मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड|

स्वर अंतरंगाचे - निवडणूक

काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे
कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड


निवडणूकीमध्ये बरच काही घडतं
जे घडत त्यातील काही पदराआड दडतं
निवडणुकीच्या मोसमी सुगीत
कोणी खातं कोणी उपाशी राहतं ॥१॥

या घटिकाचे कुणा ना समजे कोडे
बुध्दीवाद्यापुढे सामान्याचे साकडे
लोकशाही प्रवासाचे कर्म रांगडे
चालले सनातनी अंधाराकडे ॥२॥

मलीन स्वार्थाची चंगळ होते
सत्यजनमत चिखलात लोळते
इथे नेतेगणाचे संधीसाधू सेवाकर्ते
चाहुल लागताच प्रफुल्लीत होते ॥३॥

वाट पहाती खळ्यावरील भिकण्याची
बगळा पाहतो जसा माशाची
फारकत येथे पोटा ओठाची
तशी भाषणबाजी सर्व पक्षाची ॥४॥

कुठले ध्येय कुठले धोरण
अनिष्ठापुढे इष्टाचे मरण
या यात्रेचे आहे सर्वा स्मरण
कुठे पेढे कुठे अश्रूचे नयन ॥५॥

कोणा हाती निशाण विधायकतेचे
महान महात्म्याच्या अभिवचनाचे
एकात्मतेच्या सुगंधीत गुच्छाचे
महान संकल्पक अशोक राजाचे ॥६॥

न्यायनिती इथे पैशाच्या ताब्यात
जो तो गुरफटे फसव्या जाळ्यात
केवळ खुर्चीच्या राजकारणात
तत्त्वहीन घोडे सुटले धावत ॥७॥

घरातील बालीशपणाचे बोलणें
चौकातील शिंतोडयाचे रडगाणें
रित दिसत्याला दंडवत घालणें
ज्याचे खिशात नाणें त्यांचें तुणतुणें ॥८॥

मनगटशाही कुटीलशाही बनली
हक्काचा नंगानाच करु लागली
सन्मार्गात खड्डे खोदू लागली
पवित्र मताला तुडवीत चालली ॥९॥

जनहित विरोधी प्रवाहाला बांध घालून
करुनी वैचारिक प्रणालीचे संवर्धन
हक्काचें रक्षण, कर्तव्याचे पालन
मग कुठे लोकशाहीला देवपण ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : February 01, 2023

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP