कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय ११

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

आवर्डी पुसे राजा भारत ॥ युद्धा आला दक्षनाथ ॥ तो सांगा जी वृत्तांत ॥ वैशंपायना ॥१॥

मग ह्नणे ॠषेश्वर ॥ ऐसा धरिला गा पूषावीर ॥ तो जाणवला अवसर ॥ दक्षालागीं ॥२॥

ऐकतांचि दूतवचन ॥ यागासि करोनि नमन ॥ दीक्षेंचे केलें विसर्जन ॥ दक्षरायें ॥३॥

निशार्णी दीधला घावो ॥ मेळविला सैन्यसमुदावो ॥ आणि काय करी दक्षरावो ॥ तये वेळीं ॥४॥

त्वरें बोलाविलें दिक्पाळां ॥ यम इंद्रादि सकळां ॥ ह्नणे सन्नद्ध करावें दळा ॥ युद्धालागीं ॥५॥

यागभागीं तुमची वृत्ती ॥ घेतसा अवदानें आहुती ॥ पूषानें दाविली प्रचीती ॥ युद्धालागीं ॥६॥

माता अथवा अबला सती ॥ कीं गांजिता विप्रज्ञाती ॥ मोडितां पुढिलांची वृत्ती ॥ न काढावें अंग ॥७॥

आपणातें ह्नणवी क्षेत्री ॥ पाहुणा अथवा वाटसुरी ॥ घरीं आलिया अव्हेरी ॥ तो पचे नरकीं ॥८॥

आतां येतील शिवगण ॥ त्यांहीं नेले पूषा भग्न ॥ तरी त्यांची करोनि सोडवण ॥ आणावें कीं ॥९॥

मग पावले शिववीर ॥ वीरभद्रावरी शोभलें छत्र ॥ एक ढाळिती चामर ॥ देहुडेपायी ॥१०॥

विशाळ डोळस सांवळा ॥ कंठीं रुद्राक्षांच्या माळा ॥ विभूतीचा करोनि उधळा ॥ घेतलें शस्त्र ॥११॥

मुखीं रंगलें तांबुल ॥ शिवनामें गर्जती सकळ ॥ सर्वे सन्नद्ध जाहलें दळ ॥ प्रजापतीचें ॥१२॥

अष्टदिशांचे दिक्पाळ ॥ वरुण यम इंद्रादि सकळ ॥ सप्तद्विपीचे भूपाळ ॥ प्रजापतीसर्वे ॥१३॥

भृगु आचार्य तपी थोर ॥ ज यापासीं नानामंत्र ॥ तेणें सकळ रचिला दळभार ॥ रणभूमीसी ॥१४॥

यम इंद्रां जाणोनि रणीं ॥ उठिले भृंगी रुद्रमणी ॥ हांक फुटली गगनीं ॥ लागलीं वाद्यें ॥१५॥

तंव उठिले दक्षदूत ॥ ह्नणती इहीं रण केलें बहुत ॥ आतां रुद्रगणां धरुं जित ॥ सकळांसी पैं ॥१६॥

पूषा विटंबिला शिवनंदनें ॥ तरी काढूं त्याचें उसणें ॥ ऐसें ह्नणोनि क्रोधवचनें ॥ चालिले देव ॥१७॥

रवि झांकोळला अंबरीं ॥ ऐसे वर्षले बाणधारीं ॥ पृथ्वी भरिली रुधिरी ॥ वाहती मुंडे ॥१८॥

हाणिती खर्डे काळदंडें ॥ उभयांची शिरें होती दुखंडें ॥ येकांची धांवती धडें ॥ शिरेंवीण ॥१९॥

तंव उठिले नंदी मणिमंत ॥ सोंडे धरोनि आफळीत ॥ गज रथातें रोवित ॥ धरेवरी ॥२०॥

ऐसी शिववीरांची झुंजारी ॥ ते साहिली इंद्रादि वीरीं ॥ मग उठिले महामारी ॥ इंद्र वरुण ॥२१॥

गजरथांचे महालाटीं ॥ लोटोनि नेले नंदी ॠटी ॥ सैन्य पळे बारावाटीं ॥ वीरभद्राचें ॥२२॥

तंव उठिली झोटिंग जखिणी ॥ मस्तकें पाडिती धरणीं ॥ दक्षसैन्याची केली झाडणी ॥ शिवगणांहीं ॥२३॥

एकमेकां न सांभाळिती ॥ रणांगणीं थै थै नाचती ॥ गज वारु सैरा धावती ॥ शून्यसैन्यी ॥२४॥

रणतुरांच्या गजरीं ॥ अतिउद्भट वीरक्षेत्री ॥ जाणों खेळवीत कुसरी ॥ वीरभद्र ॥२५॥

उदो ह्नणती महारुद्रा ॥ प्रसन्न जाहलों रे वीरभद्रा ॥ तुज साह्य होवों पुढारां ॥ दक्षवधासी ॥२६॥

मग धांवले शिवदूत ॥ तिहीं उडविले वारु रथ ॥ वस्त्रें हरोनि हळहळीत ॥ विटंबिलें दिक्पाळां ॥२७॥

एकमेकां घेती खांदीं ॥ एक एकाचे चरण बांधी ॥ येर येरांचे झोंबती मेदी ॥ दांतेंवरी ॥२८॥

ऐसे मातले भूतगण ॥ युद्ध मांडिले दारुण ॥ असंख्य मारिलें सैन्य ॥ दक्षवीरांचे ॥२९॥

रणीं पडिलीं जीं शस्त्रें ॥ तीचि घेवोनि विचित्रें ॥ तेणें कापिताती शिरें ॥ परवीरांची ॥३०॥

तंव जाहला हाहाः कार ॥ भूमीसि पाडिला महेंद्र ॥ अश्व गज रथभार ॥ नेला शिवदूतीं ॥३१॥

ऐसें देखोनि ब्रह्मसुत ॥ मनीं जाहला विस्मित ॥ ह्नणे कैसा कोपला अनंत ॥ आह्मांवरी ॥३२॥

आतां दिवस जाहले पाठिमोरे ॥ ह्नणवोनि कन्या बापावरी मरे ॥ दिक्पाळां जिंकिती खेचरें ॥ कैसे पां ॥३३॥

जाणें कर्म जाहलें संपूर्ण ॥ कीं पुरलें दिनांचे अवसान ॥ येरव्हीं पूषा भग्नासी शिवगण ॥ धरोनि कैसे नेते पैं ॥३४॥

देवा तूं होसी विन्मुख ॥ तैं रायाचा करिसी रंक ॥ नातरी सिंहातें मूषक ॥ मारित असे ॥३५॥

देवा तुझी होतां कृपादृष्टी ॥ मणी जोडे कांचेसाठीं ॥ आणि कोपतां कनकाची माती ॥ होवोनि ठाके ॥३६॥

जया तूं जाहलासि वज्रपंजरु ॥ त्यासी काळ न शके मारुं ॥ परि अवधी भरलिया तारुं ॥ ग्रासील जळ ॥३७॥

आतां शरण जावें शारंगधरा ॥ झुंजतां पाय न घालीं माघारा ॥ धन सैन्य आणि शरीरा ॥ समर्पिले यागी ॥३८॥

तंव भृगुआचार्ये केलें अन्य ॥ बीजमंत्रें केलें हवन ॥ उदकें शिंपितां आन ॥ आव्हानिले ॠषभ ॥३९॥

हातीं कोलितांची शस्त्रें ॥ असंख्यात विक्राळ वक्त्रें ॥ ते पावले बीजमंत्रें ॥ भृगूपाशी ॥४०॥

मग तो भृगु ह्नणे त्यांते ॥ तुह्मीं मारावें शिवगणांतें ॥ तंव उठिले घेवोनि कोलितें ॥ आले रणांगणी ॥४१॥

तीं आदळती वज्रघातीं ॥ परि साहिलीं भूतीं ॥ सर्वत्र ज्वाळा धडकती ॥ सैन्यामाजी ॥४२॥

परी नवल एक जाहलें ॥ भूतां मारितां जे वांचले ॥ त्यांसी कोलितीं जाळिलें ॥ भूतांसवें ॥४३॥

ऐसें देखोनि शिवगण ॥ ह्नणती उफराटें फिरलें हवन ॥ जे करुं आले सोडवण ॥ तेचि मारिती ॥४४॥

भुतें व्यक्तें परि अव्यक्तें ॥ ह्नणोनि फिरलीं कोलितें ॥ जळबिंदु आश्रयघटातें ॥ नाशी जैसा ॥४५॥

ऐसीं कोलितें मारिती ॥ तंव भृगूसी पडली भ्रांती ॥ ते वेळीं केली स्तुती ॥ नारसिंहाची ॥४६॥

बीजमंत्रें आव्हानोनी ॥ बाण सोडिले जपोनी ॥ भुतें पळालीं देखोनी ॥ रणभूमीचीं ॥४७॥

ऐसीं पळालीं गा भूपती ॥ नारसिंहमंत्रें केली ख्याती ॥ परि तीं रिघालीं अश्वर्त्थी ॥ आणि बेहडवृक्षीं ॥४८॥

तो जाणोनि विष्णुतरु ॥ मागें मुरडला नारसिंहमंत्रु ॥ तैंहूनि जाणिजे अपवित्रु ॥ पिंपळवृक्ष ॥४९॥

भुतेम दडालीं नृपनाथा ॥ तेथें जन्मली उद्दालिककांता ॥ अवदशा बैसली अश्वत्था ॥ ती कथा कथिली ॥५०॥

परि वारांमाजी मंदवार ॥ तो नारसिंहाचा अवतार ॥ अवदशा पळालिया पवित्र ॥ तो होय पिंपळ ॥५१॥

ही भविष्योत्तरपुराणीं कथा ॥ कीं भुतें दडालीं अश्वत्था ॥ परि उद्दालिककांता भारता ॥ भारतीमतें ॥५२॥

असो पळविलें भूतगणातें ॥ परमोग्र नारसिंहमंत्रें ॥ परि पाठीस लागलीं कोलितें ॥ रुद्रगणांचे ॥५३॥

जाळीत सुटला अंगार ॥ तेणें पळाला चंडीशभार ॥ बहुत केला रणमार ॥ ॠषभदेवीं ॥५४॥

जिवाचिया काकुळती ॥ अश्व गज सांडिले शिवदूतीं ॥ मग निघाले नदीअंतीं ॥ बुडी देत ॥५५॥

तंव धांवले दक्षवीर ॥ घेवोनि अश्व गज रहंवर ॥ मग नंदीनें स्मरिले चकोर शिवचंद्रीचे ॥५६॥

वेगीं पावले शिवचकोर ॥ त्यांही ग्रासिले अंगार ॥ ऐसें युद्ध केलें थोर ॥ भृगुआचार्ये ॥५७॥

विस्मय जाहला दोहीं दळां ॥ मणिमंत भृगूसी कोपला ॥ ह्नणे हा विप्र नव्हे भला ॥ धरा यातें ॥५८॥

हा भृगू असतां युद्धीं ॥ तोंवरी दक्ष नागवे कधीं ॥ तरी आतां करुं पां बुद्धी ॥ ब्राह्मणा या ॥५९॥

कीं वंद्य असोनि ब्राह्मण ॥ जरी करितसे अवगुण ॥ तरी तो वंद्य नव्हे दुर्जन ॥ दंडणें लागे ॥६०॥

जैसा उदर जठरींचा जंतु ॥ तो जी वाचा करी घातु ॥ तरि त्या करणें लागे पातु ॥ उदरव्यथेनें ॥६१॥

दूरदेशींच्या औषधी ॥ त्या क्षमा करिजेती व्याधी ॥ तरी आत्म्या परीस आधीं ॥ वंदाव्या त्या ॥६२॥

ह्नणोनि चालिला मणिमंत ॥ भृगूनें देखिला येतयेत ॥ मग हाणोनियां दंत ॥ पाडिले त्याचे ॥६३॥

येरें धरिला भुजदंडीं ॥ करोनि दर्भाची दोरखंडी ॥ भृगु बांधिला कडोविकडीं ॥ मागले हाती ॥६४॥

मग ते मुरडले दिक्पाळ ॥ देखोनिया मणिमंतबळ ॥ ह्नणती शिवगण प्रबळ ॥ नाटोपती आह्मां ॥६५॥

तंव दक्षा जाणविलें दूतें ॥ कीं भृगूसि बांधिलें मणिमंतें ॥ मग हाकारोनि सैन्यातें ॥ निघाला दक्ष ॥६६॥

सैन्य उठिलें महा त्राणें ॥ ह्नणती युद्ध करुं अंगवणे ॥ तंव सुमती प्रधान ह्नणे ॥ ऐकें राया ॥ ॥६७॥

राजा ऐके राजनीती ॥ काही पडलिया आपत्ती ॥ तैं वेंचावी धनसंपत्ती ॥ आपत्काळीं ॥६८॥

॥ श्लोक:॥ आपदर्थेधनंरक्षेद्दारानूरक्षेद्धनैरपि ॥ आत्मानंसततंरक्षेद्दारैरपिधनैरपि ॥१॥

येतां परचक्र परिजुनी ॥ पुढें झुंजावें क्षात्रपणीं ॥ जरी असेल बळदुणी ॥ आपणातें ॥६९॥

आणि आटलिया परिवारें ॥ मग धांवावें नरेंद्रें ॥ देवोनियांही कुमरी कुमरें ॥ राखावें आपणा ॥७०॥

कीं संधी भेद दान पराक्रम ॥ यामाजी एक पदार्थ उत्तम ॥ तरी आपणां राखावें हा धर्म ॥ उत्तम पक्ष ॥७१॥

जरी वांचले शरीर ॥ तरी मिळतील धनगिरीवर ॥ अथवा कन्या पुत्र कलत्र ॥ होतील राया ॥७२॥

कीं चंद्र प्राप्त जाहलिया अंवसे ॥ कलाक्षय होतसे सर्वस्वें ॥ परि बीजेचिनि सौरसें वृद्धि पावे ॥७३॥

आह्मीं असतां परिवार ॥ तुह्मां नाहीं युद्धाधिकार ॥ आमुचा जालिया संव्हार ॥ करावें मनींचे ॥७४॥

स्वामीसि पडतां अवसर ॥ अंग चुकविती किंकर ॥ ते नरक भोगिती सहस्त्र ॥ दिव्यवर्षे ॥७५॥

ऐसें बोलिला प्रधान सुमती ॥ तेणें संतोषला प्रजापती ॥ ह्नणे धन्य गा तुझी मती ॥ आगळी असे ॥७६॥

तुवां सांगितलें सुमती ॥ हे तंव सत्य गा राजनीती ॥ परि सैन्य धाडिलें पशुपतीं ॥ निर्वाणासी ॥७७॥

मूळीं मोडोनि यागस्थिती ॥ म्यां अर्पिली धनसंपत्ती ॥ आतां केलिया काकुळती ॥ सत्वहानी होईल ॥७८॥

आतां असो हा विचार ॥ आह्मा झुंजणेंचि निर्धार ॥ मागें प्रसुति आणि परिवार ॥ यांसी धीर द्यावा त्वां ॥७९॥

हांगा मुक्तीस्तव त्यजिजे सुधा ॥ मग त्याचेनि कैसी हरेल क्षुधा ॥ परि सेविलिया शरीरसिद्धा ॥ न मिळे कैवल्य ॥८०॥

शरीरक्षेत्रें घडे धर्माचरण ॥ येणेंचि कीजे उदरपोषण ॥ आणि येणेंचि पाविजे मरण ॥ समरंगणीं ॥८१॥

मग उठिला महात्राणें ॥ गजाश्वरथ घेवोनि सैन्यें ॥ तंव हांक दीधली शिवनंदनें ॥ रणभूमीसी ॥८२॥

लागलें दुंदुभी निशाण ॥ महानादें गर्जे गगन ॥ तेम ऐकोनि त्रिभुवन ॥ खळबळिलें ॥८३॥

असो इकडे प्रजापती ॥ युद्धाची करोनि आइती ॥ सज्ज करोनियां रथी ॥ आला यज्ञमंडपा ॥८४॥

यागा करुनि प्रदक्षिण ॥ नमिले देव ऋषि ब्राह्मण ॥ ह्नणे पुनः व्हावें दर्शन ॥ तुमचे आह्मां ॥८५॥

मग निशाणा देवोनि घावो ॥ वेगें निघाला दक्षरावो ॥ सैन्यासहित महाबाहो ॥ ठाकला रणीं ॥८६॥

दोघां जाहली समदृष्टी ॥ येक अग्नि एक वृष्टी ॥ मग करिते जाहले गोष्टी ॥ पैजेचिया ॥ ॥८७॥

वीरभद्र ह्नणे रे प्रजापती ॥ तुवां रुद्रा न दिली यागवृत्ती ॥ आणि यागीं होमिली शक्ती ॥ महादेवाची ॥ ॥८८॥

ते मागतों रे ठेवणी ॥ आणिन यागहवनाची खाणी ॥ आतां उभाचि फोडीन बाणीं ॥ दक्षा तुज ॥८९॥

तुज नाहींख युद्धाची शक्ती ॥ तरी कां खवळिला पशुपती ॥ आतां देतों रणशांती ॥ गर्विष्ठा तुज ॥९०॥

तंव आवेशला दक्षवीर ॥ ह्नणे तूं कालचें पोर ॥ तुज धाडोनियां शंकर ॥ राहिला कांरे ॥९१॥

तुह्मीं करावें भिक्षाटण ॥ त्याचें स्मशानीं करावें भक्षण ॥ त्या तुज उद्भवलें सेवन ॥ मरावयाचें ॥९२॥

दक्ष ह्नणे रे शिवसुता ॥ तुज निःशस्त्री करीन आतां ॥ पाऊल न ठेवीं मी मागुता ॥ झुंजतां जाण ॥९३॥

अरे माझिया रोमरंध्रा ॥ शस्त्रें न पुरती वीरभद्रा ॥ तुज मारुनि बैसेन पुढारां ॥ यागकमी ॥९४॥

वीरभद्र ह्नणे रे प्रजापती ॥ युद्धी तुज लोळवीन क्षितीं ॥ तुझिये शिराच्या आहुती ॥ घालीन यागीं ॥९५॥

ऐसें ह्नणोनि उठिला वीरभद्र ॥ सैन्य करोनियां स्थिर ॥ तंव दक्षें राहविला परिवार ॥ आपणा मागें ॥९६॥

धनुष्या करोनि टणत्कार ॥ रोषें चालिला वीरभद्र ॥ तेणें विंधिला दक्षवीर ॥ अमित बाणीं ॥९७॥

तैं आली महाशक्ती ॥ परि येतां न निवारी प्रजापती ॥ कीं तया दाविली प्रचीती ॥ थोरिवेची ॥९८॥

मागुतें केलें संधान ॥ घातले दोनसहस्त्र बाण ॥ त्यांचे दक्षें केलें खंडण ॥ वरिच्यावरी ॥९९॥

मग उठिला प्रजापती ॥ सात बाण लाविले शितीं ॥ तेणें पाडिले अश्वसारथी ॥ वीरभद्राचे ॥१००॥

सर्वेचि मांर्गणीं आठीं ॥ दक्षें विंधिला नेहटीं ॥ रथ तोडोनि हाणिला पृष्ठीं ॥ वीरभद्र ॥१॥

तंव जाहला हाहाःकार ॥ मग उठिला दळभार ॥ त्यावरी धांवला परिवार ॥ प्रजापतीचा ॥२॥

युद्ध जाहलें तुंबळ ॥ जाणों आदळले मेरुमंदराचळ ॥ रणी वाहती खळाळ ॥ शोणितांचे ॥३॥

एकमेकांन सांभाळिती ॥ कैसे उठिले निदानघातीं ॥ उदरींची काढिती आंतीं ॥ दंतांवरी ॥४॥

घायें करिती करखंडे ॥ एकमेकांचीं दुखंडें ॥ तोडिती झाडां परि मुंडे ॥ गजनरांची ॥५॥

घाय हाणिती निष्ठुर ॥ वेगळे करिती चरणकर ॥ क्रोधें करिती शतचूर ॥ शरीरें पैं ॥६॥

एक घायाळ कुंथत ॥ एक दुःखे आरंबळत ॥ मुखें पसरिती उदकार्थ ॥ घायाळ वीर ॥७॥

अशुद्धांचे चालिले पूर ॥ प्रेतांचे जाहले गिरिवर ॥ सैन्य आटलें अपार ॥ तया युद्धीं ॥८॥

तंव उठिला दक्षवीर ॥ तेणें मोडिला शिवभार ॥ थोर केला संहार ॥ रुद्रसैन्याचा ॥९॥

बाणीं जर्जर केले वीर ॥ आणि संहारिले अपार ॥ ऐसें केलें घोरांदर ॥ दक्षें युद्ध ॥११०॥

तें देखोनि वीरभद्र ॥ मोडला जाणोनि स्वपरिवार ॥ मग क्रोधें चालिला वीर ॥ त्रिशुळेंशीं ॥११॥

तो दक्षगजपंचानन ॥ मारीत चालिला शिवनंदन ॥ नानाआयुधें करुन ॥ मारिलें सैन्य ॥१२॥

हातीं गदा आणि मुद्रल ॥ त्रिशूळ आणि खडशूळ ॥ फरश पठ्ठीश काळ ॥ टाकीतसे ॥१३॥

भाले मुसळें अस्त्रें शस्त्रें ॥ लागूल सागर कटारे ॥ कोतकांती इटतोमरें ॥ हाणीतसे ॥१४॥

नागर चंडु आणि सुरी ॥ असिलता बाणधारीं ॥ कुर्‍हाड कोइते शस्त्रीं ॥ मिरवले वीर ॥ ॥१५॥

ऐसा करुनि निःपात ॥ गजें गज असे हाणित ॥ त्या रणचक्री बुडाला रथ ॥ प्रजापतीचा ॥१६॥

ह्नणोनि दोघे जाहले विरथी ॥ दक्ष वीरभद्र क्रोधें पाहती ॥ हदयीं रुतले बाण साती ॥ प्रजापतचे ॥१७॥

अशुद्धें मिरवला वीरभद्र ॥ जैसा यागींचा होळिकार ॥ कीं रणवाटिकेचा फुल्लार ॥ महाबळिया ॥१८॥

सर्वेचि तो खडुधारीं ॥ दक्षें हाणिला शिरावरी ॥ सुस्त्रात जाहला रुधिरीं ॥ वीरभद्र ॥१९॥

जाणों मिरवला वीर कर्ण ॥ कीं पातली वीरश्री आपण ॥ ह्नणोनि सुशीळ केलें स्त्रान ॥ होमाहुतीसीं ॥१२०॥

दक्षा हाणितलें करकांडीं ॥ सर्वेचि त्रिशूळ आणि धोंडी ॥ परी आंगी नयेचि कुंडी ॥ घायवणांची ॥२१॥

मग आठवला रुद्रमंत्र ॥ जो महाशक्तीचें उत्तर ॥ तैं टाकिलें अग्निचक्र ॥ दक्षावरी ॥२२॥

तें देखतसे प्रजापती ॥ विजु ऐसी महादीप्ती ॥ मग पर्जन्यास्त्रें केली शांती ॥ दक्षें त्याची ॥२३॥

वीरभद्रें घेतलें वायव्यास्त्र ॥ तेणें उडती धोंडे तरुवर ॥ तंव दक्षें आकर्षिले गिरीवर ॥ पर्वतास्त्रें ॥ ॥२४॥

आतां असो हा विस्तारु ॥ येणें दाटेल कल्पतरु ॥ सांगतां तंव सप्तसागरु ॥ न सरे कांही ॥२५॥

ऐसा नानाशस्त्रीं फोडिला ॥ तेणें वीरभद्र क्षीण जाहला ॥ मग आंगेशी आदळला ॥ मल्लयुद्धा ॥२६॥

कळ विकळ कुळबांगडी ॥ आंगुठा कोंपर चरण ओढी ॥ हाणिती गुढगागुढ्गी ॥ एकमेकां ॥२७॥

वीर आदळला महात्राणें ॥ तेणें दुमदुमिलीं पाताळें ॥ मूछें पडिला निचेतनें ॥ वीरभद्र तो ॥२८॥

तंव जाहला हाहाःकार ॥ धांवोनि आला नंदिकेश्वर ॥ सावध करोनि वीरभद्र ॥ उठविला तेणें ॥२९॥

अधरींची टाकिली विभूती ॥ तेणें उठिला निमिष्यांतीं ॥ तो विस्मयो जाहला चित्तीं ॥ सकळिकांसी ॥१३०॥

विस्मयें ह्नणे वीरभद्र ॥ बाप बळिया ब्रह्मकुमर ॥ मजसारिखा महा वीर ॥ घातला तळीं ॥३१॥

आतां सूड घेईन रे वहिला ॥ ह्नणोनि वीरें दक्ष कवळिला ॥ तंव शिवभुतीं झडपिला ॥ प्रजापती तो ॥३२॥

मग तेणें जाहला विकळ ॥ परि ठेलाचि अळुमाळ ॥ काहीं काळांती पडिला विव्हळ ॥ दक्षरावो ॥३३॥

वीरभद्र बैसला हदयावरी ॥ काढिली कटींची सुरी ॥ ते रोविली जिव्हारीं ॥ परि न तुटे रोम ॥३४॥

मागुती नानाशस्त्रीं मारिला ॥ परि कांही न चले तयाला ॥ यास्तव मनीं चिंतावला ॥ वीरभद्र तो ॥ ॥३५॥

ह्नणोनि हातें धरिलें शिर ॥ तंव तैं जैसें कुलांलचक्र ॥ तैसें फिरतसे चौफेर ॥ भूतसंचारें ॥३६॥

तया शस्त्रांचें नचलें कांही ॥ भागला करोनि आन उपाई ॥ मग आठवली ते समयीं ॥ बुद्धी तयासी ॥३७॥

हदय चेपोनियां चरणें ॥ शिर मुरडिलें महात्राणें ॥ तें मेघांचिये गर्जनें ॥ तुटलें शिर ॥३८॥

तंव तै अनंतशिराधारीं ॥ शीर वरुषलें महा रुधिरी ॥ तेणें रांपली रणधरित्री ॥ शोणितें पैं ॥३९॥

आनंदला वीरभद्र ॥ कीं वधिला महावीर ॥ क्षिप्रानदीसि मिळाला पूर ॥ त्या शोणिताचा ॥१४०॥

शारंगधराचिये दृष्टीं ॥ दक्ष पडिला वाळुवंटीं ॥ अर्धोदकीं बुडाला तटीं ॥ क्षिप्रानदीचे ॥४१॥

हाती धरोनियां शिरास ॥ बाबरझोटी महा बीभत्स ॥ अशुद्धें थबथबित डोळस ॥ देखिला सकळीं ॥४२॥

हर्षले नंदी मणिमंत ॥ आनंदें नाचती शिवदुत ॥ ह्नणती आजी कुडांविली सत्य ॥ स्वशक्ती तुवां ॥४३॥

आजी काढिली यागवृत्ती सर्वा लाविली ख्याती ॥ मग दक्षशिरें वोंवाळिती ॥ वीरभद्रासी ॥४४॥

उदो ह्नणती योगिनी ॥ शीर घालूनियां कंडणीं ॥ आजी जालीं हो पारणी ॥ बहुतां युगांची ॥४५॥

वाणें द्यावया बैसल्या यक्षिणी ॥ भुतें भैरव आणि डंखिणी ॥ कीं नवस पुरले ह्नणोनि ॥ देती एकमेकाम ॥४६॥

रुधिर करोनियां स्त्रान ॥ मेदमांसाचें करिती तर्पण ॥ अक्षता लाविती पूर्ण ॥ दंतांच्या पैं ॥४७॥

काढोनि चर्मरुंडाचीं बोलें ॥ भुतां गौरविती क्षेत्रपाळें ॥ गजदंतांची करोनि मुसळें ॥ काडिती रणीं ॥४८॥

एक रणसागरीं पोंहती ॥ तारवें करोनि अश्वहत्ती ॥ वरी शिडें उभारिती ॥ धडमुंडांचीं ॥४९॥

एक पडिले सन्मुखपणीं ॥ तयां झोंबती भुतें डंखिणी ॥ कीं वरिलें स्वगौगनीं ॥ ह्नणोनियां ॥१५०॥

असो भुतांची जाणोनि तृप्ती ॥ शिवदूत निघाले होमाप्रती ॥ घालावयासी आहुती ॥ दक्षशिराची ॥५१॥

भग्नाचे काढोनियां नेत्र ॥ होमीं टाकिले दक्षशिर ॥ विटंबिले वीरीं वीर ॥ दक्षदूत ॥५२॥

होम पूजिला दक्षशीर्षीं ॥ भृगूची उपटिली मिशी ॥ पूषाची पाडुनि बत्तिशी ॥ घातली होमीं ॥५३॥

कलिंगरायाचे दशन ॥ वीरभद्रें केले भग्न ॥ परि हें द्वापारींचे कथन ॥ जन्मेजया गा ॥५४॥

यागींचे जे तिन्ही अग्नी ॥ तेचि ब्रह्मा विष्णु शूळपाणी ॥ त्यांसीच भक्तशिरोमणीं ॥ पूजिले दक्षें ॥५५॥

देवयागीं नंदीनें शापिलें ॥ तें वचन फळासि आलें ॥ ह्नणोनि संत जें बोलिले ॥ तें अन्यथा नव्हे ॥५६॥

मग यागपात्रां केलें भंजन ॥ आणि मंडप करोनिया दहन ॥ शिवदूतीं देवब्राह्मण ॥ नानाप्रकारीं विटंबिले ॥५७॥

एक ब्राह्मण भेणें पळती ॥ तंव भुतें खांदी डोयी बैसती ॥ नखदांतीं झोंबती ॥ खावयासी ॥५८॥

येकांची हिरोनि नेसणीं ॥ भेडसाविती बीभत्सवदनीं ॥ एक डोयीं वाहती पाणी ॥ याग विझवावया ॥५९॥

प्रेतांच्या करोनि यंत्रमाळा ॥ हटें घालिती विप्रांच्या गळां ॥ ऐसी देखोनि अवकळा ॥ पळाला याग ॥१६०॥

तो देखोनियां ब्रह्मद्वेष ॥ यागें धरिला मृगवेष ॥ मग पळाला करीत शोक ॥ कुंडांतुनी ॥६१॥

पाठीं धांवले शिवदूत ॥ परि ते निःशस्त्र जाहले समस्त ॥ धरुं पाहती तंव बद्रिकापर्वत ॥ टाकिला तेणें ॥६२॥

मग बोलावूनि दिक्पती ॥ वीरभद्र सांगे तयांप्रती ॥ वेगीं वमा हो आहुती ॥ जरी चाड महत्वाची ॥६३॥

जैसे वेदमंत्रें वीण दान ॥ कीं उदकें वीण तर्पण ॥ तैसे रुद्रें वीण अर्पण ॥ अपवित्र पैं ॥६४॥

अरे तृप्ती न करितां पितरां ॥ आधीच आहुती किंकरां ॥ तैसा रुद्रेवीण सुरवरां ॥ कैंचा भाग ॥६५॥

ह्नणोनि मुखीं घालिती दांडे ॥ एकाची उडविती तोंडें ॥ चरणीं लावोनि दोरखंडें ॥ लांबविती द्रुमीं ॥६६॥

ऐसे इंद्रादि देव दिक्पाळ ॥ गण गंधर्व ॠषि सकळ ॥ वमिती आहुतीकल्लोळ ॥ शिवदूतभयें ॥६७॥

दाघ जाहला दक्षशिरा ॥ मग उदकें विझविती अंगारा ॥ भूतीं करोनि मळमूत्रा ॥ विझविला होम ॥६८॥

कुंडींची घेवोनि विभूती ॥ ओंठ्या भरोनि भुतें खेळती ॥ तंव वीरश्री आली मागुती ॥ वीरभद्रासी ॥६९॥

गर्जिन्नला महात्राणीं ॥ आपणा आपणाचि हाणी ॥ आंग कापिले शस्त्रबाणीं ॥ आपुले हातें ॥१७०॥

वीरश्रियेनें नाचत ॥ रणीं विभूती टाकित ॥ तंव जाहला अकल्पित ॥ चमत्कार तेथें ॥७१॥

शापाचें पुढील होणार ॥ ह्नणोनि बुद्धी उपजली स्वतंत्र ॥ विभूती पडतांचि झुंजार ॥ उठिले रणींचे ॥७२॥

ऐसे उभयदळींचे वीर ॥ उठिले अश्व नर कुंजर ॥ जडत असे धड शिर ॥ आपणचि पैं ॥ ॥७३॥

असो उठलीं दोन्ही दळें ॥ परि राहिलें बस्तशिसाळें ॥ त्याचें शरीर होतें जाळिलें ॥ यागकुंडीं ॥७४॥

आणिक राहिलें दक्षाचें धड ॥ होंमीं जाळिलें त्याचें मुंड ॥ ऐसे राहिले वितंड ॥ बस्त दक्ष ॥७५॥

ते यागकुंडीची विभूती ॥ ॠषींनी मंत्रिली नानामंत्रीं ॥ वरी रुद्रामृताविभूती ॥ होती वीरभद्रा पैं ॥७६॥

तेणें शिपिलें रणमंडळ ॥ जे पशुपक्ष्यादिकीं भक्षिले मंरगळ ॥ परि ते आणिले सकळ ॥ नेत्र करपादादि ॥७७॥

असो ऐसें उठिलें दळ ॥ हस्तपादादिकीं अळुमाळ ॥ मग मिळोनि आले सकळ ॥ यागाजवळी ॥७८॥

परी निःशस्त्री जाहले वीर ॥ आणि बळक्षीण शरीर ॥ तेणें राहिला युद्धप्रकार ॥ दक्षदूतांचा ॥७९॥

आणि धुरे नाहीं रणीं ॥ तरी कोणें द्यावी आरणी ॥ मग काय केली करणी ॥ शिववीरांहीं ॥१८०॥

सोडोनि दीधलें भृगुभग्नां ॥ पूषा आणि देव ब्राह्मणां ॥ होमा करोनि विध्वंसना ॥ निघाला वीरभद्र ॥८१॥

लागलें दुंदुभी निशाण ॥ जयजय ह्नणती शिवगण ॥ वीरभद्र घेवूनि सैन्य ॥ चालिला कैलासा ॥८२॥

तैसेचि निघाले देव भूपती ॥ आपुलालें स्थानाप्रती ॥ ब्रह्मयासी सांगे सुरपती ॥ तें असो आतां ॥८३॥

दक्षधड पडिलें रणीं ॥ आतां येईल प्रसूती राणी ॥ तें पुढें ऐक गा वचनीं ॥ जन्मेजया ॥ ॥८४॥

वैशंपायन ह्नणे भारता ॥ तुवां पुसिली यागकथा ॥ तरी हे भागवतींची योग्यता ॥ कथिली तुज ॥८५॥

तरी ऐसा हा दक्षवधु ॥ जो ऐकेल कथासिंधु ॥ तो शिवलोकीं आनंदु ॥ भोगील सत्य ॥८६॥

तया होतील कन्यापुत्र ॥ हें शिवकथेचेम फलमात्र ॥ आणि साधेल ऐहिक परत्र ॥ सत्य जाण ॥८७॥

आतां असो ह प्रजापती ॥ अग्निप्रवेश करील प्रसूती ॥ तें पुढें ऐकावें श्रोती ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥८८॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ दक्षनिधनप्रकारु ॥ एकादशोऽध्यायीं कथियेला ॥१८९॥

॥ श्रीसांदसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP