३९॥

तंव कृष्णासि बोलिलें पार्थ ॥ देवा पूर्वापर कळे मातें ॥ तरी काय सांगावें तूतें ॥ करीं वाटेल युक्त तेंची ॥४०॥

तुवां केले तें केलें आह्मी ॥ हें सत्य मानावें स्वामी ॥ कृष्ण ह्मणे यत्‍न करीन मी ॥ परि होणार दैवाधीन ॥४१॥

मन नकुळ जाहला बोलता ॥ काय नये गा तुज करितां ॥ सहदेवही ह्मणे अनंता ॥ ऐकें शब्द माझा ॥४२॥

कौरवीं द्रौपदीसहित ॥ आह्मीं कष्टविलें बहुत ॥ तरी त्यांचा करितां घात ॥ दोष न लागे आह्मासीं ॥४३॥

द्रौपदी ह्मणे सखया दादा ॥ त्यांहीं आह्मा केली आपदा ॥ तरी युद्धावांचोनि मुकुंदा ॥ न करावी शिष्टाई ॥४४॥

तूंचि सामर्थें देवोनि पांडवां ॥ मारवूं शकसी कौरवां ॥ हा धर्माभिप्राय जाणावा ॥ जो बोलिला संजयेंसी ॥४५॥

जो न शमे सामदानें ॥ परि जीवनेच्छा घरिली जेणें ॥ तेणें वैरियासि दंडणें ॥ ऐकें कृष्ण ॥४६॥

मी दुपदरायाची नंदिनी ॥ अयोनिसंभव असोनी ॥ घृष्टद्युभ्नाची बहिणी ॥ अजमीढकुळीं ॥४७॥

पंडुस्त्रुषा पांडवकांता ॥ पांचा पुत्रांची असोनि माता ॥ तिये मजसी पति देखतां ॥ गांजिलें कौरवीं सभेंत ॥४८॥

सकळां समक्ष माझीं वसनें ॥ हरिलीं नष्टें केशाकर्षणें ॥ तैं पीतांबर परिधानें ॥ रक्षिलें तुवां मजलागीं ॥४९॥

तरी ते कौरव दंड पावती ॥ हें तूं सकळ जाणती चित्तीं ॥ यास्तव मातें लक्ष्मीपती ॥ करीं सुखी या संकटीं ॥५०॥

भ्रतारादेखतां स्त्रियेसी ॥ जरी भलता गांजी द्वेषी ॥ तरी जाणावें त्या पतीसी ॥ मृतासमान ॥५१॥

जरी न झुंजती भीमार्जुन ॥ तरी माझ पिता ससैन्य ॥ सभ्रातृपुत्रपुढे करुन ॥ युद्धकंदन करवीन मी ॥५२॥

दुर्योधन दुःशासन कर्ण ॥ यांचें धडमुंड नाहीं खंडण ॥ तोंवरी न संतोषे मन ॥ माझें दुःखभागिनीचें ॥५३॥

तेरावरुषें परियंत ॥ म्यां कष्ट साहिले बहुत ॥ ऐसें बोलोनि अश्रुपात ॥ करिती जाहली ॥५४॥

तंव प्रेमें ह्मणे श्रीपती ॥ माये आतां स्वल्पदिनांतीं ॥ कौरवांच्या स्त्रिया रडती ॥ होवोनि हतभर्तुका ॥५५॥

नायकतील माझें वचन ॥ तरी करतील भूमिशयन ॥ कोल्हेया श्‍वानाचें भोजन ॥ होतील सत्य ॥५६॥

जरी कनंकाद्रीचे मोडतील हुडें ॥ आकाश फुटोनि पृथ्वी उडे ॥ तरी मद्दाक्य वृथा घडे ॥ ऐसें मानी पांचाळी ॥५७॥

रुदन न करीम वो बहिणी ॥ राज्य पावसी स्वल्प दिनीं ॥ ऐसें श्रीरंगे बोलोनी ॥ सुखी केलें द्रौपदीये ॥५८॥

शरदांती मार्गशीर्षमासीं ॥ हेमंत पूजोनि ब्राह्मणांसी ॥ रथी बैसोनि हृषीकेशी ॥ सत्यकीसह निघाला ॥५९॥

आयुधसामुग्री सह रथीं ॥ बैसोनि चालिला दुष्टांप्रती ॥ तया सकळही बोळविती ॥ धर्मादिक ॥६०॥

धर्में आलिंगोनि कृष्णासी ॥ ह्मणे आमुचे कुंतियेसी ॥ नमस्कार सांगोनि प्रेमेंसी ॥ भेटावें तुवां ॥६१॥

ह्मणावें आह्मां निमित्तें ॥ बहुत क्केश जाहले तूतें ॥ आतां तें दुःख अनंतें ॥ फेडिजेल ॥६२॥

मग अंध भीष्मादि मुख्य ॥ विदुरादि कौरव सकळिक ॥ तयां क्षेम नमस्कारादिक ॥ करावे आमुचे हातें ॥६३॥

असो स्वसैन्यें हस्तनापुरीं ॥ कृष्ण निघाला झडकरी ॥ तंव मार्गीं नानापरी ॥ जाहले अपशकुन ॥६४॥

दिव्यभौम आंतरिक्ष ॥ त्रिघा उत्पात अशुभंसूचक ॥ जाहले परि अविशेष ॥ करोनि चालिला ॥६५॥

उपलव्यनगरापासोनी ॥ जातां लोक भेटती येवोनि ॥ ते नानाउपचारें पूजोनी ॥ स्तविती देवा ॥६६॥

असो कृष्ण हस्तनावतीस गेला ॥ सकळा क्षेमें भेटता जाला ॥ कुशळ नमस्कार सांगीतला ॥ पांडवांचा ॥६७॥

यावरी पांडववृत्तांत सर्व ॥ पुसते जाहले कौरव ॥ तंव बोलिला अपूर्व ॥ कृष्णनाथ ॥६८॥

ह्मणे विनवोनि पंडुनंदनीं ॥ तुह्मीं पुसिलेंसे सद्दचनीं ॥ आतां ऐका चित्त देवोनी ॥ धर्ममनोगत ॥६९॥

पांचांही जणांचे अनुमत ॥ ऐका तुह्मी हो समस्त ॥ कीं आमुचें कुळक्रमागत ॥ राज्य द्यावें कौरवीं ॥७०॥

हाचि मुख्य हेतु आहे ॥ परि अर्धराज्य तयांचें होये ॥ हा मध्यम न्याय पाहें ॥ धृतराष्ट्रागा ॥७१॥

नातरी पांच ग्राम देणें ॥ हा शेवटील विचार जाणणें ॥ तरी तिहींमाजी येक करणें ॥ मानेल तो ॥७२॥

वडील पुरुष कुळांमंधीं ॥ तो अवघें अरिष्ट चुकवी बुद्धी ॥ कुळक्षय होवों नेदी ॥ तेंवी धृतराष्ट्र उभयतां ॥७३॥

जरी हा विरोध चुकवाल ॥ आणि थोडें बहुत द्याल ॥ तरी आह्मीं तें मानिजेल ॥ बहुत ऐसें ॥७४॥

अधम नर विरोध करित ॥ त्याचें फळ कठिण बहुत ॥ ह्मणोनि लोभ न करीं अत्यंत ॥ दुर्योधना तूं ॥७५॥

नातरी धृतराष्ट्र अवधारीं हा कलिरूप गांधार घालवीं बाहेरी ॥ कुळ रक्षावें चतुरीं ॥ त्यजोनि एकांतें ॥७६॥

हें न कराल तरी भीमार्जुन ॥ द्रुपद विराट धृष्टद्युम्र ॥ ऐसे सर्वराजे मिळोन ॥ राज्य घेवों पाहती ॥७७॥

हे बोल सत्य करोनी ॥ तुह्मी मानावें सकळजनीं ॥ अन्याचें लटिकें ह्मणाल ह्मणोनी ॥ मज पांडवीं घाडिलें ॥७८॥

तरी पांडव तुह्मीं आणावे ॥ पांच ग्राम तयां द्यावे ॥ ते धर्मपुत्रवत जाणावे ॥ धृतराष्ट्रा तुवां ॥७९॥

कठिणत्व तयांचे ठायीं ॥ तुज धरितां नये पाहीं ॥ हें कृष्णोक्त ऐकोनि काहीं ॥ दुर्योधन बोलिला ॥८०॥

कृष्णा तुं त्यांचा ह्मणोनी ॥ प्रवर्तलासी तद्धितकरणीं ॥ परि कुष्टिपुत्रां लागोनी ॥ कायसी राज्यगोष्टी ॥८१॥

आतां तयांचें वदन ॥ आह्मीं पाहूंनये जाण ॥ पुनरपि सेवावें कानंन ॥ वृथा ग्राम मागणें ॥८२॥

कृष्णा आह्मी तरी तूतें ॥ येथें पाचारिलें नवतें ॥ तरी या कार्यार्थीं निरुतें ॥ तुझें येणें कां जाहलें ॥८३॥

तंव कृष्ण ह्मणे रे गांधारा ॥ न करीं अत्यंत अहंकारा ॥ ययाती स्वर्गापासोनि अवधारा ॥ पडला अभिमानास्तव ॥८४॥

मग तो तारिला दौहित्रांहीं ॥ तैसे पांडव तारक पाहीं ॥ ते न विरोधावे कहीं ॥ हें तुज हित सांगतों ॥८५॥

पांच ग्राम तयां द्यावे ॥ पांडव समजावूनि आणावे ॥ मग अनर्थ चुकती स्वभावें ॥ सर्व तुमचे ॥८६॥

तंव धृतराष्ट्र ह्मणे गा श्रीहरी ॥ माझें मन आहे पांडवांवरी ॥ परि दुर्योधनें सर्वापरी ॥ केलें आधीन मज ॥८७॥

तरी तूं आमुचा सोयरा ॥ तयाचें सफळ करीं दातारा ॥ मूर्ख जाणोनि गांधारा ॥ नानापरी समजावीं ॥८८॥

यावरी कृष्ण मधुरवचनीं ॥ समजावीत तियेक्षणीं ॥ ह्मणे गांधारा चित्त देवोनी ॥ ऐकें वाक्य ॥८९॥

माझें ह्मणितलें करिसी ॥ तरी सपरिवार सुखी हौसी ॥ दिगंत कीतींतें पावसी ॥ कीं भारतवंशीं श्रेष्ठ ॥९०॥

साधु तुज मानिती तरी ॥ नष्टप्राय प्राण न हारीं ॥ अधर्मासी नांगिकारीं ॥ करीं पितृवाक्य ॥९१॥

भीष्म द्रोणादि सोयर्‍यांसी ॥ हेंचि आवडे सर्वासी ॥ कीं सख्य कीजे पांडवांसी ॥ साडोनि अभिमान ॥९२॥

गर्व सांडितां सकळांचें हित ॥ न सांडितां होतो घात ॥ जो बंधूसी वैर करीत ॥ बळें पारकेयंचेनी ॥९३॥

तो मूढ नासेल लवलाहे ॥ ज्ञातिविरोध मृयुकारी आहे ॥ पांडवां जिंकी ऐसा पाहें ॥ नाहीं कोणी त्रिभुवनीं ॥९४॥

ह्मणोनि न करीं अवगणन ॥ अर्धराज्य तयां देवोन ॥ थोर राजलक्ष्मी पावोन ॥ सुखें राहें संसारीं ॥९५॥

वडिलांचें ह्मणितलें करावें ॥ तेणें सर्वार्थीं सुखी व्हावें ॥ हें ऐकोनि भीष्मदेवें ॥ ह्मणितलें गांधारासी ॥९६॥

हा हितकारी यदुराणा ॥ यांचें ऐकें दुर्योधना ॥ न करितां मुकोनि स्वप्राणा ॥ होसील जयोवगळा ॥९७॥

मातापितायांचें वचन ॥ तथा आप्तांची शिकवण ॥ झणीं करिसील अव्हेरण ॥ तरी नाशातें पावसी ॥९८॥

जेथ कृष्णार्जुन तेथ जयनीती ॥ ह्मणोनि न करीं कौरवशांती ॥ पांडव बरवें मानिती ॥ तें तूं आचरें ॥९९॥

घडीघडी सांगता नये ॥ जें रुचेल तेंचि करणीय ॥ तंव विदुर समयीं तिये ॥ बोलता जाहला ॥१००॥

ह्मणे तुझी मज चिंता नाहीं ॥ परि धृतराष्ट्र गांधारीची असे पाही ॥ तुझेनि दुष्टत्वें सकळही ॥ पावती नाश ॥१॥

मग अन्नवस्त्र अंधासी ॥ कोनी देणार नाहीं परियेसीं ॥ भिक्षा मागाया गृहगृहासी ॥ लागेल जावें ॥२॥

यांचें पाप फळा आलें ॥ तुज ऐसें दुष्ट जन्मले ॥ अद्यापि तरे काहीं भलें ॥ घरीं मानसीं ॥३॥

अंध ह्मणे गा दुर्योधना ॥ तूं ऐकें कृष्णवचना ॥ तेणें पराभव होईना ॥ आपणासी ॥४॥

कृष्णासांगातें जावोनी ॥ आणि धर्मा समजावोनी ॥ हें तुज उचित ह्मणवोनी ॥ करीं पुत्रराया ॥५॥

तुझी अंतरीं कींव करोनी ॥ नीति सांगतो चक्रपाणी ॥ तें न करितां कौरव रणीं ॥ मरतील तुजसहित ॥६॥

यावरी भीष्मद्रोण बोलिले ॥ पांडवीं युद्ध नाहीं चिंतिलें ॥ तंव समजूनि घ्यावें आपुलें ॥ अर्ध राज्य ॥७॥

ऐसा हा समय गेलिया ॥ मागुता न ये कांहीं केलिया ॥ असो तंव नारद तिये ठाया ॥ पातला अकस्मात ॥८॥

मग नारदाकरवीं श्रीकृष्णें ॥ राज्यवृत्त गांधाराकरणें ॥ सांगविलें नीतिवचनें ॥ परि तो नेघेचि तें ॥९॥

येरू ह्मणे कृष्णालागुनी ॥ तुह्मी सकळही मिळोनी ॥ पांडवांसी वाखणोनी ॥ माझी निंदा करितसां ॥११०॥

धर्में द्युत खेळोनि हारविलें ॥ दूषण मज तुह्मीं लाविलें ॥ तरी म्या काय आचरिलें ॥ अपराधपण ॥११॥

पांडवांचें भय मजकारणें ॥ तुह्मी दावितां क्षणोक्षणें ॥ परि मी इंद्रादिकंही न माने ॥ कोण गणना पांडवांची ॥१२॥

भीष्मद्रोण कर्णादिक ॥ वीर असतां अनेक ॥ झुंजतां पावेल त्रैलोक्य ॥ पराजयातें ॥१३॥

तरी पांडवांची कोण गुणना ॥ हा निश्चय माझिये मना ॥ युद्धीं मेलिया तरी जाणा ॥ पावेन स्वर्ग ॥१४॥

युद्धीं भूमिशयन बरवें ॥ परि वैरियां न नमावें ॥ क्षत्रियें ब्राह्मण वंदावें ॥ येरां दंडावें समग्रां ॥१५॥

पूर्वीं माझिये बापें त्यांतें ॥ पांचग्राम दीधले होते ॥ ते मज जिंकोन मागुते ॥ पाहती घेऊं ॥१६॥

परि कृष्ण ऐक वृत्तांत ॥ जोंवर मी आहे जिवंत ॥ तंव राज्य संबंध नाहीं प्राप्त ॥ पांडवांसी ॥१७॥

जंव मी जीवंत ऐका ॥ तंव सुईच्या अग्रींची मृत्तिका ॥ तेही तयां नेदीं देखा ॥ हा कृतनिश्चय ॥१८॥

ऐसें दुर्योधन बोलिला ॥ तंव श्रीकृष्णा हासिन्नला ॥ मग कोपोनि ह्मणें लागला ॥ दुर्योधनासी ॥१९॥

अरे मूढा धीर धरीं ॥ मंत्रियासहित पडसी समरीं ॥ आठवेल तिये अवसरीं ॥ वचन माझें ॥१२०॥

मूढां तूं ह्मणतोसि पाहीं ॥ कीं माझा पांडवांच्या ठायीं ॥ अपराध काहीं नाहीं ॥ तरी ऐका राजेहो ॥२१॥

हे चांडाळ चारी मिळोनी ॥ द्युत खेळले कपटेकरोनी ॥ एकंवशीय धाकुटे असोनी ॥ कपटाचरण ॥२२॥

पतिव्रता त्यांची कामिनी ॥ विटंबिली सभे आणोनी ॥ दुःशासन केशाकर्षणीं ॥ दुरुत्तरें कर्णाचीं ॥२३॥

इतुकियां कारण झालासी ॥ आतां मी निरपराधी ह्मणसी ॥ तरी हें तंव त्रैलोक्यासी ॥ असे विदित ॥२४॥

मागां पुढें बंधूच्या ठायीं ॥ ऐसें कोणीं केलें नाहीं ॥ पार्था बुडविलें डोडीं । विष घातलें भीमासी ॥२५॥

कुंतीसहित पांडवांसी ॥ वारुणावतीं जाळीत होतासी ॥ आणि कष्टविलें वनवासीं ॥ तेरावरुषें ॥२६॥

ऐसें अनेक दोष असतां ॥ न लाजसी निरपराधी ह्मणतां ॥ त्यांसी वधावया बहुतां ॥ उपायीं प्रवर्तलासी ॥२७॥

परि दैवें पांडव वांचले ॥ आतां वांटा मागों आले ॥ तेथेंही लोभें फिरविलें ॥ वदन तुवां ॥२८॥

ऐसी तुझी करणीं निंद्य ॥ मांस न खाती कीट गीध ॥ अजूनि तरी ऐकें विशद ॥ वाक्य वडिलांचें ॥२९॥

तंव दुःशासन गांधारा ह्मणे ॥ अगा पांडवां वांटा देणें ॥ येरव्हीं धृतराष्ट्र भीष्मदोणें ॥ करिजेल अनर्थ ॥१३०॥

बांधोनि तुजमज कर्णातें ॥ हे देतील पांडवांतें ॥ या बंधुवाक्यें क्रोधातें ॥ पावला गांधार ॥३१॥

मग बंधु आमात्यांसहित ॥ उठोनि चालिला न बोलत ॥ अनादर केला तेथ ॥ समस्तांचा ॥३२॥

ऐसें देखोनि भीष्में ह्मणितलें ॥ हें कौरवकुळ काळें पिकलें ॥ मंत्रेविण राज्य केलें ॥ जाईल केवीं गांधारा ॥३३॥

यावरी ह्मणे श्रीहरी ॥ कंस यादवकुळक्षयकारी ॥ तो म्यां मारूनि जयापरी ॥ सुखी केले समस्त ॥३४॥

तेवीं दुर्योधनादि शकुनी ॥ दुःशासनातें धरोनी ॥ द्यावे पांडवां लागोनी ॥ तेणें सर्व सुखी व्हाल ॥३५॥

ऐसें धृतराष्ट्रें ऐकोनी ॥ गांधारी बाहिली तिये स्थानीं ॥ मग तियेप्रति कोपोनी ॥ बोलता जाहला ॥३६॥

हा तुझा पुत्र लौल्यत्वें ॥ टाकूं पाहतो ऐश्वर्यप्राणातें ॥ अनादरोनि वृद्धवाक्यातें ॥ गेला सभेपासोनी ॥३७॥

तंव गांधारी ह्मणे विदुरा ॥ येथें बोलावा गांधारा ॥ येरें सभे आणिला सत्वरा ॥ दुर्योधन ॥३८॥

तयासि माता बहुतां रीतीं ॥ जाहली नीतिशास्त्र बोलती ॥ शेवटी ह्मणितलें धरीं चित्तीं ॥ कृष्णवाक्य ॥३९॥

अरे भीष्मद्रोणें विदुरें ॥ मानलेंसे ॥ कृष्णोक्त खरें ॥ तें आपणेया साचोकारें ॥ मानावें लागे ॥१४०॥

तूं कृष्णार्जुनभीमासी ॥ कोणाचेनि बळें जिंकिसी ॥ तरी कृष्णें सहित पांडवांसी ॥ करीं मित्रत्व ॥४१॥

ज्यांचेनि बळें राज्यतृष्णा ॥ तूं करिसी दुर्योधना ॥ ते पांडवांपुढें रणा ॥ नव्हती विजयी ॥४२॥

तरी वाटा देवोनि सख्य करीं ॥ नको वृथा कौरवसंहारीं ॥ त्रास पावतील अन्य वैरी ॥ ऐसा प्रताप वाढवीं ॥४३॥

हा मातृशब्द ऐकिला ॥ तेणें मागुता कोपला ॥ दुष्टत्रयां जवळी गेला ॥ करावया मंत्र ॥४४॥

ह्मणे हे धरोनि आपणासी ॥ अवघे देतील पांडवांसी ॥ तरी काय कीजे ऐसियासी ॥ सांगा मज ॥४५॥

यावरी हीनमंती बोलती ॥ कीं हे आपणातें धरिती ॥ कृष्णवाक्य धरोनि चित्तीं ॥ भीष्मादिक ॥४६॥

तरी आपणचि पहिलेन ॥ या कृष्णासि करूं बंधन ॥ मग पांडवांचें बळिष्ठपण ॥ कळेल सहजें ॥४७॥

ऐसा दुष्टी विचार केला ॥ तो सात्यकीसि कळों आला ॥ तेणें कृतवर्मा पाचारिला ॥ ह्मणितलें त्यासी ॥४८॥

तुह्मीं सैन्य सिद्ध करोनी ॥ द्वारीं असावें ससरोनी ॥ जंव मी सांगेन चक्रपाणी तंव परियंता ॥४९॥

असो भार सन्नद्ध केला ॥ मग सात्यकी सभे आला ॥ श्रीकृष्णासी ह्मणे तुजला ॥ धरूं पाहतो गांधार ॥१५०॥

तरी आह्मीं असतां येवढे ॥ ऐसें कदापीही न घडे ॥ परंतु विचारणें पडे ॥ श्रुतदृष्टांचें ॥५१॥

ह्मणे धृतराष्ट्रविदुरांप्रती ॥ हे दुष्ट कृष्णातें धरूं पाहती ॥ परि अग्नीसि वस्त्रें बांधिती ॥ केवीं मूर्ख ॥५२॥

तंव धृतराष्ट्रा ह्मणे विदूर ॥ ऐकें पुत्राचें चरित्र ॥ बळेंकरोनि पामर ॥ मरूं पाहें ॥५३॥

परि श्रीकृष्ण ह्मणे अंधारी ॥ आतां आज्ञा द्यावी मजसी ॥ हे मज घरोत कीं मी यांसी ॥ धरीन जाण ॥५५॥

हें निंद्यकर्म म्या केलें ॥ परि धर्मकार्य जोडलें ॥ आणि मनोरथ पुरले ॥ भीमार्जुनांचे ॥५६॥

ऐसें ऐकोनि धृतराष्ट्र ॥ पाठवोनियां विदुर ॥ बोलाविला सहमित्र ॥ दुर्योधन ॥५७॥

मग ह्मणे रे पापिया ॥ तूं धरूं पाहसी यदुराया ॥ दुष्टमंत्रेकरोनियां ॥ कर्णशकुनीचे ॥५८॥

तरी इंद्रादिकां देवां ॥ उपायशतें नधरवे सर्वा ॥ तो केवीं मूढां कौरवां ॥ आतुडेल ॥५९॥

पतंगे वेंटाळितां अग्नीतें ॥ तो स्वयेंचि पावे नाशातें ॥ तैसें होईल रे तूतें ॥ सपरिवार ॥१६०॥

ऐसेंचि विदुरें ह्मणितलें ॥ तंव श्रीकृष्ण काय बोले ॥ मातें जाणोनि येकलें ॥ धरुंपाहतो पापात्मा ॥६१॥

तरी माझ्या शरीरीं पाहें ॥ हें त्रैलोक्य सकळ आहे ॥ रुद्रेंद्रादि सुरनरकाय ॥ दैत्यपन्नग ॥६२॥

ऐसें ह्मणोनि तिये वेळे ॥ विश्वरुप दाखविलें ॥ कृष्णें हास्यमात्र केलें ॥ तंव प्रकटलें असंभाव्य ॥६३॥

अग्निपासाव स्फुलिंग जैसे ॥ देवर्षिकिन्नरगर्धव तैसे ॥ थोररूपें देखोनि परियेसें ॥ झांकिले नेत्र सकळांही ॥६४॥

भीष्मद्रोणाविदुरसंजयांसी ॥ दिव्यचक्षु देत हृशीकेशी ॥ वेगळे करोनि इतुक्यांसी ॥ सर्व जाहले भयभीत ॥६५॥

परम आश्चर्य पावले ॥ मग विश्वरूप आच्छादिलें ॥ असो सैन्यासह निघाले ॥ तंव धृतराष्ट्र बोलिला ॥६६॥

कीं हे माझेचि पुत्र श्रीपती ॥ सांगितलें न ऐकती ॥ तरी आपण पांडवांप्रती ॥ सांगावें ओजें ॥६७॥

यावरी भीष्मादिराजे आले ॥ श्रीकृष्णा बोळवीत चालिले ॥ तंव देव बिजें केलें ॥ विदुरागृहीं ॥६८॥

कुंतीचें दर्शन घेवोनी ॥ वृत्तांत कथिला संक्षेपोनी ॥ हें कुरुकुळ पिकलें देंठोनी ॥ पडेल गळोनि धरणीये ॥६९॥

आतां जातसों आह्मी ॥ कांही निरोप द्यावा तुह्मीं ॥ तंव कुंती ह्मणे स्वामी ॥ धर्मा हेंचि सांगावे ॥१७०॥

आतां स्वधर्महानी न कीजे ॥ जें बाहुबळें मेळविजे ॥ तेंचि शुद्धद्रव्य जाणिजे ॥ तरी झुंजिजे पराक्रमें ॥७१॥

अन्योक्तीनें ह्मणें क्षत्रिणी ॥ होती कोर्णायेके भुवनीं ॥ तिचिये पुत्राचे राज्य हिरोनी ॥ घेतलें सिंधुरयें ॥७२॥

मग तो दीन होवोनि राहिला ॥ मातेनें उद्मम तया कथिला ॥ तेणेंकरोनियां पावला ॥ राज्य पूर्वील ॥७३॥

तैसेंचि पितृराज्य पाहें ॥ धर्मा तुवां बुडविलें आहे ॥ तें मागुतें घ्यावें उत्साहें ॥ ऐसी आज्ञा माझी तुज ॥७४॥

द्रौपदीसि पुत्रांसहित ॥ क्षेम पुसावें पांडवातें ॥ माझिये कुशळक्षेमते ॥ सांगिजे तुवां ॥७५॥

श्रीकृष्ण शुभमार्गें जावें ॥ मत्पुत्रातें सदा पाळावें ॥ मग प्रदक्षिणा करोनि देवें ॥ वंदिली कुंती ॥७६॥

यावरे सिंहत्राणें चालिले ॥ भीष्मादिकांसी मुरडविलें ॥ कर्णा स्वरथीं घेवोनि वहिलें ॥ तया कथिलें येकांतीं ॥७७॥

कीं तूं उदार आणि झुंजारू ॥ तरी दुष्टबुद्धी नको धरूं ॥ ऐसा नानापरी विचारू ॥ कथिला तया ॥७८॥

परि तो नायकचि त्या बोला ॥ ह्मणोनि देवें पाठविला ॥ श्रीकृष्ण उपलव्या पावला ॥ सैन्यासह ॥७९॥

भीष्मादिकही फिरोनि आले ॥ ते दुर्योधना बोलिले ॥ कीं गा धर्मचरणीं वहिलें ॥ लागिजे तुवां ॥१८०॥

श्रीकृष्णदेव साह्य ज्यांसी ॥ कोणेबळें जिंकिसी त्यांसी ॥ तये धर्मिष्ठां जवळी आह्मासी॥ केविं घडे जय प्राप्त ॥८१॥

आह्मां मरणाची नाहीं खंती ॥ सर्व भोग भोगिले आहेती ॥ आयुष्यें पूर्ण जाहलीं निश्वितीं ॥ भोगोनि भोग ॥८२॥

परि तूं राज्यसुख प्राण ॥ कां दवडिसी निष्कारण ॥ जाई धर्मराया शरण ॥ बंधुजन मिळोनी ॥८३॥

तूं राज्यविभांग करीं ॥ मग तूतें धर्म न मारी ॥ परि तो वाक्य नांगिकारी ॥ साभिमानें ॥८४॥

यावरी तो उठोनि गेला ॥ कर्णासि पुसों लागला ॥ येरें वृत्तांत सांगीतला ॥ कृष्णकथिल ॥८५॥

ते कथा पुढें अपूर्वा ॥ सांगिजेल श्रोतयां सर्वां ॥ असो धर्ममुख्य पांडवां ॥ भेटला श्रीकृष्ण ॥८६॥

मग शिष्टाईचा वृत्तांत ॥ देवें सकळां केला श्रुत ॥ ह्मणे क्षात्रधर्म प्रवृत्त ॥ कीजे आतां ॥८७॥

यानंतरें संग्राम उद्मम ॥ कैसा करील राव धर्म ॥ तो ऐकावा अनुक्रम ॥ ह्मणे मधुकरकवी ॥८८॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ नवमस्तबक मनोहरू ॥ श्रीकृष्णशिष्टाईप्रकारु ॥ पंचदशाऽध्यायीं कथियेला ॥१८९॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP