कथाकल्पतरू - स्तबक ३ - अध्याय १०

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्रीगणेशाय नमः

ॠषीप्रति पुसे जन्मेजयो ॥ पुढें सांगा जी अन्वयो ॥ कैसा आला वीररावो ॥ वीरभद्र तो ॥ ॥१॥

मग ह्नणे मुनीश्वर ॥ राया पुढें ऐक सादर ॥ हे शिवचरित्रींची मनोहर ॥ दक्षकथा ॥२||

असो निघाला नारद ॥ ह्नणे उदीम जाहला फलद ॥ थोर जोडला आतां विनोद ॥ या दक्षयागें ॥३॥

तंव पुढें भेटले नंदीभद्र ॥ दुःखे चालती स्थीर स्थीर ॥ ह्नणती कैसा सांगावा विचार ॥ महादेवासी ॥४॥

त्यां सांडोनि माघारे ॥ नारद पावले अतित्वरें ॥ कैलासभूमीचें शिखर ॥ पाहिलें तेणें ॥५॥

तेथें न देखे त्रिनयना ह्नणोनि गेला चित्ररथवना ॥ मग देखिले पंचनना ॥ शंकरासी ॥६॥

तंव ध्यानस्थ असे जगन्नाथ ॥ हदयीं रामदास जपत ॥ खेचरीमुद्रा अवधूत ॥ देखिला नारदें ॥७॥

नारदा न धरवें धीर ॥ ह्नणे ध्यान सारिल केव्हां रुद्र ॥ ह्नस्तव जावोनि वामकर ॥ त्राहाटिला मुखें ॥८॥

ऐकोनियां महाशब्दातें ॥ ध्यान विसर्जिलें जगन्नाथें ॥ ह्नणे कोणें महाघोषातें ॥ केलें येथें ॥९॥

तंव देखिला स्फुंद्त ॥ नारद कळी लावित ॥ त्यासी पुसे जगन्नाथ ॥ कां चेवलासी ॥१०॥

कोणें तुज गांजिले नारदा ॥ कोणी केली तुझे निंदा ॥ कां केलेसिं महाशब्दा ॥ तें सांग मज ॥११॥

मुनि ह्नणे तुह्मां फळला याग ॥ शक्तीनें केला देहत्याग ॥ थोर केला मानभंग ॥ दक्षें तियेचा ॥१२॥

सतीनें जाळिलें शरीर ॥ परी न वर्जी कोणी उत्तर ॥ आणि मारिले नंदिभद्र ॥ कोलितपरी ॥१३॥

इतुक्यांत आलीं नंदी भुतें ॥ अग्निनें जळलेलीं दुःखीतें ॥ ऐसें देखतां जगन्नाथे ॥ आव्हानिला कोप ॥१४॥

जाणों त्रिभुवनींचा क्रोधु ॥ तो एकवाटिला अगाधु ॥ कीं तमोगुणाचा महासिंधु ॥ उचंबळला ॥१५॥

जैसा प्रळयकाळीं महारुद्र ॥ कोपें करी भूतसंहार ॥ तैसा कोपला शंकर ॥ दक्षावरी ॥१६॥

रागें कांपतसे हनुवटी ॥ गरगरां भोंवे नेत्रवाटी ॥ आसन न सांवरे सृष्टी ॥ महादेवाचें ॥१७॥

बाहुसें करिती स्फुरण ॥ क्रोधें आरक्त जाहले नयन ॥ करकरीत दाढादशन ॥ अंगी स्वेद सुटला ॥१८॥

विखुरली विभूती आघारी ॥ कमंडलु हाले फाफरी ॥ नारद पळाला दूरी ॥ क्रोधभेणें ॥१९॥

फोडिले डमरु आणि डोर ॥ फाडिलें कौपीन वस्त्र ॥ मोकळा जाहला जटाभार ॥ मस्तकींचा ॥२०॥

पाशुपत त्रिशूळ टाकिले ॥ क्रोधें धनुष्य भवंडिले ॥ कोपातिशयें कांपो लागलें ॥ वंपु रुदाचे ॥२१॥

क्रोध न सावरे नीळकंठा ॥ तोडिला कडासन कांसोडा ॥ मग हातें उपटिली जटा ॥ मस्तकींची ॥२२॥

ते गरगरां फिरवोनि जटा ॥ धरेवरी आपटी पिंगटा ॥ तेणें कंप जाहला त्रिकूटा ॥ थरारिले लोकपाळ ॥२३॥

नादें दुमदुमिलें त्रिभुवन ॥ पावलें प्रळ्याचें अवसान ॥ आदळों पाहे गगन ॥ भूमीवरी ॥२४॥

थरारिली शेषफणी ॥ थरथरां कापतसे मेदिनीं ॥ उचंबळों पाहे पाणी ॥ सागराचें ॥२५॥

भूमीजटेचा शब्दाकार ॥ नेणें जाहला गजर ॥ माजी उपजला वीरभद्र ॥ गर्भी जटेचे ॥२६॥

ते जटा उपटोनि हातें ॥ त्रांणे टाकिली जगन्नाथें ॥ वेगें गेली व्योमपंथे ॥ वीज जैसी ॥२७॥

तंव विशाळ श्यामवर्ण ॥ एकमुखी परि त्रिनयन ॥ अंगे तरुण बाहुनंदन ॥ उपजला शिवाचा ॥२८॥

मुखीं विक्राळ दशन ॥ असंख्य आयुधें परिपूर्ण ॥ खाद्यावरी गजाजिन ॥ कंठी अस्थिमाळा ॥२९॥

ललाटीं विभूतीचा टिळा ॥ कंठीं रुद्राक्षांचिया माळा ॥ जोगवटा जंटा विशाळा ॥ मुखीं शिवनाम ॥३०॥

हातीं डमरु त्रिशूळ ॥ गदा सुरी आणि मुसळ ॥ भेटी वाहे पाशकाळ ॥ दिव्यायुधेंसी ॥३१॥

धनुष्य खडु आणि बाण ॥ परशु चक्र वोडण ॥ काच कुंचे शंखस्फुरण ॥ शोभलें मुखीं ॥ ॥३२॥

माथां सर्पिगट जटा ॥ सर्वांगीं विभूतीचा पठ्ठा ॥ हात जोडोनि नीलकंठा ॥ विनवीतसे ॥३३॥

नमन करोनियां ह्नणे वचनीं ॥ जी जी देवा शूळपाणी ॥ मज आज्ञा द्यावी वचनीं ॥ सेवकासी ॥३४॥

तया देखोनियां रुद्र ॥ हर्षे जाहला निर्भर ॥ ह्नणे तुझें नांव वीरभद्र ॥ ठेविलें पुत्रा ॥३५॥

शिवें उपदेशिले मंत्र ॥ नानायुद्धांचे पवित्र ॥ मारण जारण अगोचर ॥ कथिलें तया ॥३६॥

या दळींचा तूं अग्रगण्य ॥ आतां मारीं रे ब्रह्मनंदन ॥ विध्वंसावा दक्षयज्ञ ॥ शिरासहित ॥३७॥

कुठार देवोनि महाशक्ती ॥ ह्नणे करावी भागस्थिती ॥ देवां मंथोनियां आहुती ॥ काढीं सर्वांच्या ॥३८॥

मग शिवासि करोनि प्रदक्षिणा ॥ युद्धा निघाला वीरराणा ॥ सकळ सैन्येंसीं शिवगणां ॥ सहित पैं ॥३९॥

नंदी मणिमंत आणि भद्र ॥ भूतभैरवेंसी परिवार ॥ ॠटी भृंगी चंडीश वीर ॥ यक्षगण पैं ॥४०॥

ब्रह्मराक्षस योगिनी ॥ काळ पर्णा शंखिनी ॥ वीरवेताळ डंखिणी ॥ आणि पुष्पदंत ॥४१॥

झोटिंग आणि वेताळ ॥ लांवा पिसाटें खळाळ ॥ नम्र धांविती क्षेत्रपाळ ॥ भयानक ॥४२॥

निधाल्या चौसष्ट योगिनी ॥ नवकोटी कात्यायनी ॥ छपन्नकोटी मिळोनी ॥ चामुंडा त्या ॥४३॥

नव नारसिंह खडतर ॥ चवदाशतें मायावी असुर ॥ आणि झोटिग महा उग्र ॥ पंधरा शतें ॥४४॥

अष्टकोटी भुतावळी ॥ अष्टकोटी भैरव चळी ॥ भेटी कांपे महीतळी ॥ सैन्याचेनी ॥ ॥४५॥

मग निघाला चतुरंगभद्र ॥ गज रथ आणि तुरंगस्वार ॥ पायदळींचे महावीर ॥ चालिलें पैं ॥४६॥

पुढें वाजंत्रांचे गजरीं ॥ नाद न समाये अंबरीं ॥ शिववाद्यें अनंत भेरी ॥ गर्जताती ॥ ४७॥

निशाणां देवोनि घावो ॥ वेगें चालिला वीरबाहो ॥ दुमदुमिला ब्रह्मकटाहो ॥ गजरें तेणें ॥४८॥

पावले भद्रावती नगरी ॥ महेंद्रनामें नदीचे तीरीं ॥ मग बैसले विचारीं ॥ नंदी वीरभद्रादी ॥४९॥

करुं राजनीतीचा विधी ॥ पुढें दूत पाठवावे संधी ॥ रिघु निर्गम ऐसिये बुद्धीं ॥ पडेल ठावो ॥५०॥

ठावो पडलिया संग्रामसैन्य ॥ मग भेद न पडावा जाण ॥ ऐसी बुद्धी विचारुन ॥ पाचारिला चंडी ॥५१॥

तेथें मागावी शिवाची शक्ती ॥ आणि यागभागाची वृत्ती ॥ कौशल्यें पहावी प्रतापशक्ती ॥ दक्षप्रजापतीची ॥५२॥

ह्नणोनि निघाला चंडीश ॥ तो पावला यागप्रदेश ॥ तंव दूती जाणविला संदेश ॥ दक्षलागीं ॥५३॥

वेगें येवोनि दक्षदूत ॥ राया जाणवितसे मात ॥ कीं शिवें धाडिला भृत्य ॥ तुह्मांजवळी ॥ ॥५४॥

तें ऐकोनियां कानीं ॥ दक्ष खोंचला निजमनीं ॥ जाणों हाणितला वज्रपाणीं ॥ पर्वत जैसा ॥५५॥

कीं विहंगमाचे झडपे ॥ काद्रवेष जैसा कांपे ॥ नातरी काळातें देखों न शके ॥ जीव जैसा ॥५६॥

तंव येवानि बोले चंडीश ॥ राव ह्नणे काय आयास ॥ काय करीत असे महेश ॥ सांगें मज ॥५७॥

येरु ह्नणे पाहिजे शक्ती ॥ आणि विभागाची स्थिती ॥ नातरी विटंबना प्रजापती ॥ होईल तुझी ॥५८॥

मग बोले प्रजापती ॥ सकळ कन्यातें प्रजासंतती ॥ तें देखोनि लागली खंती ॥ दाक्षायणीसी ॥५९॥

ह्नणे धन्य या कन्यका ॥ प्रज बापें कां दीधलें त्र्यंबका ॥ श्रृंगार नेणें रत्नकनका ॥ स्वप्नीं कदा ॥६०॥

ह्नणोनि तयेनें त्याजिला प्राण ॥ आह्मां लाविले लांछन ॥ येवढें केलें निर्वाण ॥ शिवकांतेनें ॥६१॥

चंडीश ह्नणे गा अवधारीं ॥ कुबेर ज्याचा भांडारी ॥ कनकरत्नासी त्याच्या घरीं ॥ काय उणें असे ॥६२॥

जैसी दुर्गेधीसी माशी ॥ त्राणें झोंबे एकमेकींसी ॥ तैसे जीव रत्नद्रव्यांची ॥ घालिती झेंपा ॥६३॥

कलिस्वरुप पूर्ण कांचंन ॥ तें शिवा नावडे भूषण ॥ लक्ष्मी कलिरुप ह्नणेन ॥ दीधली श्रीरंगासी ॥६४॥

लक्ष्मी चंचळ विष्णुअंगना ॥ ह्नणोनि ते नावडे त्रिनयना ॥ जें दुर्लभ त्रिभुवना ॥ तें घेतसे नीलकंठ ॥६५॥

जयांसि भक्ति ज्ञान अंगीं ॥ तेचि मोक्षा पावती योगी ॥ येर्‍हवीं सर्व अभागी ॥ जाण राया ॥६६॥

ह्नणोनि शंख स्फटिकमणी ॥ शिव लेववी अभंग लेणीं ॥ तरी शिवदूषणें जाय दाक्षायणी ॥ हें लटिकें राया ॥६७॥

ते शिवनामाची सुमनमाळ ॥ शिवसेवेसी प्रेमळ ॥ अर्धागीं वसे केवळ ॥ महादेवाचे ॥६८॥

जरी ह्नणों नाहीं संतती ॥ तरी त्रिभुवनाची व्याप्ती ॥ शिवदूषणें नासली शक्ती ॥ हें बोलसी व्यर्थ ॥६९॥

तो अर्धनारीनटेश्वर ॥ ते माया तो ब्रह्मनिर्धार ॥ शिवा श्रुती शिव ओंकार ॥ जाण राया ॥७०॥

जरी काशिये मरोनि जन्मणें ॥ गंगे बुडतां अधोगती जाणें ॥ तरीच राया शिवदूषणें ॥ नासेल शक्ती ॥७१॥

चकोर उबगे चंद्रसेवनें ॥ को सूर्यछाया पडे दक्षिणे ॥ तरीच शिवाचे दूषणें ॥ नासेल शक्ती ॥७२॥

दक्ष जाहला निर्वचन ॥ अंतरीं खंती उदेली दारुण ॥ वळसां पडिलें असे मन ॥ चिंतानदीचे ॥७३॥

आतां तियेचे पाडासाठीं ॥ कन्या देई गा धूर्जटी ॥ नातरी मरण शेवटी ॥ सत्य जाण ॥७४॥

तुजवरी कोपला रुद्र ॥ तेणें पाठविला वीरभद्र ॥ तो तुझा करील संहार ॥ यागासहित ॥७५॥

तरी त्यासी जावें त्वां शरण ॥ करीं विभूतीचें उधळण ॥ धांवोनी धरीं चरण ॥ वेगीं त्याचे ॥७६॥

मग बोले प्रजापती ॥ तेचि विटंबना पावती ॥ जे नीति आचारवृत्ती ॥ सांडिती दूतपणाची ॥७७॥

नातरी कंठी घालिती कांती ॥ हे नव्हे क्षात्रधर्माची रीती ॥ सेवकें करावी स्वामिस्तुती ॥ हा नीतिधर्म ॥७८॥

अरे वाचाळा तोंडेंसी ॥ रुद्रातें काय वानिसी ॥ मज सिंहासी बळ दाविसी ॥ घोंगटाचें ॥७९॥

तृणें खोंचिजे व्योमा ॥ हिंसक जाणे परमात्मा ॥ तरी माझे खंडवेना रोमा ॥ वीरभद्रासी ॥८०॥

अरे तुझा वीरभद्र ॥ रणीं करीन निःशस्त्र ॥ मज खांदी असतां शिर ॥ नेदी रुद्रभागा ॥८१॥

येथें आणीं शूळपाणी ॥ तिन्ही देव करिती बुझावणी ॥ तरी भाग देवोनि यज्ञीं ॥ न बैसें मी ॥८२॥

क्षत्रिय भीत नसे रणा ॥ सती न शंके मरणा ॥ कीं चोरभयें विटंबना ॥ हेचि निंद्य ॥८३॥

अवधी पुरलिया आयुष्या ॥ शरीर जाईल काळभक्षा ॥ तरीच कींव भाकितां मूर्खा ॥ बोलसी व्यर्थ ॥८४॥

समरीं निघालिया शूर ॥ तया काय दुजा विचार ॥ नाहीं उदयो अस्त अंधार ॥ अग्नीसि जैसा ॥८५॥

जें योगियां सुख उन्मनीं ॥ तेंचि शूरा समरंगणीं ॥ जो पडे युद्ध अंगणीं ॥ तोचि धन्य ॥८६॥

गाईविप्रांचिये काजीं ॥ जें फळ पाविजे धर्मामाजी ॥ तें प्राप्त होय झुंजी ॥ देह पडतां ॥८७॥

आतां असो हे फळश्रुती ॥ मज कन्या ना यागवृत्ती ॥ तरी तुमची किती शक्ती ॥ ते दावा मज ॥८८॥

मग निघाला शिवदूत ॥ नंदीसि जाणवी मात ॥ सांगितला सकल वृत्तांत ॥ प्रजापतीचा ॥८९॥

कोप आला शिवनंदना ॥ ह्नणे सारा रे आरोगणा ॥ घावो घाला रे निशाणा ॥ लागवेगें ॥९०॥

मग बोलाविले ज्योतिषी ॥ भूमी पाहिली चौंरासी ॥ तंव दक्षाचिया नांवरासी ॥ घातचंद्र ॥९१॥

पाहिलें काळाचें चक्र ॥ जें रेखिलें कूंकुमाकार ॥ योगिनी असती समोर ॥ दक्षकटका ॥९२॥

घात पात आणि मृत्यु ॥ धुरे असती शनीकेतु ॥ दक्ष सांपडेल जीवंतु ॥ मुहूर्ते येणें ॥९३॥

पहिले प्रहरीं राहुहोरा ॥ काळ प्रळ्याचा मोहरा ॥ तुह्मां मुहूर्त घटी तेरा ॥ असे उत्तम ॥९४॥

इकडे दक्षें बोलाविले प्रधान ॥ ह्नणे आह्मीं हा करुं जंव यज्ञ ॥ तंव पूषा केला अग्रगण्य ॥ झुंजावयासी ॥९५॥

घेवोनि दिक्पाळांची मादी ॥ आणि वीर यज्ञसंबंधी ॥ युद्ध करावें स्वबुद्धीं ॥ शिवगणेंशी ॥९६॥

परी कटकांचे प्रदेशी ॥ भालुवा भुंकती दिवसीं ॥ शुष्ककाष्ठीं वायसी॥ केली कर्कर ॥९७॥

आणि चालतां धरणीवरी ॥ छाया शिर न देखे शरीरीं ॥ हदयाच्या अभ्यंतरीं ॥ पेटला अग्नी ॥९८॥

ऐसे मानिले अपशकुन ॥ उद्वेगलें अंतःकरण ॥ करुं पाहे भांडण ॥ स्वजनेंसी ॥९९॥

तंव भरली मुहूर्तघडी ॥ ज्योतिषी सांगती पुढी ॥ मग उचलिली धाडी ॥ शिववीरी पैं ॥१००॥

नंदी शिकवी सकळां ॥ तुह्मीं जिंकावें परदळा ॥ परी प्रजांचा एकवळा ॥ न करावा तुह्मीं ॥१॥

तंव उत्तरेचे मोहरें ॥ येरी देखिले महाधुळारे ॥ दिशा लोपल्या अंधारें ॥ न दिसे भानु ॥२॥

ह्नणती कृतांत कोपला ॥ कीं प्रळयो आतांचि पावला ॥ अथवा यागचि कोपला ॥ काळरुपें ॥३॥

तों वाद्यें ऐकिली जवळी ॥ ह्नणती बळी रे बळी ॥ मग लोटले दक्षदळीं ॥ शिवगण ते ॥४॥

हांक शिववीरीं फोडिली ॥ तेणें भूगोल उन्मळी ॥ कृतांत कांपे चळचळीं ॥ तेणें धाकें ॥५॥

तेथें अशुद्धांचे पुर ॥ वाहती अश्व नर कुंजर ॥ तंव उठावले वीर ॥ प्रजापतीचे ॥६॥

मग मांडिली महामारी ॥ भग्न उठिला तयांवरी ॥ वृक्ष धोंडे बाणधारीं ॥ वर्षता जाहला ॥७॥

सकळ पृथ्वीचे भूपाळ ॥ गणगंधर्व दिग्पाळ ॥ ऐसें अवधें उठिलें दळ ॥ शिवसेनेवरी ॥८॥

निकरें झगटलें दक्षसैन्य ॥ मोडों पाहती शिवगण ॥ तंव धावणें केलें आपण ॥ नंदीश्वरें ॥९॥

जें म हादेवाचें वाहन ॥ उचलों शके हें त्रिभुवन ॥ तेणें मोडिलें दक्षसैन्य ॥ क्षणामाजी ॥११०॥

तंव धाविन्नला भग्नवीर तेणें पाचारिला नंदीश्वर ॥ संग्राम मांडिला दुर्धर ॥ उभयांते ॥११॥

भग्न ह्नणे रे पशुवा नंदी ॥ तुवां भार वहावा खांदी ॥ पंचाननाचिये युद्धीं ॥ कैसा पुरसी ॥१२॥

अरे वृषभा तृणचरा ॥ त्वां पृष्ठीं वहावें रुद्रा ॥ खावोनियां वनचारा ॥ असावेम तुवां ॥१३॥

तंव नंदी ह्नणे तूं वाजटी ॥ गर्जतोसि नासापुटीं ॥ मग वाहोनियां चपेटी ॥ गेला भग्नावरी ॥१४॥

पडती पायांचे मोगर ॥ थडकां पाडिले कुंजर ॥ थोर खोंचिले अश्वस्वार ॥ शृगेंवरी ॥१५॥

ऐसा मोडिला जाणोनि भार ॥ धाविन्नला भग्नवीर ॥ त्राणें हाणिला नंदिकेश्वर ॥ गदाघातें ॥१६॥

परि ते साहोनि वेदना ॥ नंदी ह्नणे सांभाळीं भग्ना ॥ धडके सरिसें रथचूर्णा ॥ केलें तयाचे ॥१७॥

भग्न जाहला विरथ ॥ घायी मूर्छना दाटत ॥ तंव आला मणिमंत ॥ त्यातें वर्जितसे नंदी ॥१८॥

त्यासी ह्नणे नंदीश्वर ॥ हा नव्हे नीतिविचार ॥ रणीं न करावा मार ॥ सकळांनी येका ॥१९॥

हें पतनासि होय कारण ॥ कृष्णें भोगिलें आपण ॥ त्या वालीचा घेतला प्राण ॥ जन्मेजया गा ॥१२०॥

श्रोती न ठेवावें दूषण ॥ हे दृष्टांतकथा पुरातन ॥ प्रथमस्तबकींचे अवधान ॥ द्यावें श्रोतीं ॥२१॥

मग नंदी हाणित शिळाघातें ॥ तैं पराभविलें भग्नातें ॥ मूर्छे दाटला निश्वितें ॥ भग्नवीर ॥२२॥

तें देखिलें दोहीं दळीं ॥ वाद्यें लागलीं उसाळीं ॥ देव ह्नणती बळि रे बळी ॥ दोघे वीर ॥२३॥

मूर्छा सांवरोनि भग्न ॥ चढवी धनुष्याचा गुण ॥ शितीं लाविला चंद्रबाण ॥ वधावयासी ॥२४॥

भग्नें सोडितांचि बाण ॥ नंदीनें चुकविलें संधान ॥ मग व्याघ्र जाहला आपण ॥ भग्नवीर ॥२५॥

नंदी हाणितला चपेटघातें ॥ नखें मारित नेहटें ॥ जंव झोंबावें मुखातें ॥ तंव धावला वीरभद्र ॥२६॥

वीरें टाकिली मंत्रविभूती ॥ तंव नंदी हाणी थडकाधातीं ॥ भग्न दाटला असे भीतीं ॥ नंदीचेनी ॥२७॥

मग आला काकुळती ॥ ह्नणे राखें गा गोपती ॥ तंव बांधिलाआ मागीलहातीं ॥ नंदिकेश्वरें ॥२८॥

शिववीरीं केला जयजयकार ॥ जीत धरिला भग्नवीर ॥ जय पावला नंदिकेश्वर ॥ आलिंगिला समस्तीं ॥२९॥

घेवोनियां भग्नवीरा ॥ चालिले ते मेळिकारा ॥ भुतें ह्नणती नंदीश्वरा ॥ जाहलों तृप्त ॥१३०॥

दक्षसैन्यीं हाहाकार ॥ ह्नणती धरोनि नेला वीर ॥ कटकाचा जाहला संहार ॥ बहुत पैं ॥३१॥

तंव धांवला पूषावीर ॥ घेवोनियां दळभार ॥ ह्नणे कैसा जाईल नंदिकेश्वर ॥ जिंकोनियां ॥३२॥

घोडियां घालोनि पाखरा ॥ सजोनियां कुंजरा ॥ रथीं जोडोनि तुरंगवरां ॥ लोटला तो ॥३३॥

देखतांचि शिवकटका ॥ दक्षवीरीं दीधल्या हांका ॥ आला रे पूषा वीर देखा पराक्रमी ॥३४॥

जंव मुरडावा वीरभव्र ॥ तंव चंडीशें केला स्थिर ॥ ह्नणे आला धांवणें कर ॥ यासी झुंजेन मी ॥३५॥

घेवोनिया बळिये वीर ॥ रणीं धांवला चंडक्रूर ॥ पूषा लोटला त्यावर ॥ स्वसैन्येंसी ॥३६॥

अरे चंडीशा शिवगणा ॥ तुह्मीं बांधिलें वीरा भग्ना ॥ आतां करीन विटंबना ॥ सकळ सैन्याची ॥ ॥३७॥

तुह्मां साजे दीक्षाजोग ॥ तुह्मां कैंचा यागीम विभाग ॥ ऐसें ऐकतां आला राग ॥ शिववीरासी ॥३८॥

घेवोनियां त्रिशूळचक्रें ॥ गजनरांची कापिली शिरें ॥ रणीं लागली वाजंत्रें ॥ दोनी दळीं ॥३९॥

हाणिती करकांडीं गदा ॥ मांसाचा करिती चेंदा ॥ भुतें खावया झोंबती मेदा ॥ दातांवरी ॥१४०॥

तंव उठिला पूषावीर ॥ लोटिला गजसेनेचा भार ॥ तेणें रगडिला परिवार ॥ चंडीशाचा ॥४१॥

येक खोचिले राउतीं ॥ येक मारिले पदाती ॥ येक दाटले गदाघातीं ॥ भूमीवरी ॥४२॥

शोणितें दाटली क्षिती ॥ जैसा मेघ वर्षाती ॥ प्राचीस दिसे गभस्ती ॥ गमलें तेथें ॥ ४३॥

सवेंचि उठिला पूषावीर ॥ अश्व रथ कुंजरभार ॥ जैसा लोटला अग्निपुर ॥ तृणावरी पैं ॥४४॥

रणीं लोटले दक्षवीर ॥ क्रोधें चौताळती फार ॥ मग सांवरोनि आला समोर ॥ चंडीश तो ॥४५॥

सैन्या हांकारोनि चालिला ॥ जैसा सिंहचि पेटला ॥ ह्नणे साहें साहें भला ॥ गदाघायातें ॥४६॥

वाद्यें वाजती गजरीं ॥ चंड उठिला स्वभारीं ॥ दोहीं दळीं झुंझारी ॥ जाहली फार ॥४७॥

सरसावले भारें सबळ ॥ घालिती करकांडीं कोळ ॥ बाणीं लोपलें मंडळ ॥ दिनमणींचे ॥४८॥

कांती आणि त्रिशूळ ॥ लहुडी धोंडी मुसळ ॥ ऐसी जाहली सबळ ॥ दोहीं दळांसी ॥४९॥

काढती माजीच्या कटारा ॥ उभयांच्या कापिती शिरा ॥ ऐसें झुंजणे होत वीरां ॥ झोटधरणीं ॥१५०॥

निर्वाणींचा विचार ॥ पूषा झुंजे महावीर ॥ थोर गांजिला परिवार ॥ चंडीशाचा ॥५१॥

परि आवेशला चंड ॥ जैसा तमावरी मार्तेंड ॥ खांदी घेतला प्रचंड ॥ ताडवृक्ष ॥५२॥

फोडी हस्तीचीं कुंभस्थळें ॥ घायें निघती मुक्ताफळें ॥ जैसीं नक्षत्रे महीतळें ॥ पूजावयासी ॥५३॥

घाई होताती चूर्ण ॥ रथ सारथी वाहन ॥ मग केलें पलायन ॥ वीरीं पूषाचे ॥५४॥

परि पळालियाही सैन्या ॥ पूषा न सांडी अभिमाना ॥ ह्नणे चंडीशा शिवगणा ॥ जासील कैसा ॥५५॥

म्यां जिंकिली वरुणावती ॥ बळें काढिली भागवृत्ती ॥ थोर लाविली ख्याती ॥ वरुणादिकांसी ॥ ॥५६॥

आठी दिशांचे दिग्पाळ ॥ ते म्यां जिंकिले सकळ ॥ मज तूं वाटसी केवळ ॥ मशकरुप ॥५७॥

मग ह्नणे शिवदूत ॥ आपुला धर्म पुरुषार्थ ॥ जो वानी पूर्वजांचा अर्थ ॥ तो महामूर्ख ॥५८॥

तूं निलाजिरा रे कंटका ॥ जैसा नपुंसका थोरवटा ॥ आतां जाणवेल सुभटा ॥ शूरत्व तुझें ॥५९॥

ह्नणोनि मुद्रल हाणिला तोंडे ॥ तो पूषानें केला द्विखंडें ॥ हाणितां मोडले खांडे ॥ तया पूषाचे ॥१६०॥

मग चंडीशें फेंकिलें चक्र ॥ सूतिलें पूषाचें शिर ॥ येरें हाणितलें समोर ॥ येत येता ॥६१॥

मग हातीं घेवोनि धोंडी ॥ पूषा हाणितला चंडी ॥ घायें पाडिली मुरकुंडी ॥ भूमीवरी ॥६२॥

मल्लविद्येचा अभ्यास ॥ आवंतुनि चालिला चंडीश ॥ हां हां ह्नणतां नागपाश ॥ घातला त्यासी ॥६३॥

तेणें लागली जीवकळा ॥ मग पूषा आणिला तळा ॥ हरिख जाहला सकळां ॥ शिवगणांसी ॥६४॥

मग बांधोनि बाहूंसी ॥ उफराटें धरिले परियेसी ॥ मागें होता मोकळे केशीं ॥ पूषा वीर ॥६५॥

तंव जाहला जयजयकार ॥ जीत धरिला पूषा वीर ॥ हरिखें भेटे वीरभद्र ॥ चंडीशातें ॥६६॥

झुंजा जाहली निवारी ॥ गेले आपुले मेळिकारीं ॥ पूषा नेला शिववीरीं ॥ बांधोनियां ॥६७॥

इकडे दत गेले धांवत ॥ दक्षा सांगितली मात ॥ पूषा धरोनि नेला जित ॥ शिववीरींकी ॥६८॥

युद्ध जाहलें दारुण ॥ आह्मां नावरती शिवगण ॥ चंडीश शिववीर दारुण ॥ मारिलें सैन्य सर्वही ॥६९॥

आतां असो हे पुढती ॥ वीरभद्र आणि प्रजापती ॥ युद्ध करितील ती ऐका ख्याती ॥ ह्नणे कृष्णयाज्ञवल्की ॥१७०॥

इति श्रीकथाकल्पतरु ॥ तृतीयस्तबक मनोहरु ॥ चंडीशल्यातीविचारु ॥ दशमोऽध्यायीं सांगीतला ॥१७१॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP