कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

धर्म ह्नणे जी वासुदेवा ॥ विस्तारें शाल्ववध सांगावा ॥ कृष्ण ह्नणे ऐकें धर्मा ॥ म्यां यज्ञीं वधिला श्रुतश्रवा ॥१॥

त्याचा सूड घ्यावयालागुनी ॥ शाल्व उदेला सौम्यविमानीं ॥ युद्ध करी यादवांसीं ॥ द्वारके वेढा घालोनी ॥२॥

यादवीं दुर्ग बळकाविले ॥ बाहेर शाल्वसैन्य पसरलें ॥ तें देखोनियां अवघड ॥ झुंजों ममत्मज चालिले ॥३॥

सांब प्रद्युम्न मुख्य वीर ॥ रथीं आरुढले समग्र ॥ शस्त्रास्त्रेंसीं उठावले ॥ आले नगराबाहेर ॥४॥

त्या शाल्वाचा सचिव ॥ आणि सांब महाबाहो ॥ युद्ध जाहलें घोरांदर ॥ तंव उठिला प्रद्युम्नयादव ॥५॥

तेणें शस्त्रास्त्रांच्या घाई ॥ सेनापती पाडिला भुई ॥ तों वेगवंत नामें वीर ॥ उठिला गदाघातें पाहीं ॥६॥

तो सांबें गदा प्रेरुनी ॥ वेगवंत पाडिला धरणीं ॥ तेव्हां रुक्मिणीच्या नंदना ॥ विविंधें विंधिलें अमितबाणी ॥७॥

येरें विविंध पाडिला ॥ देखोनि शाल्व येता जाहला ॥ तैं यादवसैन्यासी ॥ थोर धाक संचरला ॥८॥

मग प्रद्युम्न उठावला ॥ शाल्वासी थोर झुंजला ॥ शस्त्रास्त्रीं नानाविधें ॥ शाल्व मूर्छित पाडिला ॥९॥

शाल्ववीर शंखध्वनी ॥ करीत राहिले हाहाकरुनी ॥ परि मूर्छा भंगोनि शाल्ववीरें ॥ यादव पिटिले अमितबाणीं ॥१०॥

मदन मूर्छित पाडिला ॥ यादवां आकांत वर्तला ॥ सारथियें रथीं वाहोनी ॥ सैन्याबाहेर आणिता झाला ॥११॥

परि सावध होवोनि रंतिपती ॥ बोलिला सारथियाप्रती ॥ कीं थोर लाज आणिली आह्मां ॥ रथ हाकारीं शीघ्रगती ॥१२॥

युद्धीं पराडमुख होणें ॥ हें यदुवंशासि लाजिरबाणें ॥ हांसती यादवांच्या नारी ॥ ह्नणतील लाजविलें नंदनें ॥१३॥

मरणही होईल तरी भलें ॥ परी अपयशें धिक् जियाळें ॥ ह्नणोनि रणभूमीसी ॥ नेई रथेंसि वहिलें ॥१४॥

तंव मदनासि ह्नणे सूत ॥ तूं गा जाहलासि सावचित्त ॥ आतां पाहें माझा पराक्रम ॥ मी दारुकाचा सुत ॥१५॥

तूं धनुष्यबाण सज्ज करीं ॥ ह्नणोनि रथ प्रेरिला झडकरी ॥ सव्यापसव्य नानागती ॥ फिरवी सैन्यामाझारी ॥१६॥

हें शाल्वें देखोनि नयनीं ॥ सारथी विंधिला तिहींबाणीं ॥ तैसाचि प्रद्युम्न विंधिला ॥ नानाप्रखर मार्गणी ॥१७॥

परि ते धनुर्धरें वहिले ॥ बाणीं बाण निवारिले ॥ ऐसें घोरांदर महायुद्ध ॥ दोघां वीरां मांडलें ॥१८॥

तंव असंख्यात मार्गण ॥ मदनें सोडिले दारुण ॥ तिहीं बाणीं धरणीये ॥ शाल्व पाडिला नलगतां क्षण ॥१९॥

मग शिरश्छेदा कारणें ॥ आणीक शर सोडावे मदनें ॥ तंव नारद पाठविला देवीं ॥ तो ममात्मजासि ह्नणे ॥२०॥

अगा तुझेनि हातें पाहीं ॥ या वीरासि मृत्यु नाहीं ॥ मग तो हर्षे करोनी ॥ उगाचि असे आपुले ठायीं ॥२१॥

इकडे शाल्वही मूर्छा भंगोनी ॥ मुरडला हतवीर्य होवोनी ॥ गेला आपुलिये देशीं ॥ द्वारकापुर विध्वंसोनी ॥२२॥

मी राजसूययज्ञींहुनी ॥ जंव गेलों द्वारकास्थानीं ॥ तंव भग्ननगर देखिलें ॥ पुसिलें वडिलांलागोनी ॥२३॥

तेय शाल्वाचा वृत्तांत ॥ यादवीं मज केला श्रुत ॥ मग शाल्व वधावया ॥ निर्धार केला प्रख्यात ॥२४॥

तैं म्यां आनकदुंदुभीतें ॥ नगर निरविलें तयातें ॥ आणि शंखनादें वाद्यघोषें ॥ निघालों सैन्यासांगातें ॥२५॥

समुद्रतीरीं दरी माझारी ॥ शाल्व प्रवेशला स्वनगरीं ॥ म्यां पाठोपाठीं जावोनियां ॥ नगर आच्छादिलें शरीं ॥२६॥

तंव शाल्व संसरोनी ॥ विंधीत आला अमितांबाणीं ॥ त्याहीं यादवसैन्य भेदलें ॥ राहिलें मातें व्यापोनी ॥२७॥

परि तयाच्य महावीरीं ॥ यादवसैन्य विंधिले भारी ॥ तेथें उठावा करोनि यादवीं ॥ परदळ पाडिलें भारी ॥२८॥

तेणें गजर जाहला नगरीं ॥ रुदन करिती नरनारी ॥ तंव शस्त्रास्त्रें मोकलोनी ॥ शाल्व मायायुद्ध करी ॥२९॥

शतघ्नी गदा शूळ मुसळें ॥ शस्त्रें प्रेरिली मायाजाळें ॥ तीं बाणजाळें तत्क्षणीं ॥ म्यां निवारिलीं विद्याबळें ॥३०॥

तंव तेणें बाणघातें ॥ व्याकुळ केलें दारुकातें ॥ तेव्हां दारुकें ह्नणितलें ॥ देवा सांवरिजे मातें ॥३१॥

म्यां ऐसें वचन ऐकोनी ॥ शाल्वाचा हस्तस्तंभ केला गगनीं ॥ मग माव रचिली शाल्वें ॥ तें नकळे मजहीलागोनी ॥३२॥

येक द्वारकेचा जन आला ॥ तो मज सांगों लागला ॥ कीं द्वारका वेढिली शाल्वे ॥ सात्यकी बळदेवो धरिला ॥३३॥

मदन नेलासे बांधोनी ॥ ह्नणोनि आहुकें धाडिलें सांगोनी ॥ तरी द्वारका राखावी ॥ शीघ्र आपण येवोनी ॥३४॥

म्यां विचारिलें अंतःकरणीं ॥ हें त्रिशुद्धी नघडे निर्वाणी ॥ बळभद्र मदन सांब ॥ अजित सात्यकी त्रिभुवनीं ॥३५॥

दुजा नवलावो एक जाहला ॥ शूरसेन मजपुढें पडला त्या देखोनि विव्हळ जाहलों ॥ बाण करींचा गळाला ॥३६॥

मोह उपजला चित्तीं ॥ मग उगाचि बैसलों रथीं ॥ तंव जाहला हाहाःकार ॥ परवीर बाणीं विंधिती ॥३७॥

म्यां ते जाणोनि माया ऐसी ॥ उठिलों पुनरपी युद्धासी ॥ वीर पाडिले असंख्यात ॥ शिरें धाडिलीं शाल्वापाशीं ॥३८॥

यावरी शब्दपाती अस्त्र ॥ म्यां मंत्रोनि सोडिलें शीघ्र ॥ शिर छेदाया शाल्वाचें ॥ चालिलें धुंधुवातें थोर ॥३९॥

तो शब्द ऐकिला ॥ मग शिळाधारीं वर्षला ॥ तेणें पळाले यादव ॥ हाहाःकार प्रवर्तला ॥४०॥

तंव पाषाण भेदी अस्त्रें ॥ म्यां निवारिलें क्षणमात्रें ॥ तैं विनविलें समस्तीं ॥ कीं शाल्व वधावा निर्धारें ॥४१॥

मग म्यां सुदर्शन प्रेरिलें ॥ तेणें शाल्वशिर छेदिलें ॥ मागुतें मुरडोनियां ॥ सुदर्शन ममकरीं आलें ॥४२॥

दैत्य पळाले कुटुंबेसीं ॥ समुद्रीं पाडिलें शाल्वासी ॥ याकारणा गुंतलों ह्नणोनी ॥ नाहीं आलों तुह्मांपाशी ॥४३॥

जंव रिकामे जाहलों आह्मी ॥ तंव सर्वस्व हारविलें तुह्मीं ॥ शेवटीं द्रौपदीचिये अवकळे ॥ पावलों निदानीं मी ॥४४॥

द्यूतारंभींचि द्वारके असतों ॥ तरी येवोनि उभयां वारितों ॥ जालें होणारासारिखें ॥ परि मीचि तुह्मां रक्षितों ॥४५॥

ऐसें सांगोनि आघवें ॥ आज्ञा मागीतली देवें ॥ तंव नमस्कारुनि पांडवीं ॥ पूजिला श्रीकृष्ण सद्भावें ॥४६॥

घृष्टद्युम्नें मागोनी ॥ द्रौपदीसुत चालिला घेवोनी ॥ मग आज्ञा मागोनि समस्त ॥ चालिले आपुलाले स्थानीं ॥४७॥

द्वारके गेलिया श्रीहरी ॥ पांडव द्रौपदी सुंदरी ॥ पुढें निघालीं वनाप्रती ॥ तीं पावलीं कुरुक्षेत्रीं ॥४८॥

तेथें ब्राह्मणांसी भेटले ॥ द्विजीं उपचारीं पूजिले ॥ ते पूजा घेवोनि देखा ॥ मार्गी लोक आश्वासिले ॥४९॥

मग द्वैतवनीं प्रवेशले ॥ तेथें धर्म बंधुवां बोले ॥ हें द्वैतवन विजन आहे ॥ बरवें फळपुष्प सासिन्नलें ॥५०॥

आपणां बारावरुषें क्रमणें ॥ तरी इयेचि वनीं राहणें ॥ तंव अर्जुन बोलिला ॥ ऐकोनि धर्माची वचनें ॥५१॥

तूं गा मान्य ऋषिवृंदांतें ॥ व्यासनारद मानिती तूतें ॥ तुज अज्ञात काय आहे ॥ महाराजा तूं सर्वातें ॥ ॥५२॥

तुझी इच्छा असेल जेथें ॥ आह्मां वास करणें तेथें ॥ हें द्वैतवन पुष्पकळीं ॥ युक्त आहे निरुतें ॥५३॥

धर्म ह्नणे अर्जुनातें ॥ मज हें वन बरवें रुचतें ॥ मग पांडव धौम्यासहित ॥ राहिले निश्वयेंसिं तेथे ॥५४॥

धर्मा जाणोनि द्वैतवनीं ॥ धांवोनि आले द्विजमुनी ॥ राहिले धर्माचे संगतीं ॥ परम आनंद मानोनी ॥५५॥

तेथें शाल ताल तमाल ॥ आम्र मधूक कदंब बकुळ ॥ अवकाळीं पुष्पें फळें ॥ नानाविध पक्षिकुळ ॥५६॥

मयूर केकाशब्द करिती ॥ मदोन्मत्त भद्रजाती ॥ नानाश्वापदीं युक्त ॥ सासिन्नली वसुमती ॥५७॥

नांदती सिद्धऋषी मुनिजन ॥ अग्निहोत्री ब्राह्मण ॥ तयां करोनि नमस्कार ॥ स्थिरावले पंडुनंदन ॥५८॥

यावरी पांडवांप्रति येउनी ॥ भेटला मार्कॆडेय मुनी ॥ धर्मे पूजिला उपचारीं ॥ येरु विस्मित जाहला मनीं ॥५९॥

धर्म ह्नणे देखोनि आमुतें ॥ कां जी विस्मय जाहला तुह्मांतें ॥ मुनि ह्नणे युधिष्ठिरा ॥ हर्षविषाद नाहीं मातें ॥६०॥

परि तुमचे क्लेश देखोनी ॥ दुःख जाहलें अंतःकर्णी ॥ म्यां रामस्मरण केलें ॥ तयाचे कष्ट आठवुनीं ॥६१॥

राम सत्वगुणासागर ॥ सवें सीता आणि सौमित्र ॥ पितृआज्ञेस्तव वनवास ॥ करितां कष्टला थोर ॥६२॥

दुजा इंद्रासारिखा थोर ॥ अलर्क राजा परिकर ॥ तोही कष्टला वनासी ॥ दुःख भोगिलें अपार ॥६३॥

ऐसें रायांचें चरित्र कथोनी ॥ परस्परें अभिवंदोनी ॥ गेला उत्तरदिशेसी ॥ मार्केडेय महामुनी ॥६४॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ पांडव द्वैतवनीं असतां ॥ ब्रह्मवृंदें वेदध्वनी ॥ दिसे ब्रह्मलोकसाम्यता ॥६५॥

तैं धर्माप्रति सद्भावता ॥ बकदाल्म्य जाहला बोलता ॥ ह्नणे तुझिये संगतीं ॥ ब्राह्मण सुखावती सर्वथा ॥६६॥

भृगु आंगिरस वसिष्ठ ॥ कश्यप आत्रेय श्रेष्ठ ॥ अगस्त्यादि श्रौतस्मातैं ॥ कर्में करिताति वरिष्ठ ॥६७॥

तरी सद्वंशज तीर्थ पाहीं ॥ ब्राह्मणावेगळें दुजें नाहीं ॥ ह्नणोनि ब्राह्मण पूजावे ॥ प्रीतिपूर्वक प्रत्यहीं ॥६८॥

इच्छापूर्ण भोजनें द्यावीं ॥ कदापि निंदा न करावी ॥ सर्वप्रकारें राया ॥ विप्रकुळें संतोषवावीं ॥६९॥

त्यांचें आशिर्वदें सर्वार्थी ॥ अलभ्य पदार्थ पाविजती ॥ तुज तरी सहजें राया ॥ नित्य असे ब्राह्मणभक्ती ॥७०॥

तयांचा आशिर्वाद होईल ॥ तरी तूं सकळ पावशील ॥ मग ते पंडुकुमरीं ॥ विप्र वंदिले सकळ ॥७१॥

बकदाल्भ्य द्वैपायन ॥ नारद आणि जामदग्न्य ॥ भालुकी कृतचेता सहस्त्रपाद ॥ मौंज लवणाश्व काश्यप कर्ण ॥७२॥

इत्यादि ऋषि वंदिले ॥ नानास्तवनीं स्तविन्नले ॥ अन्नदानव्रत धर्मे ॥ करावें मनीं धरियेलें ॥७३॥

वैशंपायन ह्नणती भारता ॥ वनवास असतां पंडुसुतां ॥ गुंफास्थानीं सायंकाळीं ॥ धर्मादि बैसले असतां ॥७४॥

तंव द्रौपदी ह्नणे धर्मासी ॥ तो दुर्योधन पापराशी ॥ तेणें आह्मां दुःख दीधलें ॥ नानाकापट्यें परियेसीं ॥७५॥

चहूंजणांचा तुजवरी ॥ राया कोप असे भारी ॥ दुर्योधन कर्ण शकुनी ॥ दुःशासन अवधारीं ॥७६॥

आपण अरण्यवासी दीन ॥ तुज कडासनीं भूमिशयन ॥ हें देखोनि दुःख होतें ॥ तूं रत्नासनींचा विराजमान ॥७७॥

अष्टभोगीं संपूर्ण ॥ सुगंध वस्त्रें भूषणें अन्न ॥ तें स्मरोनि माझ्या जींवीं ॥ दुःख होतें दारुण ॥७८॥

देव राक्षस सर्प मनुष्य ॥ यांचा जेतारा तूं पुरुष ॥ त्या तुज कां कोप नुपजे ॥ करावया कौरवनाश ॥७९॥

तुझे बंधु आज्ञामात्रें ॥ आंदोळूं शकती वसुंधरे ॥ त्यांतेंही असतां जवळी ॥ कां पां कोप तुज न संचरे ॥८०॥

जो क्षत्रिय चुके समकाळीं ॥ त्याची अपकीर्ती दिग्मंडळीं ॥ निंदा करिती लोक ॥ वृथा जिणें भूतळीं ॥८१॥

द्रौपदी ह्नणे धर्मासी ॥ इतिहास येक परियेसीं ॥ एतदर्थी पुरातन ॥ मी सांगतें सविंशेषीं ॥८२॥

बळिरायें प्रल्हादाप्रती ॥ कथा पुसिली एतदर्थी ॥ मग प्रल्हादें निरुपिली ॥ क्षमा आणि क्षात्रवृत्ती ॥८३॥

तरी क्षमा कीं तेज पाहीं ॥ यांहूनि काहीं बरवें नाहीं ॥ परि क्षमावंत बहुत होय ॥ दुःख वंत लोकत्रयीं ॥८४॥

जैं सकळ पदार्थ जाती ॥ तैं सेवक उदास होती ॥ मग दीनत्वें वर्ततां जगीं ॥ थोर होय अपकीर्ती ॥८५॥

स्त्री सेवक अष्टभोग ॥ नानापदार्थ अनेग ॥ तेजस्विया प्राप्त होती ॥ आणि कीर्ती वर्णी जग ॥ ॥८६॥

पुत्र भृत्य दारा दासी ॥ पराभविती क्षमावंतासी ॥ ह्नणोनि क्षमा त्यजोनि राया ॥ वधावें कौरवांसी ॥ ॥८७॥

तितिक्षे आणि तीव्रतेजा ॥ यांचा समय जाणे तो राजा ॥ तूं तंव सर्व जाणोनी ॥ कां जोडिशी निंदाभाजा ॥८८॥

यावरी धर्म जाहला बोलता ॥ कीं क्रोध हा मनुष्याचा हंता ॥ क्रोधें होय पराभव ॥ विनाश क्रोध धरितां ॥८९॥

मी धर्ममूर्ति सत्वधीर ॥ केवीं करुं क्रोधांगिकार ॥ सर्व हिंसा क्रोधें होती ॥ नकळे गुरु स्त्री कुमर ॥ ॥९०॥

क्रोधें स्वघात परघात ॥ क्रोधें होय नरकपात ॥ याकारणें सत्पुरुषीं ॥ क्रोध जिंकावा निश्वित ॥९१॥

॥ श्लोकः ॥ क्षमाखङ्गं करे यस्य दुर्जनः किं करिष्यति ॥ अतृणे पतितो वन्हिः स्वयमेवोपशान्यति ॥१॥ ॥ टीका ॥ क्षमाखङ्ग ज्याचे करीं ॥ तयासि दुर्जन काय करी ॥ अतृणीं पडलिया वन्ही ॥ उगाचि उपशमे निर्धारी ॥ ॥९२॥

क्षमावंतासि जय असे ॥ क्रोधिया अपायीं प्रवेशे ॥ क्रोध उपजतांचि निवारावा ॥ बुद्धिउपायें पुरुषें ॥९३॥

क्रोधें सकळही अनर्थ ॥ पुरुषालागीं होती प्राप्त ॥ एतदर्थी असे गाथा ॥ कांते ऐकें दत्तचित्त ॥९४॥

॥ श्लोकः ॥ क्षमायज्ञः क्षमा वेदः क्षमा धर्मः क्षमा धृतिः ॥ ब्रह्मविद्या तपः शौचं स्थैंर्य सर्व क्षमात्मकं ॥२॥

तेजस्विनां क्षमा तेजः ॥ एवं मया कथितं तुज ॥ नानाविध गुणधर्म ॥ असती क्षमेठाई सहज ॥९५॥

ऐसें कश्यपें निरुपिलें ॥ मग म्यां क्षमेतें धरियेलें ॥ हें ऐकोनि द्रौपदी ॥ धर्मासि सक्रोधें बोले ॥९६॥

कीं पुरुष क्षमा आर्जव ॥ हें करोनि श्री पावे सहज ॥ तैसी यज्ञेंकरोनि नपवे ॥ धर्मासि नाहीं अपूर्व तुज ॥९७॥

चहूं बंधूंतें सांडिसी ॥ परि धर्म न टाकिसी ॥ जो राजा धर्म प्रतिपाळी ॥ तया धर्म न सांडी निश्वयेंसीं ॥९८॥

तूं तरी स्वाहास्वधाकार ॥ तेणें तृप्त करिसी देवपिटर ॥ तथा विप्र अतिथी संन्यासी ॥ गृहस्थारण्यवासी समग्र ॥९९॥

तूं सकळ प्राणियांसी ॥ वैश्वदेवांती संतुष्टविसी ॥ हें विजनवन चोरयुक्त ॥ येथेंही कर्म न टाकिसी ॥१००॥

पूर्वी त्वां अश्वमेधादिक ॥ केले ऋजुमृदु वदान्यक ॥ त्या तुज लज्जायुक्त देखोनी ॥ मनीं होतसे असुख ॥१॥

सुखदुःखादि भोगशरीर ॥ शुभाशुभ फळें अपार ॥ सर्वाभूतीं पापपुण्य ॥ धाता निर्मितो समग्र ॥२॥

स्थावरजंगम भूतें निर्मुनी ॥ ब्रह्मा खेळ खेळे नित्यानी ॥ मातापिता वैरी सम ॥ ब्रह्मा वर्तवी सर्वजनीं ॥३॥

परि येक त्याचें अयुक्त करणें ॥ सत्यवादिया कष्ट देणें ॥ नष्टां पापियां सुख भोग ॥ मी दुःखी होतें याकारणें ॥४॥

तुझी देखोनि अवदशा ॥ आणि दुर्योधनाची राज्यदशा ॥ विधीचें विपरीत करणें ॥ कळों आलें भरंवशा ॥५॥

ऐसें ऐकोनि द्रौपदीवचन ॥ युधिष्ठिर बोले आपण ॥ अहो द्रौपदी अवधारीं ॥ तुझें वाक्य जाहलें श्रवण ॥६॥

परि सर्वही प्रकारें ॥ मी अधर्म न आचरें ॥ धर्मफलेच्छा नाहीं मज ॥ द्यावें यजावें परोपकारें ॥७॥

पुरुषें विहित कर्म करावें ॥ फल पावावें वा न पावावें ॥ जो धर्मद्रोह इछी नर ॥ तो कर्मफळ न पावे ॥८॥

धर्मावेगळें श्रेष्ठ नाहीं ॥ धर्मे सामर्थ्य बहुतां पाहीं ॥ मार्केडेय अमर जाहला ॥ व्यास वसिष्ठ मैत्रेयोही ॥९॥

नारद लोमेश शुक समस्त ॥ शापानुग्रही जाहले समर्थ ॥ ऐसें नानाउपयीं ॥ धर्मे द्रौपदीये शिकवित ॥११०॥

यापरी द्रौपदी संबोखिली ॥ मग ते अर्जुना बोलिली ॥ ह्नणे ईश्वर ब्रह्मा धर्म यांची ॥ निंदा म्यां नाहीं केली ॥११॥

मी आर्त ह्नणोनि स्वार्थे ॥ भलतेंचि तुह्मां बोलतें ॥ परि आणिक काहीं अपूर्व ॥ ऐका आतां सांगतें ॥१२॥

जो उपजला स्तनपानें ॥ कर्मचि आचरावें तेणें ॥ कर्मावांचोनि गति नाहीं ॥ कर्मे प्रत्यक्ष फळ पावणें ॥१३॥

वृक्षादि पशु पाषाण स्थावर ॥ कर्मेविण जीवती समग्र ॥ परि मनुष्यजन्म कर्मालागी ॥ दीधला विधीनें सारतर ॥१४॥

अकस्मात जो अर्थ काहीं ॥ तोही कर्मेविण प्राप्त नाहीं ॥ हटें दैवें स्वभावें फळे ॥ तेथ कर्मचि प्रधान पाहीं ॥१५॥

धाताही पूर्वकर्मवशें ॥ अदृष्ट निर्माण करीतसे ॥ शुभाशुभ आचरे नर ॥ पूर्वकर्मलवलेशें ॥१६॥

जैसें जैसें कर्म प्रेतित ॥ जन तदनुसार आचरत ॥ कर्म कैसें व्यापक ॥ तें ऐकें सुदृष्टांत ॥१७॥

तिळीं तेल गाईसि दुग्ध ॥ काष्ठीं वन्ही प्रसिद्ध ॥ तैसें प्राणिमात्रासी ॥ कर्म व्यापक स्वतःसिद्ध ॥१८॥

ऐसें आहे ह्नणोनि पुरुषें ॥ कर्मचि करावें विशेषें ॥ तुझिये बंधूंचें कर्म ॥ वृथा नव्हेचि सर्वाशें ॥१९॥

हें कर्म करितां सर्वाथीं ॥ सकळही समृद्धी पावती ॥ भूमीं पेरिलिय वांचोनी ॥ पीक न पिके शेतीं ॥१२०॥

कर्म आचरितां कष्टेंसी ॥ खेद न धरावा मानसीं ॥ बहुत उद्योग करितां अंतीं ॥ फळ पाविजेचि विशेषी..॥२१॥

माझिये पितयाचे घरीं ॥ हे शास्त्रनीती द्विजवरीं ॥ माझिये बंधूप्रती ॥ सांगीतली नानापरी ॥२२॥

तिये समयीं आयकिली ॥ ते मी तुह्मां सांगीतली ॥ ऐसें अर्जुना मुख्य करोनी ॥ द्रौपदी पांडवां बोलिली ॥२३॥

पुढे द्रौपदीवाक्यानंतरें ॥ श्वासोश्वास सांडोनि वृकोदरें ॥ बोलता जाहला धर्माप्रती ॥ तें सांगिजेल कवि मधुकरें ॥२४॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥ धर्मद्रौपदीसंवादप्रकारु ॥१२५॥ ॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP