मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|
एकादशीनियम

धर्मसिंधु - एकादशीनियम

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


एकादशीला पाखंडी लोकांशी संभाषण, स्पर्श किंवा दर्शन ही वर्ज्य करावीत; ब्रह्मचर्य राखून सत्य भाषण करावे दिवसा झोप घेऊ नये; वगैरे जे नियम, ते व्रतांच्या परिभाषेत सांगितले आहेत. एकादशीला पाखंडी, चांडाळ, विटाळशी वगैरेचे दर्शन झाले असता, सूर्यदर्शन घ्यावे म्हणजे शुद्धत्व येते. अशांचा स्पर्श झाला असता शहाण्याने स्नान करावे व नंतर सूर्यदर्शन घ्यावे म्हणजे तो शुद्ध होतो. अशांशी भाषण घडले तर अच्युताचे म्हणजे सूर्याचे चिंतन करावे. याप्रमाणे वरील गोष्टीबद्दल प्रायश्चित्त आहे. उपासाच्या दिवशी जर श्राद्धतिथि असेल तर श्राद्ध करून, उरलेले सर्व अन्न एका ताटात वाढून, त्या सर्व अन्नाचा वास घ्यावा (अवघ्राण) आणि ते सर्व अन्न गाईसारख्या जनावरास खाऊ घालावे. कंद, यूळ, फळ वगैरे वस्तु खाऊन उपास करणार्‍याने, स्वतः जी फळे वगैरे खावयाची ती, पितरांच्या जागी योजिलेल्या ब्राह्मणांच्या पानांवर वाढून, त्यातून शिल्लक राहिलेली खावीत. 'हे राजा, एकादशीला जर श्राद्धतिथि येईल, तर तो दिवस टाकून, द्वादशीला श्राद्ध करावे' वगैरे वचने वैष्णवांनी परंपरेच्या आचारानुसार पाळावीत. वैष्णवांना जर सोळा महालये करणे असेल, तर ती

एकादश्यधिकरणकं द्वादश्यधिकरणकंच महालयं तंत्रेण करिष्ये'

असा संकल्प करून द्वादशीला दोन महालये करावीत. काम्य उपासाच्या दिवशी सुतक आले असता शरीर संबंधाचे नियम स्वतः पाळून, सुतक संपल्यानंतर पूजा, दान, ब्राह्मणभोजन वगैरे योग्य कर्मे करावीत. नित्य अशा उपासाच्यादिवशी जर सूतक आले, तर स्नान करून हरीला नमस्कार करावा आणि निराहारादि नियम स्वतः करून, पूजा वगैरे ब्राह्मणांकडून करवावीत. दानादिक करू नयेत. सुतक संपल्यानंतर ते काही एक करण्याची आवश्यकता नाही. विटाळशीपणा वगैरे दोष असता याचप्रमाणे करावे. द्वादशीला सकाळी नेहमीप्रमाणे पूजा करून, भगवंताला व्रताचे अर्पण करावे.

'अज्ञान तिमिरान्धस्य व्रतेनानेन केशव । प्रसीद सुमुखोनाथ ज्ञानदृष्टिप्रदो भव'

हा त्या व्रतार्पणाचा मंत्र होय. दशमी वगैरे दिवशी सांगितलेल्या व्रताचा जर भंग होईल, म्हणजे त्या दिवशी जर दिवसा झोप घेणे होईल, पुष्कळदा पाणि पिणे घडेल अथवा खोटे बोलणे घडेल, तर त्याच्या नियमभंगासाठी प्रत्येकाबद्दल नारायणाच्या अष्टाक्षर मंत्राचा १० वेळा जप करावा. दोष लहानसा घडला असेल तर २० वेळा तो जप करावा. व्रतामध्ये जर विटाळशी, चांडाळ, परीट, बाळंतीण वगैरेंचा शब्द ऐकू आला तर १००८ गायत्रीजप करावा आणि मग नैवेद्य आणि तुळशीची पाने यांनी मिश्र केलेल्या अन्नाचे पारणे करावे. पारण्यात जर आवळा खाल्ला तर ज्याच्याशी भाषण केले असता दोष लागतो, तो दोष नाहीसा होतो. द्वादशी मोडली असता महादोष आहे; म्हणून द्वादशीलाच पारणे करावे. द्वादशी जर थोडी असेल, तर शिल्लक असलेल्या रात्रीत मध्यापर्यंतच्या सर्व क्रिया कराव्या. याला अपकर्ष म्हणतात कोणी असे म्हणतात की, अग्निहोत्र, होम वगैरेंचा अपकर्ष करू नये. (अपकर्ष म्हणजे मुळीच न करणे). याप्रमाणेच श्राद्धाचाही अपकर्ष नाही; कारण, रात्री श्राद्ध करण्याचा निषेध सांगितला आहे. मोठे संकट, श्राद्ध व प्रदोषादिव्रत असताना तीर्थ जल घेऊन पारणे करावे. द्वादशी जर बराच वेळ असेल, तर द्वादशीचा हरिवासर नावाचा पहिला पाद टाकून मग पारणे करावे. द्वादशी जर एक कलाही नसेल, तर त्रयोदशीला पारणे करावे. द्वादशी जर मध्याह्नानंतर असेल, तर सकाळी तीन मुहूर्तपर्यंतच पारणे करावे; ते माध्याह्नी वगैरे करू नये, असेच बहुतेकांचे मत आहे. निरनिराळ्या कर्माचे काल निरनिराळे आहेत. या नियमाला बाध येऊ नये म्हणून, पारणे अपराह्णीच करावे असेही कोणी म्हणतात. सर्व महिन्यात जर शुद्ध व वद्य या दोन्ही पक्षांतील द्वादश्यांना श्रवणनक्षत्राचा योग येईल, तर ज्याच्या अंगी सामर्थ्य असेल त्याने एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दिवशी उपास करावा. अशक्ताने एकादशीला फराळाचा गौणपक्ष धरून, श्रवणनक्षत्राच्या द्वादशीला उपास करावा. जर विष्णुशृंखल योग असेल, तर एकादशीच्याच दिवशी श्रवणद्वादशीचा उपास करून, श्रवणरहित अशा द्वादशीस पारणे करावे. द्वादशी जर श्रवणनक्षत्रापेक्षा कमी असेल, तर प्रणवयुक्त द्वादशीला देखील पारणे करावे; कारण द्वादशीचे उल्लंघन केले तर दोषे सांगितला आहे. विष्णु-शृंखल योगादिकांचा निर्णय, भाद्रपद महिन्यातल्या श्रवण द्वादशीच्या प्रकरणात सांगण्यात येईल. दिवसा झोप घेणे, परान्नभक्षण करणे, एकाहून अधिकवेळ जेवणे, स्त्रीसंग करणे, मध चाटणे, काश्याच्या भांड्यात जेवणे व तेलाचा उपयोग करणे, या आठ गोष्टी द्वादशीला वर्ज्य कराव्यात. द्यूत, संताप, हरभरे, कोद्रू, उडीद, तेल, मीठ, मसूर, काजळ, खोटे बोलने, लोभ श्रम, प्रवास, ओझे वाहणे, विद्या शिकणे, विडा खाणे वगैरे गोष्टी वर्ज्य कराव्यात. हे नियम काम्यव्रतांत तर अवश्य पाळावेत. नित्य व्रतांतही सशक्ताने हे नियम पाळावेत. कठीण नियम पाळण्यास जर अंगी शक्ति नसली तर त्याने अहोरात्र भोजन वर्ज्य करून, इंद्रियनिग्रह करावा आणि श्रद्धेने विष्णूचे ध्यान करून, एकादशीचा उपास करावा, म्हणजे त्याचे पाप नाहीसे होते यांत संशय नाही. एकादशीला जो कोणी दुसर्‍यास जेव म्हणून सांगून स्वतः जेवतो तो नरकाला जातो. एकादशीव्रत केल्याने विष्णूची सायुज्यमुक्ति व संपत्ति, ही प्राप्त होतात. याप्रमाणे एकादशीव्रताचा निर्णय झाला. इतर कार्यात, द्वादशीयुक्त अशी जी एकादशी असेल, ती घ्यावी. येथे याप्रमाणे सतरावा उद्देश संपूर्ण झाला.

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP