मतभिन्नतेचे दोन विषय -

श्रीपतिनाथ विरचित श्रीसिद्धचरित्र ग्रंथ शके १८०५ (इ.स.१८८३) मध्ये लिहीला.


श्रीसिद्धचरित्राचे लेखक श्रीपति म्हणजे प्रात:स्मरणीय साध्वी गोदामाई यांचे बंधु श्रीपतराव कीर्तने हे होत अशा समजुतीचा एक पक्ष असून सदर श्रीपति हे गोदावरी माउलींचे बंधु नाहींत; तर श्रीतिकोटेकर महाराजांचे एक अनुग्रहीत शिष्य `श्रीपतिबोवा गोळख' नामक होते, त्यांनीं ही पोथी लिहिली असें दुसरें मत आहे. ही झाली पोथी कर्त्याबाबतची मतभिन्नता ! गुरुपरंपरा सांगताना व अन्यही सर्व स्थळीं सदर पोथींत देवचूडामणि ही एकच व्यक्ति होती या श्रद्धेनें सर्वत्र उल्लेख आले आहेत. चूडामणि हे ज्ञानदेवांचे शिष्य असाच सगळीकडे उल्लेख मिळतो; त्यामुळें `देवचूडामणि' हें एकाच सत्पुरुषाचे जोड-नांव (देववत्‍ चूडामणि) आहे असें मत असून दुसरें मत असें कीं, श्रीज्ञानदेवांचा अनुग्रह मुळांत देवनाथ नांवाच्या साधुपुरुषास मिळाला आणि त्यांचेपासून नंतर चूडामणि, गुंडामहाराज अशी परंपरा तयार झाली. याप्रमाणें `देव चूडामणि' या संज्ञेसंबंधीं दोन वेगळी मतें आहेत. कोल्हापूर येथील श्रीयुत अ.भा. ऊर्फ दादामहाराज किर्लोस्कर यांनीं समक्ष भेटींत व पत्रद्वारें, जुन्या पिढींतील कांहीं सांप्रदायिक व्यक्तींची नांवें व अनुषंगिक माहिती कळवून, ``श्रीपति म्हणजे श्रीपतिबोवा गोळख आणि देवचूडामणि म्हणजे देववत्‍ चूडामणि, देवनाथ व चूडामणि अशा दोन व्यक्ति नव्हेत'' अशी ठाम मतें कळविलीं आहेत. श्रीकिर्लोस्कर महाराज हेही या संप्रदायाशी संबंधित असल्यानें येथें त्यांचा परिचय करुन देणें आवश्यक वाटतें. श्रीकिर्लोस्करमहाराजांचे वय सुमारे सत्तर वर्षाचे आहे. अगदी बालपणीं, पूज्य गोदूताई-आईंनीं नेत्रांस अमृत करस्पर्श केल्यामुळें आपलें दृष्टिमांद्य नाहीसें झालें अशी आठवणही श्रीदादामहाराज सांगतात. कै. चंद्रोबा चव्हाण, नानाबोवा शिंदे, सदोबा हवलदार, वगैरे मंडळी श्रीतिकोटेकर महाराजांचा अनुग्रहीत असून भास्करपंत किर्लोस्करांच्या नित्य बैठकींतील असत. हे सर्व सज्जन जरी तिकोटेकरांचे शिष्य होते तरी खुद्द कोल्हापूरांतच गोदामाईंसारख्या महायोगिनीची सत्संगति नेहमीं मिळत असल्यानें सर्वजण गोदूताईनाही गुरुस्थानींच मानीत असत. कै. नानाबुवा शिंदे यांच्या सूचनेवरुन श्रीदादामहाराज इतरांना अनुग्रह देऊं लागले. यांचा शिष्यवर्गही हल्लीं बराचसा आहे. श्रीतिकोटेकर महाराजांच्या दत्तउपासनेचा वारसा किर्लोस्कर यांजकडे उत्कट भक्तिप्रेमानें चाललेला आजही दिसतो. ``श्रीसिद्धचरित्राची शिळा छाप पोथी हीच सर्वस्वी प्रमाण मानून सेवा मंडळानें त्याच पोथीचें पुनर्मुद्रण करावे. आणखी प्रती पाह्यच्याच असतील तर त्यासाठी लागेल तेवढा कालावधि घेऊन संशोधन करावे. तूर्त चाललेली घाई करुं नये. मिळतील त्या सर्व पोथ्यांतील सर्व पाठभेद कामतांच्या गुरुचरित्र आवृत्तिसारखें नोंदवावेत. टीपा, प्रस्तावना, छायाचित्रें वगैरेंची कांहीं आवश्यकता नाहीं'' अशा आशयाचें पत्र ज्या सज्जनांनीं सद्गुरु स्वामींकडे पाठविलें होते असें आम्हीं प्रस्तावनेच्या पहिल्या भागांत नमूद केलें होते ते सांप्रदायिक सज्जन म्हणजेच सदर किर्लोस्कर महाराज होत. (मतभिन्नतेचे दोन विषय `या मुद्द्यांचा ऊहापोह करण्यासाठीं मुख्यत: किर्लोस्कर महाराजांच्या पत्रव्यवहारानें चालना मिळाली. दुर्दैवानें दि. चार एप्रिल १९७० या दिवशीं किर्लोस्करदादांची कोल्हापूर येथें निर्घृण हत्या झाली. सिद्धचरित्राची ही आवृत्ति प्रकाशित होण्यापूर्वीच, पाशवी अत्याचारामुळें श्रीकिर्लोस्कर महाराजांना इहलोकीची यात्रा संपवावी लागली याचा संपादकांना व सेवा मंडळाला अत्यंत शोक होतो.) श्रीमत्‍ सच्चिदानंद सद्गुरु स्वामी स्वरुपानंद यांच्या अत्यंत अनाग्रही स्वभावाचा ज्यांना अल्प किंवा दृढ परिचय आहे त्यांच्या हें सहज लक्षांत येईल कीं `श्रीपति गोळख का श्रीपति कीर्तने ?' `देववत्‍ चूडामणि का देवनाथ आणि चूडामणि' या मतभिन्नतेचा निर्णय लावावा असें सद्गुरुंना जरुरीचें वाटणें संभवनीय नाहीं. तसेंच या संदर्भात ऊहापोह करुन योग्य ठरलेलें मतच मानणें आणि चूक ठरलेंले मत चुकीचें आहे असा अट्‍टाहास धरणें - यांतील कोणतीच भूमिका स्वामींजवळ नव्हती आणि नसेल.
`करणें का न करणें । हें आघवे तोचि जाणे । विश्व चळतसे जेणें । परमात्मेनि ॥'
या बोधांत सद्गुरु कधीचेच समरसून राहिले आहेत. ओवींतील करणें व न करणें या क्रियापदांत यच्चयावत्‍ क्रियापदांचा अंतर्भाव आहे असें समजलें म्हणजे श्रीपति हे गोळख अथवा कीर्तने - कोणीतरी एक होत - व देवनाथ चूडामणि दोन व्यक्ति होत्या याबाबतींत `असणें का नसणें । हें आघवे तोचि जाणे' हीच सद्गुरुंची अनाग्रही भूमिका राहणार. सद्गुरुंच्या या परमोच्च स्थितीचें आम्हास सतत स्मरण असल्यानें, पुढील विवेचनांत आम्ही फक्त उभय पक्षांचीं मतें नमूद करीत आहोत. दोन प्रकारच्या, ओवीसंख्येंत फरक असलेल्या, भिन्न पाठ देणार्‍या किमान दोन पोथ्या उपलब्ध आहेत हें कळल्यामुळें जसा आम्हांला अनेक पोथ्या मिळविण्याचा, अस्सल प्रत मिळविण्याच उद्योग हातीं घ्यावा लागला त्याचप्रमाणें वरील संदर्भात भिन्न मतें आहेत हें दृष्टोत्पत्तीस आल्यामुळें कांहीं गांठीभेटी, पत्रव्यवहार करावा लागला. कांहीं ग्रंथांतून याबद्दल उल्लेख मिळाले हा सर्व तपशील येथें नोंदवीत आहोंत. कोल्हापुरांत श्रीकिर्लोस्करांच्याच वयाचे व सद्गुरु विश्वनाथमहाराज रुकडीकर यांचे शिष्य श्री. अण्णासाहेब रुकडीकर हे आहेत.  त्यांच्या माहितीप्रमाणें सिद्धचरित्राचे लेखक श्रीपति म्हणजे श्रीपतराव कीर्तने (गोदूताईंचे बंधु) हे होत. ``श्रीपति म्हणजे श्रीपति गोळख हें त्रिवार सत्य आहे'' अशा शब्दांत श्रीकिर्लोस्करांनीं आपलें मत सांगितलें. या बाबतींत जास्त प्रकाश टाकणारी माहिती किर्लोस्कर व रुकडीकर या दोघांच्याही संग्रहीं नाहीं ही खेदाची बाब होय. त्या त्या मताचा पाठपुरावा करणार्‍या आणखी कोणा जुन्या पिढींतील व्यक्तींची माहितीही आम्हांस मिळूं शकली नाहीं. खुद्द सिद्धचरित्रांत श्रीपतींनीं आपल्या आडनांवाचा कोठेही उल्लेख केलेला नाहीं अगर आपण गोदामाईचे (मांसवंशांतील) बंधु असाही सूचक निर्देश केला नाहीं. ऐकीव पुरावा, ग्रंथान्तर्गत पुरावा वगैरेची छाननी करुन, जवळजवळ निष्कर्षापर्यंत पोहोंचण्याइतका या बाबतींत ऊहापोह करणें (सहज नव्हे पण) शक्य आहे परंतु आम्ही वर नमूद केलेल्या भूमिकेप्रमाणें येथें केवळ दोन्ही मतें वाचकांपुढें मांडली आहेत.
दुसरा मुद्दा देव-चूडामणींसंबंधीचा ! याही बाबतींत श्रीकिर्लोस्कर महाराजांशीं ज्या भेटी व पत्रव्यवहार झाला त्यांत त्यांची श्रद्धा खालीलप्रमाणें व्यक्त झाली आहे. १४ एप्रिल १९६९ च्या पत्रांत ते लिहितात :
``........ तीच बाब ज्ञानेश्वर कृपाविभूषित श्रीदेवनाथांबद्दलची. हे तेच देवनाथ असतील. त्यांचें कार्य महत्त्वाचें, अमोल असेल परंतु आम्हा परंपरागतांना `देवचूडामणि' म्हणतांना देवनाथ डोळ्यासमोर येऊं नयेत. ब्र.भू. नानाबुवा शिंदे `देववत्‍ चूडामणि' असें म्हणाले होते. सद्गुरुंनीं सांगतानाही `देवनाथ चूडामणि' असे सांगण्यास हरकत नव्हती. ते देवनाथ प्रत्यक्ष दंवतुल्य असतील पण परंपरेच्या प्रस्तावनेंत त्यांचा संबंध नाहीं ........''
देवचूडामणि ही एकच व्यक्ति होती या श्रद्धेला बळकट पुरावा खुद्द सिद्धचरित्रांतच आहे ! आरंभापासून अखेरपर्यंत या पोथींत जेथें जेथें देवचूडामणि हें नांव आलें आहे तेथें तें एकाच व्यक्तीला अनुलक्षून आहे आणि जेथें गुरुपरंपरा सांगितली आहे तेथें `ज्ञानदेवांनीं चूडामणींना अनुग्रह दिला' अशा अर्थाच्या ओव्या मिळतात. हें सिद्धचरित्र पोथीपुरतें निरुपवाद असल्यानें, वाचकांना कोणत्याही अध्यायांत असे उल्लेख सापडतील. मूळ ओव्या उद्‍धृत करण्याची जरुरी वाटत नाहीं. १४ एप्रिल १९६९ रोजीं पत्र लिहिण्यापूर्वीही समक्ष भेंटींत श्रीकिर्लोस्कर महाराजांनीं हेच विचार व्यक्त केल्यामुळें आम्ही या संदर्भात `अधिकृत स्वरुपाची' कांही माहिती मिळूं शकते काय ? याचे चिंतनांत असतांना, श्रीगुंडामहाराज देगलूरकरांचे वंशजांकडे तपास करावा अशी स्फूर्ति झाली. त्याप्रमाणें वारकरी संप्रदायांतील अध्वर्यु, वेदान्त व्यासंगी, श्रीज्ञानेश्वरीचे ख्यातनाम प्रवचनकार व गुंडामहाराजांच्या वंशांतलें ह.भ.प. श्रीधुंडामहाराज यांना ११ सप्टेंबर १९६८ रोजीं एक दीर्घ पत्र पाठविलें. त्या पत्राचें सविस्तर उत्तर त्यांचेकडून ताबडतोब आले. त्यांतील प्रस्तुत संदर्भासंबंधीचा मजकूर वाचकांपुढें ठेवीत आहोंत. श्रीधुंडामहाराज लिहितात :
``श्रीदेवनाथ व श्रीचूडामणि हे एक नव्हेत. या दोन वेगळ्या व्यक्ति होत्या हें खरे आहे. सिद्धचरित्रांतील माहिती अपुरी आहे. श्रीदेवनाथ हे आळंदीस श्रीज्ञानेश्वर महाराजांचा अनुग्रह व्हावा म्हणून अनुष्ठान करावयास बसलें. शेवटीं प्राणत्याग करावयास सिद्ध झाले तेव्हां समाधींतून त्यांना अनुग्रह झाला व ते सिद्ध पुरुष झाले. ते फिरत देगलूर प्रांतांत आले असतां त्यांचा अधिकार पाहून चूडामणींनीं त्यांचा अनुग्रह घेतला. अशी कथा चरित्रांत आहे. ``परंपरेचा जो श्लोक प्रसिद्ध आहे तो `आदिनाथच मत्स्येंन्द्रं गोरक्षं गहिनी तथा । निवृत्तिं ज्ञानदेवं च देवंचूडामणिं नम: ॥'  असा आहे त्यांत देवं चूडामणि अशी एकविभक्त्यन्त भिन्न पदें आहेत. एखाद्याच्या दृष्टिदोषानें किंवा अनवधानतेनें देवं वरील अनुस्वार चुकला व देवचूडामणि असा उच्चार होणें शक्य आहे. म्हणून देवं म्हणजे देवनाथ व चूडामणि असा वेगळा अर्थ आहे.
``आपल्या संप्रदायांतील देवनाथांचे चरित्र विशेष उपलब्ध नाहीं. श्रीचूडामणींचें चरित्र जे आमच्या ``गुंडामाहात्म्यांत' आहे त्यापेक्षां अधिक माहिती मिळत नाहीं. श्रीचूडामणि महाराजांची मुख्य समाधीही देगलूर येथें आमच्या मठांतच आहे. त्यांचे वंशज तेथेंच पूजेस येतात. तात्पर्य देवनाथ व चूडामणि हे वेगळे पुरुष होऊन गेले.'' सदर पत्रांत उल्लेखिलेलें श्रीगुंडामहाराजांचें ओवीबद्ध चरित्र २४ अध्यायांचे असून ओवीसंख्या २९०० आहे. प्रस्तुत पोथी शके १८३६ मध्यें पुणें येथें आर्यभूषण छापखान्यांत छापली आहे. सध्यां हा ग्रंथ दुर्मिळ आहे. त्यांत गुरुपरंपरेचा उल्लेख अ दोनमध्यें ६३ ते ९० ओव्यांत आलेला आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचा मंत्रोपदेश देवनाथांना झाला असा स्पष्ट निर्देश आहे. पुढील `तोचि प्रज्ञान उपदेश । चूडामणीसी अविनाश । लाधला तेणें जाहला संतोष । क्रीडा निर्दोष पैं केली ॥८८॥
या ओवीचा अर्थ महत्त्वाचा आहे.परंपरेशी निगडित अशा या जुन्या ग्रंथातूंन `देवनाथांना ज्ञानेश्वरांचा अनुग्रह झाला' असा उल्लेख मिळाला. तसेंच या संप्रदायाशीं साक्षात्‍ संबंध नसलेल्या पण एका थोर सत्पुरुषांनीं लिहिलेल्या दुसर्‍या एका ओवीबद्ध ग्रंथांत अशीच माहिती मिळाली. `आधुनिक महीपति' असा ज्यांचा यथार्थ उल्लेख होतो त्या संतकवि वै. श्रीदासगणूमहाराजांच्या अफाट वाड्मयांत अनेक साधुसंतांची चरित्रें लिहिलेली आहेत. प्रस्तुत संदर्भात, शके १८३० व शके १८४७ मध्यें रचलेल्या अनुक्रमें `संतकथामृत' व `भक्तिसारामृत' या दोन्ही ग्रंथांत कांहीं अध्यायांतून श्रीगुंडामहाराजांचे लीला चरित्र वर्णिले आहे तसेंच `भक्तिसारामृतांत' श्रीदेवनाथ महाराजांचें चरित्र आलें आहे. श्रीदासगणूमहाराजांच्या समग्र वाड्मयाचे खंड अलीकडे पुन: प्रकाशित झाले असल्यानें उपरोक्त ग्रंथ आज उपलब्ध आहेत. फक्त देवनाथ-चूडामणि यांच्या गुरुशिष्य संबंधापुरतेच श्रीदासगणूमहाराजांचे हे ग्रंथ व अध्याय तूर्त पाहायचे असल्यानें `श्रीभक्तिसारामृतांतील' श्रीदेवनाथमहाराजांसंबंधीचा दहावा अध्याय अवलोकन करीत असतां `श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेसाठीं श्रीदेवनाथांनीं समाधीजवळ एकवीस दिवस अनुष्ठान केले अशी हकीकत आहे. परस्पर भेटीचें व उपदेशाचें वृत्त श्रीदासगणूंच्याच भक्तिमधुर शब्दांत वाचूं.
``श्रोते ! एकविसाव्या दिवशीं । दोन प्रहर रात्रीसी । प्रकटले प्रत्यक्ष ज्ञानराशि । निवृत्तिदास ज्ञानेश्वर ॥१०५॥
ज्ञानेश म्हणती देवनाथा । तुजलागीं येथें पाहतां । आनंद झाला माझ्या चित्ता । तो वानूं कितीतरी ॥११०॥
आतां इकडे करी कान । उपदेश हा करी ग्रहण । ........
श्रीज्ञानदेवांनीं दिलेल्या ज्ञानेश्वरीचें पठण नेवासें येथें श्रीदेवनाथांनीं मोहिनीराजापुढें केले. तें ऐकावयास स्वत: ज्ञानेश्वर महाराजही आले. ग्रंथ पूर्ण होतांच मोहिनीराज व ज्ञानदेवांनीं दोघांनींही प्रसन्न होऊन त्यांना उपदेशपरंपरा चालविण्याची आज्ञा दिली. असें या जातिवंत कीर्तनकार संतकवींनीं खुलवून, मोठें गोड वर्णन केलें आहे. पुढील ओव्या अधिक महत्त्वाच्या आहेत. श्रीचूडामणींना देवनाथांचा अनुग्रह होता असें त्यांत स्पष्ट दिसते. श्रीज्ञानदेव सांगतात :
``जा आतां जगभरी । वाचून ही ज्ञानेश्वरी । दुस्तरशा भवसागरीं । जड जीवां तारावें ॥२६१॥
पूर्वेस देगलूर प्रांतांत । चूडामणि माझा भक्त । आहे तो तूं करुनि छात्र । संप्रदाय वाढवी ॥२६२॥
श्रीचूडामणि महाराजांचे विद्यमान्‍ वंशजापैकीं एक श्रीएकनाथ शंकर महाराज हे हल्लीं नांदेड येथें राहतात. श्रीसद्गुरु स्वरुपानंद स्वामींचें चरित्र त्यांचे वाचनांत आलें. कार्यवाहांना लिहिलेल्या १७ जुलै ६९ च्या पत्रांत ते म्हणतात : ``श्रीसद्गुरु चूडामणि महाराजांना ज्ञानदेवांचा अनुग्रह नसून देवनाथांचा आहे. वडील, चुलते, आजोबा यांचेजवळ बसून जी माहिती उपलब्ध झाली त्याप्रमाणें देवनाथ देगलूरचे अशी माहिती नाहीं. देवनाथांचा व चूडामणींचा पूर्व परिचय नव्हता. चूडामणि काशीयात्रेला गेले होते तेव्हां त्यांना उपदेश झाला. देवनाथ महाराष्ट्रीय होते याला मात्र सर्वाचें एकमत आहे ....'' या पत्रांतील शेवटच्या वाक्यांतून देवनाथांचें वास्तव्य फार करुन महाराष्ट्रांत नसून काशीसारख्या उत्तर हिंदुस्थानांतील क्षेत्रांत असावे असें दिसते. याला पोषक असें प्रमाण श्रीदासगणूंच्या पोथींतील देवनाथचरित्रांत `मी आहे हिंदुस्थानी । माझा मुलूख दूर येथुनी । महाराष्ट्राचा मजलागुनी । मुळींच नाहीं परिचय ॥१३४॥ अ १० यांत मिळते. देवनाथ यांच नांवाचे दुसरे एक सत्पुरुष वर्‍हाड प्रांतांत सुरजी (अंजनगांव) येथें इ.स. १७५१ ते १८२१ या काळांत होऊन गेले. हे मुळांत कुस्तीगीर पहिलवान्‍ होते. सदर देवनाथांचे सद्गुरु कोणी गोविंदनाथ होते. श्रीदेवनाथांना काव्यस्फूर्ति असे. `देवनाथांची कविता' या नांवानें त्यांचा पद्यसंग्रह बर्‍याच वर्षापूर्वी छापलेला आहे. ``भक्ति लीलामृत' या संतकवि दासगणूमहाराजविरचित पोथींत याही देवनाथांची अधिक हकीकत जिज्ञासूंनीं वाचावी. सुर्जी अंजनगांवच्या सदर देवनाथांचा मात्र श्रीसिद्धचरित्राशीं कांहीही परंपरा संबंध नाहीं एवढें लिहून हा भाग आटोपतों.

N/A

References : N/A
Last Updated : March 12, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP