श्रीसिद्धचरित्राचें ग्रंथकर्तृत्व - स्थल, काल

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


मराठी सारस्वतांत श्रीगुरुंचा महिमा श्रीज्ञानेश्वर महाराजांनीं अलौकिक भाषेंतून, अनंत वेळां व्यक्त केला. माउलींच्या पूर्वी निर्माण झालेल्या संस्कृत वाड्मयांत, काव्य, नाटकें, भाष्यें इत्यादि सारस्वतांत देवाला व गुरुला वन्दन आढळते परंतु श्रीगुरुभक्ति, श्रीगुरुसेवा, गुरुकृपा, गुरुंच्या आशीर्वादाचें सामर्थ्य वगैरे बाबतींत ज्ञानोबा माउलींनीं `ज्ञानदेवें रचिला पाया' या सार्थ उक्तीप्रमाणें, सद्गुरुचें जें वर्णन केलें आहे तें केवळ अजोड असून, पुढील काळांतील ओवीवाड्मयाला प्राधान्यत्वें पायाभूत ठरलें हें श्रीएकनाथांपासून अनेक भागवतधर्मी सत्पुरुषांच्या ग्रंथरचनेंत दिसून येतें. श्रीसिद्धचरित्राचे कर्तेही याच परंपरेंतील आहेत. अर्थात् सिद्धचरित्राचें ग्रंथकर्तृत्व हें तत्त्वत: `सद्गुरु श्रीरामचंद्र महाराज तिकोटेकर' यांचे आहे. तथापि व्यावहारिक सत्तेंत, हा ग्रंथ कोणी रचला तें येथें थोडक्यांत नमूद करुं. सिद्धचरित्राचे `लेखनिक' कोणी `गजानन' नामक सत्त्वस्थ पुरुष असले तरी `लेखक' तीन आहेत. एक श्रीपति (यांचा आम्हीं आदरार्थी उल्लेख श्रीपतिनाथ असा करतों) दुसरी व्यक्ति साध्वी गोदामाई कीर्तने व तिसरे लेखक `कृष्णसुत' हे होत. तिघां लेखकांपैकीं, पोथीच्या चालीस अध्यायांत, सहा अध्याय वगळून, इतर सर्व ओव्या श्रीपतिनाथांच्या हातच्या आहेत. श्रीपतिविरचित या चौतीस अध्यायांत जेथें परंपरेंतील `गुरुशिष्य भेटींत' शिष्याला उपदेश केल्याचा जो भाग आहे तो प्राधान्यत्वें `योगमार्गाचें विवरण' या स्वरुपाचा आहे. त्या सर्व ओव्या पूज्य गोदामाईंनीं रचल्या आहेत. उदाहरणार्थ अ. आठमधील ओवी क्र. ८३ पासून पुढे सुमारे शंभर ओव्या' तसेंच अ. बत्तीसमधील ओवी क्र. २७ ते १२० इ. भाग पाहावेत. अध्याय एकोणीस ते चोवीस अखेर सहा अध्याय `कृष्णसुतांनीं' रचलेले आहेत. श्रीपतिनाथांनीं पहिल्या अध्यायांत आपल्या आईवडिलांची नांवें व त्यांची थोरवी नमूद केली आहे. एका उल्लेखावरुन त्यांना ज्येष्ठ बंधु असावेत असेंही दिसते. याखेरीज प्रसंगोपात्त येणार्‍या उल्लेखावरुन ते गृहस्थाश्रमी होते एवढी माहिती मिळते. यापेक्षां त्यांच्या आत्मवृत्ताचा जास्त तपशील पोथींत नाहीं. प्रस्तावनेंतील एका विभागांत, श्रीपति म्हणजे कोणी श्रीपति गोळख असें एक मत व श्रीपति म्हणजे गोदामाईंचे बंधु श्रीपतराव कीर्तने असें दुसरें मत हें आम्हीं नोंदविलेले वाचकांस आठवत असेल. पोथींत उपलब्ध होणार्‍या उल्लेखावरुन श्रीपतींचे आडनांव, कुळ, गोत्र वगैरे निश्चित कळूं शकत नाहीं. पूज्य गोदामाईसंबंधीं श्रीपतिनाथांना पराकाष्ठेचा आदर होता हे पुष्कळ ओव्यांतून स्पष्ट दिसते. सदर महासाध्वीसंबंधीं आम्हाला जी ऐकीव माहिती मिळाली ती आम्ही `शिळा छाप पोथीची, हकीकत निवेदन करतांना नमूद केली आहे. खुद्द या पोथींत संपूर्ण छत्तिसाव्या अध्यायांत गोदामाईंचे त्रोटक पण उद्‍बोधक चरित्र श्रीपतींनीं वर्णिलें असून `स्वतंत्र ग्रंथांत गोदामाईचें सविस्तर चरित्र' लिहिण्याची मनीषाही व्यक्त केली आहे. तसा स्वतंत्र ग्रंथ तयार होऊन आज उपलब्ध असतां तर एका समकालीन व्यक्तीनें दिलेला अधिकृत तपशील (पूज्य गोदामाईसंबंधीं) वाचकांस मिळाला असता. कोल्हापूर शहरांत मध्यवस्तींतील मंगळवार पेठेंतील श्रीविठ्ठल मंदिराला लागून जो वाडा सध्या आहे तेंच आईचें निवासस्थान होय. हा वाडा त्यांचे काळांतही `आनंदभुवन' संज्ञेनें ओळखला जात असे. श्रीतिकोटेकर महाराज एकोणीस ते चोवीस हे सहा अध्याय लिहिले आहेत. त्यांतही १९ व २० अध्यांयातील ओवीरचनेंत श्रीपतिनाथांच्या ओवीचे बेमालूम अनुकरण आहे. इतके कीं या दोन्ही अध्यायांचे अखेरीं `कृष्णसुत' असा निर्देश नसता तर ही रचना श्रीपतींची नाहीं असें स्वप्नांत देखील वाटलें नसते. उरलेल्या अध्यायांत मात्र रचनेचा फरक ताबडतोब जाणवतो. कृष्णसूतांची ओवी श्रीज्ञानेश्वरी अगर श्रीदासबोधासारखी साडेतीन चरणी आहे. दृष्टांत देण्याची पद्धति हुबेहुब ज्ञानेश्वरी, अनुभवामृताप्रमाणें आहे. तिकोटेकर महाराजांचे सद्गुरु श्रीमहादेवनाथ यांचें लीलाचरित्र यांचें लीलाचरित्र `कृष्णसुतांनीं' लिहिलें आहे. `कृष्णसुत' म्हणजे त्या काळांतील प्रसिद्ध वेदान्ती, सुरस पद्यांतून वेदान्तपर गीतें लिहिणारे, श्रीमद्‍भगवद्‍गीतेवर शंभर पदें रचणारे श्री. खंडो कृष्ण ऊर्फ बाबा गर्दे होत अशी कोल्हापूरांतील श्रीकिर्लोस्कर, रुकडीकर वगैरे जुन्या पिढींतील सांप्रदायिकांच्या संग्रहांतील माहिती आहे. कै. बाबा गर्दे यांनीं सद्गुरु तिकोटेकर महाराजांवरही कांहीं पदें अष्टकें केल्याचें ऐकिवांत आहे. पोथीच्या तिन्ही लेखकांसंबंधीं एवढी पुरेशी माहिती येथें नमूद केल्यानंतर, प्रत्यक्ष ग्रंथ कसा, केव्हां, कोठें निर्माण झाला ती हकीकत लिहीत आहोंत. सिद्धचरित्राच्या शिळा छाप पोथींत ज्या सलग अशा महत्त्वाच्या ओव्या गळल्या आहेत त्यांत प्रस्तुत संदर्भातील ३८ व्या अध्यायांतील पुष्कळ ओव्याही गळल्या आहेत त्यांचा गोषवारा संक्षेपानें खालीं दिला आहे. अ ३६, ३८ आणि ४० या तीन अध्यायांत श्रीपतिनाथांनीं, गोदामाईंचें ग्रंथकर्तृत्व, पोथीचा आरंभ कसा झाला, त्यांत कांहीं कालखंड का पडला, कृष्णसुतांना ओव्या रचण्याचा प्रसंग का आला, वगैरे हकीकत संक्षिप्त दिली असून पोथीरचनेचे, स्थळ, काळ, संपूर्ण कधीं झाली हेंही नोंदविलें आहे. तिन्ही अध्यायांतील ओव्यांचा गद्य गोषवारा खालीलप्रमाणें सांगतां येईल. श्रीपतिनाथ सांगतात: गोदावरीनें कित्येकांना सन्मार्गी लावले; कितीक व्याधिग्रस्त रोगमुक्त केले, आणि मूर्खाहातीं ग्रंथ करविले हें तर प्रत्यक्ष या ग्रंथांत, वाचकहो, तुम्ही पाहातच आहांत ! (यांतील श्रीपतींचा स्वत:कडे लघुत्व घेण्याचा विनयाचा भाग जरा नजरेआड केला म्हणजे प्रस्तुत पोथीरचनेंतील गोदामाईंचें महत्त्व, कवीच्याच मुखानें ऐकावयास मिळते) या ग्रंथांत जेथें जेथें उपदेश प्रकरण आलें आहे तेथें तें स्वत: गोदामाईंनींच वर्णिले आणि नांव मात्र पुढें केलें तें माझें ! ``शके १८०१ मध्यें श्रीगुरु रामचंद्रयोगी महाराज करवीर मुक्कामीं असतां सिद्धचरित्र लिहिण्याची त्यांनीं मला आज्ञा केली. `मी अज्ञान, मतिमंद आहे. माझ्याकडून हें कसें काय पार पडेल ?' अशी श्रीगुरुंस प्रार्थना केली असतां, `चिंता करुं नये. कोठें चूकभूल झाली तर गोदावरी योग्य तें सांगेल.' असे आश्वासन मिळालें. नि:शंक मनानें मीं ओव्या लिहिण्यास सुरुवात तर केली. (सतरा अठरा अध्याय होईपर्यंत अडीच तीन वर्षांचा काळ गेला) पण प्रपंचांतील व्यापामुळें मला हें कार्य निभेना. एकोणीस ते चोवीस अध्याय बाबांनीं रचले. (तेथपर्यंत महादेवनाथ महाराजांचें चरित्र पूर्ण झाले. पुढें सद्गुरुंचे चरित्र मींच लिहावे अशा बुद्धीनें बाबांनीं लेखणी पुन: माझे हातीं दिली पण)  बायका मुलांच्या विवंचनेंत पोथीलेखनाला पुढे गति मिळेना. ``अशा कुंठित अवस्थेंत असतां कोल्हापूरच्या निरराय नामक एका बडया शिष्यानें शके १८०४ मध्यें तिकोटयाला धमणी पाठवून श्रीगुरुंना कोल्हापूरला आणविले ! (गुर्वाज्ञेनंतर चार वर्षांचा काळ जाऊनही ग्रंथ पुरा झाला नव्हता ही खंत होतीच) मी सद्गुरुंच्या दर्शनास गेलों. वंदन करुन उभा असतां ``पूर्ण झालेला ग्रंथ घेऊन ये'' अशी गुरुमहाराजांची वाणी ऐकली आणि गर्भगळित झालों ! खालीं मान घालून गप्प उभा राहिलों. त्या मौनाचा अर्थ श्रींच्या लक्षांत येण्यास किती वेळ लागणार ? महाराज रागावले. `पोथी पूर्ण होऊन आपणांस वाचावयास मिळेल या आशेंतच (गेल्या चार वर्षात) कितीतरी सांप्रदायिक मंडळींनीं  इहलोक संपविला ( हें तुला माहीत नाहीं काय ?) आतां हा ग्रंथ पूर्ण होणार तरी कधी ? आम्हीं ग्रंथसमाप्तीपर्यंत करवीरलाच मुक्काम करतों' अशी सद्गुरुंची कोपवाणी ऐकून अत्यंत लज्जा वाटली. मी थरकांपत उभा राहिलो. `लवकरच ग्रंथ पुरा करतो. आज्ञा व्हावी. कृपा असावी' अशी प्रार्थना करुन तेथून पळ काढला ! (बाह्यत: क्रोधयुक्त अशीं तीं सिद्धमुखांतलीं अक्षरें हा शक्तिपात होता. वरदान होते. प्रापंचिक चिंतनांत अडकून पांगळी झालेली बुद्धि, एका क्षणांत श्रीगुरुंनीं अनिर्बंध संचारास समर्थ केली.) ``करवीर क्षेत्राच्या उत्तरेस अडीच तीन मैल अंतरावर असलेल्या `प्रयाग तीर्थाजवळ, मकर संक्रमणाच्या पर्वकाळीं, उरलेल्या ग्रंथाची रचना चालूं झाली. काय आश्चर्य सांगावे ? `जैसें मुळीं पडतां पाणी । फापावे लागे वृक्ष मेदिनी । तैसे श्रीगुरु धरितां ध्यानीं । वैखरी वाणी सरसावली ॥'' ``सिद्धचरित्राच्या कलशाध्यायाच्या उपसंहाराच्या ओव्या रचल्या तें स्थळ कोल्हापुरांतच पद्मालय (हल्लीचें पद्माळें) परिसरांत होतें. शालीवाहन शके अठराशें पांच, सुभानु नाम संवत्सरांत कार्तिक शुद्ध षष्ठी या तिथीस रविवार रोजीं ग्रंथ संपूर्ण झाला. ``म्हणवोनि श्रीपति जयजयकारी । कवळोनि श्रीरामपदपद्मांघ्रि । उजळल्या भाग्यें अचलकारी ।

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP