श्रीरामचंद्रयोगींचा शिष्यपरिवार

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीज्ञानेश्वरमहाराजांकडून देवनाथ-चूडामणि यांचेकडे आलेल्या सोऽहं राजयोगपरंपरेंत, ज्यांनीं `दक्षिणा ज्ञानसंदेश:' या वचनास अनुसरुन आपल्या सद्गुरुंना अमाप गुरुदक्षिणा समर्पण केली ते सिद्धपुरुष म्हणजे प्रस्तुत सिद्धचरित्रांतील महादेवनाथांचे कृपांकित श्रीरामचंद्रयोगी तिकोटेकर महाराज हे होत. श्रीतिकोटेकर महाराज हे स्वभावत:च प्रवासाची आवड असलेले संत होते. सद्गुरुंची आज्ञा देखील संचार करुन लोकोद्धार करण्याची होती आणि मुख्य म्हणजे निर्विषय आत्मसुखाचा अखंड आनंद श्रीमहाराज अनुभवीत असल्यानें, इतर साधुसंतांप्रमाणेंच `विषयवोढी भुलले जीव । आतां कोण यांची करील कींव ।' अशा द्रवीभूत अंत:करणानें श्रीमहाराजांनीं आपण होऊन असंख्य लोकांना आत्मानंदाचे संतर्पण घातलें. `सुखाचिया पाउटीं जाइजे' असा स्वरुपसाक्षात्काराचा अगदीं जवळचा व स्वच्छ सन्मार्ग दाखविला. कोल्हापूर येथील एका जज्जसाहेबांचा एक पट्टेवाला श्रीमहाराजांचा शिष्य होता व तो फार तयारीचा होता अशी एक आठवण श्रीसंत गुळवणी महाराजांनीं नुकतीच प्रस्तुत संपादकांना सांगितली. रामचंद्रयोगींचा जन्म चिंचणी (कुरुंदवाडनजीक) येथें झाला. बरीच वर्षे तेथें वास्तव्य झाले. आयुष्यांतील उत्तरकाल श्रीनीं तिकोटे विजापूर येथें घालविला. महासमाधि विजापुरला झाली. दरम्यानच्या काळात त्यांचें जेथें वास्तव्य झाले, अशा गांवांचीं, क्षेत्रांची नांवें आणि शिष्यमंडळींचीं नांवें, सिद्धचरित्रांत आलेल्या उल्लेखावरुन पुढे लिहिली आहेत. हेतु असा कीं, सेवा मंडळातर्फे सदर पोथी प्रकाशित झाल्यानंतर, त्या त्या गांवांतील मंडळींनीं व महाराजांच्या शिष्यांच्या वंशजांनीं आमचेकडे अधिक तपशील पाठवावा. क्षेत्रांचीं व गावांचीं नांवें : कोल्हापूर, गाणगापूर अक्कलकोट, नारसिंहवाडी, वाटेगांव, मंगसोळी, अथणी, बेवनूर, सदलगे, कुरुंदवाड, चिंचणी, मैंदर्गी, तिकोटें, संगधरी, धोत्री, विजापूर, तोरगळ व उगार.
शिष्यमंडळींची नांवें : सद्गुरु पदारुढ झाल्यावर पहिल्या दोन दीक्षा श्रीमहाराजांनीं कुंटुंबातच दिल्या. एकूण जंत्री अशी : धर्मपत्नी सौ. जानकाबाई, सुपुत्र बळवंत (ऊर्फ नरहरी), श्रीपति, गोदूताई कीर्तने, बाबा गर्दे, वाटेगांव येथील वासुदेव देवस्थानचे पुराणिक, ग्रामनायक व इतर अनेक, मंगसोळीचे शंकरशास्त्री, बावण्णा ताटगोडे, नारायण सावकार, बाबाजी कुलकर्णी, रावजी सोनार, कृष्णाजी, बाळाजी गोविंद देशपांडे, रामचंद्र तंमाजी (सर्वजण मंगसोळीचे असावेत) दत्तंभट देशिंगकर, बाबू गुरव, सिद्रामप्पा, मल्लंभट देशिंगकर, अथणीचे गोपाळपंत बोडस, सदलगे येथील श्रीपादभट अडके, अक्कलकोटचा राजा मालोजी, त्याचा सासरा वांगीकर मोहिते, मालोजीची पत्नी, राजाची आजी अम्माई, राजपुरोहित रामकृष्णशास्त्री, अक्कलकोटचेच बापू अमरगोलकर नामक जहागिरदार. अम्माईचा मुलगा सुभानराव (तोरगळ) तेथेंही अनेक शिष्य त्यांत शंभूराव दीक्षित उल्लेखनीय, कोणी दुर्गाबाई, सगंधरीचा शटयाप्पा, धोत्री व मंगसोळी येथें बहुत सांप्रदायिक झाल्याचे उल्लेख, अप्पा देसाई (जहागिरदार) करवीरचे निरराय, कृष्णशास्त्री, विजापूर येथील रामभाऊ कलमडीकर, त्यांचा अल्पवयी मुलगा नरहरी, तसेंच रामभाऊंचा मित्र पंढरीनाथ. इ.इ. श्रीसिद्धचरित्रांत निरनिराळ्या ठिकाणीं आलेले उल्लेख एकत्र करुन आम्हीं ही यादी लिहिली आहे. याखेरीज तिकोटेक महाराजांचीं `निष्काम अपत्ये' कितीतरी होती. आळंदी येथील श्रीहरिहरेन्द्रस्वामींच्या मठाचे एक भूतपूर्व महंत श्रीमत् परमहंस श्रीमाधवेन्द्र स्वामी हे पूर्वाश्रमीचें श्रीमाधवराव किर्लोस्कर होत व ते श्रीतिकोटेकर महाराजांचेच अनुग्रहीत होते. श्रीमाधवेन्द्रस्वामी आपल्या शिष्यवर्गाला जो गुरुपदेश देत असत तो तिकोटेकर महाराजांकडून आलेला सोऽहं बोधच असे. खुद्द महाराजांच्या कन्या गुंडाक्का शिष्यवर्गांत होत्या. गुंडाक्का संप्रदाय चालवीत हेंही प्रसिद्ध आहे. संप्रदाय चालविण्याचा अधिकार महाराजांनीं दिला असे पोथींतच उल्लेख आहेत ते म्हणजे मंगसोळी येथील शंकरशास्त्री, अथणी येथील गोपाळपंत बोडस ( हेपुढे कृष्णातीरीं स्थायिक झाले) हे होत. तसेंच पूज्य गोदामाई कीर्तने यांनाही परंपरा चालविण्याचा अधिकार केव्हांच दिला होता. पोथींत उल्लेख येऊं शकला नाहीं; पण श्रीरामचंद्रयोगींचे एक थोर शिष्य व स्वामी स्वरुपानंदांचे परमगुरु विश्वनाथमहाराज रुकडीकर यांचें विस्मरण कसें होईल? श्रीमत् सच्चिदानंद परमगुरु श्री रुकडीकर महाराजांकडून हा संप्रदाय प.पूज्य बाबा महाराज वैद्य तथा श्रीगणेशनाथमहाराज यांचे मुखानें श्रीसंत सद्गुरु स्वरुपानंद स्वामींपर्यंत पांवसला आला. तिघांसंबंधीं चरित्रात्मक माहिती संक्षेपानें पुढील भागांत देत आहोंत. तत्पूर्वी श्री तिकोटेकर महाराजांच्या कृपाप्रसादाचा लाभ विजापुरीं बालपणीं झालेल्या एका सत्पुरुषांची थोडक्यांत माहिती येथें देतो. सोलापूर येथें समाधिस्थ झालेले एक श्रेष्ठ गायत्रीउपासक व दत्तभक्त श्रीप्रभाकर महाराज टेंबे हे साधुपुरुष लहानपणीं विजापुरास स्वगृहीं असतांना, लहान वयांतच त्यांना श्रीरामचंद्रयोगी महाराजांचा अनुग्रह झाला होता. पुढील आयुष्यांत टेंबे महाराजांना बसपय्या नामक लिंगायत साधूंचा बराच सहवास व सेवा घडली. श्रीसंत भाऊसाहेब उमदीकर यांचाही संबंध आला होता. श्रीप्रभाकर महाराज हे बालब्रह्मचारी, तपस्वी, वाणीचे फटकळ पण कृतार्थ संत होते. नामस्मरणावर अत्यंत भर. गुरुदेव रानडे हे यांना थोर मानीत असत. हे अत्यंत वयोवृद्ध होऊन सोलापूरलाच शांत झाले. पुढे पुढे बर्‍याच लोकांना यांनीं मंत्रदीक्षा दिली. अगदीं पहिले गुरु म्हणून कृतज्ञतेनें टेंबे महाराज अनेक वर्षे तिकोटेकर महाराजांच्या पुण्यतिथीस आवर्जून विजापूरला जात असत. त्यांचे वंशजांना सुवर्णाची गुरुदक्षिणा देत अशी सोलापुरीं त्यांचे भक्तांकडून माहिती मिळाली. अलीकडेच अनेक आर्त भक्तांना टेंबे महाराजांच्यासमाधीजवळ खूप प्रचीति येऊं लागल्यानें भक्तांनीं पुण्यतिथि (माघ वद्य प्रतिपदा) उत्सव मोठया प्रमाणांत चालूं केला आहे तसेंच विस्तीर्ण सभामंडपाचें कामही पूर्ण झाले असून १९७० च्या फेब्रुवारींत महाराजांचें एक विस्तृत गद्य चरित्र भक्तमंडळींनीं प्रसिद्ध केलें आहे. समाधिस्थानीं प्रभाकरमहाराजांचा पूर्णाकृति बैठा प्लास्टर पुतळा असून एका बाजूस बसप्पय्यास्वामी व दुसर्‍या बाजूस तिकोटेकर महाराजांचे मोठें तैलचित्र भिंतीवरच काढलेलें आहे. या संप्रदायांतील मंडळींना सोलापूरला जाण्याचा योग आल्यास त्यांनीं अवश्य टेंबेमहाराजांच्या दर्शनास जावे. साक्षात्कारी संत श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री यांचा व रामचंद्रयोगीमहाराजांचा चांगला स्नेहसंबंध होता. विजापूर परिसरांतील आपल्या शिष्यांना पंतमहाराज हे तिकोटGकरांचा सत्संग करावयास सांगत असे म्हणतात. भाऊसाहेब उमदीकरमहाराज यांचाही श्रींचा चांगला परिचय होता. आतां आमची गुरुपरंपरा-निवेदन करीत आहोंत.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP