बारांनी बारा वरसा आली

सकू ग तुझ्या लगीनाशी

आई मला कंदी पोचवशी

लेकी तुला सासर्‍या पोचवीन

लेकी तुला साडी नेसवीन

मग तुला सासर्‍या पोचवीन

सकू अंगोळीला गेली

हातीचा तांब्या पडला धरणीवरी

आई मला अपशकून झाला

अपसकून न्हव लेकी, सकून झाला

सकूबा पाताळ नेसू गेली

हातीच्या निर्‍या पडल्या धरणीवरी

आई मला अपसकून झाला

अपसकून न्हव लेकी सकून झाला

सकूबा अंगामधी चोळी चढविती

हातीची चोळी पडली धरणीवरी

सकूबा कुंकू लावाया गेली

हातीचा करंडा पडला धरणीवरी

सकुबा जोडवी लेईयेती

हातीची जोडवी पडली धरणीवरी

सकूबा मंगळसूत्र लेती

हातीच मंगळसूत्र पडल धरणीवरी

तितून सकू सडाकली गेली बा पहिल्या वना

अरे अरे हाथीराख्या दादा तुझे हाथी कोण्या नगरीचे

सकू ग तुझ्या सासरीचे

आमची माणस कशी रे हायती !

सखे सकू सुखी ग हायीती

गोविंदा दुःखी ग हाय

तितून सकू सडाकली

गेलीब दुसर्‍या वना

भेटला ग गाई खिल्लार

अरे अरे गायीराखया दादा

तुझ्या गायी कोण्या नगरीच्या

सकुबा तुझ्या ग सासरीच्या

आमची माणस कशी रे हायत ?

सखे सकू सुखी ग हायती

गोविंदा दुःखी ग हाये

तिथून सकू सडाकली

गेली तिसर्‍या वना

भेटला ग महेशी खिल्लार

अरेरे आमचा गोविंदा दुःखी हाय

तिथून सकू सडाकली

गेली बा चवथी या वना

भेटला बैल

अरेरे आमचा गोविंदा दुःखी हाय

तिथून सकू सडाकली

गेली बा पाचव्या वना

भेटला मेंढ

अरेरे आमचा गोविंदा दुःखी हाय

तिथून सकू गेली बा साहव्या बना

भेटला गाढव

अरेरे आमचा गोविंदा दुःखी हाय

तिथून सकू गेली बा सातवीया वना

भेटली कोंबडी

अरेरे आमचा गोविंदा दुःखी हाय

तिथून सकू सडाकली

गेली बा आपल्या घरी

आवो आवो सासरे बाबा

तुम्हाला मी नमस्कार करते

नको ग करू नमस्कार

सोन गेल हाक नी (हरवून गेली)

नाही मला सोन्याची गोडी

सासूच्या पाया पडू गेली

सासूला बोलती झाली

तुम्हाला मी नमस्कार करते

नको ग करु नमस्कार

सोन गेल नायी मला गोडी

नंदेच्या पाया पडू गेली

मग सकू घरामंदी गेली

माळ्याला लावली शिडी

शिडी बा पडून गेली

सकुजी रडू लागली

मग गेली वडाच्या पारी

अरे रे वडा तू माजा दादा

सोड रे सोड पारणा (पारंब्या)

पारणा सोडूनी रे आत मला घेशी

पारण्यान सकू गेली सरगासी

मारीली दरवाज्यावर हाक

आवोवो सरगीच्या देवा

दरवाजा उघडून आत मला घेवा

दरवाजा उघडून काय तुझ म्हणण

माझे नी भरतार आहेत तुम्हापाशी

तुझ्या ग भरताराला काय ग खूण

डोकीत पगडी गळ्यात गोफ

आपुला भरतार ओळखून नेशी

धरीला भरताराचा हात

आली सरगातून बाहीर

सरगाच्या वाटेवर चेपीला शीरा

सासरच्या वाटेवर पेरीला जीरा

आली वडाच्या पाशी

वडा तू सोड पारणा

मी जाते आपल्या गावी

मी जाते आपुल्या घरी

भरतारासंग सकू घरी आली

आवो सासरे बाबा

तुम्हाला मी नमस्कार करते

जोडयानी नमस्कार करते

पान पक्वान्न केला स्वयपाक

पाची परकारचे लाडू वाढीले पंगतीला

दोघ बसा दुहीकड

मंदी बसले पुतर

सकू वाढीती जेवाया

सर्वांना करी नमस्कार

भरतार आनले सरगातून

N/A

References : N/A
Last Updated : January 11, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP