कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नम: ॥

वैशंपायन ह्मणती नृपवर ॥ रात्रभरी विखुंरतां दळभारा ॥ गंधर्व गेलिया नंतरें ॥ येकवट जाहला समग्रां ॥१॥

रणभूमीतें पाहती ॥ परि दुर्योधना न देखती ॥ कर्णदु:शासनादिक ॥ माना खालत्या घालती ॥२॥

थोर करोनि हाहा:कार ॥ ह्मणती काय जाहला गांधार ॥ येक ह्मणती गंधर्वी नेला ॥ अनर्थ जाहला अनिवार॥३॥

हें अपयश घेवोनि शिरीं ॥ कैसें प्रवेशावें नगरीं भीष्मद्रोणांचें हंसें जाहलें॥ आतां शस्त्रें घालूं उरीं ॥४॥

आतां कोणा जावें शरण ॥ जो हें निवारील विघ्न ॥ तंव सोमदत्त बोलिला ॥ माझें आइका वचन ॥५॥

आजी अर्जुनासम कोणी ॥ क्षत्रिय नाहीं त्रिभुवनीं ॥ जेणें जाळिलें खांडववन ॥ युध्दीं जिंकिला शूळपाणी ॥६॥

तोचि झुंजोनि गंधर्वासी ॥ सोडवूंशके गांधारासी ॥ तरी दूत येक पाठवुनी ॥ सर्व सांगावें धर्मासी ॥७॥

ह्मणावें तुह्मां बुझवायालागीं ॥ गांधार येत होता वेगीं ॥ वाटेसि चित्रांगद गंधर्वे ॥ धरोनियां नेला स्वर्गी ॥८॥

तरी आह्मां साह्म करावें ॥ अर्जुनासे पाठवावें ॥ तेणें झुंजोनि गंधर्वासी ॥ दुर्योधन सोडवावें ॥९॥

कीं कौरवपांडव सहोदंर ॥ अवघडीं न देती अंतर ॥ धर्म पाठवील पार्थासी ॥ ऐसें ऐकतांचि उत्तर ॥१०॥

आतां साभिमाना न धरावें ॥ आपुलें कार्य साधावें तंव कर्ण ह्मणे सोमदत्ता ॥ तुवांचि तेथवरी जावें ॥११॥

येरु निघाला झडकरी ॥ शंखध्वनीतें उच्चारी ॥ ह्मणे अनर्थ जाहला मोठा ॥ ऐसा आला गुंफेव्दारीं ॥१२॥

धर्मे सोमदत्त देखिला ॥ ह्मणे आंगरे वृत्तांत आपुला ॥ येरु ह्मणे काय सांगों ॥ अनर्थ थोर जाहला ॥१३॥

समजावया तुह्मासी ॥ गांधार आला दळभारेंसीं ॥ तंव आड घातलें चित्रांगदें ॥ धरोनि नेलें दुर्योधनासी ॥१४॥

धृतराष्टें आणि गांधारियां ॥ बहुत शिकविलें तया ॥ ह्मणती बुजावोनि धर्मासी ॥ आणा पडोनियां पायां ॥१५॥

भीष्मद्रोण बहु कोपले ॥ ह्मणती आणा धर्मासि वहिलें ॥ दुर्योधनें तें मनीं धरोनी ॥ तैसेंचि सैन्य पालाणिलें ॥१६॥

उत्साहो समस्तीं मानिला ॥ दुर्योधन हर्ष जाहला ॥ समजावया आला वेगें ॥ तंव गंधर्वी धरोनि नेला ॥१७॥

देव पूजितां देवळ पडलें ॥ धर्म करितां कर्म जोडलें ॥ आतां वेग करीं युधिष्ठिरा ॥ तयासि सोडवी वहिलें ॥१८॥

तंव धर्म ह्मणे बा अर्जुन ॥ सोडवोनि आणीं दुर्योधना ॥ येरु उगाचि राहिलासे ॥ हें नये तयाच्या मना ॥१९॥

धर्म ह्मणे कांरे उगला ॥ तंव पार्थ कर जोडोनि बोलिला ॥ जी हें अवघें कपट असे ॥ तो छळाया होता पातला ॥२०॥

प्रथम जिंकोनि कपटफांशीं ॥ सभे आणिलें पांचाळीसी ॥ तैं अपमान थोर केला ॥ परि तुह्मीं वारिलें आह्मासी ॥२१॥

मागुता दुर्वासा पाठविला ॥ सत्व हराया केला ॥ परि साह्य केलें कृष्णनाथें ॥ नातरी प्राणांत होता जाहला ॥२२॥

यावरी जयद्रथा पाठविलें ॥ तेणें द्रौपदीये हरिलें ॥ आह्मी विटंबोनि सोडिला ॥ तें दु:ख गांधारें मानिलें ॥२३॥

नाहीं भीष्मद्रोण सरिसे ॥ तरी समजावया आले कैसे ॥ शेवटील घालणें घालूं आला ॥ ऐसें अंतरीं मज भासे ॥२४॥

मग धर्म ह्मणे गा पार्था ॥ हे मी सर्व जाणें व्यवस्था ॥ परि लैकिक राखवा लागे ॥ धांवणें करोनि सर्वथा ॥२५॥

जो कोणी करी अपकार ॥ त्यावरी करी प्रत्युपकार ॥ तोचि सत्पुरुष त्रिलोकीं ॥ ऐसा शास्त्रोक्त निर्धार ॥२६॥

॥ श्र्लोक: ॥

उपकारिषु य:साधु: साधुत्वे तस्य को गुण : ॥ अपकारिषु य: साधु:स साधु: सद्निरुच्यते ॥१॥

आतां असो हे उपपत्ती ॥ आनविचार न करीं चित्तीं॥ झुंजोनियां गंधर्वासी ॥ गांधार सोडवीं शीघ्रगती ॥२७॥

तंव उठिला अर्जुन ॥ चालिला रथारुढ होवोन ॥ रणभूमीसि जावोनि वेगें ॥ चाढविला धनुष्याचा गुण ॥२८॥

पत्रिका लिहोनि बांधिली शरीं ॥ मग तो सोडिला गगनांतरीं ॥ सोडासोडा दुर्योधना ॥ पार्थे लिखित पाठविलें ॥३०॥

येरु ह्मणती बहुत बरवें ॥ आपुलें काज येणें गौरवे ॥ दुर्योधन पाठवोनि पार्थाजवळी ॥ तयासी भलें मानवावें ॥३१॥

तेणें कौरवां हासेल जन ॥ कीर्ती पावले अर्जुन ॥ ह्मणतील पांडवीं सोडविलें ॥ संतोषेल जगज्जीवन ॥३२॥

विचार समस्तां मानवला ॥ मगदूत पार्थापें धाडिला॥ ह्मणे मार्ग करोनि अंतराळीं ॥ आणिजे दुर्योधन वहिला ॥३३॥

यरें बांधोनि शरसेत ॥ पाई उतरिला कौरवनाथ ॥ मग धर्माजवळी आणिला ॥ समस्त दळभारासहित ॥३४॥

दुर्योधन तटस्थ जाहला ॥ काहीं न बोलेचि उगला ॥ लज्जायमान होउनी ॥ माथा पालवीं घातला ॥३५॥

भीमनकुळादि द्रौपदी ॥ सकळ हांसती विनोदीं ऋषीश्र्वर ह्मणती गांधारा ॥ कैसी संचरली कुबुध्दी ॥३६॥

मग युधिष्ठरें उठोनी ॥ वोढिला हातीं धरोनी ॥ सुष्ठोत्तरीं संबोखिला ॥ बैसवोनि निजासनीं ॥३७॥

ह्मणे तूं आमुचा बंधु होसी ॥ गंधर्वी धरोनि नेलासी ॥ ह्मणती सोमवंशी वीर नाहीं ॥ तरीं हें उणें आह्मांसी ॥३८॥

तूं वोखटें मनीं न मानीं ॥ सुखें जाय नग रालागुनीं ॥ ह्मणोनि पूजिला उपचारें ॥ येराहोतसे खोंचणी ॥३९॥

मग मामादि सारुनी ॥ भोजन जाहलें षड्ररसान्नी ॥ सकळां जाहले टिळेविडे ॥ पामकिले मान देवोनी ॥४०॥

धर्मासि ह्मणे गांधार ॥ तुमचा उपकार जाहला थोर ॥ आजि सोडविलें आह्मांसी ॥ तुह्मी महावीर धनुर्धर ॥४१॥

द्रौपदी बोले उत्तर ॥ आजी आमुचें दैव थोर ॥ जे दुर्योधन मानवले ॥ हा आह्मां जाहला उपकार ॥४२॥

तेणें अधिकचि खोंचला ॥ मग आज्ञा घेवोनि चालिला ॥ पांडव बोळवित चालिले ॥ ते राहविले त्या वेळां ॥४३॥

दुर्योधन ह्मणे युधिष्ठिरा ॥ येकी विनंती अवधारा ॥ मी जाईन हस्तापुरीं ॥ तंव सवें द्यावें धनुर्धरा ॥४४॥

युधिष्ठिर पार्थासि ह्मणत ॥ जाईबा यासी बोळवित ॥ घालोनियां हस्तनापुरीं ॥ मुरडोनि येई त्वरित ॥४५॥

मग बैसोनि रथावरी ॥ पार्थ निघाला झडकरी ॥ गुंफे प्रवेशले धर्मादिक ॥ येरु पातला हस्तनापुरीं ॥४६॥

तो भागीरथीच्या तीरीं ॥ पार्थ उतरोनि स्त्रान करी ॥ येर चालिले पुढारे ॥ दुरोनि दिसे नगरी ॥४७॥

परि नवलावो जालातो ऐका ॥ गंधर्वे धरिलें कौरव्नायका ॥ ह्मणोनि दु:शासनकर्णादिकीं ॥ धाडिलें हस्तनापुरीं सेवकां ॥४८॥

त्यांहीं धृतराष्ट्र गांधारीप्रती ॥ सांगीतली सर्व स्थिती ॥ जीजी गंधर्वी नेवोनि दुर्योधना॥ सैन्य पाडिलें असे क्षिती ॥४९॥

दु:शासन कर्णादिकां ॥ पळविलें वीरनायकां ॥ ऐसा ऐकोनि वृत्तांत ॥ कोल्हाळ वर्तला सकळिकां ॥५०॥

धृतराष्ट्रें अश्रु गाळिले ॥ भीष्मद्रोण तेथें आले ॥ त्यांहीं संबोखिलें समस्तां ॥ कीं आणूं गांधारा वहिलें ॥५१॥

रायें बोलाविले समस्त ॥ कृपाचार्यादि जयद्रथ ॥ तंव ते द्रोणें वारिले ॥ ह्मणे तुह्मी रहावें निश्र्विमत ॥५२॥

मी जावोनि काम्यकवना ॥ आज्ञा देईन अर्जुना ॥ तो सोडवील गांधारासी ॥ तें मानवलें सर्वजनां ॥५३॥

तंव बोलिला तो दूत ॥ तेथें धाडिलासे सोमदत्त ॥अवघे ह्मणती भलें जाहलें ॥ पाहों तयांचा पुरुषार्थ ॥५४॥

मग सकळही दळभारीं ॥ राहिले नगराबाहेरी ॥ तंव घडघडिला रहंवर ॥ दुर्योधना आला सपरिवारीं ॥५५॥

एक ह्मणती दुर्योधन नेला ॥ ऐसा वृत्तांत आयकिला ॥ ह्मणोनि राज्य घ्यावयासी ॥ हा अर्जुन पातला ॥५६॥

हा नव्हे रे दुर्योधन ॥ मागां आहे भीमसेन ॥ऐसे भयचकित बोलती ॥ तंव ह्मणे गंगानंदन ॥५७॥

अरे सकळही रहाउगले ॥ म्यां गाधारा ओळखिलें ॥ मग जावोनि पुढारे ॥ दुर्योधना भेटले ॥५८॥

तैं अवघाही वृत्तांत ॥ केला सोमदत्तें श्रुत ॥ भीष्मादि संतोषेनि ह्मणती ॥ धर्मा ऐसा नाहीं आप्त ॥५९॥

पांडव हे कपटी नव्हती ॥ मागील उणें नाठवती ॥ गांधार वृथा करितो वैर ॥ अद्यापि आठव न धरी चित्तीं ॥६०॥

अर्धराज्य देवोनि पांडवां ॥ धर्माचि सखा जोडावा ॥ हें उत्तर विषापरी ॥ लागलें दुर्योधनादि कौरवां ॥६१॥

भीष्मद्रोणादि ह्मणती किरीटी ॥ आलिया येथं घेतों भेटी ॥ तंव ह्मणे सोमदत्त ॥ तो आहे भागीरथीतटीं ॥६२॥

ऐकतां संतोषले ॥ उल्हासें भेटाया चालिले ॥ अर्जुन क रितसे स्नान ॥ तंव ते समीपपातले ॥६३॥

तया दोघांतें देखोनी ॥ आला धनंजय धावोनी ॥ चरणांवरी ठेविला माथा ॥ येरीं आलिंगिला उचलोनी ॥६४॥

तंव कुंतीविदुरां कराया श्रुत ॥ भीष्में पाठविले दूत ॥तींऐकतां येवोनि वेगें अर्जुनासि आलिंगित ॥६५॥

मग कुंतियें ह्मणितलें ॥ बारे हें बरवें केलें ॥ आतां न विश्र्वासावें कौरवां ॥ जावें धर्माजवळी वहिलें ॥६६॥

तंव विदुर ह्मणे पार्थासी ॥ बारे सावध वर्त्तावें वनासी ॥ आतां जाई वेगवत्तर ॥ न विसंबावें येकमेकांसी ॥६७॥

ऐसें आयकितां वचन ॥ चौघांसही केलें नमन ॥ मग गेला काम्यकवनीं ॥ रथीं बैसोनि अर्जुन ॥६८॥

येवोनि धर्मा नमन केलें ॥ क्षेमकुशळ सांगीतलें ॥ येरीकडे भीष्मादिक ॥ दुर्योधना जवळि आले ॥६९॥

उत्साह केला हस्तनापुरीं ॥ प्रवेशले वाद्यगजरीं ॥ नगर श्रृंगारिलें नागरिकीं ॥ वोवांळिती नानापरी ॥७०॥

भेटी जाहली समस्तांशी ॥ पाठवणी दीधली लोकांसी ॥ गांधार प्रवेशला मंदिरीं ॥ परि विव्हळ मानसीं ॥७१॥

जाल्या वोंवाळ्णी आरोगणा ॥ उल्हास असे सर्वजनां ॥ आता असे हे भरोवरी ॥ परि चिंता वर्तली दुर्योधना ॥७२॥

लोकापवादथोर जाहला ॥ कीं पार्थे दुर्योधन सोडविला ॥ ह्मणे धिक् जियाळें माझें ॥ अभिमान मनीं धरिला ॥७३॥

आतां एकांतींचा विचार ॥ पुढां काय करील गांधार ॥ तो सांगिजेल श्रोतयांसी ॥ वैरटपर्वीचा कथाचार ॥७४॥

असो येरीकडे वनासी ॥ पांडव त्र्कमिती काळासी ॥ ह्मणती येकमेकांप्रती ॥ गांधार न सांडी अभिमानासी ॥७५॥

येक नाहीं तंव येक विघ्न ॥ अपाय रचितो दुर्योधन ॥ जरी धरोनि न नेते गंधर्व ॥ तरी करिता कांहीं निर्वाण ॥७६॥

ऐकोनि ह्मणे पांचाळी ॥ आपुला साह्यकारी वनमाळी ॥ तेणेंचि करोनि उपाव ॥ वांचविलें वनस्थळीं ॥७७॥

त्यावांचोनियां दुसरा ॥ नाहीं अवघडीं सोयरा ॥ ऐसा उव्देग भाविती ॥ तंव येणें जाहलें शारंगधरा ॥७८॥

देवो सांभाळूं आला ॥ समस्तां आनंद जाहला ॥ करोनि साष्टांग दंडवतें ॥ पूजाउपचार मांडिला ॥७९॥

धर्म ह्मणे गा हषीकेशी ॥ थोर कष्टलों वनवासीं ॥ पडिलें दु:खाचिया वळसां ॥ उपाय सांगि]जे आह्मांसी ॥८०॥

मग ह्मणे कृष्णनाथ ॥ अखंड चिंतावा अनंत ॥ तेणें दु:खें निवारती ॥ हा सत्य असे वचनार्थ ॥८१॥

ऐसा अनुष्टवेल तूतें ॥ तरी करीं अनंतव्रतातें ॥ मग समूळ व्रतकथा ॥ सांगीतली धर्मातें ॥८२॥

ते अनंतव्रतकथा ॥ सप्तमस्तबकीं असे भारता ॥ ह्मणोनि संकलित बोलणें ॥ पसर होईल ग्रंथा ॥८३॥

व्रत सांगोनि हषीकेशी ॥ शीघ्र गेला व्दारकेशीं ॥ मग धर्मे द्रौपदीसह ॥ अनुष्ठिलें त्या व्रतासी ॥८४॥

असो ऐसीं वरुषें बारा ॥ वनवास घडला पंडुकुमरां ॥ काम्यकवनीं संपूर्णता ॥ आतां नष्टचर्य अवधारा ॥८५॥

आतां संपलें अरण्यपर्व॥ संक्षेपें कथिलें अपूर्व ॥ सारसार उध्दरिलें ॥ वनीं राहिले पांडव ॥८६॥

सोडविला दुर्योधन ॥ तेणें तो पावला अपमान ॥ हे अरण्यपर्वीची कथा ॥ निरुपिली संकलोन ॥८७॥

आतां विराटपर्वीची कथा ॥ नष्टचर्य पंडुसुतां ॥ ते सांगिजेल संक्षेपोनी ॥ ह्मणे मधुकरकवि वक्ता ॥८८॥

इति श्रीकथाकल्पतरु॥ नवमस्तबक मनोहरु॥ नवमाऽध्यायीं कथियेला ॥ वनपर्वसमाप्तिप्रकारु ॥८९॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP