कथाकल्पतरू - स्तबक १ - अध्याय ९

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


॥ श्रीगणेशाय नमः ॥

पुण्यश्लोकाची ऐकतां कथा ॥ पावन करी सकल जगता ॥

उध्दरोनियां श्रोता वक्ता ॥ अढळ पदा पावती ॥१॥

नळा अंगीं पातका विण ॥ न होय कलीचें संचरण ॥

हेंचि जाहलें पूर्वील कथन ॥ आतां पुढें परिसिजे ॥२॥

नैषधा कवणैक नष्टदिनीं ॥ विसर पडला शौचाचमनीं ॥

चरण न करितां क्षाळणीं ॥ पहुडला राव ॥३॥

अवघिया द्वादश वर्षांत ॥ येवढाचि कलंक देखत ॥

ह्मणोनि कलि प्रवेशत ॥ नळशरीरीं ॥४॥

तंव सांडिली धर्म वासना ॥ सेजे नावडे निज अंगना ॥

कीं राज्य सांडोनिया वना ॥ पडूं लागे ॥६॥

संतजनांसि करि रळी ॥ स्वजनासी मांडिला कळी ॥

पूर्वस्वभावाची खोली ॥ गेली सर्व ॥७॥

पापकर्म जोंजों घडत ॥ तोंतों कलि अधिक संचरत ॥

ऐसा व्यापिला समस्त ॥ राजा नळ ॥८॥

त्या नळाचा गोत्रबंधु ॥ पुष्कर नामें भाग्यमंदु ॥

तयासि जाऊनि प्रबोधु ॥ केला कलीनें ॥९॥

पुष्करासि ह्मणे कली ॥ तूं नळासी खेळ सारीफळी ॥

मग जिंकोनियां सकळीं ॥ करी उघडा ॥१०॥

मी रिघेन फांशियांत ॥ तुवां खेळतां न राखीं हात ॥

सर्व जिंकोनिया निभ्रांत ॥ घ्यावें तुवां ॥११॥

तयासि तो पुष्कर ह्मणे ॥ मज जवळी नाहीं नाणें ॥

म्यां तयासवें कैसें खेळणें ॥ तुझिया बोलें ॥१२॥

कलि ह्मणे तरि गा प्रभू ॥ मी होईन तुझा वृषभू ॥

तोचि त्वां करावा आरंभू ॥ प्रथमपणाचा ॥१३॥

ऐसा सांगोनि विचार ॥ कपटरूपें जाहला थोर ॥

मग तयासह आला पुष्कर ॥ राया जवळी ॥१४॥

पुष्कर ह्मणे राया नळा ॥ कालक्रमणा असे द्यूतखेळा ॥

नळ ह्मणे भला रे भला ॥ बोलिलासि जीवींचे ॥१५॥

तापलिया घालिजे वारा ॥ तैसें बोलिलासि रे पुष्करा ॥

परि तुज खेळावया आरा ॥ काय असे ॥१६॥

मग ह्मणे तयासि पुष्कर ॥ हारजिताचा विचार ॥

म्यां वोडविला असे ढोर ॥ तरि ढाळीं फांसे ॥१७॥

मग फांसे ढाळिले पाटीं ॥ तंव पुष्करें कलीचे साटीं ॥

सर्वही जिंकिली सृष्टी ॥ याचिपरि ॥१८॥

नळ पडिला असे हारीं ॥ पण बोले वरचेवरी ॥

मग रागें हारविले चारी ॥ गजतुरंग ॥१९॥

आणि हारविलें द्रव्यभांडार ॥ शस्त्रें वस्त्रें अलंकार ॥

कनकनाणीं राजमंदिर ॥ हरिलीं पुष्करें ॥२०॥

तंव नळातें ह्मणे सुंदर ॥ हें कर्म असेजी अपवित्र ॥

तें नळें मानिलें उत्तर ॥ विष जैसें ॥२१॥

जैसें ज्वरिताचें मुख ॥ तैं साखरेसि ह्मणे विख ॥

कीं विरहिणी लागी तक्षक ॥ मारुत जैसा ॥२२॥

ऐसें ऐकोनि स्त्रीचें उत्तर ॥ तेणें वोडवलें सकलराष्ट्र ॥

परि तेंही जिंकिलें समग्र ॥ पुष्करें तेणें ॥२३॥

मग अपत्यें आणि दमयंती ॥ वोडविता जाहला भूपती ॥

तंव नळासि धरिलें हातीं ॥ प्रधान रायें ॥२४॥

दोघांसि तेथूनि उठविलें ॥ सारी फांसे विध्वंसिले ॥

ऐसें केलें तेव्हां भलें ॥ तेणें प्रधानें ॥२५॥

पुष्करें घेतलें सिंहासन ॥ नगरीं द्वाही फिरविली आपण ॥

दमयंती काढिली दीनवदन ॥ पुत्रांसहित ॥२६॥

मंदिरांतोनि दमयंती ॥ तेव्हां बाहेरी आणिती ॥

अलंकार सर्व घेती ॥ हिरोनियां ॥२७॥

कन्या पुत्रांचे अलंकार ॥ तेही घेतले समग्र ॥

मग जीर्णसें येक वस्त्र ॥ देती नेसावया ॥२८॥

हातीम देवोनि कन्यापुत्र ॥ नळराय काढिला बाहेर ॥

दीधलेंसे येक धोतर ॥ नेसावया ॥२९॥

नळ अपत्यें आणि नारी ॥ घातलीं नगरा बाहेरी ॥

तंव प्रधानें आणिला झडकरी ॥ रथ देखा ॥३०॥

मग तो बृहद्रथ प्रधान ॥ सारथी जाहला आपण ॥

नगरा बाहेरि नेवोन ॥ बोले नळाप्रती ॥३१॥

तुह्मीं येथें राहिजे स्थिर ॥ मी अन्न आणितों शीघ्र ॥

तयासि बोलिला उत्तर ॥ राजानळ ॥३२॥

आह्मां घेणें नाहीं परान्न ॥ तुह्मीं जाऊनि करावें भोजन ॥

ऐसें सांगूनि प्रधान ॥ पाठविला नगरीं ॥३३॥

दमयंती ह्मणे नृपवरा ॥ चला जाऊं माझे माहेरा ॥

भीमक तुमचा सासरा ॥ मानील बरवें ॥३४॥

मग ह्मणे तो राजा नळ ॥ आतांच मज कां खावू काळ ॥

परि प्राप्त जालिया वोखटा वेळ ॥ वर्जावे सोइरे ॥३५॥

कीं जो सासुर्‍यांचेनि जोजे ॥ आणि स्त्रीआधीन होइजे ॥

तो नरकीं निश्चयें पचिजे ॥ सप्तजन्म ॥३६॥

आता तूं एक अवधारीं ॥ जाई आपुल्या माहेरीं ॥

माझी अवदशा गेलियावरी ॥ येईन तेथें ॥३७॥

मग ते बोलिली अबळा ॥ माझा प्राणलिंग गा तूं नळा ॥

कां जळावीण कमळा ॥ उरी कैंची ॥३८॥

माझें सर्वस्वराज्य भूषण ॥ स्वामी तुमचेचि हे चरण ॥

तयांचें मज पांघरूण ॥ सर्वदाही ॥३९॥

जिवलगा तुह्मी प्राणनाथा ॥ कां ऐसे उदास बोलतां ॥

सोडोनि द्यावें चिंताव्रता ॥ रायानळा ॥४०॥

राज्य द्रव्य हारविलें ॥ तें आमुचें कर्म गेलें ॥

परि तुमचेनि संतोषलें ॥ माझें मन ॥४१॥

माझा कायसा आभारू ॥ सहज हा स्त्रियांचा आचारू ॥

स्त्रियेसि आपुला भ्रतारू ॥ तीर्थदैवत ॥४२॥

आपुली द्रव्यलक्ष्मी गेली ॥ ती पीडा तुमची टळली ॥

आतां होवोनि मोकळीं भलीं ॥ हिडों तीर्थें ॥४३॥

प्रियकरा आतां येक अवधारीं ॥ अपत्यें पाठवूं माहेरीं ॥

मग तुह्मी ह्मणाल त्या नगरीं ॥ जाऊं सुखें ॥४४॥

तेथें होता वार्ष्णेय सारथी ॥ अपत्यें दीधलीं त्याचें हाती ॥

ह्मणे न्यावीं गा भीमकाप्रती ॥ सांभाळोनी ॥४५॥

अपत्यें पाठविलीयावरी ॥ नळ राहीला वनांतरीं ॥

परम दुःखें क्रमिली ते रात्री ॥ स्त्रीसहित ॥४६॥

दमयंती ह्मणे नृपवरा ॥ चला जाऊं येकदिया नगरा ॥

मी तेथें मेळवीन आहारा ॥ दैन्यवृत्तीं ॥४७॥

कष्ट करीन नानापरी ॥ दोघां मेळवीन आहारीं ॥

तरी प्राणेश्वरा तेथवरी ॥ चला जाऊं ॥४८॥

जरी जाहलें विमुख जग ॥ तरी सत्वचि धरावें चांग ॥

राया तूं माझें प्राणलिंग ॥ चिंता न करीं ॥४९॥

अन्नविण राजा नळ ॥ होत असे बहु व्याकुळ ॥

परि उदकेंही न भरी चूळ ॥ कूपींचिया तो ॥५०॥

पोटीं तृषेचा कलाल उठिला ॥ ह्मणोनि नदीतीरासि गेला ॥

जळामाजी पाहों लागला ॥ कांहीं भक्ष्य ॥५१॥

रायें क्षुधेचे आवेशें ॥ मारिलें उदकींचे दोन मासे ॥

पक्व करावया देत असे ॥ दमयंती जवळी ॥५२॥

येरी भाजोनि पक्व करी ॥ मग घेवोनि गेली नदीतीरीं ॥

करें क्षालितां झडकरी ॥ सजीव झाले ॥५३॥

ते जळामाजी गेले पळोन ॥ सती ह्मणतसे दीनवदन ॥

आतां पतिक्षुधा कैसेन ॥ शांत करूं ॥५४॥

तयेचे करीं अमृत वसे ॥ तेणें सजीव जाहले मासे ॥

मग मागें परतोनि येतसे ॥ चिंताक्रांत ॥५५॥

तयेसि ह्मणे नृपवर ॥ मज आणिपां मत्स्यआहार ॥

तंव ते न बोले उत्तर ॥ पाहे खालतें ॥५६॥

परमदुःखें ह्मणे दमयंती ॥ स्वामी मत्स्य जाळोनि निगुती ॥

प्रक्षाळितां नदीप्रती ॥ मत्स्य पळाले ॥५७॥

नळ विचारी निजमनीं ॥ लटकीं स्त्रियांची बोलणीं ॥

भाजले मत्स्य मागुते जीवनीं ॥ कैसे गेले ॥५८॥

परमाल्हादें ह्मणे नृपवर ॥ क्षुधे पुढें कैंचा भ्रतार ॥

निश्चयें मजवांचोनि आहार ॥ केला इणें ॥५९॥

तैं अमृतकराची स्थिती ॥ सांगूं विसरली दमयंती ॥

कलीनें घातली असे भ्रांती ॥ सतीलागीं ॥६०॥

मागुती बोले राजा नळ ॥ कांहीं न पाहतां काळवेळ ॥

मजवांचूनि तुवां सकळ ॥ भक्षिले मत्स्य ॥६१॥

मग ते सती दमयंती ॥ शाप बोलिली मत्स्यांप्रती ॥

कीं सर्प भक्षोत रे दुर्मती ॥ मत्स्य हो तुम्हां ॥६२॥

हें नाहीं न ह्मणावें चतुरीं ॥ कथा असे हे ग्रंथांतरीं ॥

असो तो कलि तोडितसे मैत्री ॥ दोघांजणांची ॥६३॥

मग तों क्षुधेनें राजा नळ ॥ परम होतसे व्याकुळ ॥

ह्मणोनि घेतले धांडोळ ॥ वनामाजीं ॥६४॥

तंव जो कलि कपटवेषें ॥ पक्षी होवोनि आला असे ॥

त्यांतें देखिलें डोळसें ॥ नळरायें ॥६५॥

त्या पक्षियां नाम शकुनी ॥ कनकवर्ण असती दोनी ॥

ते धरावया लागोनी ॥ गेला नळ ॥६६॥

तळवटीं घालूं पाहे करू ॥ तंव ते चरती हळुहळु ॥

मग वस्त्र सोडोनि दिगंबरू ॥ जाहला नळ ॥६७॥

देखोनिया अल्प अंतर ॥ त्यांवरी टाकिलें धोतर ॥

तें घेवोनियां पक्षी सत्वर ॥ गेले दोनी ॥६८॥

पक्षिरूपें बोलतसे कळी ॥ मज सांपडली तुझी फळी ॥

ऐसें ह्मणोनि अंतराळीं ॥ नेलें वस्त्र ॥६९॥

नळ समजला मानसीं ॥ जेणें मज जिंकिलें सारिफाशीं ॥

तेणेंचि आतां पक्षिवेषीं ॥ नेलें वस्त्र ॥७०॥

मग दुःखें पडिला धरणीं ॥ ह्मणे मज कोपला शूळपाणी ॥

आतां हें मुख कामिनी ॥ केंवि दावूं ॥७१॥

ललाट पिटी करतळीं ॥ ह्मणे कर्मा तूं महाबळी ॥

बापरे नग्न असतां स्त्रीजवळी ॥ केंविं जावें ॥७२॥

ह्मणोनि तेथेंचि राहिला ॥ अधोवदनें असे बैसला ॥

यावया उशीर कां लागला ॥ ह्मणे दमयंती ॥७३॥

कां पां नयेचि नृपवरू ॥ मग आली शोध करूं ॥

तंव देखिला दिगंबरू ॥ नळराव ॥७४॥

लावोनि मागें पुढें हात ॥ दमयंतीजवळी सांगे वृत्तांत ॥

ह्मणे आतां करणें अपघात ॥ मजलागीं ॥७५॥

येवढें हिंडतां हें वन ॥ परि कोणीच नेदी दर्शन ॥

जैसें प्रेतासि स्पर्शन ॥ नकरी कोणी ॥७६॥

आतां तूं सांडीं माझी आशा ॥ मज पावली हे अवदशा ॥

प्रिये तूं जाई पितृदेशा ॥ दक्षिणमार्गें ॥७७॥

मार्ग दाविला करकमळें ॥ तंव तिनें नेत्रीं उदक आणिलें ॥

ह्मणे हें वचन तरी न बोलें ॥ प्राणनाथा ॥७८॥

तूं ईश्वर मी शालिका ॥ केंवी होयगा वेगळिका ॥

तूं सर्वभावें माझा देखा ॥ प्राणनाथा ॥७९॥

आतां माझें हें शरीर ॥ तुज वोंवाळीन निर्धार ॥

प्राण त्यागीन सत्वर ॥ तुझिये चरणीं ॥८०॥

प्राक्तनप्रसंगाचे मेळीं ॥ परि तूं उदक मी मासोळी ॥

राजसा न करीं आपणावेगळी ॥ मजलागीं ॥८१॥

तूं न करीं काहीं चिंता ॥ राज्यलक्ष्मीचिया अर्था ॥

प्राणनाथा राज्य सर्वथा ॥ नलगे आह्मां ॥८२॥

राज्य तुह्मीं हारविलें ॥ तें ईश्वरें बरवेंचि केलें ॥

आह्मासि त्यांतूनि सोडविलें ॥ मोक्षमार्गार्थ ॥८३॥

आतां तुह्मी राज्यचिंता ॥ करूं नये प्राणनाथा ॥

यावरी तीर्थयात्रा आतां ॥ करूं दोघें ॥८४॥

एका पावन पुण्यतीर्थीं ॥ दोघें पवित्रपणें करूं वस्ती ॥

तेणें पुढें उध्दारगती ॥ होय आह्मां ॥८५॥

तेथें मी कष्ट करीन ॥ उदरालागीम मेळवीन ॥

तुह्मा बैसलें ठेवीन ॥ प्राणनाथा ॥८६॥

चला जाऊं एके नगरीं ॥ तेथें मी होईन ह्मणियारी ॥

दुष्टकाळ ऐसियापरी ॥ कंठूं नळा ॥८७॥

आह्मीं दोघें असतां सवें ॥ सीत तें कायसें बाधावें ॥

परि मज दूरी न करावें ॥ सर्वकाळीं ॥८८॥

तुह्मांसि सांडोनियां दूरी ॥ मी न वांचें क्षणभरी ॥

घाव पडिला अंगावरी ॥ साहों लागे ॥८९॥

मी असेन तुह्मां जवळी ॥ सेवा करीन त्रिकाळीं ॥

मज न करीं वेगळी ॥ प्राणप्रिया ॥९०॥

माघारी न जाईं कदाकाळीं ॥ सेवा करीन त्रिकाळीं ॥

आतां जे येक आहे ते फळी ॥ नेसों दोघें ॥९१॥

मग तियेनें आपुलें वस्त्र ॥ अर्ध फाडिलें असे शीघ्र ॥

नेसावया दीधलें धोतर ॥ नळाप्रती ॥९२॥

तयेसि देवोनि आलिंगन ॥ नळ बोले दुःखें करून ॥

प्रिये तूं माझें जीवन ॥ सत्य अससी ॥९३॥

ऐसें ह्मणोनि उठाउठी ॥ पल्लव वेढिला कटितटीं ॥

तंव देखिली पर्णकुटी ॥ तेथें येक ॥९४॥

फळ मूळ न मिळतां वनीं ॥ तेथें आलीं सातव्या लंघनीं ॥

तृण घालोनियां धरणीं ॥ केलें शयन ॥९५॥

अनुतापें साडोनि जाईल रागें ॥ ह्मणोनि एकवस्त्र नेसलीं दोघें ॥

तंव निद्रा लागली सवेगें ॥ दमयंतीसी ॥९६॥

मग नळ मनीं विचारी ॥ सांडोनि जावें ही सुंदरी ॥

इची मज मायादोरी ॥ झाली आहे ॥९७॥

ह्मणे मी हा मायादोर ॥ तोडीन आतां निर्धार ॥

ऐसा करूनियां विचार ॥ उठता जाहला ॥९८॥

परि येक वस्त्र आहे दोघांसी ॥ तें फाडितां पावेल चैतन्यासी ॥

ऐसा विचार निजमानसीं ॥ करी नळ ॥९९॥

जंव तो ऐसी चिंता करी ॥ तंव कलीनें टाकिली सुरी ॥

मग वस्त्र कापोनि सत्वरीं ॥ नळ गेला ॥१००॥

गेला पाउलें दोन चारी ॥ परि मग पडिलासे विचारीं ॥

ह्मणे एकलीं वनीं सुंदरी ॥ सांडूं कैसी ॥१॥

हे स्वरूपसुंदर कमळिणी ॥ केवीं सांडावी घोरवनीं ॥

ऐसा विचार करोनि मनीं ॥ फिरला मागें ॥२॥

येवोनियां तो मागुता ॥ दमयंतीसि होय पाहता ॥

ह्मणे हे सौंदर्यसुगुणसरिता ॥ सांडूं कैसी ॥३॥

कटकटा केलें जगन्नाथा ॥ जियेसि न देखे सविता ॥

ते अन्हवाणी हिंडतां ॥ श्रमली कींहो ॥४॥

जयेची ऐकोनि रूपकीर्ती ॥ सैंवरा आले दिक्पती ॥

तेचि हे आतां दमयंती ॥ भूमीसि रुळे ॥५॥

जे सदैव सुमनसेजेवरी ॥ ते येथें निजेली तृणावरी ॥

ऐसें ह्मणोनि दुःख करी ॥ नळ राव ॥६॥

जे नित्य बैसे सुखासनीं ॥ न चाले कदा आंगणीं ॥

ते म्यां निर्जन वनोवनीं ॥ हिंडविली कीं ॥७॥

अन्नसत्रीं जिचे हातीं ॥ सहस्त्रावधी द्विज जेविती ॥

ते आतां उपवासी दमयंती ॥ सप्तदिन ॥८॥

राव हृदयीं दुःखें तळमळी ॥ तयासि न सोडवे वेल्हाळी ॥

तंव कलि संचरला हृदयकमळीं ॥ रायानळाचे ॥९॥

ऐसिया वनीं संकटसमयीं ॥ कलि प्रविष्टला होता हृदयीं ॥

ह्मणोनि माया तुटली पाहीं ॥ तत्काळ त्याची ॥११०॥

तंव जाहला प्रातःकाळ ॥ थोरशब्दें रुदला नळ ॥

मग परमदुःखे उतावेळ ॥ तेथोनि निघे ॥११॥

जैसा प्राण सांडी शरीर ॥ कीं मीन त्यागी सरितानीर ॥

तैसा टाकोनि नृपवर ॥ जाता जाहला ॥१२॥

रायें तेव्हां आपुलें मन ॥ केलें वज्राहूनि कठिण ॥

टाकोनियां कामिनीरत्न ॥ गेला मग ॥१३॥

तंव उदय जाहला दिनकरा ॥ मग जागृत होवोनि सुंदरा ॥

पाहों लागली भ्रतारा ॥ तंव तो न दिसे ॥१४॥

ह्मणोनि आपुलें पाहे वस्त्र ॥ तंव तें कापिलें असे साचार ॥

मग भूमीवरी टाकोनि शरीर ॥ विलाप करी ॥१५॥

दुःखें उठली मागुती ॥ वनामाजी होय पाहती ॥

नळा ह्मणोनि बोभाइती ॥ होय देखा ॥१६॥

परि न सांपडे तयेसि नळ ॥ कानीं कांहीं नपडे सांचळ ॥

सैरा वैरा हिंडे चंचळ ॥ वनामाजी ॥१७॥

मग ह्मणे कटकटा ॥ बापरे कर्मा विकटा ॥

तुवां तिघांसि तीन वाटा ॥ साच केल्या ॥१८॥

ललाट हाणी करकमळीं ॥ मूर्छित पंडे भूमंडळीं ॥

मत्स्य जैसा तळमळी ॥ जीवनाविण ॥१९॥

ऐसियापरी बोभाइतां ॥ सभोंवती धांवतां धांवतां ॥

भूमीवरी मूर्छित पडतां ॥ दूरी गेली ॥१२०॥

मागुती वन धुंडाळित ॥ पाहतसे आपुला नाथ ॥

यापरी श्रमली बहुत ॥ दमयंती ते ॥२१॥

तयेसि दुःखाचेनि भरें ॥ निद्रा आली अतिनिकरें ॥

तंव गिळियेली अजगरें ॥ महासर्पें ॥२२॥

बोभाइली शब्दें थोरें ॥ नळा गिळिलें रें अजगरें ॥

तीं ऐकिलीं उत्तरें ॥ पारधियें एकें ॥२३॥

तिचा ऐकोनि आर्तस्वर ॥ पारधी धांवोनि आला सत्वर ॥

तंव ते पायांकडे सुंदर ॥ गिळीली सर्पें ॥२४॥

तत्काळ त्या पारधियें ॥ सर्प मारिला शस्त्रघायें ॥

मग बाहेर काढिता होय ॥ दमयंतीसी ॥२५॥

वधोनियां त्या अजगरा ॥ उदकें धुतली सुंदरा ॥

गेलिया अंगींची लहरा ॥ जाहली सावध ॥२६॥

तयेसि पुसे पारधी ॥ तुं कोणाची करितेस शुध्दी ॥

येकलीच या वनामधीं ॥ हिंडसी कां ॥२७॥

येरी ह्मणे राजा नळ ॥ नैषधदेशींचा भूपाळ ॥

त्याचा घेतसें धांडोळ ॥ वनामाजी ॥२८॥

येरू ह्मणे कैंचा नळ ॥ तुझा मी करीन प्रतिपाळ ॥

आतां सुखें क्रीडाखेळ ॥ करीं वनीं ॥२९॥

दमयंती ह्मणे गा ताता ॥ तूं तरी माझा प्राणदाता ॥

मी असें तुझी दुहिता । उपकारिया ॥१३०॥

जो कां बाळपणीं वाढवी ॥ आणि संकटावसरीं सोडवी ॥

तोचि पिता होय स्वभावीं ॥ शास्त्र ह्मणे ॥३१॥

नळावांचोनि मी मान्या ॥ समस्तांची असें कन्या ॥

ऐसा नेम जाणोनि धन्या ॥ करीं कृपा ॥३२॥

परि तो न मानी उत्तर ॥ कामबुध्दीनें धरिला पदर ॥

बळेंचि घालों पाहे शर ॥ तयेवरी ॥३३॥

हें जाणोनि दमयंती ॥ तयासि जाहली शापिती ॥

मग बोले पतिव्रता सती ॥ उत्तर काय ॥३४॥

करोनि सूर्यावलोकन ॥ आणि आरक्त केले नयन ॥

तुझें होवोचिरेदहन ॥ पापरूपा ॥३५॥

ऐसी दमयंती शापित ॥ तंव तो जाहला भस्मभूत ॥

येरी मग निघाली त्वरित ॥ तेथोनियां ॥३६॥

नळाची शुध्दी करीत ॥ व्याघ्र श्वापदादिकां पुसत ॥

चालली वनामाजी हिंडत ॥ दमयंती ते ॥३७॥

तंव पावली नदीतीरा ॥ तेथें देखिलें ऋषेश्वरां ॥

ते ह्मणती तूं सुंदरा ॥ कवणाची गे ॥३८॥

भृगु वसिष्ठादि पवित्र ॥ तियेसि पुसती ऋषेश्वर ॥

ह्मणती कोण येथें तूं सुंदर ॥ तापसवनीं ॥३९॥

मग तयेनें सर्व कथा ॥ आपुली सांगितली सर्वथा ॥

ह्मणे स्वामी मज भेटेल भर्ता ॥ तें सांगाजी ॥१४०॥

दमयंतीसि ह्मणती ऋषी ॥ त्वा चिंता न करावी मानसीं ॥

भेटी होईल नळासी ॥ तुझी माते ॥४१॥

त्यांहीं दीधलीं कंदमुळें ॥ तें जाहलें पारणें अबळे ॥

पांघुरावयासही तेवेळे ॥ दीधलें वस्त्र ॥४२॥

मग तयेसि ऋषि ह्मणती ॥ बाई ऐक आमुची युक्ती ॥

तूं आतां जाईं मायेप्रती ॥ येथोनियां ॥४३॥

नळासि आली अवदशा ॥ तरि तुज न भेटे तो सहसा ॥

त्याची गेलिया अवदशा ॥ होईल भेटी ॥४४॥

तूं वो स्वरूपवंत नारी ॥ नको हिंडूं वनांतरी ॥

नाश होईल क्षणाभीतरीं ॥ जीवित्वाचा ॥४५॥

कीं पतिवांचोनि सर्वथा ॥ स्त्री हिंडतां निराश्रिता ॥

ते नाश पावे निभ्रांता ॥ सत्य जाण ॥४६॥

ऐक आमुचे विचारा ॥ जाईं आपुले माहेरा ॥

पैल मार्ग जातो निर्धारा ॥ वैदर्भासी ॥४७॥

आतां तूं येथोनि जाईं शीघ्र ॥ मार्ग दावितों पैं सत्वर ॥

ऐकोनि ते निघाली सुंदर ॥ तेथोनियां ॥४८॥

मार्गीं जातां तयेसी अवधारा ॥ भेटला सार्थक वणजारा ॥

उतरला वाटेवरी बिढारा ॥ देवोनियां ॥४९॥

तंव तेथें जाहली रात्री ॥ येरी राहिली त्याचे शेजारीं ॥

वाणियें देखिली सुंदरी ॥ दमयंती ते ॥१५०॥

परस्परें ह्मणती बिढारी ॥ येवढी स्वरूपें ही नारी ॥

तरी असेल निर्धारीं ॥ लांव हीच ॥५१॥

ऐसें हें स्वरूप धरोनि ॥ लांव हिंडे नित्य वनीं ॥

कपटें मार्गस्थांसि भक्षोनि ॥ जाते मग ॥५२॥

आतां आह्मांसि निद्रा पडेल ॥ तेव्हांच हे सर्वांस भक्षील ॥

इचा विश्वास मानाल ॥ तरि मरणें ॥५३॥

ऐसा विचार करोनी ॥ तिहीं दवडिली तेथुनी ॥

मग ते दुमातळीं जावोनी ॥ राहिली येरी ॥५४॥

दमयंती आश्रया वेगळी ॥ निशीं राहिली वृक्षातळीं ॥

दुःखें निद्रा करी बाळी ॥ श्रमभारेंसीं ॥५५॥

तंव रात्रीचिये समयीं तेथें ॥ हस्ती पातले जलपानातें ॥

तिहीं मारिलें वाणियांतें शंडाघातीं ॥५६॥

जाणोनि पतिव्रता सती ॥ कीं कैवारा आले हस्ती ॥

स्वाश्रयापासूनि केली परती ॥ ह्मणोनियांच ॥५७॥

मग तेथोनियां प्रातःकाळीं ॥ निघे दमयंती वेल्हाळी ॥

हिंडतां पावली तयेवेळीं ॥ चैद्यदेशा ॥५८॥

तया चैद्यदेशाभीतरीं ॥ नगरा नाम राजपुरी ॥

तेथें आलीसे सुंदरी ॥ परमदुःखें ॥५९॥

तेथें वीरबाहू नृपवर ॥ राज्य करी निरंतर ॥

त्याची राजमाता सुंदर ॥ राणी जाण ॥१६०॥

ते दमयंतीची माउसी ॥ परि वोळखीं नाहीं तयेसी ॥

बहुत दिन नाहीं परियेसीं ॥ भेटी तयां ॥६१॥

राजमाता रायाची राणी ॥ असे उपरी आरुढोनि ॥

स्वानंदे पाहातसे नयनीं ॥ चहुंकडे ॥६२॥

तंव दमयंती सुंदरी ॥ आली नगरा भींतरीं ॥

तयेसि देखिली नेत्रीं ॥ राणियेनें ॥६३॥

अति सुंदर आणि येकली ॥ राणीनें येतां देखिली ॥

मग दासीस पाठविली ॥ तयेजवळी ॥६४॥

तयेनें बोलावितां मंदिरा ॥ दमयंती आली सुंदरा ॥

येवोनि भेटली निर्धारा ॥ राणियेसी ॥६५॥

राजमाता ह्मणे तूं कोण ॥ येरी ह्मणे मी परदेशिण ॥

आपुले पतिशुध्दी लागुन ॥ हिंडत असे ॥६६॥

माते माझा प्राणपती ॥ सांडोनि गेला वनाप्रती ॥

तयालागीं मी आहें हिंडती ॥ देशोदेशीं ॥६७॥

तंव तियेसि राणी ह्मणत ॥ बाई तूं ऐसी रूपवंत ॥

पतिविणें येकली हिंडत ॥ परमदुःखें ॥६८॥

तूं हो सुकुमारी राजसी ॥ कीं तारुण्यें अससी सुरसी ॥

तरि हिंडतां निश्चय पावसी ॥ नाश देखा ॥६९॥

तूं स्वरूपें सुंदर नारी ॥ नाश पावसील निर्धारीं ॥

ह्मणोनि राहें आमुचे घरीं ॥ सुखें आतां ॥१७०॥

तुझा जंव पति येई तव ॥ तूं सचिंत न करीं जीव ॥

तुजसी कन्या सर्वथैव ॥ मानिली म्यां ॥७१॥

तुज कन्येचिये ठायीं ॥ म्यां मानिली असे बाई ॥

तरि आतां निश्चिंत राहीं ॥ घरा आमुच्या ॥७२॥

मग तियेसि ह्मणे दमयंती ॥ मी उच्छिष्ट न भक्षीं कल्पांतीं ॥

आणि परपुरुष येकांतीं ॥ न राहें कदां ॥७३॥

न करीं कोणाचें चरणक्षाळण ॥ आणि मार्जन किंवा मर्दन ॥

तुजसी श्रृंगार देईन ॥ इतुकेंचि करणें ॥७४॥

ऐसें ती दमयंती बोले ॥ तें राणियें सर्व मानिलें ॥

मग प्रीतीस्तव राहविलें ॥ सुनंदेनें ॥७५॥

सुनंदेचे संगतीं निर्धारीं ॥ वीरबाहूचे मंदिरीं ॥

राहिली दमयंती सुंदरीं ॥ पतिविरहें ॥७६॥

आतां इकडे नळाची कथा ॥ वर लाधला असे अवचिता ॥

तें ऐकावें सकल श्रोतां ॥ ह्मणे कृष्णयाज्ञवल्की ॥७७॥

इति श्रीकथाकल्पतरू ॥ प्रथम स्तबक मनोहरू ॥

नलदमयंतीवियोगविस्तारू ॥ नवमोध्यायीं कथियेला ॥१७८॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP