कथाकल्पतरू - स्तबक ९ - अध्याय ६

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

मग श्वासोश्वास सांडोनी ॥ भीम बोलिला आर्तवचनीं ॥ ह्नणे ऐकें धर्मराया ॥ मदुक्त चित्त देवोनी ॥१॥

धर्मे अथवा आर्जवें करोनी ॥ गांधार राज्य नेदी निर्वाणीं ॥ जेवीं पंगूच्या गाई हरिजे ॥ तेवीं हरिलें कपटें करोनी ॥२॥

आणि तूं स्वधर्म प्रतिपाळोनी ॥ आह्मासि कष्टविसी वनीं ॥ हे तुझी धर्मबहुलता ॥ बरवी न वाटे मनीं ॥३॥

कृष्ण बळदेव अभिमन्य ॥ संजय यादव मुख्य मदन ॥ यांसी बरवें वाटत नाहीं ॥ वनीं राहिलों आपण ॥४॥

राया अशक्ताचियापरी ॥ तूं कां दीन झालासि अंतरीं ॥ आतां आह्मां आज्ञा देई ॥ राज्य घेऊं बरव्यापरी ॥५॥

वैरी मारणें हा स्वधर्म असे ॥ कोणी निंदा न करी विशेषें ॥ पौरुष्यं केलिया राया ॥ धर्मादि साधती आपैसें ॥६॥

जो तरी नकरी पुरुषार्थ ॥ त्यासी धर्मार्थ सांडिती सत्य ॥ धर्मार्थ सांडोनि सेविजे काम ॥ तरी निधन पाविजे त्वरित ॥७॥

याचिकारणास्तव पंडित ॥ धर्मार्थ सेविती सत्य ॥ हें स्वभावेंचि असे राया ॥ अनुक्रमें समस्त ॥८॥

धर्मे साध्य होय अर्थ ॥ अर्थे काम होय प्राप्त ॥ धर्मार्थ संपन्न पुरुष ॥ सदा कामातॆं इच्छित ॥९॥

कामार्थी तरी पुरुष कांहीं ॥ आणिक दुजें इच्छित नाहीं ॥ यास्तव धर्मार्थ काम ॥ सेवावे काळविभागें पाहीं ॥१०॥

हे काळविभागें सेवितां ॥ मोक्षप्राप्ती होय सर्वथा ॥ तरी पौरुषत्वासि अर्थमूळ ॥ तेणें धर्म साधे तत्वता ॥११॥

धर्मे काममोक्ष प्राप्त होती ॥ ह्नणोनि पौरुषत्व धरीं भूपती ॥ पौरुषें सर्व लभ्यमान ॥ यद्विषयीं नाहीं भ्रांती ॥१२॥

कपटें राज्य हरिलें त्यांहीं ॥ धर्ममार्गे घेतले नाहीं ॥ तें पौरुषत्वें साध्य होईल ॥ मज अर्जुनातें आज्ञा देई ॥१३॥

ऋषि राजे महानुभाव ॥ यांचा ऐसाचि मनोभाव ॥ तरी पौरुषत्वें राज्य घ्यावें ॥ हाचि करुं उपाव ॥१४॥

विप्रां गोदानें द्रव्यदानें ॥ राज्य घेवोनि सुखी करणें ॥ त्रिभुवनीं नाहीं वीर ॥ जेणें आह्मासीं झुंजणें ॥१५॥

यावरी युधिष्ठिर बोलिला ॥ ह्नणे भीमा तूं गा भला ॥ वाक्यशल्यें करोनी ॥ मातें विंधितोसि या वेळां ॥१६॥

मी तुज निंदित नाहीं जाण ॥ मज करितां पावलासि व्यसन ॥ परि मी जिंतावयाचे इच्छें ॥ खेळलों नाहीं निर्वाण ॥१७॥

कपटफांशीं शकुनीयें ॥ मज हारविलें पाहें ॥ व्यसनीं पाडिलें दुर्योधनें ॥ थोर कष्टविलें द्रौपदीये ॥१८॥

तें वारंवार आठवुनी ॥ धीर होत नाहीं मनीं ॥ परि भाष राखावयानिमित्तें ॥ कष्टणें लागतसे वनीं ॥१९॥

जैं द्यूतीं मज हारविलें ॥ द्रौपदीसि विटंबिलें ॥ तेव्हांचि पुरुषत्व करितेती ॥ तरी सफळ होतें भलें ॥२०॥

आतां होणार तें जाहलें ॥ समयपरियंत रहा उगले ॥ सत्य असे भाष माझी ॥ प्राप्त होईल आपुलें ॥२१॥

अगा सत्याहूनि काहीं ॥ अपूर्व सृष्टिमाजी नाहीं ॥ तंव भीमसेन क्रोधें ॥ बोलिला धर्मासि पाहीं ॥२२॥

अरे तेरा वरुषें क्रमावीं ॥ मग प्राप्तकाळीं संधी करावी ॥ तेव्हां सर्व पाविजेल ॥ हे मूढबुद्धि न धरावी ॥२३॥

तूं काळ नित्य मानिसी ॥ परि मनुष्यें वश असती काळासी ॥ आयुष्य क्षणोक्षणींन्यून होतें ॥ हें कां पां न विचारिशी ॥२४॥

अपरिमित आयुष्य आहे ॥ ऐसें जया कळलें पाहें ॥ तोचि तेरावरुषें प्रतिक्षा करील ॥ हें सर्वथा आह्मां न साहे ॥२५॥

शरीरधारी जे प्राणी ॥ त्यांसि मृत्यु क्षणोक्षणीं ॥ जो वैराचा प्रतिकार न करी ॥ तो सर्वाधम मेदिनीं ॥२६॥

त्याचें वृथा जन्म जाणावें ॥ ह्नणोनि वैरी मारोनि राज्य भोगावें ॥ आणि समस्तही कृष्णादी ॥ आपणां साह्य असती सद्भावें ॥२७॥

आमुचा तरी पुरुषार्थ ॥ राया तुज आहे विदित ॥ मनुप्रणित राजधर्म ॥ तेहीं तूं अससी जाणत ॥२८॥

बाहुबळें क्षत्रियें पाहीं ॥ पृथ्वी भोगावी हें अन्यथा नाहीं ॥ आपण सर्वाथीं पूर्ण असों ॥ तूं दीनत्व सोडोनि देयीं ॥२९॥

तेरावरुषांचे तेरा मास ॥ क्रमूं कळेना वनवास ॥ येणें प्रतिज्ञा सत्य होईल ॥ मग करुं वैरिविनाश ॥३०॥

तूं ऐसा तरी नेम करीं ॥ कीं युद्धाविण अपवित्र क्षेत्रीं ॥ राज्य पावलिया आपण ॥ दानें देऊं नानापत्री ॥३१॥

ऐसें भीमवाक्य ऐकोनी ॥ धर्मे श्वासोश्वास सांडोनी ॥ उगाचि राहिला क्षणमात्र ॥ नेत्रनिमीलन करोनी ॥३२॥

मग पाहोनि भीमाप्रती ॥ बोलता जाहला पुढती ॥ ह्नणे दृढ विचारुनि कार्य ॥ आरंभावें बुद्धिमंतीं ॥३३॥

तूं वीर्यभावें चपळ भारी ॥ ह्नणोनि बोलसी अविचारीं ॥ परि ऐकें वचन माझें ॥ कौरवदळीं महाक्षेत्री ॥३४॥

भीष्म द्रोण आणि कर्ण ॥ भूरिश्रवा शल्य जाण ॥ जळसंध अश्वत्थामा ॥ दुर्योधन संबंधीजन ॥३५॥

तथा अपराजित आपणातें ॥ तेही आश्रयूनि असती त्यांतें ॥ सकळपदार्थी संपूर्ण ॥ सर्वशस्त्रास्त्रें जाणते ॥३६॥

दुर्योधनाचा मान जाणोनी ॥ तन्निमित्तें जातील मरणीं ॥ अभेद्यकवची कर्णवीर ॥ कोण वधील तया रणीं ॥३७॥

ऐसें वचन ऐकोनी ॥ भीम दुःखित जाहला मनीं ॥ तंव व्यास येवोनि धर्मासी ॥ बोलता जाहला तत्क्षणीं ॥३८॥

ह्नणे भीष्मादिकां पासोनी ॥ जें भय असे तुझ्या मनीं ॥ तें मी सर्वही निवारीन ॥ मग नेला एकांतस्थानीं ॥३९॥

ह्नणे हा नरावंतार अर्जुन ॥ युद्धीं तपोबळें करुन ॥ देवादिकां जिंकील ॥ यासी साह्यकारी श्रीकृष्ण ॥४०॥

आतां तुह्मीं हें वन टाकोनी ॥ राहिजे आणिकीये वनीं ॥ ते मानिलें युधिष्ठिरें ॥ तंव काय केलें व्यासानीं ॥४१॥

योगविद्या उपदेशुनी ॥ अंतर्धान पावले मुनी ॥ मग युधिष्ठिरें ते सद्विद्या ॥ अभ्यासिली तत्क्षणीं ॥४२॥

यावरी पुनरपि काम्यकवनीं ॥ पांडव आले व्यासवचनीं ॥ तेथ दैविक पैतृकें केलीं ॥ मृगांदिकां मारोनी ॥४३॥

मग कवणीयेके दिनीं ॥ एकांतीं असतां तिये वनीं ॥ अर्जुनाप्रति धर्म ॥ बोलता जाहला वचनीं ॥४४॥

कीं भीष्म द्रोण कृप कर्ण ॥ अश्वत्थामा सर्वजन ॥ सकळही धनुर्वेद ॥ जाणताती संपूर्ण ॥४५॥

तयां वश करोनि दुर्योधनें ॥ मानित असे गुरुपणें ॥ तयासि सर्व पृथ्वीपाळ ॥ वश असती समर्थपणें ॥४६॥

आह्मासि तरी तूं येक ॥ धनुर्धर मुख्य नायक ॥ या कारणें तप करोनी ॥ प्रसन्न करीं शतमख ॥४७॥

सकळदेवांचीं शस्त्रास्त्रें ॥ असती इंद्रापें अपारें ॥ तीं मागोनि तपोबळें ॥ साधीं भ्रात्या समग्रें ॥४८॥

ऐसें वचन आयकोनी ॥ धनुष्यबाण हातीं घेउनी ॥ नमस्कारोनि ऋषीश्वरां ॥ निघाला स्वस्तिवाचन करोनी ॥४९॥

तत्समयीं द्रौपदीसती ॥ सर्वानुमतें जाहली बोलती ॥ आह्मां रक्षिता तूंचि पार्था ॥ निरंतर तुज मी चिंतीं ॥५०॥

मज सभेंत काय बोलिले ॥ तें अपार दुःख जाहलें ॥ न विसरावें आमुतें ॥ तुज चिंतितें कुशल भलें ॥५१॥

ऐसें वचन ऐकोनी ॥ पार्थे संबोखिली सद्वचनीं ॥ ह्नणे कांहीं चिंत्ता न करावी ॥ मग निघाला तत्क्षणीं ॥५२॥

हिमालय अतिक्रमोनी ॥ गंधमादन टाकोनी ॥ गेला इंद्रकीलपर्वतीं ॥ तेथ अंतरिक्ष जाहली वाणी ॥५३॥

इयेचि स्थळीं राहीं पार्था ॥ पूर्ण पावसी मनोरथां ॥ हें ऐकोनि धनुर्धर ॥ तेथेंचि जाहला राहता ॥५४॥

तंव वृक्षमूळीं जटाधारी ॥ पार्थे तापसी देखिला नेत्रीं ॥ येरु अर्जुना जाहला पुसता ॥ तूं कवण गा शस्त्रधारी ॥५५॥

येथें शस्त्रीं नाहीं प्रयोजन ॥ सांडीं सांडीं गा धनुष्यबाण ॥ ऐसें बहुतांपरी वारितां ॥ परि तो नायकेचि तद्वचन ॥५६॥

मग तपस्वी संतोषला ॥ ह्नणे मी इंद्र प्रसन्न तुजला ॥ तेव्हां पार्थे जोडोनि कर ॥ देवेंद्रासी बोलिला ॥५७॥

पूर्ण जाहला काम आज ॥ परि येक अस्त्र देई मज ॥ तंव इंद्र ह्नणे अस्त्राचें ॥ काय कारण गा तुज ॥५८॥

स्वर्गादि भोग मागणें ॥ यावरी पार्थ इंद्रासि ह्नणे ॥ माझे बंधु असती वनीं ॥ मज वैरि संहारपणें ॥५९॥

आणि कीर्ति अर्जणें पाहीं ॥ येरु ह्नणे याहूनि श्रेष्ठ काई ॥ परि महेश भेटेल तुज ॥ मी अस्त्रें देईन तत्समयीं ॥६०॥

ऐसें ह्नणोनि अदृश्य जाहला ॥ पार्थे महेश मनीं धरिला ॥ दर्शन व्हावया कारणें ॥ तप करिता जाहला ॥६१॥

ऐसी ऐकोनि व्यवस्था ॥ जन्मेजयो जाहला पुसता ॥ वैशंपायना तूं सर्वज्ञ ॥ तरी सांगें अग्रकथा ॥६२॥

अर्जुनासि कवणियेपरी ॥ प्रसन्न जाहला त्रिपुरारी ॥ तें कृपा करोनि मुनी ॥ मज सांगिजे सविस्तरीं ॥६३॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ धर्मारायाची आज्ञा घेवोन ॥ इंद्रदर्शनानिमित्त ॥ गेला शस्त्रेंसिं अर्जुन ॥६४॥

ऐसा पावला इंद्रकीलपर्वतीं ॥ जेथ नानाविध वनस्पती ॥ पुष्पीं फळीं वोतवंरा ॥ पक्षी नानाशब्द करिती ॥६५॥

तेथें पार्थे तप मांडिलें ॥ पहिले मासीं तीन फळें ॥ दुसरे मासीं फळें दोनी ॥ येक तिसर्‍यामाशीं भक्षिलें ॥६६॥

चौथ्या मासीं गलितपर्णे ॥ पांचवे मासीं वायुभक्षणे ॥ ऊर्ध्वबाहु एकांगुष्ठ ॥ तप करी उभा राहोन ॥६७॥

तें देखोनि तेथील ऋषी ॥ जावोनि कथिती शिवासी ॥ ह्नणती पार्थाचें तपतेज ॥ न साहवे आह्मासी ॥६८॥

तरी त्वां निवारावें तयातें ॥ मग ह्नणितलें जगन्नाथें ॥ तुह्मी अवघे जारे पुढें ॥ मी मागोनि येतों तेथें ॥६९॥

अर्जुनाचा अभिप्रावो ॥ मज कळला सर्व भावो ॥ असो ऋषी गेलियां नंतरें ॥ काय करी महादेवो ॥७०॥

आपण भिल्लवेष धरोनी ॥ सवें भूतगण भवानी ॥ आणि सहस्त्रावधी नारी ॥ आला अर्जुनापें वनीं ॥७१॥

शिवाज्ञेनें मूक दैत्य ॥ धरुनि वाराहरुप त्वरित ॥ अर्जुनातें मारावया ॥ अला शब्दें गुरगुरत ॥७२॥

तंव शर साधोनि धनुषीं ॥ पार्थ ह्नणे सूकरासी ॥ तूं माराया आलासि मज ॥ परि मीचि वधीन निश्वयेंसी ।७३॥

ऐसें ह्नणोनि सोडावा बाण ॥ तंव ह्नणे किरातपंचानन ॥ यावरी माझें लक्ष आहे ॥ तूं सोडूं नको बाण ॥७४॥

तें वचन अमान्य करोनी ॥ पार्थे वराह विंधिला बाणीं ॥ तंव येरीकडे सवेगें ॥ शर सोडी पिनाकपाणी ॥७५॥

ते उभयतांचे बाण ॥ त्याचे शरीरीं भेदोन ॥ मूक दैत्य पडिला भूमीं ॥ मग भिल्लासि ह्नणे अर्जुत ॥७६॥

तूं कवणरे स्त्रियां सहितु ॥ फिरतोसि या वनाआंतु ॥ हा मृगयाधर्म नव्हे ॥ म्यां विंधितां कां विंधिलें तूं ॥७७॥

तंव शंकर जाहला बोलता ॥ तूं रे असत्यवादी निरुता ॥ म्यां पूर्वी लक्श केलें होतं ॥ त्वां कां विंधिलें वारिता ॥७८॥

हा मेला माझ्या बाणीं ॥ तूं गर्व न धरीं मनीं ॥ पार्थ ह्नणी माझेचि शरें ॥ मृग पाडिला धरणीं ॥७९॥

रुद्र ह्नणे तुज गर्व आहे ॥ तरी माझा बान साहें ॥ अथवा तूं बाण सोडीं ॥ मग संसांरले उभय ॥८०॥

दोघीं सिंहनाद केले ॥ युद्ध घोरांदर मांडलें ॥ अर्जुनें अनंत कोटी ॥ बाण भिल्लावरी टाकिले ॥८१॥

ते तोडिले पंचांननें ॥ विस्मयो मानिला अर्जुनें ॥ ह्नणे ऐसा वीर कैसा ॥ दुजा हरिहर होय झणें ॥८२॥

जरी दुजा कोणी असता ॥ तरी क्षणामाजी मरता ॥ माझे बाण सरले ॥ परि हा नढळे सर्वथा ॥८३॥

रिक्त नव्हे माझा भाता ॥ हा बाण भक्षितो सर्वथा ॥ संधान करितां न दिसे ॥ ममास्त्रेंहीं गेलीं वृथा ॥८४॥

मग धनुष्य उगारोनी ॥ हाणीतला कोंटी करोनी ॥ तंव मांडोनि गेलें धनुष्य ॥ बाहुबळें भिडले दोनी ॥८५॥

पार्थे दोनी वज्रमुष्टीं ॥ हदयीं ताडिला धूर्मटीं ॥ तंव शिवें धरिला दडपोनी ॥ निचेष्ठि त केला करीती ॥८६॥

तये अर्जुनाच्या युद्धीं ॥ थोरसंतोषला कपदीं ॥ ह्नणे अर्जुना मी संतोषलों ॥ तुझ्या संग्रामी त्रिशुद्धीं ॥८७॥

आतां तूं सर्व वैरी जिंकिसी ॥ ह्नणोनि स्वरुप दाविलें त्यांसी ॥ येरें साष्टांगें वंधोनि ॥ स्तविलें श्रीशंकरासी ॥८८॥

देवा मी अपराधी दुराचारी ॥ कीं तुजसवें केली झुंजारी ॥ तंव हांसोनि पार्थालागीं ॥ बोलता जाहला त्रिपुरारी ॥८९॥

तूं गा नरावतार साक्षात ॥ तुज साह्यकारी अनंत ॥ पूर्वी बदरिकाश्रमीं ॥ तुह्मीं तप केलें बहुत ॥९०॥

माझें तुज प्रसन्नपण ॥ तूं करीं अरिनिर्दाळण ॥ देवेंद्रा स्थापिलेंति स्वर्गी । तूं आणि नारायणें ॥९१॥

तूं माझाचि अवतार ॥ फेडावया भूभार ॥ अवतरलासि भूतळीं ॥ दुजा मत्सखा चक्रधर ॥९२॥

तुझे धर्मादि भ्राते सकळ ॥ अक्षय्य होऊत सर्वकाळ ॥ तंव अर्जुन विनवोनि ह्नणे ॥ प्रसन्न जालासि जाश्वनीळ ॥९३॥

तरी पाशुपतास्त्र मज द्यावें ॥ जेणें दानव मारिले आघवे ॥ जें प्रसवे अस्त्रजाळ ॥ शूळ गदा बाण बरवे ॥९४॥

तें मज देयीं शंकरा ॥ मग मी वैरियां मारीन समग्रां ॥ रुद्र ह्नणे प्रसन्नत्वें ॥ घेई पाशुपत धनुर्धरा ॥९५॥

तुं धारणा मोक्षसंहारीं ॥ कुशळ आहेसि सर्वोपरी ॥ या अस्त्रा अवध्य काहीं ॥ नाहीं सृष्टीमाझारी ॥९६॥

यावरी होवोनि शुचिष्मंत ॥ विद्या घेता जाहला पार्थ ॥ मंत्रोपदेश विधानें ॥ देत असे उमाकांत ॥९७॥

तंव लागल्या सुरदुंदुभी ॥ महागजर जाहले नभीं ॥ पार्थे स्तवितां शंकरु ॥ अदृश्य जाहला कपर्दी ॥९८॥

पाशुपतविद्या पावला ॥ तेणें पार्थ संतोषला ॥ तंव इंद्रादि लोकपाळ ॥ भेटों आले तयाला ॥९९॥

यम ह्नणे गा धर्ममूर्ती ॥ तुज भेटों आले दिक्पती ॥ तूं ब्रह्मशापें साक्षात नर ॥ अवतरलासि क्षिती ॥१००॥

त्वां प्रसन्न केला शूळपाणी ॥ तरी अस्त्रें घे पां आह्मांपासोनी ॥ मग धर्मे दीधला दंड ॥ वरुणें पाश तत्क्षणीं ॥१॥

कुबेरें दीधलें प्रस्वापन ॥ इंद्रें वज्र आयुध जाण ॥ ऐसीं पार्था लाधलीं अस्त्रें ॥ येरु घेत शुचि होउन ॥२॥

यावरी देव गेले स्वस्थानीं ॥ पार्थ हरिखला अंतःकरणीं ॥ यानंतरें धनुर्धरें ॥ हदयीं चिंतिला वज्रपाणी ॥३॥

तंव तेथें आला मातळी ॥ इंद्रसारथी महाबळी ॥ रथासह येतां वेगें ॥ गर्जना जाहली भूतळीं ॥४॥

तो पार्थासि ह्नणे देवांसहित ॥ बैसला असे सुरनाथ ॥ तुज न्यावया अमरावतीये ॥ पाठविला हा रथ ॥५॥

इये रथीं आरुढावें ॥ तंव अर्जुन बोलता होय ॥ हा देवांदानवां दुर्लभ ॥ म्यां केविं बैसावें पाहें ॥६॥

मातली ह्नणे तूं इंद्रानंद ॥ रथीं बैसें गा नाहीं बाध ॥ तें ऐकोनियां पार्थ ॥ स्त्रान करिता होय शुद्ध ॥७॥

मग नानास्तुति करोनी ॥ मंदराचळातें उल्लंघोनी ॥ मातलीसहवर्तमान ॥ चालिला रथीं बैसोनी ॥८॥

मार्गी गंधर्वाची नगरें ॥ देखोनि पुसिलें धनुर्धरें ॥ येथें कोण वसताती ॥ तें सांगावें सविस्तरें ॥९॥

मातली ह्नणे पार्था येथ ॥ बैसताती पुण्यवंत ॥ ऐसें क्रमोनि अंतराळ ॥ गेले अमरावतीसि त्वरित ॥११०॥

त्या नगरींची अपूर्व रचना ॥ देखतां संतोष जाहला अर्जुना ॥ तंव ऐरावती महाद्वारीं ॥ देखिला चतुर्दत शुभ्रवर्णा ॥११॥

नानामुनिगणीं स्तूयमान ॥ देवगंधर्वी शोभायमान ॥ इंद्राणीसहित इंद्र ॥ सिंहासनीं विराजमान ॥१२॥

पार्थ रथींचा उतरला ॥ नमस्कार करिता जाहला ॥ देवें आलिंगोनि भावें ॥ मांडियेवरी बैसविला ॥१३॥

सर्वाग स्पर्शीत वज्रपाणी ॥ दोघे उपविष्ट एकासनीं ॥ तंव गंधर्व अप्सरादिकीं ॥ स्तविलें नानास्तुतिवचनीं ॥१४॥

ऐसा पितृगृहीं पार्थ ॥ राहोनि विद्या अभ्यासित ॥ पांच वरुषें अतिक्रमलीं ॥ तंव बोलिला सुरनाथ ॥१५॥

कीं हा सखा चित्रसेन ॥ तुज मी देतों आजपासून ॥ गीतनृत्य अभ्यासावें ॥ मग शिकता जाहला अर्जुन ॥१६॥

यावरी कोणे एके दिनीं ॥ इंद्र पार्थेसीं सिंहासनीं ॥ बैसलासे पुत्रभावें ॥ तंव आले लोमशमुनी ॥१७॥

इंद्रें षोडशोपचारीं पूजिला ॥ उत्तमासनीं बैसविला ॥ येरें पार्थासि देखोनि ॥ देवेंद्रासि बोलिला ॥१८॥

अगा येणें काय पुण्य केलें ॥ जे तुवां स्वासनीं बैसविलें ॥ इंद्र ह्नणे ऋषीश्वरा ॥ हा पार्थ माझा तान्हुलें ॥१९॥

हा केवळ मनुष्य नोहे ॥ महापराक्रमी आहे ॥ अस्त्रविद्ये लागोनी ॥ मजजवळी आला आहे ॥१२०॥

पूर्वकाळीं नरनारायणीं ॥ तप केलें बदरिकावनीं ॥ आतां भूभार हरावया ॥ अवतरले हेचि मेदिनीं ॥२१॥

याचा पराक्रम तुह्मां ॥ कळला नाहीं द्विजोत्तमा ॥ आतां आपण काम्यकवनीं ॥ जावोनि भेटावें धर्मा ॥२२॥

सांगावी पार्थाची व्यवस्था ॥ कीं शस्त्रास्त्रविद्या समस्ता ॥ घेवोनि येईल पार्थ ॥ काहीं न करावी चिंता ॥२३॥

तुवां आतां बंधुवांसहित ॥ तीर्थे करावीं समस्त ॥ विषमस्थळीं समस्तां ॥ तुवां रक्षावें सत्य ॥२४॥

ऐसें ऐकोनि लोमशमुनी ॥ शीघ्र गेले काम्यकवनीं ॥ पांडवांतें देखोनि ऋषी ॥ भेटले तयांलागुनी ॥२५॥

असो ऋषीश्वर गेलियावरी ॥ कोणेएके अवसरीं ॥ इंद्रें आज्ञापिला चित्रसेन ॥ कीं येक माझें कार्य करी ॥२६॥

हे रुपलावण्य उर्वशी ॥ पाठवीं पार्थसंभोगासी ॥ मग तो चित्रसेन ॥ जावोनि ह्नणे तियेसी ॥२७॥

अहो उर्वशी परियेसीं ॥ हा पार्थ लावण्यराशी ॥ पराक्रम विद्या लक्ष्मी ॥ संपन्न गुणविशेषीं ॥२८॥

तरी त्वां जावोनि तयापाशीं ॥ पूर्ण करीं कामनेसी ॥ ऐसी प्रेरिली तेणें ॥ तें मानवलें उर्वशी ॥२९॥

मग सर्व श्रृंगार करोनी ॥ नाना उपभोग घेउनी ॥ पार्थ चित्रशाळे निद्रिस्थ ॥ तंव ते आली तत्क्षणी ॥१३०॥

येरु देखोनि शंकला ॥ उठोनि उभा राहिला ॥ गुरुभ्रांती लज्जायुक्त ॥ तिये पूजिता जाहला ॥३१॥

तंव ते ह्नणे मी उर्वशी ॥ पार्थ ह्नणे कां आलीसी ॥ येरीनें सकळ वृत्तांत ॥ श्रुत केला तयासी ॥३२॥

पार्थ लाजला ऐकोनी ॥ हस्तीं नेत्रकर्ण झांकोनी ॥ लज्जायमान होत्साता ॥ बोलिला तियेसि वचनीं ॥३३॥

हें वो काय बोलतेसी ॥ तूं गुरुदारा परियेसीं ॥ ममपित्याची अप्सरा ॥ हें कदा न धडे निश्वयेंसी ॥३४॥

जैसी मज कुंती माता ॥ तैसीच वो तूं सर्वथा ॥ माझा प्रतिपाळ करावा ॥ न करीं व्यभिचारकथा ॥३५॥

उर्वशी ह्नणे धनंजया ॥ येथें तप करिसी वायां ॥ तर्पे आचरोनि मृत्युलोकीं ॥ प्राणी येताति या ठाया ॥३६॥

येथें इंद्रआज्ञेनें अभिनव ॥ भोग भोगिती सर्व जीव ॥ हें सुख नाहीं भूतळीं ॥ भोगभूमी हे अपूर्व ॥३७॥

येथें विधिनिषेध नाहीं ॥ मी तरी कामार्त असें पाहीं ॥ ऐसें वचन ऐकोनी ॥ पार्थ ह्नणे ते समई ॥३८॥

तूं माझी माता जाण ॥ मीं तुज पुत्रासमान ॥ तंव कोपोनि उर्वशी ॥ देती जाहली शापदान ॥३९॥

तूं माझी अवज्ञा करिसी ॥ तुझी परी होईल तैसी ॥ तूं नपुंसक होसील ॥ येकवर्ष निश्वयेंसीं ॥१४०॥

ऐसी शापूनियां सुंदरा ॥ गेली आपुले मंदिरा ॥ मग ते रात्री अतिदुःखें ॥ पार्थे क्रमिली अवधारा ॥४१॥

प्रभातीं चित्रसेनाप्रती ॥ सांगता जाहल शापस्थिती ॥ मग तें चित्रसेन अवघें ॥ सांगतसे सुरपती ॥४२॥

यावरी बोलावोनि पार्था ॥ इंद्र जाहला संबोखिता ॥ कीं धन्यधन्य सोमवंशें ॥ कुंतीसुता भाग्यवंता ॥४३॥

स्तुती करोनियां ऐशी ॥ ह्नणे हा शाप तेराव्या वर्षी ॥ गुप्तवृत्तीं रहाल तुह्मी ॥ तैं भोगिसी निश्वयेंसीं ॥४४॥

तें शापमोचन मानोनी ॥ चित्रसेनाचिये भुवनीं ॥ क्रीडा करी धनंजयो ॥ सर्वकाळ राहोनी ॥४५॥

भारता ऐकतां हें आख्यान ॥ कामपीडा नपवे जन ॥ कथा संक्षेपें सांगीतली ॥ ग्रंथ विस्तारेल ह्नणोन ॥४६॥

ऐसा पांडवां सांडोनि वनीं ॥ पार्थ गेला अस्त्रालागुनी ॥ तो सर्वविद्या पूर्ण जाहला ॥ कौरवीं आयकिलें श्रवणीं ॥४७॥

जन्मेजय ह्नणे हो मुनी ॥ हें पार्थाचें कर्म ऐकोनी ॥ काय केलें धृतराष्ट्रें ॥ तें सांगा विस्तारोनी ॥४८॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ व्यासें धृतराष्ट्राजवळी येवोन ॥ पार्थाची सर्व स्थिती ॥ सांगीतली विस्तारोन ॥४९॥

पार्थ इंद्रलोकीं गेला ॥ ऐसा शब्द आयकिला ॥ मग संजयाप्रती ॥ धृतराष्ट्र बोलिला ॥१५०॥

कीं मंदात्मा माझा पुत्र ॥ पापरुपी साचार ॥ करोनि धर्मासी विरोध ॥ कैसा भोगील राज्यभार ॥५१॥

सत्यवादी युधिष्ठिर ॥ आणि पार्था ऐसा झुंजार ॥ तयां संग्रामीं भीडतां ॥ कोण साहों शके शर ॥५२॥

ऐसा नानाप्रकारीं ॥ धृतराष्ट्र मनीं विलाप करी ॥ तें ऐकोनि संजय ॥ बोलिला तिये अवसरीं ॥ ॥५३॥

राया तूं बोलसी तें सत्य ॥ पांडवां कष्टविलें अत्यंत ॥ विपत्ती केली द्रौपदीये ॥ कर्ण बोलिला अयुक्त ॥५४॥

तें आद्यंत स्मरोनी ॥ ते उगे राहतील कायसेनी ॥ दीधलें प्रसन्नत्वें अर्जुना ॥ पाशुपतास्त्र शूळपाणी ॥५५॥

सर्व देवीं आपुलालीं ॥ नानाआयुधें दीधलीं ॥ तो अर्जुन आणि भीमसेन ॥ ख्याती करितील भूतळीं ॥५६॥

शांत नव्हती सर्वथा ॥ वधिती कौरवां समस्तां ॥ ऐसें वचन ऐकोनी ॥ धृतराष्ट्र जाहला बोलता ॥५७॥

कर्णे दुर्वाक्यें बोलोनी ॥ सभे गांजिली द्रुपदनंदिनी ॥ तेणें काय हाता आलें ॥ वैर जोडिलें आवंतोनी ॥५८॥

कर्ण शकुनी दुःशासन ॥ हे मंत्री मानितो दुर्योधन ॥ मी तंव अंध ह्नणोनी ॥ नायकती माझें वचन ॥५९॥

ऐसें धृतराष्ट्र बोलिला ॥ तंव भारत विनविता जाहला ॥ अंधें शाक करोनी ॥ द्वेष पुत्रावरी धरिला ॥१६०॥

पक्षपात पांडवांवरी ॥ असो पांडव असतां वनातरीं ॥ काय भोजन करिते जाहले ॥ तें सांगिजे सविस्तारीं ॥६१॥

वैशंपायन ह्नणती राया ॥ वनीं मृग मारोनियां ॥ मांस भक्षिती पांडव ॥ हव्यकव्य करोनियां ॥६२॥

ऐसें असतां तयांसी ॥ तंव असंख्य पातले ऋषी ॥ तयां करावया उपहार ॥ चौघे गेले चहूंदिशीं ॥६३॥

मृग मारोनि आणिले ॥ ऋषीचें पोषण करिते जाहले ॥ द्रौपदीही आतिथ्य करी ॥ कंदमुळीं वनफळें ॥६४॥

वनवासीं असतां ऐसें ॥ पांडवीं क्रमिलीं पोषण करिते जाहले ॥ द्रौपदीही आतिथ्य करी ॥ कंदमुळीं वनफळें ॥६४॥

वनवासीं असतां ऐसें ॥ पांडवीं क्रमिली पांच वरुषें ॥ हे व्यवस्था धृतराष्ट्रें ॥ आयकिली सविशेषें ॥६५॥

मग श्वासोश्वास सांडोनी ॥ बोले संजयाप्रति वचनीं ॥ कीं भीमार्जुन महावीर ॥ तयां साहकारी चक्रपाणी ॥६६॥

नकुळसहदेव महारथी ॥ आणि पांचाळादि भूपती ॥ उठती महामारीये ॥ आमुचें सैन्य निःशेष करिती ॥६७॥

द्रौपदीचे सभाक्केश ॥ आणि कष्टरुपी वनवास ॥ आठवोनि झुंजती पांडव ॥ तेव्हां होईल सर्वनाश ॥६८॥

ऐसा धृतराष्ट्र व्याकुळ जाहला ॥ तंव संजयो बोलिला ॥ पुत्रस्नेहें करोनि राया ॥ पूर्वीच त्वां धर्म दवडिला ॥६९॥

पांडव जिंकिले कपटद्यूतीं ॥ हें ऐकोनियां श्रीपती ॥ यादवां भूपां सहित ॥ येवोनि भेटला पांडवांप्रती ॥१७०॥

अवघे सकोप बोलिले ॥ जें दूतें आह्मां सांगीतलें ॥ तें तुज सांगतों राया ॥ पांडव कृष्णें आश्वासिले ॥७१॥

ह्नणे मी होईन सारथी ॥ आणि अर्जुन महारथी ॥ सखे संबंधी अवघे ॥ सैन्येंसहित मिळती ॥७२॥

मग तुमचें राज्य घेणें ॥ सर्व वैरी संहारणे ॥ जे समृद्धी देखिली इंद्रप्रस्थीं ॥ ते पहिलीचि हरणें ॥७३॥

अंगवंगरौद्र सागर ॥ नूपकासी हय बर्बर ॥ म्लेछ आणि लंकावासी ॥ पाश्विमात्य समग्र ॥७४॥

सागरांतिक किरात यवन ॥ स्वार सैंधव हारहूण ॥ कैकेय माळव काश्मीरक ॥ ऐसे असंख्य नृपनंदन ॥७५॥

यज्ञीं देखिले पूर्वी आह्मीं ॥ तयां मारुनि सकळ लक्ष्मी ॥ घेवोनि राया समृद्धी ॥ निश्वयें तुज देईन मी ॥७६॥

राम अक्रूर भीमार्जुन ॥ गद सांब आणि प्रद्युम्न ॥ शिशुपाळपुत्र आहुक ॥ पांचाळसुत धृष्टद्युम्न ॥७७॥

ऐसे अवघे मिळोनी ॥ कर्णदुःशासन शकुनी ॥ दुर्योधनादि सर्व राजे ॥ तयां संहारुं रणीं ॥७८॥

त्यांची राजश्री पदार्थ ॥ तुह्मां देईन निभ्रांत ॥ एतद्विषयीं कृष्णाची ॥ धर्मे घेतली भाक सत्य ॥७९॥

तेचि समयीं श्रीअनंत ॥ येतहोता कराया निःपात ॥ परि सांत्वन केलें द्रौपदीयें ॥ नातरी होता अनर्थ ॥१८०॥

द्रौपदीसि ह्नणितलें गोपाळें ॥ म्यां शांती धरिली यावेळे ॥ परि तुज गांजिलें तयांची ॥ रणीं पाडीन शिरकमळें ॥८१॥

त्यांचें मांस आणि रुधिर ॥ भक्षिती पशुपक्षी अपार ॥ हें तेरावरुषां उपरी ॥ आह्मी करुं अखर ॥८२॥

तरी ते अवघे भूपती ॥ अवधी पुरलिया येती ॥ युद्ध करोनि घोरांदर ॥ सर्व संहार करिती ॥८३॥

ऐसें संजयो धृतराष्ट्रा ॥ सांगता जाहला गा नरेंद्रा ॥ तंव विनवी जन्मेजयो ॥ वैशंपायना मुनींद्रा ॥८४॥

कीं अस्त्रनिमित्तें पार्था ॥ स्वर्गी जाणें जाहलें असतां ॥ पांडव काय करिते जाहले ॥ ते सांगें अग्रकथा ॥८५॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ अमरावतीये गेला अर्जुन ॥ पाठीं नानादुःखें ॥ पांडव करिती अनुदिन ॥८६॥

तंव युधिष्ठिरासि वृकोदर ॥ गहिंवरोनि करी उच्चार ॥ कीं पार्थ गेला अमरावतीये ॥ तो आपुला परम आधार ॥८७॥

तुझिये आज्ञे करोनी ॥ गेला आह्मांतें सांडोनी ॥ कृष्ण पांचाळादि आह्मी ॥ करितों शोक सर्व मनीं ॥८८॥

तो असलिया आह्मांपाशीं ॥ वैरी वधूनि जिंकूं भूमीसी ॥ गांधारें केला अपमान ॥ असह्य होतो आह्मांसी ॥८९॥

क्षत्रियधर्म सांडोनी ॥ जो राहे शांती धरोनीं ॥ वृथा तयाचें जियाळें ॥ होय अपकीर्ती त्रिभुवनीं ॥१९०॥

अरी पासोनि अपमान ॥ जालिया जो राहे साहोन ॥ तो पचिजे रोरवीं ऐसें ॥ धर्मा निर्भत्सीं भीमसेन ॥९१॥

तंव धर्म सांत्वोनि ह्नणे भीमासी ॥ तूंचि दुर्योधनातें मारिसी ॥ घेसी राज्य आपुलें ॥ अवघी पुरलिय निश्वयेंसीं ॥९२॥

तंव बृहदश्वा येवोनि ह्नणे ॥ धर्मा पडला समयो साहणें ॥ परि तुजसवें कांता बंधु ॥ धौम्यादि ऋषि जाणणें ॥९३॥

द्यूतकर्मी तुज परिस ॥ नळ कष्टला बहुवस ॥ मग धर्म विनवी ऋषिराया ॥ सांगें त्याचा वनवास ॥९४॥

तैं समूळ नळोपाख्यान ॥ ऋषीश्वरें केलें कथन ॥ जे प्रथमस्तबकीं कथा ॥ कथिली असे संकलोन ॥९५॥

नळोपाख्यान ऐकोनी ॥ धर्म संतोषला मनीं ॥ मग अक्षविद्या संपूर्ण ॥ पुसिली मुनीलागोनी ॥९६॥

तेव्हां बृहदश्वें परियेसीं ॥ अक्षविद्या दीधली धर्मासी ॥ मग पूजोपचारां नंतरें ॥ बदरिकाश्रमीं गेला ऋषी ॥९७॥

मुनी गेलियानंतरें ॥ पार्थाचे कष्ट युधिष्ठिरें ॥ आयकोनी कर्णोपकर्णी ॥ व्याप्त जाहला दुःखें थोरें ॥९८॥

ह्नणे आह्मालागीं वनांतरी ॥ तप केलें नानापरी ॥ निराहरी भक्षोनि वायु ॥ प्रसन्न केला त्रिपुरारी ॥९९॥

पाशुपतविद्या पावला ॥ मग इंद्रें स्वर्गासि नेला ॥ आतां येईल कवणेपरी ॥ ऐसा चिंताग्रस्त जाहला ॥२००॥

तंव लोमेश येवोनि धर्मासी ॥ ह्नणे इंद्रें गौरवोनि मजसीं ॥ सांगीतली पार्थव्यवस्था ॥ ते आठवत अहर्निशीं ॥१॥

मग वैराग्य उपजलें चौघांजणा ॥ आणि द्रौपदीसि जाणा ॥ जे पार्थदुःखें तीर्थमिषें ॥ करुं पृथ्वीप्रदक्षिणा ॥२॥

तंव नारद तेथ आला ॥ पांडवीं उपचारीं पूजिला ॥ मग तीर्थफळ सविस्तर ॥ धर्म पुसता जाहला ॥३॥

नारद ह्नणे गा धर्मा ॥ जे पुलस्तियें कथिली भीष्मा ॥ तीर्थभ्रमणफळश्रुती ॥ ते ऐकें थोर महिमा ॥४॥

जया कांहीं वेंचाया नाहीं ॥ तेणें तीर्थासी भ्रमावी मही ॥ अग्निष्टोमादि यागफळ ॥ तया प्राप्त होय पाहीं ॥५॥

मग पुष्करादि तीर्थाची ॥ जे महिमा असे अनुक्रमेंची ॥ ते सांगोनि गेला नारद ॥ येरीं मनीं धरिलें तेंची ॥६॥

घटोत्कच पाचारोनी ॥ तेणें द्रौपदी खांदीं वाहोनी ॥ केलीं सर्व तीर्थे पांडवीं ॥ मागुती आले काम्यकवनीं ॥७॥

आतां असो या वनांतरा ॥ पुढां भेटी होईल पंडुकुमर । ते कथा मधुकरकवी ॥ सांगेल श्रोतयां चतुरां ॥८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ नवमस्तबक मनोहरु ॥ षष्ठाऽध्यायीं कथियेला ॥ धर्मकोपोपशमप्रकारु ॥२०९॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP