श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: ।  श्रीरामसमर्थ ।
नमो अयोध्यावासिया । वसिष्टशिष्या रघुराया । पित्राज्ञापालका वेदवंद्य । कौसल्यानंदना नमो तुज ॥१॥
गुहकप्रिया श्रीरामा । योगीजनचित्तवीरामा । वनवासिया निवृत्तकामा । सीता वल्लभा नमो तुज ॥२॥
श्रीगुरु आपले गुण अपार । वर्णिता भागले थोर थोर । अवधान द्यावें सत्वर । पुढील कथेसी ॥३॥
शंकरशास्त्री ह्मासुर्णेकर । काव्यव्युत्पन्न भाविक थोर । श्रीगुरुचे जाहले किंकर । कवी आणि सावक ॥४॥
दीक्षा अनुग्रह करावया । सद्‍गुरु अधिकार देती तया । ह्मासुर्ण गांवी रामराया । पाशीं मठ तयांचा ॥५॥
शिष्यशाखा असे थोडी । कवित्वाची बहु गोडी । पुराणसवेंची आवडी । सदगुरूंचे गुण गाती ॥६॥
कागवाडक्षेत्री रामदासी । लागले श्रीगुरुपदासी । साडेतीन कोट जपासी । केले असे भक्तीनें ॥७॥
श्रीगुरुंनी दिधली दीक्षा । प्रपंच परमार्थ उभय पक्षा । चालवोनि करिती रक्षा । अनंत दुरीराची ॥८॥
जन्मभूमीचा उध्दार । केला बांधोनि मंदीर । अनुग्रहा अधिकार । दिधला असे ॥९॥
शिष्य शाखा असे थोडी । आध्यात्म ज्ञानाची गोडी । अन्नदानाची परवडी । चालविती बहू ॥१०॥
सद्‍गुरुची अति भक्ती । वरचेवरी दर्शना जाती । प्रपंची न जडे आसक्ती । राम सेवेची आवडी ॥११॥
आणिक शिष्य हरिदास । हरीभाऊ वदती जयास । प्रपंची सदा उदास । गुरुसेवा अतिप्रिय ॥१२॥
तेव्हा सद्‍गुरुभेटी झाली । तेव्हां पराधिनता सोडिली । सदा ध्याती गुरुमाउली । अनन्यभक्तीनें ॥१३॥
सांगली क्षेत्र वसतिस्थान । प्रेमळ करिती कीर्तन भजन । नसती तालसुरहि बंधन । कारण एक उपासना ॥१४॥
कार्य कारण कुटुंब गेह । सद्‍गुरुकार्यी झिजविती देह । न जाणती अन्य उपाय । रामनाम गुरुसेवा ॥१५॥
पुत्र कलत्र बंधू भगिनी । वाहिली समग्र सद्‍गुरुचरणी । सकलही गुरुसेवा करोनी । आनंदे काल क्रमिताती ॥१६॥
यांची भगिनी बहिणाबाई । गुरुचरणी ठेवता डोई । सेवा करिता आळस नाहीं । मायबाप महाराज ॥१७॥
असो कुटुंबी सकल लोक । हरिदास नामाचें सार्थक । करोनी भोगिति सुख दुर्मिळ गुरुसेवेचें ॥१८॥
रामभटटात्मज बाळंभटट जोषी । कुरोलीचे रहिवासी । व्यसनी होते अतिशयेसी । गुरुजवळी सहज आले ॥१९॥
गांजा अफू आणि चरस । सेवोनि दिवस । विनविती श्रीसामर्थास । गोष्ट आमुची परिसवी ॥२०॥
जरी पुरवील आमुचें व्यसन । तरी करूं नामस्मरण । आज्ञा मानूं प्राणासमान । असत्य न बोलूं कदापि ॥२१॥
सद‍गुरु वदती उत्तम । अगत्य चालवूं नेम । ऐसे आवडती आह्मा परम । गोसावी यांसी ॥२२॥
नित्यनेम जप नेमून दिला । ऐसा कांही काळ गेला । कृपेनें निर्व्यसनी केला । व्यसनासक्त तो द्विज ॥२३॥
साधक स्थिती प्राप्त झाली । चित्तासी शुध्दता आली । सद्‍गुरुंनी दीक्षा दिधली । पावन केले बाळंभटट ॥२४॥
शास्त्रीबुवा सातारकर । वेदांतव्युत्पन्न चतुर । महाराजांचे भक्त थोर । होवोनि गेले ॥२५॥  
ब्रह्मचारी चिमण गांवकर । वैराग्यशील साधक थोर । दीक्षानुगृहाचा अधिकार । श्रीसंधिवनियासी ॥२६॥
हनुमान गढीस राहून । तुळसीकृत रामायण । नित्यकरी पारायण । योगाभ्यासी ज्ञानी जो ॥२७॥
बलवंतराव घाणीकर । सात्विक भाविक साधक थोर । श्रींचे झाले किंकर । तनमन धनाने ॥२८॥
बापूसाहेभ न्यायाधीश । साठे उपनाम जयांस । श्रीगुरुचे प्रसादास । अधिकारी जाहाले ॥२९॥
भाऊसाहेब केतका । नेमणुकीचे कामगार । गुरुचरणी टाकिला भार । सकलही प्रंपंचाचा ॥३०॥
शालिग्राम पंतोजी विद्वान । गिजरेशास्त्री कर्मठ जाण । काशीकर गुरुजी वेद संपन्न । गुरुचरणी नत होती ॥३१॥
आप्पासाहेब भडगांवकर । आप्पासाहेव कागवाडकर । भैय्यासाहेब हर्देकर । धनसंपन्न शिष्य झाले ॥३२॥  
भैय्यासाहेब इंदुरवासी । अखंड जपती रामनामासी । गाड्गुळी भीमराव परियेसी । सदा ध्याती गुरुपद ॥३३॥
सांगली क्षेत्रीय फडणवीस । बळवंतराव वदती जयांस । ब्रह्मानंद देती अधिकारास । आपुले गुरु संस्थेचे ॥३४॥
तोफखाने जाहले महंत । जयासि सिताराम वदत । गृहीं बांधोन मंदिराप्रत । रामसेवेसी सादर ॥३५॥
फडके काकासाहेब वदती । सद्‍गुरु बहुप्रेम करती । वारंवार संरक्षिती । अर्थ बोध देवोनी ॥३६॥
गोदूबाई नामे भक्त । परम भाविक सत्वस्थ । विनोदें अंबेहळद वदत । सद्‍गुरु तियेप्रती ॥३७॥
चहूं वर्षाची असता । असने करविती दावून सत्ता । किती वानू अभिनवता । गुरुकृपेची ॥३८॥
मुलाचे व्रतबंधाचे वेळी । यावी श्रीगुरुमाउली । ऐसी अशा बहु धरिली । परी महाराज अति दूर ॥३९॥
भक्त काजकल्पद्रुम । सदगुरुमाय विश्राम । संकटकालीं होती उगम । भक्तांसी सदा सन्निध ॥४०॥
व्रतबंधन होवोनि गेले । विप्र भोजनासी जमले । परी तुपावांचुन आडले । अवकाश पडला यावया ॥४१॥
श्रीगुरु वदती अंबेहळद । तुह्मीं भगवदभक्त प्रसिध्द । तुह्मांसी कायसा खेद । असेल तेवढें आणावें ॥४२
पावशेर तुप सकळांसी । वाढिते झाले तपोराशी । आनंद झाला सकळांसी । चमत्कृती देखोनी ॥४३॥
एकदां मंदिरी ऐसे झालें । नाथ भागवत निरुपण चालिलें । श्रोतेजन तटस्थ जाहले । गुरुवाक्यें परिसोनी ॥४४॥
तंव अंबेहळदीचा सुत । दत्तू क्रीडे आनंदात । सद्‍गुरु वदती तयाप्रत । दंगा येथे न करावा ॥४५॥
परी मूल हूड भारी । उगा न राहे क्षणभरी । मग श्रीनीं मस्तकावरी । वरदहस्त ठेविला ॥४६॥
मुलाची लागली समाधी । स्वस्वरुपीं शांत आनंदी । एक दिवस गेला मधी । माय विनवी गुरुसी ॥४७॥
बालका लागली असेल भूक । बैसोनि अंग दुखेल नि:शंक । कृपा करोनी घालावी भीक । पुत्र स्मृतीसी आणावा ॥४८॥
सद्‍गुरु वदती हास्यवदन । निजरंगीं रंगेल मन । रक्षणकर्ता भगवान । समाधींसमयीं ॥४९॥
असो पुनरपी मस्तकावरी । हस्त ठेविताची सत्वरी । बाळ येवोनी देहावरी । गुरुचरण वंदितसे ॥५०॥
ऐसे भक्त बहुत झाले । बहुता साक्षात्कार घडले । सकलांनीं साधन केलें । अल्प बहुत ॥५१॥
हर्देकरीन दुर्गाबाई । काशीबाई गंगुताई । पटाइत मावशी भक्त पाही । कवी आणि साधक ॥५२॥
गिरवीकर नरसोपंत । दासबोध वाची भक्तियुक्त । नाग येवोनि श्रवण करित । डोलतसे आनंदे ॥५३॥
जेव्हां मनीं विकल्प आला । तेव्हां येईनासा झाला । गुरु वदती तुह्माला । गुरुवाक्य कारण ॥५४॥
मुक्ताबाई शिष्य भली । सद्‍गुरु सेवेसी लागली । सकल इंद्रियें झिजविली । गुरुगृही राहोनी ॥५५॥
पाहता दिसे रोकडी । गुरुसेवे नसे रडकी । पाकशाळेची धडकी । अन्नपूर्णा वाटतसे ॥५६॥
नामयाची जनाबाई । तैसी गुरुंची मुक्ताबाई । सेवेवांचूनीं काज नाहीं । वदती घेत हरिनाम ॥५७॥
मुखी नाम हाती काम । हाचि एक नित्यनेम । सद्‍गुरु चरणी पावली विश्राम । धन्य भाग्य जियेचें ॥५८॥
अम्मा नामे मद्रासी । राहिली गुरुसेवेसी । द्वादश वर्षे व्रतासी । धरले मौन गुरुआज्ञे ॥५९॥
गृहासक्ति सांडोनी । दुर्लध्य वासना जिणोनी । आदरें सेवा करोनी । नाम घेत भक्तीनें ॥६०॥
वस्त्रें भूषणें कुशलता । गुंफोनि देती भगवंता । गृहाची सोडिली आस्था । स्त्रीजात असोनी ॥६१॥
गोविदा नामें अळतेकर । गुरुसेवे झिजवी शरीर । मौनव्रत साचार । गुरुआज्ञेनें धरियेलें ॥६२॥
असो ऐसा बोध रुख । शाखा पसरल्या अनेक । जाणते एक गुरुनायक । दुजा समर्थ दिसेना ॥६३॥
कित्येकांच्या पुरविती कामना । साह्य करिती क्षणाक्षणा । भक्तियुक्त उपासना । लावोन देती आनंद ॥६४॥
कित्येक येती आणि जाती । व्याधिग्रस्त मुक्त होती । तयांची न करवें गणती । मशका दुर्लध्य मेरू जैसा ॥६५॥
सकळांसी लाविती साधन । मुख्य एक नामस्मरण । क्वचित्‍ औषधीही कथन । करोन करिती निर्दु:ख ॥६६॥
अंगार्‍याची महती फार । लाविताची जाती विकार । जवळी ठेविती निशाचर । पीडा न होय निश्चयें ॥६७॥
ताईत चिठी दोरा देती । निरोगी करुनि शांतविती । मुख्य नाम वनस्पती । पेरीत ह्र्दय काननीं ॥६८॥
देहादिक विविधताप । वासनाजन्य द्वंद्वताप । सकला रामनाम जप । दिव्यौषधी गुरुघरची ॥६९॥
सिध्द साधक मुमुक्षु । गुरुगृहीं अनंत भिक्षु । जाणतां समर्थ ज्ञानचक्षु । स्वल्प संकेत दाविला ॥७०॥
सकलांसी माझा नमस्कार । वारंवार जोडून कर । हेंचि गुरुचें नांदतें घर । ध्यानें अंतरीं कोंदले ॥७१॥
इतिश्री सद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविती रामदासी यांचा लळा । कृपाकटाक्षें ॥७२॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते अष्टोध्यायांतर्गत चतुर्थ समास: एकंदर अध्याय । ओवीसंख्या ॥३३४॥
॥ श्रीगुरूपादुकार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ इति श्री अष्टमोध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP