भगवद्गीतास्तोत्र - अध्याय सोळावा

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७८२०॥
ऐके गुणवंता किरीटी । दैवें फळ दिल्या हाटीं ॥१॥
गुण उत्तम धरिजे । सत्वशुद्धि भय त्यागीजे ॥२॥
ज्ञानयांत थोरपणें । दान दम याग करणें ॥३॥
तप शास्त्र वांकुडा । तोचि तुकया सौंगडा ॥४॥

॥७८२१॥
सत्य राग न अहिंसा । त्याग शांतिचा भरंवसा ॥१॥
अपैशून्य मनीं लाज । दया भूतीं मृदु काज ॥२॥
स्थैर्य निस्पृह लक्षणें । मी ओवाळी पंचप्राणें ॥३॥
धन्य माउली तुकयाची । कुसी सुफळ पुण्याची ॥४॥

॥७८२२॥
न ज्या श्लाघ्य परद्रोहो । नसणें धारणा उत्साहो ॥१॥
क्षमा शुद्धता पैं तेज । हें होती गा दैवें आज ॥२॥
संपत्तिचा तोची नर । मिरवी भूषणीं शरीर ॥३॥
दैवी देवाची ह्मणावी । वस्ती तुकयाची गावीं ॥४॥

॥७८२३॥
आतां दंभ दर्पगुणें । वसवीं अहंतेचें ठाणें ॥१॥
क्रोध क्रूर अवक्रता । आसुरी संपदा अहिता ॥२॥
ज्यास होती तो पावला । कांदा जेवीं दुर्गंधीला ॥३॥
त्यजी कस्तुरीचें आळें । तुका ह्मणे मस्तीबळें ॥४॥

॥७८२४॥
दैवी संपदा मोक्षार्थ । पहिला सांगितला अर्थ ॥१॥
भवबंधार्थ आसुरी । जे हे वर्णितों दूसरी ॥२॥
शोक न करी पांडवा । वरुं आलीयास देवां ॥३॥
तूं गा दैवी संपत्तिचा । भाव दर्पण तुकयाचा ॥४॥

॥७८२५॥
द्विधा उद्भव भूतांचा । दैव आणि आसुरांचा ॥१॥
विस्तारें वदलों दैव । सुचिन्हाचा प्रादुर्भाव ॥२॥
आतां आसुरा आइक । मन देउनी नावेक ॥२॥
जेथें दुश्चिन्हांचा मेळ । तुकया न मानी तो खेळ ॥४॥

॥७८२६॥
कामप्रवृत्ति धर्मार्थी । कीं मोक्षार्थी निष्काम ॥१॥
नेणतीच द्वय मार्गा । विषय वर्गावर पडे ॥२॥
शौच आचार तो नाहीं । जैसे महीषी ही रेडे ॥३॥
असुरां त्यां नसे त्यां नसे सत्य । तुकया गत मग कैंची ॥४॥

॥७८२७॥
ईशावीण वर्णिताते । विश्वोत्पत्ती कामानें ॥१॥
देव ह्मणीजे कृत्रिम । सर्व क्रम आपुला ॥२॥
विश्वा कैसेनि उद्योग । हा संयोग स्त्री नरा ॥३॥
अहो मैथुनावांचून । कैं दिसून ये तुका ॥४॥

॥७८२८॥
दृष्टि ज्यांची प्रत्यक्षी हे । न जो पाहे सद्वाक्य ॥१॥
अल्पबुद्धि जो भ्रष्टधी । कोणें कधीं उद्धरे ॥२॥
लोक घातीं क्रूरकर्मी । पाहे उर्मी बळाची ॥३॥
दुष्ट चार्वाक वर्ततां । नेणे संता तुकया ॥४॥

॥७८२९॥
दंभ श्लाघा मदें मस्त । अंगें सुस्त बोकड ॥१॥
कामासिंधुंत बुडाला । जो उडाला मर्यादे ॥२॥
मोहे घेऊनी दुर्बुद्धि । हुंगी गंधी योनीची ॥३॥
व्रतीं शुचीं वर्तती । तुकयाप्रती दे त्रासू ॥४॥

॥७८३०॥
मरणादि चिंता नाना । आठवीना रोगासी ॥१॥
भय न धरी यमाचें । तो रामाचें काय लागे ॥२॥
भोग पुरुषार्थ भोगी । देह भंगीं आपण ॥३॥
प्रत्यक्षींच निश्चय जया । तो तुकया न पाहे ॥४॥

॥७८३१॥
आशापाश ते निबद्ध । दे विरुद्ध श्रीपादा ॥१॥
कामक्रोधासी आश्रित । कीं मिश्रित लोभांगीं ॥२॥
इह लोकींच्या भोगार्था । परमार्था नायके ॥३॥
धन अन्याय संग्रह । तुका ग्रहरुप त्या ॥४॥

॥७८३२॥
मेळविलें आजी म्यां हें । हिशोब पाहे दफ्‍तरीं ॥१॥
मनोरथ हा होणार । कीं सोनार दे डांक ॥२॥
मज आहे हें बोलती । पैं कोलती पिशाची ॥३॥
पुन्हा धन दैवें मीळे । तुकया खळें गांजावें ॥४॥

॥७८३३॥
आज वैरि हा मारिला । आणिकांला मारीन ॥१॥
समर्थ तो मीच भोक्ता । ऐसा वक्ता अस्मादि ॥२॥
बळें मीच सिद्ध मीच गर्वे चिंच वांकली ॥३॥
तुका पाहिला तुकून । मी सधन सुखाचा ॥४॥

॥७८३४॥
मला दूत समृद्ध मी । जग न मी न पाहे ॥१॥
मज सारिखा कोण हो । भरी होन हो हुंडीचे ॥२॥
मातें भजे त्यास सुखें । मी असंख्य देणारा ॥३॥
वदती दैत्य हे श्रौत कीं । कुबेर तुकीं तुकेना ॥४॥

॥७८३५॥
चित्तीं स्वर्गादिका भ्रांती । ते महंती कोरडी ॥१॥
मोहजाळेंच वेष्टिलें । प्रतिष्ठिलें स्त्रीवृंदीं ॥२॥
न पुरेच काम देहीं । मग विदेही जैं होती ॥३॥
तेव्हां पडती नरकांत । तुकया भ्रांत लागेना ॥४॥

॥७८३६॥
देहीं धनें मानें मदें । तंतु आल्हादे गर्विष्ठ ॥१॥
पोसले जैसे वृक । दिनाविक मांसानी ॥२॥
यज्ञ यजती नावांचे । कीं दंभाचे डांगोरे ॥३॥
विधिपूर्वक चुकले । ते मुकले तुकयासी ॥४॥

॥७८३७॥
शरीरीं अहंकार पेटे । वन्ही न पाहे वसोटे ॥
बळें शुल्कवन्ही झटे । गर्व दावी तेजाचा ॥१॥
काम कापुर मिळवणी । क्रोध गंधकाची खाणी ॥
झाला श्रित घृतकर्णी । उरों नेदी चाटितु ॥२॥
ममअंशे जग झालें । ऐसें ज्यास उमजलें ॥
इहीं तयास भर्जीलें । ऐसा गा पुढां द्वेषिती ॥३॥
ज्वाळा निंदेची खडतर । पोळी साधूचें जिव्हार ॥
तेथें तुकायाचा थार । आहे आहे नाहीं नाहीं ॥४॥

॥७८३८॥
परताप मत्सेवका । पाहोन आकांत या लोका ॥
मेघ मी वोळे त्या पावका । हस्तोदका चित्रेंसी ॥१॥
माझी क्रूरपणाची तीख नभीं चमके लखलख ॥
तेव्हां पडे काळें मुख । जें गुंडाळे धुवारे ॥२॥
नराधमाची विभूती । आसुरी पोटी धुंधुवाती ॥
पडे तेथें उद्भवती । सदा काळ कोळसे ॥३॥
दुष्ट योनी पुन:पुना । अन्य मार्गु नेणे सीन्हा ॥
कां जे तुकयाचा तान्हा । खळें आगळा गांजीला ॥४॥

॥७८३९॥
आसुरी योनीं मूढ । जन्मोजन्मीं पावे दृढ ॥
तें ही न ठेवीं मी गूढ । येथें उघड सांगतों ॥१॥
भील कावळा कीं बोका । कर्मठाही सेर टोलका ॥
मुंगळा मातंक मंडुका । कंटक रुख पाषाण ॥२॥
गीध व्याघ्र क्रोड पीसा । योनी भोगुनियां अशा ॥
मग यमदंडे त्रासा । पावे पडे रौरवीं ॥३॥
जेथें अंत न लगे रवी । वायु खुंटे त्या आथावी ॥
पडे विसर मग जीवीं । झाला पुरा तुकयाचा ॥४॥

॥७८४०॥
जावया नरक कूपीं । तीन द्वारें हीं साक्षेपीं ॥
हातीं लागलीया पापी । बळें देती ढकलूने ॥१॥
आत्मघातक यास्तव । आह्मी ठेवूं यांचें नांव ॥
कां कीं न चले उपाव । येथें कोटी साधनीं ॥२॥
तरी काम क्रोध लोभ । तीन द्वारें हीं स्वयंभ ॥
ज्याचा भुवनत्रयीं क्षोभ । कांपे अवघा भूगोळ ॥३॥
तस्मात्‍ शाहाणा तूं होसी । तरी त्यागी या तीघांसी ॥
मग शुद्ध मार्गा जासी । जैसा तुका वैकुंठा ॥४॥

॥७८४१॥
या त्रि नरकद्वारा । पासुनियां धनुर्धरा ॥
सुटला तो नर त्वरां । साधनाच्या पाउटीं ॥१॥
आत्मश्रेय आचरोनी । राहे उंस जनीं वनीं ॥
सदा सावधान मनीं । हित वागे आपुलें ॥२॥
त्या थोरास थोर गती । होय जनकादी संगती ।
अथवा तुकया पंगती । प्रसादीक घे लाभुअ ॥३॥

॥७८४२॥
सत्य शास्त्रार्थ विहीन । विधि वास विसर्जन ॥
श्रुति पाठ दे लाजुन । ऐसा जो कां उन्मतु ॥१॥
वागणें ते स्वेच्छाचार । जेवीं अकाळीं जळधर ॥
कार्यनाश परी उर । फोडी देउनी किंकाळी ॥२॥
सिद्धी वनस्पती कैंची । शुभा अशुभा सुखाची ॥
नव्हे गोष्टी ते मुखाची पडे धर्म दुष्काळु ॥३॥
उत्तम गती त्याची हे गा । आपण मरे पीडी जगा ॥
किंवा वोणवा आवघा । तुका ह्मणे दे त्रासु ॥४॥

॥७८४३॥
तस्मात्‍ उत्तम सच्छास्त्र । जैसें साळंकारी वस्त्र ॥
किंवा विष्णुनामें वक्र । वैष्णवाचें रंगलें ॥१॥
विचारितां कार्याकार्य । वंद्य होय जनीं आर्य ॥
किंवा शिष्य गुरुवर्य । माया जेवीं तान्हयां ॥२॥
शास्त्रें विधियुक्त जाणोनी । वागे जैसा द्वयपाणी ॥
कर्म योग्य तूं अवनीं । होसी सखया ऐक रे ॥३॥
तुका जैसा कां निष्काम । झाला जगास विश्राम ॥
तेवीं तुझा गा आराम । विश्व मनीं मानीला ॥४॥

॥७८४४॥
ऐसा बोध करी विष्णु । वासूदेव जो सहिष्णु ॥
जड जीव जगद्विष्णु । ऐके जिष्णु सावधान ॥१॥
संपदेचा हा संशय । वारुनियां यदुराय ॥
केला षोडशीं आत्रेय । ज्ञाननभीं आवडीं ॥२॥
परी त्याची जीवन कळा । होती स्वाधीन गोपाळा ॥
तेही न राखे वेगळा । अर्पण करी किरीटासी ॥३॥
तेंच सत्रावीचें पय । प्राशिल जेथें वत्स न्याय ॥
तेथें तुकया प्रत्यय । वदे गुरुदास पैं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 19, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP