श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: ।  श्रीरामसमर्थ ।
आनंद्सागर ब्रह्मानंद । यांनी जाणिलें ब्रह्मचैतन्यपद । आणिक शिष्य झाले प्रसिध्द । तेही पुढती सांगतिल ॥१॥
कुर्तकोटी इनामदार । धनवान आणि चतुर । लिंगनगौडा नामें द्विजवर सरस्वती प्रसन्न तयासी ॥२॥
पाश्चात्य विद्या संपादोनी । संस्कृत अग्रगण्यता मिळऊनि । विद्या भूषण पदवी जयांनी । स्वतेजे संपादिली ॥३॥
आणिकही बहु मान । देशी विदेशी मेळवून । नित्य करिती विद्यादान । विद्यार्थि यांसी ॥४॥
सार्वजनीक हितासाठीं । नित्य करिती आटाआटी । अकस्मात झाली भेटी । ब्रह्मनंद गुरुची ॥५॥
पाठक आणि अनुभवी । यांची भेटी झाली बरवी । अनुभव सुखाची चवी । वेगळीच आहे ॥६॥
भक्ति उपासना आणि ज्ञान । पाहोन झालें समाधान । नम्र होवोनि तक्षण । अनुग्रह प्रसाद घेतला ॥७॥
तदुपरी ब्रह्मानंद यांनी । विद्या वैराग्य पाहोनी । घातले श्रीसमर्थचरणीं । अनुग्रह प्रसाद देवाविला ॥८॥
सदगुरु वदती तया लागून । करावें श्रीभागवतकथन । व्युत्पत्ति पाहतां संतोषाने । महाभागवतनाम देती ॥९॥
भागवतीचें वैराग्य । पाहतां वाटे धन्य भाग्य । भवनदी दुस्तर दुर्लध्य । सहज हे उल्लंघिती ॥१०॥
सद्‍गुरुसेवा करिती बहुत । रामनाम सदा गात । निरुपणें चित्त शांतवित । सकल जनांचें ॥११॥
लोकसेवेची हौस भारी । धर्म सुधारणा व्हावी बरी । ह्मणोन हिंडती नगरोनगरीं । नि:स्वार्थ निरालस्यें ॥१२॥
कुर्तकोटीचे शिवमंदीर । तेथेंचि स्थापिले रघुवीर । अनुग्रहाचा अधिकार । सद्‍गुरुंनीं दिधला असे ॥१३॥
शिष्यशाखा असे थोडी । समाजहिताची बहु गोडी । पाश्चात पौर्वात्य द्विधागाडी । उकलोनि दाविती ॥१४॥
स्वधर्मी सदा रत व्हावें । देशोन्नतीसी झटावें । बोध करिती मनोभावें । ठांई ठांई ॥१५॥
असो श्रीमहाभागवत । पुढें झाले विख्यात । सद्‍गुरुचरणी झाले रत । आणिक शिष्य ॥१६॥
कर्‍हाडक्षेत्रीं शांताश्रम । संन्यासी कर्मठ परम । त्यांचे श्रीगुरुवरी प्रेम । अतिशयेसी ॥१७॥
कांही काल वाराणशीसी । होते श्रीगुरुंचे संगतीसी । गुरुबंशु उभयतांसी । मानिती एकमेकां ॥१८॥
समर्थ शिष्य विश्वनाथ । नामें होता भाग्यवंत । तयासी समर्थ आज्ञापित । कर्‍हाड क्षेत्री जावया ॥१९॥
शांताश्रम यतीपाशीं । जावें तुवां वेगेसी । सेवा करावी अहर्निशीं । ती आम्हां पावेल ॥२०॥
म्हणती प्रसाद घ्यावा । साधनी देहा झिजवावा । मम कृपें परलोक साधावा । वदती ऐसें ॥२१॥
यज्ञेश्वर वैदिक विद्वान । श्रीगुरुसी गेले शरण । अनुग्रह मंत्र घेऊन । सेवा केली एकनिष्ठें ॥२२॥
नामपुरश्वरणें केलीं । वेदविद्या गुरुसी अर्पिली । चित्तासी समाधानता आली । साधनबळें ॥२३॥
सद्‍गुरु बहु संतोषले । विश्वनाथ नाम ठेविलें । सर्व अधिकार तया दिधले । वाढवा म्हणती भक्तिपंथ ॥२४॥
मठ केला आटपाडीसी । स्थापिलें राममंदिरासी । शिष्याशाखा बहुवास । रामनाम गर्जतसे ॥२५॥
गुरुदक्षिणा विद्येप्रत । द्यावया कवण निमित्य । म्हणाल तरी ’ उदर ’ भरित । होते भिक्षुकी करोनी ॥२६॥
वेदविक्रय वंचक वृत्ति । येणें न घडे भगवद्‍भक्ती । यास्तव श्रीगुरुप्रति । अर्पण करोनि सोडिली ॥२७॥
कृष्णा नामे कुच्चिकर । यांचे शिष्य होते चतुर । श्रध्दायुक्त सुनामगजर । करणेविषयी प्रसिध्द ॥२८॥
कुरवली श्रीसिध्दस्थान । तेथील दामोदरबुवा म्हणोन । गोसावी हरिदास धरिती चरण । सद्‍गुरु महाराजांचे ॥२९॥
अति कठिण सेवा करिती । निच कामे अंगिकारिती । गुरुचरणी अतिप्रीती । प्रपंचआस्था टाकिली ॥३०॥
पडेल तें काम करावें । जैसे मिळेल तैसें खावें । सदा संतोषी असावें । नाम ध्यावे आदरें ॥३१॥
दोन तप संगतीसी । राहिले गुरुसेवेसी । सद्‍गुरु होवोनी संतोषी । दीक्षा दिधली तयाप्रति ॥३२॥
अनुग्रहाचा अधिकार । देते झाले गुरुवर । गोमवाडीचे मंदिर । सेवा तेथें सांगितली ॥३३॥
कांहीकाल पर्यंत । होते तेथें सेवा करित । पुढें कुरवली जन्मग्रामांत । आज्ञे मंदिर स्थापिलें ॥३४॥
कुरवलीसी मठ केला । शिष्य समुदाय वाढविला । दीन जनासी दाविला । बोधूनियां सुपंथ ॥३५॥
भजन अत्यंत प्रेमळ । उंचस्वार आणि रसाळ । परिसतां वाटे मायाजाळ । सोडूनि भजनीं लागावें ॥३६॥
असो ऐसे दामुबुवा । सन्मार्गी लावी जीवा । गुरुप्रसाद वानावा । शिकवी म्हणोनी ॥३७॥
विष्णुबुवा कुंभोजकर । नामे देशस्त द्विजवर । श्रीगुरुचें किंकर । झाले श्रोते अवधारा ॥३८॥
सहज गेले दर्शनासी । देखिले श्रीगुरुचरणासी । समाधान झाले मानसीं । पाहोन ज्ञान उपासना ॥३९॥
भूत भविष्य वर्तमान । जाणोन प्राकृतासमान । प्रपंच परमार्थ चालवून । समाधानी गुरुमूर्ति ॥४०॥
अनुग्रह घ्यावा ऐसी चित्ती । उदित होय स्वयंस्फूर्ति । तेव्हां करिती विनंती । दीना हातां धरावें ॥४१॥
समर्थ वदती तयासी विसरला मागील गुरुसी । तसेंच कराल आम्हांसी । तरी कैसें करावें ॥४२॥
गुरु म्हणजे नव्हे मेवा । लागे देह अर्पावा । तरीच त्या देवाधिदेवा । होईल भेटी ॥४३॥
एक गुरु असतां पाही । दुजा श्लाध्य नाही । गुरुक्षोम घडतां पाही । ठाव कोठेहि न मिळे ॥४४॥
श्रीगुरुंनीं बोध केला । तेव्हां मनी आठव झाला। शिवमंत्र असे दिधला । पूर्वी एका गुरुनें ॥४५॥
आणिक सांगिरली खूण । तुजसी होईल विस्मरण । भेटता सच्चितानंदघन । बोध करितील पुनरपि ॥४६॥
तयासि सद्‍गुरु मानावें । चित्त तेथेंचि अर्पावें । जिणें सार्थक करोन घ्यावें । सद‍गुरुसेवा करोनी ॥४७॥
सर्व व्रतांत निवेदिला । श्रीगुरुनीं अनुग्रह केला । तोच मंत्र उपदेशिला । शिवउपासना लाविली ॥४८॥
शिव आणि रघुपती । भेद न मानी कल्पांतीं । आसनीं असतां एकांती । शिवमंत्र जपावा ॥४९॥
येरवी स्मरावा श्रीराम । जो शिवाचा आराम । भक्तकाज कल्पद्रुम । अखंद वदनीं असावा ॥५०॥
असो अनुग्रह घेवोन । बहुत केलें साधन । तैसे करिती तीर्थाटन । चौधाम सप्तपुर्‍या ॥५१॥
द्वादश ज्योतिर्लिंगे केली । बहुत वेळां यात्रा झाली । पुन्हां तीर्थांची माउली । सद्‍गुरु भेटी पावले ॥५२॥
स्थिती पाहोन आज्ञा देती । सर्व अधिकार तुम्हाप्रती । वाढवावी श्रीरामभक्ती । नौका जी भवनदीची ॥५३॥
गुरुआज्ञा घेवोन । पावले वर्‍हाडी सेंदुर जन । मठ केला ब्रह्मचैतन्य । शिष्य समुदाय वाढविला ॥५४॥
मारुतीराव पिटके म्हणोनि । गृहस्थाश्रमी साधक ज्ञानी । दीक्षानुग्रह द्यावया लागोनी । अधिकारी जाहले ॥५५॥
अंतर्ज्ञानी नि:संदेही । परी महती मुळींच नाही । शिष्यशाखा असे पाही । हो ना करीत थोडीसी ॥५६॥
तम्हणशास्त्री नवलगुंद । याहीवरी झाला प्रसाद । दीक्षा देवोनी सच्चिदानंद क। नामाभिधान ठेविलें ॥५७॥
यांचा मठ हुबळीसी । बाढविती रामभक्तीसी । शिष्यशाखाही अल्पशी । केली गुरुप्रसादें ॥५८॥
यावगली शिवदीक्षित । कर्नाटकी झाले संत । गुरुआज्ञा मानोनी नेमस्त । उपासना चालविती ॥५९॥
यांचे येथें दत्तस्थापना । स्वयें करी सद्‍गुरुराणा । तेथेंच श्रीजानकीरमणा । प्रतिष्ठा केली आदरें ॥६०॥
उप्पन बेटटीगिरीकर । कृष्णशास्त्री झाले किंकएर । साधनी झिजविती शरीर । शुध्दभाव गुरुचरणीं ॥६१॥
गुरु शिष्य महासागर । तयांचा न लागे पार । अल्प प्रगट वदलें थोर । श्रोती रोष न धरावा ॥६२॥
ऐसे हे संतजन । ज्यांचे अंतरी सीतारमण । तयांसी करोनी नमन । पुढील कथा विस्तारू ॥६३॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते अष्टोध्यायांतर्गत तृतीय समास। ओवीसंख्या ॥६३॥
॥ श्रीगुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP