श्रीगणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: ।  श्रीरामसमर्थ ।
दुजे शिष्य ब्रह्मानंद । दृढ धरिलें गुरुपद । सिध्द होवोनी प्रसिध्द । जगदोध्दार बहु केला ॥१॥
कर्नाटकीं विजापूर प्रांत । बदामीसंनिध जालिहाळ वदत । तेथें विप्र कुटुंब नांदत । स्वधर्म कर्मी दक्ष सदा ॥२॥
भारद्वाज गोत्री परम । गाडगुळा ऐसें उपनाम । बाळंभटट द्विजोत्तम । भार्या सती जिऊबाई ॥३॥
रेणुका उपास्य दैवत । तिचे कृपें चार सुत । माजी अनंतभटट विख्यात । जाहले श्री ब्रह्मानंद ॥४॥
बालपणी हूड भारी । मुले जमवोन भजन करी । व्रतबंध झालिया उपरीं । शास्त्र शिको घातलें ॥५॥
मुळगुंद येथील विद्वान । नामें गुरु शास्त्री ब्राह्मण । तया जवळी राहोन । विद्या बहुत पठण केली ॥६॥
काव्य तर्क वेदांत । वेद पठण थोडें बहुत । शिकोण झाले पंडीत । जगमान्य ॥७॥
निरोप आले गृहासी । मायबापें झाली हर्षी । करू म्हणती विवाहासी । सुशील कन्या पाहोनि ॥८॥
तंव अनंतें देह भोग । हस्ती दाविला कुष्ठरोग । तनिमित्तें विवाह योग । टाळिला साधनीं विक्षेप ॥९॥
माता पितयासी विनविलें । देहभोत भोगणें घडलें । उपशमन पाहिजे केले  । ईशसेवा करुनी ॥१०॥
या निमित्तें आज्ञा घेतली । स्वारी तेथून निघाली । सोर्टूर संनिध पावली । व्यंक डेशासमीप ॥११॥
भोंवतीं डोंगर उंच गाढे । माजीं व्यंकटवाडे खेडें । काळ धर्मे पड्ले उघडें । ओस आणि निर्मनुष्य ॥१२॥
संनिध ओहोळ आणि कुंड । झाडी विशाळ आणि प्रचंड । श्र्वापदें नांदती उदंड । भयानक स्थळ ॥१३॥
कर्नाटकी व्यंकटेश । दैवत असें विशेष । तैसे तेथें एक ओस । मंदीर पूर्वीचें ॥१४॥
स्वयंभू व्यंकटेश मूर्ती । नसे कांही अवयवाकृती । तेथें जावोन राहती । निर्मनुष्य जंगलांत ॥१५॥
एकांती एकाग्रता भक्तीस । वृत्ति साधनी स्थिर केली । सेवा निष्ठेनें । चालविली । व्यंकटेशप्रभूची ॥१६॥
उष:काली स्नान करोनी । अनुष्ठान करिती माध्यान्हीं । सोर्टुरीं भिक्षा आणोनी । पुष्करणी कुंडी बुडविती ॥१७॥
व्यंकटेशा नैवेद्य दावोन । एकवेळ  करिती भोजन । पुनरपी श्री आराधना । अहोरात्र चालविती ॥१८॥
जेथें दिवसा कोणी न करिती । तेथें केली नित्यवस्ती । वैराग्य उपजलें चित्तीं । देह सार्थक करावें ॥१९॥
विनवीत श्री व्यंकटेशा । भवभय हारका परेशा । पुरवावी येवढी आशा । देह सार्थकीं लावावा ॥२०॥
बहुत शास्ते पठण केली । परी समाधानता नाही आली । समाधानाची साउली । व्यंकटरमणा दावावी ॥२१॥
करुणा भाकिती वेळोवेळीं । नऊ मास सेवा केली । जगन्माय संतोषली । स्वप्नीं येवोनि सांगत ॥२२॥
आतां अनुष्ठान पुरें करावें । त्वरित उत्तरेसी जावें । सद‍गुरुचरणी लीन व्हावें । खाणाखुणा सांगितल्या ॥२३॥
अनंत जन्मांचीं सुकृत्यें । फळा येतील जा तेथें । कामना व्याधी समस्ते । हरतील सकल गुरुराव ॥२४॥
स्वारी तेथून निघाले । उत्तरेप्रती चालिली । वाराणसी वस्ती केली । कांही कालपर्यंत ॥२५॥
कृष्णानंद स्वामीपाशीं । पुन्हां केलें पठणासी । गीता उपनिषद भाष्यासी । शारीरभाष्य वेदांत ॥२६॥
विद्वता झाली गहन । तरी नोहे समाधान । मनीं ध्यानीं सद्‍गुरुचरण । कोठें भेटतील मजलागी ॥२७॥
काशी प्रयाग नारायण । आयोध्या मथुरा वृंदावन । सकल तीर्थे फिरुन । गुरुमाय शोधिती ॥२८॥
फिरत आले इंदुरासी । तेथें देखिलें गुरुसी । दृष्टांतीं लक्षणें जैसी । तैसी तेथें पाहिली ॥२९॥
तेंचि रुप तेंचि ध्यान । परी नाही ज्ञानचिन्ह । पोरासवे देखती जाण । अज्ञानासारिखे ॥३०॥
नाहीं गीताभाष्य उपनिषद । पूर्वपक्ष उत्तरपक्ष वाद । परमार्थाचा संवाद । तोहि दिसेना ॥३१॥
प्राकृत भाषा बोलती । नाही संस्कृत व्युत्पत्ती । तरी तेथें ज्ञानप्राप्ती । मजसी काय होईल ॥३२॥
वारानसी देखीले साधू । तेथें होत वादविवाद । वेदांतचर्चा अनुवाद । पूर्वपक्ष आणि सिध्दांत ॥३३॥
येथें कांहीच दिसेना । ऐसा विकल्प झाला मना । परी वेध लागला सुटेना । दर्शनें आनंद होतसे ॥३४॥
लीला दाविती गुरुराव । येथें शब्द ज्ञान वैभव । गुंतली वृत्ती अनुभव । सुखासी नाही देखिलें ॥३५॥
नित्य दर्शनासी येती । सदगुरु बळेंची वागती । बालकासवें करिती हास्यविनोद ॥३६॥
ऐसा काळ बहुत गेला । दर्शनाचा हव्यास लागला । परी मनीं विकल्प आला । ज्ञानचिन्ह दिसेना ॥३७॥
शरण जावें वा न जावें । ऐसें चित्ती पडले गोवे । उगाच पहात बसावें । सद्‍गुरुलीला ॥३८॥
भोळे भाविक दर्शना येती । चरणीं लोटांगण घालिती । सद्‍गुरु समाधान करिती । ज्याचे त्यापरी ॥३९॥
देह व्याधी दूर करिती । भूत पिशाच्चें शरण येती । रामनाम प्रस्थापिती । सकळां ठायीं ॥४०॥
पराव्याचें जाणोनि अंतर । नेमकेचि देती प्रत्युत्तर । नित्य घडती चमत्कार । पाहतां विस्मय वाटतसे ॥४१॥
संगतीसुखा लोलुप झाले । अहंता विकल्प मावळले । अनुतापें पोळोनि चालिलें । शरण पदीं रिघ्राया ॥४२॥
पाहोन चित्तशुध्दी झाली । गुरुमाय पान्हावली । ब्रह्मानंदी मग्न केली । वृत्ती अनंतभटटाची ॥४३॥
नाम ठेविलें ब्रह्मानंद । दिधला अनुग्रह प्रसाद । सकलांसि झाला अनंद । अनंतशास्त्री शरण आले ॥४४॥
अंगोवरोन हात फिरविती । देहव्याधि त्रस्त वदतई । ब्रह्मानंद तैं विनविती । देहातीत सुख असावें ॥४५॥
प्रारब्ध भोगोनि सारावें । कर्मबंधनापासोन सुटावें । तरीच परमार्थ फावें । बंधरहित ॥४६॥
सद्‍गुरु पुढें आज्ञापिती । जावें नर्मदातीराप्रती । ओंकारेश्वर उमापती । स्नान जेथें ॥४७॥
निर्मनुष्य आरण्यांत । शिवालय जीर्ण बहुत । तेथें जावोनि सतत । नामस्मरण करावें ॥४८॥
ऐशी आज्ञा होतां पाही । शीघ्र पावले त्या ठायीं । जेथें मनुष्य वस्ती नाहीं । हिंस्त्र श्वापदें हिंडती ॥४९॥
साधोनियां एकांतवास । जप केला साह्या मास । प्रगट झाले गुरुपरेश । शिंवालिंगामधोनी ॥५०॥
पोटीं धरोनि कुरवाळिलें । अनुष्ठान समाप्त करविलें । सवेंचि तेथें गुप्त झालें । गोंदावलीस यावें म्हणोनि ॥५१॥
गोंदावलीं येऊनि दर्शन घेती । अति आदरें सेवा करिती । कांही दिवसां उपरांती । आज्ञा करिती गुरुराव ॥५२॥
सर्व अधिकार दिधले तुम्हांसी । आतां जावें कर्नाटकासी । वाढवावें समर्थपंथासी । राममंदिर स्थापावें ॥५३॥
वृक्ष न वाढे वृक्षाखालीं । ऐसें वदती ते काळीं । जावोनि नामपोई घाली । हीच सेवा आमुची ॥५४॥
गुरु निरोपें निघाले । ते कपोतेश्वरीं आले । एक तप अनुष्ठान केलें । तेरा कोटी जपावें ॥५५॥
बेलधडीस आले तेथोनी । मनीं चिंतिती समर्थ वाणी । मंदिर बांधावें ह्मणोनी । आज्ञा मज झाली असे ॥५६॥
ऐसी चिंता लागली । तव समर्थ स्वारी आली । चरणी लोटांगण घाली । ब्रह्मानंद शिष्यराणा ॥५७॥
महाराज वदती काय चिंता । रामकृपें सर्व सिद्वता । रामभक्ता साह्य करिता । यदर्थी शंका नसावी ॥५८॥
बोधें चित्त शांतविती । मग आले गोंदावली प्रती । इकडे वर्तली चमत्कृती । श्रोतेजनीं परिसावी ॥५९॥
मंदिर कैसें बांधावें । कैसें द्र्व्य मेळवावें । गुरु आज्ञे सादर व्हावें । इच्छिती ऐसे ॥६०॥
गांवोगावीं जावोनि । बहुत द्र्व्य मेळवून । मंदिर बांधिले शोभायमान । बेलधडी क्षेत्रासी ॥६१॥
राम स्थापना करायासी । आणिलें श्रीसमर्थासी । तृप्त केले बहुवसी । अन्नदानें विप्रगण ॥६२॥
कांही दिवसां उपरांती । उसनी अवस्था धरिती । उन्मती अवस्था धरिती । उडाली मुळी देह स्मृती । बंधन बहुतजन्मीचें ॥६३॥
कोठेंही पडोनी राहावें । कोणासवें न बोलावें । अत्यानंद डुलत रहावें । अन्नवस्त्रा चाडा नहीं ॥६४॥
ऐसी ही उन्मती अवस्था । वेडगळ वाटे समस्तां । परी जोडाल्या अनंत सुकृतां । जीवा समाधान देतसे ॥६५॥
असो ऐसे ब्रह्मानंद । सेवोनि श्रीगुरुप्रसाद । उन्मत होवोन निजानंद । भोगिती सिध्द सोहळा ॥६६॥
पुन्हां लोककार्य करिती । लोकांसारिखे वावरती । बीज भाजल्या उपरांति । रुजणेचें भय नाही ॥६७॥
तेथून पुढें नरगुंदासी । करविले राम जपासी । तेराकोट पुरश्चरणासी विप्रा मुखे ॥६८॥
सांगतेची केली सिध्दता । परी जलाची नसे पुर्तता । अधिकारी वदती भक्ता । उत्साह तेथें न करावा ॥६९॥
ब्रह्मानंद वदती धीर धरा । रामकृपें सुटतील धारा । तंव अकस्मात मेघ भरारा । येवोनी जल वर्षति ॥७०॥
जलस्थानें भरोन गेलीं । भक्त मंडळी आनंदली । देव दासांचा वाली । उणें दिसतां धांवतसे ॥७१॥
जावोनि स्वयें गोंदावलीसी । विनविती श्रीगुरुसी । आलिया जप सांगतेसी । आनंदी आनंद वाढेल ॥७२॥
जैसा देव भक्त प्राण । तैसे गुरुशिष्याधान ल। नरगुंदा लाघलें निधान । जगदोध्दारक महाराज ॥७३॥
होम हवन अन्नदान । पुराण भजन निरुपण । भूतां पुजोनि भगवान । संतुष्ट केले ब्रह्मानंदें ॥७४॥
असो ऐसे ब्रह्मानंद । स्वयें पावले सद्‍गुरुपद । बहुतांसी अनुग्रह प्रसाद । देवोन सुमार्ग लाविलें ॥७५॥
पुढें बिदरळीसी । गोपाळ कृष्ण मंदिरासी । केलें जीर्णोध्दारासी । अन्नदान अगणित ॥७६॥
तेरा कोटी जप सांगता । होम हवनादी पुर्तता । आणवोनि सद्‍गुरुनाथा । याचक बहु तोषविले ॥७७॥
आजन्म ब्रह्मचर्य राहिले । व्यंकटापूर ठाणे केलें । चिरेंबंदी मंदिर बांधिलें । भव्य आणि सुंदर ॥७८॥
श्रीराम आणि हनुमान । तैसे महाराज ब्रह्मानंद जाण । गुरुभक्त मानिती तयालागुन । सद्‍गुरुसारिखे ॥७९॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते अष्टोध्यायांतर्गत द्वितीयसमास: । ओवीसंख्या ॥७९॥
॥ श्रीगुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 23, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP