कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय ५

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नम:

जन्मेजय ह्नणे ॠषिवर्यां ॥ पुढें कथा सांगा स्वामिया ॥ काय वर्तलें मुनिवर्या ॥ रामकथेचें ॥ ॥१॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ राया ऐकावें वचन ॥ जेणें निवताति श्रवण ॥ श्रोतयांचे ॥२॥

विश्वामित्र ह्नणे रामचंद्रा ॥ आपण जातों मिथुळानगरा ॥ तेथें धनुष्य आहे तें सुरनरा ॥ अगम्य जें ॥३॥

तें त्र्यंबक नामें देवदेत्त ॥ परि सुफळ होईल सत्य ॥ तुजदेखोनि लज्जित ॥ होतील राजे ॥४॥

मग गंगेचे उत्तरतीरीं ॥ सव्य घातला हिमगिरी ॥ ब्रह्मयोनी महाक्षेत्रीं ॥ आले ॠषीं सहित ॥५॥

गाधिज ह्नणे कौसल्यात्मजा ॥ येथें कुश नामें होता राजा ॥ त्याची पत्नी विदर्भजा ॥ आणि पुत्र चारी ॥६॥

कुशांब आणि कुशनाभ ॥ तिसरा अमूर्तरजस सुप्रभ ॥ चवया वसु नामें दिव्याभ ॥ ऐसे चारी ॥७॥

कुशांबें वसविली कौशांबी पुरी ॥ कुशनाभें महोदयनगरी ॥ जिये कन्याकुज्ज पूर्वापारीं ॥ ऐसें नाम ॥८॥

पावले तंव कान्यकुज्जपठ्ठण ॥ राम ह्नणे हें कां नामधारण ॥ तंव सांगता जाहला मूळावसान ॥ ॠषेश्वर तो ॥९॥

कुशनाभ जो राजॠषी ॥ त्यासी कन्या जालिया शतयेकी ॥ त्या खेळों गेल्या कौतुकी ॥ वनामाजी ॥१०॥

तंव द्विजरुपें मलयानिळ ॥ त्यांसी करिता जाहला चावळ ॥ कीं तुह्मीं अनुसरोनि अंगमेळ ॥ द्यावा मज ॥११॥

मग त्या ह्नणती समस्ता ॥ तूं अज्ञान गा मारुंता ॥ हे पिताचि जाणे वार्ता ॥

ऐकता तयासि कोपला मारुत ॥ सर्वांगीं संचरला वात ॥ कुजा जाहलिया क्षणांत ॥ सकळही कन्या ॥१३॥

अंग कांपे थरथरां ॥ विरुप जाहलें शरीरा ॥ तेथोनि आलिया नगरा ॥ पित्याजवळी ॥१४॥

मग ते समग्र मूळ कथा ॥ पितयातें सांगती समस्ता ॥ तंव तो ह्नणे तुह्मीं कां मारुता ॥ वरिलें नाहीं ॥१५॥

असो आतां चूली नामें महामुनी ॥ तपीं बैसला परम ज्ञानी ॥ तंव सोमदा नामें गंधर्विणी ॥ आली तेथें ॥१६॥

तेणें नाना सेवा शक्तीं ॥ ॠषी प्रसन्न केला घ्रीशगती ॥ ह्नणे मज देवोनि भोगरती ॥ सृंजीं पुत्र ॥१७॥

ॠषीनें तयेसि दीघली रती ॥ पुत्र जाहला युवती प्रती ॥ ऐसें केलें मंत्र शक्तीं ॥ चूली ॠषीनें ॥१८॥

त्या चूलीचा रेतजात ॥ तया नांव बोलिजे ब्रह्मदत्त ॥ महातापस विख्यात ॥ जाहला तो ॥१९॥

मग तेणें ब्रह्मदत्तें ॥ कुशनाभ प्रार्थिला नानामतें ॥ ह्नणेया कन्या दे गा स्वहस्तें ॥ समस्त मज ॥२०॥

मग ते सर्व समूळकथा ॥ रायें कथिली ब्रह्मदत्ता ॥ तेणें त्या मंत्रोनि समस्ता ॥ केलिया सुंदरा ॥२१॥

ऐसी प्रौढी ॠषिपुत्रा ॥ आगळा असे सदाचारा ॥ कन्या केल्या सुंदरा ॥ पूर्विल्या ऐशा ॥२२॥

परि तें कन्याकुज नगर ॥ तेंचि गुणनाम गा पवित्र ॥ तंव त्यांही बाधिले कंठसुत्र ॥ ब्रह्मदत्ताचें ॥२३॥

तया कुशनाभाचा कुमर ॥ गाधी नामें महापवित्र ॥ कुशें त्यासी दीघला आवार ॥ कन्याकुज्ज नगर हें ॥२४॥

तोचि गाधी माझा पिता ॥ जो मागधदेशींचा भोक्ता ॥ तरी हें कन्याकुज्ज रघुनाथा ॥ रचिलें ऐसें ॥२५॥

मग सुवर्ण नामें महानद ॥ गंगेसि मिळाला जाणों अगाध ॥ तेथें सुस्त्रात जाहला वेदविद ॥ विश्वामित्र तो ॥२६॥

पुढें कौशिकी नामें सरिता ॥ मुनि ह्नणे हे माझी भगिनी गा रघुनाथा ॥ त्या ॠषीकॠषीची कांता ॥ कन्या गाधिरायाची ॥२७॥

इयेचें नाम सत्यवती ॥ हे जमदग्निमाता गा रघुपती ॥ आयुष्य निमालिया पुण्यकीर्ती ॥ जाहली सरिता ॥२८॥

मग राम ह्नणे गाधिसुता ॥ गंगा हे कोणाची दुहितां ॥ कैसी आली मृत्युपंथा ॥ तें सांगे मज ॥ ॥२९॥

ॠषी ह्नणे रघुकुळटिळका ॥ मेरुची कन्या मेनिका ॥ ते दीधली पुण्यश्लोका ॥ हिमवंतासी ॥३०॥

तंव त्या मेनिकेचे उदरीं ॥ दोन कन्या जालिया सुंदरी ॥ एक गंगा दुसरी परिकरीं ॥ पार्वती जे ॥३१॥

तारक वघावयाकारणें ॥ कंदर्पाचे करोनि सांडणें ॥ पुत्र मागीतला चतुराननें ॥ महादेवासी ॥३२॥

मग नानाविधी वेदमंत्री ॥ वऱ्हडिका जाहली त्रिपुरारी ॥ ब्रह्मा गेला निजपुरीं ॥ सत्यलोकासी ॥३३॥

असो दिव्य संवत्सरीं ॥ मैथुन मांडिले अहोरात्रीं ॥ उमा जाणोनियां पवित्री ॥ महादेवें ॥३४॥

परी कवणा न वाटे शिण ॥ तेणें चिंतावला चतुरानन ॥ मग देवी पाठविला कृशान ॥ भिक्षेलागीं ॥३५॥

गृहस्थाश्रमीं असतां ॥ विमुख जावों नेदावें अतीता ॥ तेणें गुणें दुश्वित्तत्ता ॥ जाहली महेशा ॥३६॥

परि जाणोंनियां तापस ॥ उमेनें घातला वीर्यग्रास ॥ तो भक्षिता जाहला त्वरेस ॥ अंगारक ॥ ॥३७॥

आतां असो हे योग्यता ॥ हे द्वितीयस्तबकीं असे कथा ॥ ते ऐकिली असेल श्रोता ॥ अनुक्रमें ॥३८॥

ह्नणोनि असो पूर्वागत ॥ कथिलेंचि कथणें अनुचित ॥ परि सांगिलें संक्षिप्त ॥ श्रोतयांसी ॥३९॥

आतां असो हे उमा कुमरी ॥ गंगा शैलकन्या दुसरी ॥ ते मागीतली सुरवरीं ॥ पवित्रपणासी ॥४०॥

तैं समस्त सुरगणीं ॥ गंगा नेली स्वर्गभुवनी नाम ठेविलें मंदाकिनी ॥ विरिचिदेवें ॥४१॥

तंव ह्नणे रामराणा ॥ कैसेनि आली मृत्युभुवना ॥ तें समूळ गाधीनंदना सागें मज ॥४२॥

मग ह्नणे विश्वामित्र ॥ सूर्यवंशी राजा सगर ॥ तो पुत्राविणें चिंतातुर ॥ मनामाजी ॥४३॥

वैदर्भ रायाची दुहिता ॥ केशिनी नामें रघुनाथा ॥ ते वडील बोलिजे कांता ॥ सगररायाची ॥४४॥

आणि अरिष्टनेमीची कुमरी ॥ सुमती नामें सुकुमारी ॥ ते पर्णिली दुसरी ॥ सगररायें ॥४५॥

तो सगर हिमवंताचे पाठारीं ॥ तपीं बैसला शतवर्षेवरी ॥ स्त्रियांसहित ब्रह्मचारी ॥ होवोनियां ॥४६॥

तेणें भृगॠषी केला प्रसन्न ॥ मुनि ह्नणे माग इत्सादान ॥ राव ह्नणे पुत्रेंविण भुवन ॥ अपवित्र माझें ॥४७॥

भृगु ह्नणे साठीसहस्त्र ॥ सुमातीसि होतील गा कुमर ॥ महाक्षेत्री प्रतापी वीर ॥ नानारुपांचे ॥४८॥

मग साठी सहस्त्र सुत ॥ सुमतीसि जाहले समस्त ॥ पालख लांबवी तंव अकल्पित ॥ देखे पुत्रांतें ॥ ॥४९॥

हें पद्मपुराणीचें मत ॥ परि रामायणीं प्रसवली सत्य ॥ तरि हें देवांॠषीचें कृत्य ॥ अगम्य लोकां ॥५०॥

आणि वाल्मिकाची असे भांरती ॥ येक अंड प्रसवली युवती ॥ तया तुंबीफळाची आकृती ॥ भीतरीं बीजरुपें बाळकें ॥५१॥

तैं कुंडें करोनि साठीसहस्त्र ॥ घृतें भरिलीं समग्र ॥ मग पूर्णदिवशी पृथकाकार ॥ जन्मलीं बाळें ॥ ॥५२॥

ऐशा साठी सहस्त्र सुतां ॥ आणि सुरसा नामें दुहिता ॥ हीं जाहलीं गा रघुनाथा ॥ सुमतीप्रती ॥५३॥

केशिनीसीं जाहला असमंज सुत ॥ तो ब्रह्मज्ञानी विरक्त ॥ येक उपजलिया सुत ॥ आपण गेला वनासी ॥५४॥

त्या असमंजसाचा असिमान सुत ॥ त्यापासुनि वाढलावंश ॥ सुमतीचा जाहला निर्वश ॥ साठीसहस्त्र पैं ॥५५॥

आतां असो हें पुढील कथन ॥ सगरें मांडिला महायज्ञ ॥ करीं बांधिले कंकण ॥ दीक्षा घेउनी ॥५६॥

विघ्याद्रि हिमाचळ मध्यभागीं ॥ यज्ञ मांडिला महावेगीं ॥ घोडा सोडिला वरीचांगीं ॥ महीमंडळावरी ॥५७॥

परि तो घोडा सुरपतीं ॥ चोरोनि नेला शीघ्रगतीं ॥ कपिलमुनीचे मठाप्रती ॥ पाताळासी ॥५८॥

त्या ॠषीसि न कळतां भुवनी ॥ वारु बाधिला तपोवनीं ॥ मग आपण गेला तेथुनी ॥ इंद्रभुवना ॥५९॥

इकडे कटकीं जाहला गजरु ॥ ह्नणती कोणी नेला वारु ॥ तो ठाई घालावा चोरु ॥ ह्नणोनि मांडिला उदीम ॥६०॥

मग गिरिकंदरे समस्त ॥ वारु पाहती सगरसुत ॥ मनीं होवोनि दुश्वित ॥ आले पितयापासीं ॥६१॥

तंव पिता ह्नणे त्यांसी ॥ हे पुसावे ब्रह्मयासी ॥ त्या वांचोनि कोणासी ॥ नेणवे कदा ॥६२॥

मग ते प्रौढी सगरसुत ॥ ब्रह्मया पुसती समस्त ॥ येरु ह्नणे पाताळगत ॥ जाहला वारु ॥६३॥

ऐसें जाणोनि समस्तीं ॥ पृथ्वी कोरिली सगरसुती ॥ तोचि हा सागर महाकीर्ती ॥ सगरसुतांची ॥६४॥

तंव पश्र्विमेचा भद्रजाती ॥ विरुपाक्ष देखिला पुढती ॥ शिरी धरोनियां वसुमती ॥ उभा असे ॥६५॥

उत्तरदिशेचा गजेंद्र ॥ ज्यांचे नाव हिमपांडुर ॥ तोही पृथ्वीचा घेवोनि भार ॥ उभा असे ॥६६॥

महापद्म गज दक्षिणे ॥ उंच तरी मेरुप्रमाणें ॥ आणि सुमौन देखिला नयनें ॥ पूर्वदिशेचा ॥६७॥

ऐसे चारीकोणी चारी ॥ गज देखिले राजकुमरीं ॥ त्यासी नमस्कारुनियां शिरी ॥ चालिले सगर ॥६८॥

पृथ्वी दाटे जैं पातकें ॥ तै दिग्गज हालविती मस्तकें ॥ तेणें भूमिकंप होय देखें ॥ आणि दीर्घगर्जना ॥६९॥

कुमरी केला नमस्कारु ॥ तंव दिग्गजी दीधला शुद्धिवरु ॥ कीं तुह्मां भेटेल हो वारु ॥ भरंवसेनी ॥७०॥

असो जाती पहात नयनीं ॥ तंव पुढें देखिला कपिलमुनी ॥ जो अंशरुपें चक्रपाणी ॥ अवतरलासे ॥७१॥

आणि त्याचे शेजीं यज्ञवारु ॥ चरतां देखिला अरुवारु ॥ हणती हाचि धरा हो चोरु ॥ मारा वहिला ॥७२॥

समस्त चालिले आतुर ॥ हातीं घेवोनि तरवार ॥ तंव ते नेत्राग्निघातें कुमर ॥ जाळिले कपिलें ॥७३॥

इकडे सगर ह्नणे गा असिमाना ॥ वारु पाहिजे यागहवना ॥ तरी शुद्धी करोनिया नंदना ॥ आणीं वहिलें ॥७४॥

मग तो असिमान नातु ॥ पृथ्वी पाहोनि जाला पाताळगतु ॥ तंव दिग्गजीं सांगीतला वृत्तांतु ॥ पितृव्यगणांचा ॥७५॥

कीं तुझे आले होते पितर ॥ त्याही पुसिला वारुचा विचार ॥ पाताळीं गेले परि दुसार ॥ परतले नाही ॥७६॥

असिमान गेला कपिलमठीं ॥ तंव वारु देखिला दृष्टीं ॥ परी पुढें पाहे तों आंगिटी ॥ पितृगणांची ॥७७॥

तो अग्नी विझवावया पाणी ॥ चहूंकडे पाहतसे नयनीं ॥ तंव गरुड आला तेक्षणीं ॥ तयापासी ॥७८॥

गरुड ह्नणे गा असिमाना ॥ जरी उद्धरणें पितृगणां ॥ तरी मी ह्नणेन त्या जीवना ॥ आणीं वहिल ॥७९॥

हिमवंताची ज्येष्ठ नंदिनी ॥ ते गंगा आहे स्वर्गभुवनी ॥ तेणें विझविलिया अग्नी ॥ उद्धरतील पूर्जज ॥८०॥

पाताळीं गंगा यावयालागोनी ॥ हा उपावो योजिला कपिलमुनी ॥ मग ह्नणे वारु जा घेवोनी ॥ असिमाना तूं ॥८१॥

तो घेवोनियां वारु ॥ असिमान आला वेगवत्तरु ॥ समस्त सांगितला समाचारु ॥ पितामंहासी ॥८२॥

मग यागाची करोनि समाप्ती ॥ सगरा जाहली स्वर्गप्राप्ती ॥ तो सगर बोलिजे पुण्यकीर्ती ॥ जन्मेजया ॥८३॥

तंव तो असिमान सिंहासनीं ॥ बैसविलासे प्रधानजनीं ॥ तेणें गंगा धरोनिया मनीं ॥ निघाला तपासी ॥८४॥

मग हिमवंताचे पाठारीं ॥ तप साधिलें नानापरी ॥ तो निमाला महाक्षेत्री ॥ तीससहस्त्र वर्षीनीं ॥८५॥

पुढें त्याचा पुत्र दिलीप ॥ तेणें गंगेचा धरुनि संकल्प ॥ तपीं बैसला पुण्यश्लोक ॥ वरुषें त्रयोदश ॥८६॥

ऐसें तया आचरताम ॥ तोही निमाला काळसंकेता ॥ मग राज्य दीधलें सुता ॥ भगीरथासी ॥८७॥

तेणें पांचसहस्त्र वर्षे ॥ ऊर्ध्वबाहू अनाशनकें ॥ गोकणीं राहिला मौनमुखें ॥ भगीरथ तो ॥८८॥

साही शीतोष्ण पंचाग्नी ॥ आकाशदृष्टी धूस्त्रपानी ॥ गंगा धरोनियां मनीं ॥ आराधिला विरिंची ॥८९॥

ब्रह्मा ह्नणे गा प्रसन्न ॥ येरु ह्नणे द्यावें गंगाजीवन ॥ उद्धरावया पितृगण ॥ पूर्वज माझे ॥९०॥

विधि ह्नणे गा अवधारी ॥ गंगा भूलोकी इच्छिसी जरी ॥ तरी तयेचा ओघ सांवरी ॥ ऐसें पात्र पाहिजे ॥९१॥

तरी ऐक पां सावचित्त ॥ आतां तूं सेवी उमाकांत ॥ तो करील पूर्ण मनोरथ ॥ सत्य जाण ॥९२॥

मग प्रसन्न व्हावया त्रिपुरारी ॥ येरु तपसाधना करी ॥ आराधीतसे दिनरात्रीं ॥ महादेवासी ॥९३॥

तेणें प्रसन्न केला त्रिपुरारी ॥ कीं गंगा येतयेतां सांवरी ॥ ऐसी बोलाविली सुंदरी ॥ गंगा देवी ॥९४॥

रुद्र ह्नणे जाहलों प्रसन्न ॥ तंव पावलें गंगाजीवन ॥ मंदाकिनी आली आपण ॥ मृत्युलोकासी ॥९५॥

ते शिवें झेलिली येतयेतां ॥ एक जटा दीधली भगीरथा ॥ मग बैसोनियां दिव्यरथा ॥ निघाला तो ॥९६॥

सप्तबोघ जाहली स्वर्गगामिनी ॥ पूर्वेसि गेले वोघ तीन्ही ॥ नलिनी आणि पावनी ॥ ल्हादिनीं तिसरी ॥९७॥

अलकनंदा दुजी सुभद्रका ॥ आणि तिसरी ते सुचक्षुषा ॥ या पश्र्विमे गेलिया पुण्यश्लोका ॥ रामराया ॥९८॥

मग उत्तरेसि चालिली सरिता ॥ जे चतुर्थ वोघ बोलिजे सीता ॥ तंव जन्हु भेटला याग करिता ॥ मार्गीं तियेसी ॥९९॥

यज्ञपात्रांचा होईल नाश ॥ ह्नणोनि गंगेचा केला ग्रास ॥ तंव भगरिथें कथिला दोष ॥ पूर्वजांचा ॥१००॥

रायें जानू चिरुनि नखाग्रें ॥ गंगा दीधली जन्हु नरेंद्रें ॥ तेंचि गुणनाम जाहलें पवित्रे ॥ जान्हवी ऐसें ॥१॥

ते सहस्त्रमुखे भागारिथी ॥ सागरा मिळाली शीघ्रगती ॥ मग ते नेली भोगावती ॥ पाताळासी ॥२॥

तेणें भगरिथें भूपाळें ॥ पूर्वज उद्धरिले गंगाजळें ॥ मग ते प्रत्यक्ष चालिले ॥ स्वर्गभुवनासी ॥३॥

आतां असो या पुनरागता ॥ हे द्वितीयस्तबकीं आहे कथा ॥ परी सांगितली योग्यता ॥ वाल्मिकीची ॥४॥

आतां असो हे रामकथा ॥ काहीं आठवलें राया भारता ॥ तें स्वस्थाचितें ऐकावें श्रोता ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥५॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ भागीरथीआख्यानविस्तारु ॥ पंचमोऽध्यायीं कथियेला ॥१०६॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP