मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|
श्रीगुरुचरित्र पारायण-पद्धती

श्रीगुरुचरित्र पारायण-पद्धती

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे.

Shri Gurucharitra is the most influential book written in Marathi.


श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.

"अंतःकरण असता पवित्र । सदाकाळ वाचावे गुरुचरित्र ।"

अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.

१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.

२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.

३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.

४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.

५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)

६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.

७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.

८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.

९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP