कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय ९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नम:

मग ह्नणे पारिक्षिती ॥ सकळकन्यासि पुत्रप्राप्ती ॥ तरी दाक्षायणीसि संतती ॥ नव्हती कांहो ॥१॥

ते सकळभगिनीमाजी थोर ॥ असोनि जाहले कां नाहीं कुमर ॥ हें सांगा जी सविस्तर ॥ कृपा करोनी ॥ ॥२॥

तंव ह्नणे वैशंपायन ॥ दाक्षायणीसि व्हावा नंदन ॥ तंव तयेनें त्यजिला प्राण ॥ यागमंडपीं ॥३॥

मागुती ह्नणे नॄपनाथ ॥ येवढा कां जाहला अनर्थ ॥ तो सांग पां वृत्तांत ॥ मुनेश्वरा ॥४॥

अहो यागकार्य उत्तम बहुत ॥ मग तेथें का केला अपघात ॥ ते तरी महाशक्ती समर्थ ॥ आदिभवानी ॥५॥

जिये जाणूं न शकती कोणी ॥ ऐसी ते मूळपीठ भवानी ॥ देह त्यजिला हे साहसकरणी ॥ केली कांहो ॥६॥

मग ह्नणे मुनेश्वर ॥ नारद कळीसी तत्पर ॥ तो गेला वेगवत्तर ॥ कैलासासी ॥७॥

तो पावला शिवपुरी ॥ उजवी घातली अलकानगरी ॥ मग प्रवेशला झडकरी ॥ श्रृंगारवाटिके ॥८॥

तंव ध्यानस्थ होते पशुपती ॥ शेजे उभी असे शक्ती ॥ खुणावोनि ह्नणे ये आरुती ॥ नारद देवो ॥९॥

अपर्णे तव पिता प्रजापती ॥ तेणें याग मांडिला क्षितीं ॥ देव गणादिक भूपती ॥ गेले समस्त ॥ ॥१०॥

यक्षकिन्नर गणादिक ॥ दिक्पती आणि मांडलिक ॥ ब्राह्मण ॠषी सकळिक ॥ नेले समस्त ॥११॥

पैल पाहें पां विमानीं ॥ देव जातासि संपत्नी ॥ मी आलोंहो दाक्षायणी ॥ सांगो तुज ॥१२॥

तुझ्या समस्ता बहिणी ॥ आणि प्रसूती जननी ॥ याचि प्रसंगे करुनी ॥ भेटती सकळा ॥१३॥

मग बोलिली अंबिका ॥ आह्नांसि मूळ ना पत्रिका ॥ तरी लाजिरवाणें त्र्यंबका ॥ कैसे पुसावें ॥१४॥

ऐसें न भाइंजे आपण ॥ परम होईल दूषण ॥ सकळ हांसतील पिशुन ॥ बहिणी भावंडे ॥१५॥

चला जावोजी यज्ञा ॥ कैसें ह्नणावें त्रिनयना ॥ कैसी केली पैं अवज्ञा ॥ दक्षें माझी ॥१६॥

पत्रिका पुसेल जाश्वनीळ ॥ कोण मूळ आला आहे ह्नणेल ॥ तो मरणापरीस बोल ॥ लागेल मज ॥१७॥

जरी ऐसेनिच कीजेल जाणें ॥ तरी स्त्रियांचे पराधीन जिणें ॥ ह्नणवोनि लागेल पुसणें ॥ नीळकंठासी ॥१८॥

मग तो ह्नणे मुनेश्वर ॥ इतुका न करीहो विचार ॥ यागा गेलिया न वबे ईश्वर ॥ जावोंचि तुवां ॥ ॥१९॥

जातां आपुलिया माहेरा ॥ नलगे कागद पाचारा ॥ मायबार्पेवीण शंकरा ॥ वेदना कैची ॥२०॥

ज्याचे घरीं विवाहयज्ञ ॥ त्याचे दुश्वित होई मन ॥ कां मूळेवीण जाइजे आपण ॥ तोचि सखा प्रीतीचा ॥२१॥

हे आमुची मूळ गोष्टी ॥ तुवां न पुसावें वो धूर्जटी ॥ शंभु न जाय परि तुवां मार्तुभेटी ॥ जावें सर्वया ॥२२॥

तें मानवले दक्षनंदिनी ॥ मग निघाले नारदमुनी ॥ तंव ते आली तत्क्षणीं ॥ शिवसेवेसी ॥२३॥

क्षणैक राहिली निर्वचन ॥ तंव ध्यान जाहले विसर्जन ॥ मग उघडिले लोचन ॥ चंद्रचूडे ॥२४॥

देव विलोकी सुंदरा ॥ तंव नेत्रीं सुटल्या अश्रुधारा ॥ विनवूं पाहे शंकरा ॥ परी न निधे शब्द ॥२५॥

मग देवो ह्नणे आपण ॥ हें करावया काय कारण ॥ कां जालीस दुःखित मन ॥ सुंदरे तूं ॥२६॥

तंव ते अधिकाधीक स्फुंदे ॥ मान खालाबितसे लाजे ॥ मग आलिंगिली वॄषभध्वजें ॥ सुंदरा ते ॥२७॥

उभा राहोनि धूर्जटी ॥ हातीं धरोनि हनुवटी ॥ दुजा हस्त ठेवोनि पृष्ठीं ॥ पुसता जाहला ॥२८॥

ऐसी ते अवोमुख दृष्टी ॥ सद्रदीत दाटली कंठी ॥ मग कडिये घेवोनि गोरटी ॥ पुसे देवो ॥२९॥

ते शिवाचिया प्रेमभावा ॥ सांडोनि निघाली दक्षगात्रा ॥ ह्नणोनि बाहुदंडी ॥ शिवा दीवलें क्षेम ॥३०॥

तान्हुलें जातसे देशा दूरी ॥ प्रेमें धांवती सोयरी ॥ मग कडिये घेवोनि द्वारीं ॥ हिंडविती जैसी ॥३१॥

तैसें जाहलें नीलकंठा ॥ प्रेमें उचलिली बरवंटा ॥ अहा कैसें ह्नणे कटकटा ॥ जाहलें काय ॥३२॥

तो अनुसर जाणोनि सती ॥ उतरिली कडिये खालती ॥ मग जाहली सांगती ॥ नीलकंठासी ॥३३॥

जी जी देवा शूळपाणी ॥ म्यां अपूर्व ऐकिलें कानीं ॥ जातां देखिले विमानीं ॥ देव समस्त ॥३४॥

ते एकमेकां अनुवादती ॥ कीं दक्षे याग मांडिला क्षिती ॥ तेणें मजसी उपजली खती ॥ माहेराची ॥३५॥

जै मज दीधलें तुमचे हाती ॥ तैची भेटली नाहीं प्रसुती ॥ तरी जाईन जी पशुपती ॥ यागमंडपा ॥३६॥

तोचि ह्नणावा सोइरा ॥ न बोलावितां जाय मंदिरा ॥ आणि पडलिया अवसरा ॥ ठाके उभा ॥३७॥

मग ह्नणे महारुद्र ॥ त्वां कथिला नीतिविवार ॥ परि तो गर्वाचा गिरिवर ॥ दक्षप्रजापती ॥३८॥

विद्या तप आणि धन ॥ वय कुळ मख यजन ॥ हेंचि गर्वासि कारण ॥ आणिक दूसरें नसे ॥३९॥

तया तुझी असती पैं प्रीती ॥ तरी बोलाविता प्रजापती ॥ आणि न काढिता वृत्ती ॥ यागीं आमुची ॥४०॥

देवां देखतां यागपीठें ॥ बोलिला मजसी वोखंटे ॥ तरी जळोजळो मुखवटें ॥ न पाहे त्याचें ॥४१॥

मग देवयानीची कथा ॥ रुद्र जाहला सांगता ॥ ते सांगता पुनरागता ॥ ग्रंथ वाढेल ॥४२॥

तरी गर्विष्ठाचे घरा न जावें ॥ तो जाईल धनाधिया गर्वें ॥ मग त्या अपमानाचिया सर्वे ॥ नुरे जीवित ॥४३॥

कीं बोलकाष्ठाचिया इंगळी ॥ सदाम्य हदयातें जाळी ॥ तें मरणाचे काळवेळीं ॥ न विसरें जाण ॥४४॥

राजा मोडिला साधे निदेशे ॥ देश सांधे पडल्या पाउसें ॥ परि न सांधे मोडिलें तैसें ॥ मानस देखा ॥४५॥

तुझिया सकळा बहिणी ॥ सालंकृता नाना भूषणी तुज मान न देतील कोणी ॥ निर्धारपणें ॥४६॥

तप विद्येसी होय पूजन ॥ धनवंतासी होय सन्मान ॥ परि पुत्रही जालिया अर्किचन ॥ न मानी माता ॥४७॥

आतां ऐसेन जासील जरी ॥ तरी कल्याण नव्हे अवधारीं ॥ मग ते बोलिली सुंदरी ॥ शिवाप्रती ॥ ॥४८॥

तुह्मां असता मायबाप्ती तरी जाणतेती हा दुःखताप ॥ कीं स्त्रियेचा न चाले कोप ॥ भ्रतारासी ॥४९॥

आजी कन्या सदैव सकळी ॥ परी मी मातृभेटीसी आकुळी ॥ ग्राममात्राची गवोळी ॥ भोजनी तियेचे ॥५०॥

जातां पितयाचे मंदिरीं ॥ कन्येसे कायसी कुसरी ॥ मरणाचि लिहिलें असेल जरी ॥ तरी टाळील कवण ॥५१॥

ह्नणोनि माथा ठेविला चरणीं ॥ कीं प्रसन्न व्हावें जी शूळपाणी ॥ मज आज्ञा द्यावी वचनीं ॥ यागयात्रेची ॥५२॥

मग बोले महारुद्र ॥ वेगें पाल्हाणा नंदिकेश्वर ॥ आणि दीधले बरोबर ॥ शिवगण आपुले ॥५३॥

श्रृंगी ॠटी आणि यक्ष ॥ भूतभैरव पिशाचक ॥ वीर वेताळ राक्षस ॥ दीधले सएं ॥५४॥

देवीनें चरणीं ठेवोनि माथा ॥ हदयीं चिंती दक्षुसुता ॥ कीं जन्मोजन्मीं जगन्नाथा ॥ होईन दासी ॥५५॥

ऐसी यात्रेसी करी आइती ॥ हदयी व्यापिला पशुपती ॥ चक्रवाकां करी विभक्ती ॥ रजनी जैसी ॥५६॥

तैसें केलें नारदमुनी ॥ अवस्थें व्यापिला शूळपाणी ॥ शरीर गेलें गळोनी ॥ विरहें देखा ॥५७॥

मग आरुंढली नंदीवरी ॥ सर्वे सेवकी खेचरी ॥ वेणुनाद शंखाभेटी ॥ लागली वाद्यें ।५८॥

असो निघाली वेगवत्तर ॥ पावली दक्षयागक्षेत्र ॥ तंव देखिला मंडप थोर ॥ पसरलासे ॥ ॥५९॥

चहुंकडे नृत्यगायनीं ॥ चारीवेदांचिया ध्वनी ॥ तें ऐकोनि दक्षनंदिनी ॥ संतोषली अंतरी ॥६०॥

ऐशा आनंदे विश्वजननी ॥ प्रवेशली यागभुवनी ॥ नंदी आणि भद्रमणी ॥ ठेविले द्वारीं ॥६१॥

तंव वेगी आली प्रसूती ॥ हदयीं आनंदली शक्ती ॥ आलिंगिती परमप्रीती ॥ भुजदंडी ॥६२॥

दोघींसि न सांवरे रुदन ॥ प्रेंमें स्फूंदती जाण ॥ नेत्रां करोनिया मार्जन ॥ संबोखिली कन्या ॥६३॥

हातीं देखे शंखमणी ॥ कणी स्फटिकांची लेणीं ॥ जटा वळिल्या असती वेणी ॥ विभूतीसीं ॥६४॥

कंठी ल्याइली रुद्राक्षमाळा ॥ गेरुरंगाचा पाटोळा ॥ ऐसीतें देखोनि कळवळा ॥ आला मातेसी ॥६५॥

कन्या भेटलिया माहेरा ॥ प्राप्त होय रत्नदोरा आनंद होतसे सहोदरा ॥ मिरवणेसी ॥६६॥

मग आपुले हातीचें कंकण ॥ प्रसुती देतसे आंदण ॥ तें लेवविलें सुलक्षण ॥ कंन्येलागीं ॥६७॥

तंव देखिल्या निजबहिणी ॥ नाना जडित रत्नलेणीं ॥ पुत्र प्रजातें घेवोनि ॥ आलिग समस्ता ॥६८॥

त्यांसी ह्नणतसे प्रसूती ॥ तुह्मी भेटा वो समस्ती ॥ तंव त्या खदखदां हांसती ॥ पाठिमोरिया ॥६९॥

हे कैची हो दाक्षायणी ॥ तूं भुललीस काय जननी ॥ क्षेम द्यावे गोसाविणी ॥ आह्मीं काय ॥७०॥

इचे अंगणीचा विटाळ ॥ आह्नां लागेल अपवित्र ॥ तेणें खचेल श्रृंगार ॥ आश्रुचा माते ॥७१॥

तेणें पति रागेजती ॥ मग काय करावें हो प्रसूती ॥ तंव एकी मागुती बोलती ॥ मातेप्रती ॥ ७२॥

आणिक एकी ह्नणती बहिणी ॥ भेटीसि आली हे जोगिणी ॥ एक ह्नणती भिक्षाटणीं ॥ आली असेल ॥७३॥

एकी पहाती नंदी ढोर ॥ तंव माशियानीं भरलें घर ॥ ह्नणती कैसा देवो शंकर ॥ कैलासींचा ॥७४॥

तंव भीतरी आली भुतें ॥ उघडी आंगे हळहळीतें ॥ मुखें पसरिती समस्तें ॥ भयानक ॥७५॥

बहिणी न साहती त्यांसी ॥ दंडावरीं मारिली पिसीं ॥ ह्नणती बहिण नव्हे ही विवसी ॥ आली यागा ॥७६॥

परि न बोले दाक्षायणी ॥ तेथुनि उठली तत्क्षणीं ॥ महाक्रोधें करुनी ॥ गेली यागमंडपी ॥७७॥

ते दक्षें देखिली कुमरी ॥ परी तो जालासे ब्रह्मचारी ॥ ह्नणे हे कन्या परि परनारी ॥ भेटों नये ।७८॥

गळां देखिल्या रुद्राक्षमाळा ॥ त्या पाहोनी दक्ष कोपला ॥ आणि राग तया आठवला ॥ यागमंडपीचा ॥७९॥

नेत्र झांकोनि करकमळें ॥ नेत्री न पाहेचि स्वबाळे ॥ आणि न भेटे अबळे ॥ द्वेषें तेणें ॥८०॥

ऐसा जाणोनि अनादर ॥ परि करुं आली नमस्कार ॥ तेथें पाहतसे विचार ॥ यागभागांचा ॥८१॥

पाहिल्या पात्रीं परोती ॥ देवदिग्पाळांच्या आहुती ॥ परी न देखे भागस्थिती ॥ महादेवाची ॥८२॥

तंव ते जाहली क्रोधारुढ ॥ फांफरें हाले यागकुंड ॥ ह्नणे जळोजळो तुझें तोंड ॥ रुद्रद्वेषिया ॥८३॥

रागें हाले हनुवटी ॥ समचरणीं राहे दृष्टी ॥ ऐसी देखिली गोरटी ॥ ॠषिजनीं ते ॥८४॥

जैसी कां पातकांसी गंगा ॥ कीं सिंहिणी लक्षी मानेगा ॥ यद्वा औषधी सिद्ध जाहली रोगा ॥ नाशावयासी ॥८५॥

अथवा जैसी व्याघी कुरंगा ॥ कीं दीपकळिका पतंगा ॥ नातरी भेकीवरी भुजंगा ॥ खवळलीसे ॥८६॥

ऐसी कोपली दाक्षायणी ॥ ते महायोगिनी भवानी ॥ मग बोलिली क्रोधवचनीं ॥ प्रजापतीसी ॥८७॥

अरे मूळी नसतां नीरे ॥ सुख कैचे मानी तरुवर ॥ कीं उदक आटतां जळचर ॥ निराश होई ॥८८॥

होतां मरणाचे डोहळे ॥ तैं ससा सिंव्हग्रासा आतळे ॥ कां भेक पाहे निजबळें ॥ भुजंगासी ॥८९॥

सिंहाचिया आमिषा ॥ जंबुके वांचेलरे कैसा ॥ नातरी शरीर पडतां काळपाशां ॥ राखेल कवण ॥९०॥

अरे गर्विष्ठा प्रजापती ॥ भागु नेदिसी पशुपती प्रती ॥ तरी तो घेईल आहुती ॥ तुझे शिराची ॥९१॥

रुद्रनेत्रींचा जो अग्नी ॥ त्यासी करिसी लपवणी ॥ परि हा भक्षील रे निर्वाणीं ॥ शीर तुझें ॥९२॥

जैसा काष्ठीचा पावक ॥ प्रकट नसतां शांत देख ॥ तैसा त्वां लेखिला त्र्यंबक ॥ जामातपणें ॥ ॥९३॥

करितां व्यभिचारी हवन ॥ इष्टदेवतेस नाहीं अवदान ॥ मग त्याचेंचि करीतसे प्राशन ॥ देवता जैसी ॥ ॥९४॥

तैसें होईल रे प्रजापती ॥ सर्वांचें इष्टदैवत पशुपती ॥ त्या वांचोनियां तृप्ती ॥ सुरगणां कैची ॥९५॥

तो परमात्मा ईश्वर ॥ सर्वाभूती अगोचर ॥ त्याचा नेणती निर्धार ॥ विरंचि विष्णु ॥९६॥

आणिक ऐकारे विचार ॥ मश्यक अथवा कुंजर ॥ त्रिमूर्तिवांचोनि विस्तार ॥ नाहीं जाणा ॥९७॥

तरी तुझे मस्तकी महारुद्र ॥ पंच इंद्रियें पंचवक्र ॥ मध्यभाग तो शारंगधर ॥ कटीं ब्रह्मदेवो ॥९८॥

पाहें रुद्र असे मुखग्रासीं ॥ हरी उदर पोखी रसीं ॥ ब्रह्मा असे कटिप्रदेशीं ॥ रची सृष्टी ॥९९॥

ह्नणोनि रुद्रा आलिया राग ॥ तो नेईल शिरोभाग ॥ मग बरवा होईल याग ॥ प्रसन्न तुज ॥१००॥

अरे रे दक्षा अदैवा ॥ वाचे न वदसी शिवशिवा ॥ तरी आतां घेसील धांवा ॥ यमपुरीचा ॥१॥

तूं पिता नव्हेसि वैरी ॥ मज लाज हे केली थोरी ॥ मीच जन्मलें कां पार्थरी ॥ तव उदरीं रे ॥२॥

तुझे अन्नरेताचा विकार ॥ तेणें रचिलें हें शरीर ॥ परी शिवायोग्य नव्हे पात्र ॥ तें जाळीन आतां ॥३॥

तुझा पिता प्रजापती ॥ ऐसें ह्नणेल पशुपती ॥ तेधवां काय अपकीर्ती ॥ वांचावें म्यां ॥४॥

तुझीये लाज पितियेपणा ॥ माझी केली मानखंडना ॥ आतां अंगविजे मरणा ॥ हेंचि भलें ॥५॥

मज वारितां त्रिपुरारी ॥ मी आलें तंव मंदिरी ॥ परि पुसिलें नाहीं उत्तरीं ॥ निष्ठुरा त्वां ॥६॥

आतां घेईन प्रायाश्वित ॥ ही तनु त्यागीन सत्य ॥ जाळोनि करीन हेमवत ॥ शिवायोग्य ॥७॥

ते परम पावना योगिनी ॥ पराकाष्ठा उन्मनी ॥ मग हटनिग्रह करोनी ॥ बैसली देवी ॥८॥

आचमन करोनी विन्यासें ॥ बैसली हवनपूर्वावेशे ॥ योग मार्गाचिनि उद्देशें ॥ घातलें पद्मासन ॥९॥

देवोनि उडीयानाबधु ॥ अंकोचिला अधरकंदु ॥ वायु जो होरा अधु ॥ तो घातला पश्विमे ॥११०॥

व्यान अपानाचेनि साकारें ॥ तेणे भेदिलीं षटचक्रें ॥ मग निघाली वैकुंठद्वारें ॥ सुषुन्मेच्या ॥११॥

त्रिवेणी अपानाचे देठी ॥ तेथें आधारचक्राच्या पीठीं ॥ मणिपूरीं करी भेटी ॥ समानेसी ॥१२॥

मग लंघोनि स्वाधिष्ठान ॥ पावली प्राणाचें भुवन ॥ तेथें जिंकिले चक्रस्थान ॥ अनुहा तें ॥१३॥

आणि विशुद्धचक्राचे मठीं ॥ तेथें उदाना जाहली भेटी ॥ मग मिळाले ललाटीं ॥ व्यान अपान ॥१४॥

पुढें पडिली अग्निचक्रीं ॥ ध्यानीं धरोनी त्रिप्ररारी ॥ तेथें भेटली सुंदरी ॥ महादेवासी ॥१५॥

मग मांडिली स्तुती ॥ ह्नणे जयजया जी पशुपती ॥ शिवशिवा सर्वाभूती ॥ व्यापक तूं ॥१६॥

जयजया जी कर्पूरगौरा ॥ जटाजूटा त्रिशुळधरा ॥ व्याघ्राजिन भस्मांबरा ॥ शोभे तुज ॥१७॥

जयजया जी गिरिजापती ॥ तूं सर्वदेवांची स्थिती ॥ मनकामना प्राणपती ॥ द्यावे तुज ॥१८॥

जयजयाजी सर्वेश्वरा ॥ वृषभध्वजा पंचवक्रा ॥ जन्मोजन्मीं दातारा ॥ द्यावी सेवा ॥१९॥

मग चेतविला जठराग्नी ॥ फुंकिला चक्राग्नीचा वन्ही ॥ दोहींचे योगें करुनी ॥ जाळिला देह ॥१२०॥

त्या रुद्राग्निचेनि ज्वाळें ॥ देह दाहिला दक्षबाळें ॥ प्रतिकळा नेली राउळें ॥ तें नेणवे मज ॥ २१॥

नाना कर्पूरांची दीप्ती ॥ पारुसली त्रिनेत्रशक्ती ॥ तैं वसा आणि अस्थी ॥ नुरेचि कांही ॥२२॥

ते परम योगिनी अबळा ॥ शक्ती धरिली अवलीळा ॥ स्वदेहें तो देह जाळिला ॥ अग्नि आवंनुनी ॥२३॥

हे पद्मपुराणीची कथा ॥ येरव्हीं बोलावया काय योग्यता ॥ कोकिळावंश जाहला भारता ॥ येणोंचि गुणें ॥२४॥

ऐसी ते सहजलीळा ॥ देहीं उठवी योगज्वाळा ॥ सकळीं देखिली कोकिळा ॥ जातजातां ॥२५॥

थोर जाहला गवगवा ॥ ह्नणती प्राण सांडील शांभवा ॥ काय सांगावा शिवशिवा ॥ हरिख यागाचा ॥२६॥

ते अविनाश शिवशक्ती ॥ नाहीं पिता पुत्रभ्रांती ॥ परि राहिली अपकीर्ती ॥ चंद्रार्कवरी ॥२७॥

असो ऐकिले नंदिकेश्वरें ॥ महा शब्दाचेनि गजरें ॥ मग धाविन्नला परिवारें ॥ सहितमंड्पा ॥२८॥

जंव दृष्टीं न दिसे गोरटी ॥ तंव कोपल्या भूतकोटी ॥ मग विदारित्या यागपीठी ॥ हवनद्रव्यांच्या ॥२९॥

मंडप उचलिला मणिमंतें ॥ ब्राह्मणांवरी लोटली भुतें ॥ स्थान सांडोनि आकांतें ॥ पळती सर्व ॥१३०॥

पळतां द्विजांचीं फिटली धोत्रें ॥ सैरावैरा विखुरलीं पात्रें ॥ धाकें झांकिती उभय नेत्रें ॥ न देखवे त्यां ॥३१॥

भ्रमती मंडपा भोंवती ॥ तंव पुढें शिवगण देखती ॥ एकमेंका मागें लपती ॥ न सांपडे मार्ग ॥३२॥

ह्नणती हें शिवद्वेषाचें मूळ ॥ आह्मी पातलों तात्काळ ॥ रुद्रायणीदेहें यज्ञफळ ॥ घडे केवीं ॥३३॥

आलों द्रव्याचिया आशां ॥ परि मानवलें नाहीं महेशा ॥ अज्ञानकर्माचिया धरसां ॥ पडिलों दुःखे ॥३४॥

ऐसें बोलती ॠषेश्वर ॥ तिहीं टाकिले दिशांतर ॥ परि भृग्वादिक थोरथोर ॥ राहिले तेथें ॥३५॥

तंव उठिले दिग्पाळ ॥ जे महाबळिये विशाळ ॥ त्यांही हाकिले असे दळ ॥ नंदिकेश्वराचें ॥३६॥

मग उठिला भगवीर ॥ मुसळें ताडिला नंदिकेश्वर ॥ श्रृंगी मारिला भद्र ॥ स्त्रुवांवरी ॥३७॥

तेथें यागीचे मंत्रांवरी ॥ भुतें मारिली ऋषेश्वरीं ॥ थोर मांडिली झुंजारी॥ यागमंडपी ॥३८॥

ऐसेम युद्ध मांडले विचित्र ॥ एकमेकां मारिती शस्त्र ॥ मग करितजाहले ऋषीश्वर ॥ मंत्र काहीं ॥ ॥३९॥

भृगूनें बीजमंत्र आव्हानिले ॥ होमकुंडों उदक शिंपिलें ॥ तंव तेथोनि शरभ निघाले ॥ सहस्त्रसंख्या ॥ ॥१४०॥

हातीं कोलितांचे भाले ॥ तेच रुद्रगणां मारित चालिले ॥ जळोनि पडिले भूतभारे ॥ रुद्रगणांचे ॥४१॥

जळती भुतांचे केश ॥ धडाडिलें नंदीचें पुच्छ ॥ आंगीचें जळतसे मांस ॥ मणिमंताचे ॥४२॥

भुतें पळालीं तरुवरी ॥ एक जीवनीं एक पाथरीं ॥ एक लपालीं गिरिवरी ॥ भेणेंकरोनी ॥४३॥

तंव कटकीं पडली हांक ॥ नोळखती एकमेक ॥ मग दक्षें पाठविले सेवक ॥ वारावयासी ॥४४॥

मग आकर्षिले वृषभदेव ॥ तेणें कटकीची निवारिला गौगव तंव नारदें नेला पुढाव ॥ शिवाणसीं ॥४५॥

सकळीं भृगूची केली स्तुती ॥ महामुनी तूं वेदमूर्ती ॥ मग याग मांडिला पुढती ॥ दक्षरायें ॥४६॥

मग ह्नणे वैशंपायन ॥ भारता त्वां पुसिला प्रश्न ॥ दाक्षायणीसि व्हावा नंदन ॥ तों जाहलें ऐसें ॥४७॥

हें दाक्षायणीचें चरित्र ॥ कथा पुरातन पवित्र ॥ अपुत्रिकां होतील पुत्र ॥ भावें सिद्धी ॥४८॥

ही कथा श्रीभागवतीं ॥ मैत्रेय सांगे विदुराप्रती ॥ ते म्यां कथिली गा भूपती ॥ जन्मेजया ॥४९॥

आतां असो हे आदिशक्ती ॥ पुढें वीरभद्र वधील प्रजापती ॥ तें ऐकावें श्रोतीं ॥ ह्नणे कृष्णायाज्ञवल्की ॥१५०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ दाक्षायणीचरित्रविचारु ॥ नवमोऽधायीं सांगितला ॥१५१॥

शुभंभवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP