भगवद्गीतास्तोत्र - अध्याय सहावा

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७४६८॥
पांडवासि विस्मय । देव वदतां योगीराय ॥
आपणा ठावका अन्वय । असावा हें वाटलें ॥१॥
मग पुसावें हा हेत । कां कीं जेथें हरिप्रीत ।
तेंच आपुलें ही हित । हें तों कधीं टळेना ॥२॥
ऐसा भाव अंतरींचा । जाणुनि सखा वदे वाचा ॥
ऐके पार्था संशयाचा । मूळ ठावो फिटेल ॥३॥
आह्मी अंतरीं ठेविजे । मग तें कोणासी अर्पिजे ॥
ऐसें न भेटेल दूजें । पैं मायेचें आवडतें ॥४॥
अनन्यासी वंची जो कां । होय अधिकारी पातका ॥
असो काळजी सूटका । आजि झालें हें भाग्य ॥५॥
दाना योग्य तूं सत्पात्र । जैसें कन्येजोगें गोत्र ॥
अथवा परमार्थी श्रोत्र । जैसा दीजे विरक्तीं ॥६॥
तरी ऐके विचक्षणा । गुज घेई अंत:करणां ॥
अनश्रुत हे वासना । कर्मफळीं ज्या नाहीं ॥७॥
करावें तें करीतो । तोच योगी संन्यासी तो ॥
निरग्रिही जो होतो । अक्रिय तो नाहीं ॥८॥
तुका वदे विचक्षणीं । मांदुस गीता रत्नखाणी ॥
घ्यावें एकेक निवडुनी । वचनें शेषशायीचीं ॥९॥

॥७४६९॥
ह्मणावा जो संन्यास तो । कर्मयोग सिद्ध होतो ॥
दोहीं मार्गे जैसा जातो । एका क्षेत्रा वंदाया ॥१॥
कीं या काम्याचे त्यागें । जो संन्यास घे तूं अंगें ॥
कर्मयोगाही प्रसंगें । नव्हे कांहीं दुसरा ॥२॥
तुका विनवी भावार्थी । लोक परिसो परमार्थी ॥
ज्यास प्रीत योगपंथीं । अहर्निशीं अखंड ॥३॥

॥७४७०॥
योगारुढ जो कां ज्ञाता । जगीं व्हावया मान्यता ॥
संपादित आमुची वार्त्ता । पैं गा जीवीं धरुनी ॥१॥
कर्म त्यास ही पांडवा । कारण होय या गौरवा ॥
जैसें तेलबळें दिवा । प्रभा दावी अनंत ॥२॥
तया योगारुढा लागीं । ध्यानस्थित कारणअंगीं ॥
पुढें उजळी हेमांगीं । तुकया कारागीर तो ॥३॥

॥७४७१॥
जेव्हां न विषयीं कदा । गुंते दैवीक संपदा ॥
तुज सांगतों प्रमदा । लाघव जैसें शुकासी ॥१॥
कर्मी ही न रुते मन । जैसें श्रीपादा स्वप्न ॥
झाला गज वाजी वाहन । जागा होतां तें मिथ्या ॥२॥
टाकी भोगाचे संकल्प । गेला जीवींचा विकल्प ॥
तेव्हां आरुढ ज्ञानदीप । बोलतो तुकया ऐसें ॥३॥

॥७४७२॥
अरे विषयडोहांत । जें कां बुडालें संतत ॥
तें तंव उद्धरावें चित्त । आत्मबळें अभ्यासें ॥१॥
नये बुडवूं प्रपंचीं । पुढें जाणिव गेल्याची ॥
कोण पुसे धनवंताची । लाज जाय धन गेल्या ॥२॥
मित्र हें आपुलें चित्त । साह्य झाल्या फळ देत ॥
शत्रु ही हेंच होत । हा उद्धरुनि अनर्थ ॥३॥
तुका ह्मणे सर्वाधिक । साधन हेंचि गमे एक ॥
चित्त झाल्या सन्मुख । काय उणें लाभासी ॥४॥

॥७४७३॥
मित्र चित्त तें ह्मणावें । जें कां स्वरुपीं विसावें ।
विश्वरुप अनुभवें । जिंकि स्वात्ममतीनें ॥१॥
हें का अलभ्य साधन । विधि इंद्र चंद्रेशा न ॥
मानवती ऐसा मान । पैं भोगी तें निवाडे ॥२॥
नाहीं तरी अज्ञानांत । मिथ्या भवसिंधु दावीत ॥
तुका ह्मणे जीव भ्रात । होय शुद्ध हें झाल्या ॥३॥

॥७४७४॥
अरे शांताचे कुरुपती । जित चित्ताची आयती ॥
थोरपण हे निगुतीं । चित्त थोरे स्वरुपीं ॥१॥
त्याचें चिन्हेंची वीरा । मान अपमान वारा ॥
झगडल्या या शरीरा । मेरु ऐसी धैर्यता ॥२॥
तैसेंच शीत उष्ण । विषामृता जैसा कृष्ण ॥
सुख दु:खीं तो सहिष्ण । तुकया चकों नेदीजे ॥३॥

॥७४७५॥
ज्ञान भोज्य गुरु हातें । धाला जेवूनी तृप्तीतें ॥
सुखें उद्गार अवचितें । पैं गा दे तूं सर्वदा ॥१॥
जितेंद्रिय ब्रह्मचारी । राहे कूटस्थ व्यापारीं ॥
भासे न भासे अंतरीं । ज्याचा अंत अढळेना ॥२॥
तोच योगारुढ हेम । भेंडा धोंडा जया सम ॥
तुका ह्मणे सर्वोत्तम । हे रोकडी प्रतीती ॥३॥

॥७४७६॥
कोणी कापिलीया मान । दु:खें न पवे रुदन ॥
मित्र जोडे राज शुन ॥ गजवाहनीं मीरवी ॥१॥
दोन्ही सारिखे जयासी । तैसें चित्त सख्यापासी ॥
घेत नित्य विसांव्यासी । असखा ही तेवींच ॥२॥
साधु बोधा मिथ्या बोली । सम बुद्धी पूजा केली ॥
तुका ह्मणे ज्ञानवल्ली । त्याची झाली सुफळ ॥३॥

॥७४७७॥
कर्मयोगीं चित्त योजी सदोदित । जैसा योगी घेत दिव्यरसु ॥१॥
एकांत सेवन आवडतें मन । पथ्यानें लोटून शाहाणा वागे ॥२॥
स्थिर चित्तें चिंती एक जगत्पती । सद्विद्या सत्प्रीती अनुरागें ॥३॥
टाकी आशा तैसा परिग्रह वीरेशा । नाहीं जीवदशा तुका ह्मणे ॥४॥

॥७४७८॥
स्थापूनियां शुद्ध देशी ये प्रसिद्ध । प्रयाग अंबुद्ध संतग्राम ॥१॥
स्थिर हें आपुलें आसन जेणें केलें । बहु उचललें ऐसें नको ॥२॥
नीच तरी भूमी दोष लागे ऊर्मी । कुश मृगचर्मी पट दिव्य ॥३॥
तेथें सुमुहूर्ते बैसावें निरुतेम । आठवीं गुरुतें तुका ह्मणे ॥४॥

॥७४७९॥
करुनी मानस एकाग्र हव्यास । नेदी बाह्य पैस मनाघेवों ॥१॥
स्थिर चित्त होय इंद्रियास क्रिया । वोळंगती पायां सदोदीत ॥२॥
चित्त शुद्धयर्थाचा योग पैं हटाचा । जयो आसनाचा तुका ह्मणे ॥३॥

॥७४८०॥
माज पाठ शीर ग्रीवा नीट स्थीर ॥ धरुनी निर्धार स्थिर कीजे ॥१॥
उठतां उपाधि तैशा देहीं आधी । गिळीजे अंबुधि नदा जैसा ॥२॥
आवरोनी मना धरी जो धारणा ॥ तुका ह्मणे जाणा योगियातो ॥३॥

॥७४८१॥
असे सर्वकाळ चित्तासि निखळ । योजुनी प्रबळ निर्भय जो ॥१॥
शांत मती करणें जीती अंत:करणें ॥ व्रत निर्मळपणें आचरे हें ॥२॥
चित्तासी मद्रूपीं लावुनि निक्षेपी ॥ वसे स्वस्वरुपीं मत्पर जो ॥३॥
तुका ह्मणे तेथें सिद्धी स्व सामर्थ्ये । येतां योगीनाथें न पाहणें ॥४॥

॥७४८२॥
एवं चित्त ऐसें योजुनी विन्यासें ॥ मन हातीं तैसें आकळावें ॥१॥
मोक्षा अधिकारी होय निर्विकारी । शांतिदेवी वरी श्रीकृष्णाची ॥२॥
तुका ह्मणे येथें संशयी अनाथ । पडती त्या पंथ लावी देव ॥३॥

॥७४८३॥
नव्हे योग ऐसा खावें बहु तैसा । लंघनें भरंवसा जाय सारा ॥१॥
बहू झोंप घेणें योगाची लक्षणें । नव्हति किं जागणें चिर जेथें ॥२॥
अर्जुना तूं जाण योगाचें प्रमाण । अंतरींची खूण आह्मीं सांगों ॥३॥
तुका ह्मणे देवो कृपाळु पाहावो । योगाचा बोलावो आतुवडी ॥४॥

॥७४८४॥
युक्तीनें वागीजे शीण न आणीजे । आहार घेईजे स्वल्पु तैसा ॥
चेष्टा कर्म सूत्रें युक्तीचीं पवित्रें । जाणीजे स्वतंत्रें जाणतेनी ॥२॥
निद्रा किंवा जागा येथें महाभागा । युक्ति शुद्ध गंगा पाहिजे गा ॥३॥
तयासी हा दु:ख नासोनी दे सुख । तो योगु पैं चोख तुकया लाभे ॥४॥

॥७४८५॥
आत्मरुपीं चित्त रमे सदोदित । निस्पृह संतृप्त कृपाघन ॥१॥
काम होय शून्य गति ते अनन्य । पाहतां अमान्य न हों आह्मी ॥२॥
सिद्ध ऐसें त्यातें ह्मणावें सर्वार्थे । ऐसें रमानाथें वर्णीयेलें ॥३॥
ध्यान कैसें कीजे तें श्रोत्रीं घेईजे । तुका ह्मणे माझें हीतें ऐका ॥४॥

॥७४८६॥
निर्वात सदनीं दीप उपमेनी । चंचळ आसनीं होऊं नये ॥१॥
योगियाचें चित्त मिळे ऐका मात । मजला हे मात एकविध ॥२॥
किंवा पतिव्रता आलिंगीत कांता । वियोगाची वार्ता सहज राहे ॥३॥
तुका ह्मणे घन वृष्टि धरासन । तैसे योगीं मन स्थिरावलें ॥४॥

॥७४८७॥
जेथें उपरमे चित्त योगप्रेमें । सहज देहधर्मे सांडवला ॥१॥
योगाचिया पंथें निरोधी सर्वार्थ । उसंत पैं जेथें विरामलें ॥२॥
जेथें आत्मा मीळे चित्तानंद मेळें । अखंडित खेळें निरामयीं ॥३॥
पाहातो षट्‍पद जेवीं अरविंद । तुका म्हणे नाद मुर ठायीं ॥४॥

॥७४८८॥
नसे अंत त्यास अनंत म्हणावें । सुखानें मिळावें ऐसें ठायीं ॥१॥
बुद्धि दृढ धरी तैसीच इंद्रियें । दमी योगराय योग्यांचा तो ॥२॥
जाणे त्यातें मग तो हा करितां कर्म । वृत्तीस जो धर्म चलों नेदी ॥३॥
पाउलें पांथिक जैसीं उपेक्षीना । तुका म्हणे मना धरुनी वागे ॥४॥

॥७४८९॥
न मानीं तो लाभ आणखी त्याहूनी । जीवा समाधानी अखंडित ॥१॥
ज्या सुखाची गती हातास आलीया । मग कष्ट झालिया ने घे जीवीं ॥२॥
आधि व्याधि रोग राज क्षोभ झाला । तुका म्हणे त्याला आठवेना ॥३॥

॥७४९०॥
दु:ख संयोगाची धुळी आंगा न लगे । नभ जैसें उबगे वज्रघायें ॥१॥
बुद्धि योगीं कैसी पाण्यांत मासोळी । मग तळमळी पार्था कोण ॥२॥
चित्त आत्मरुपीं राहे सर्व काळ । ऐसें यत्नबळ स्वीकारी तूं ॥३॥
निश्चय सदृढें ऐसा च साधावा । तुका ह्मणे दावा यम न करि ॥४॥

॥७४९१॥
संकल्प करितां कामातें त्यागूनी । शुचि अनुष्ठानीं सर्व त्यागें ॥१॥
मनस्वी खेळतो विषयद्वारीं खळ । कर्ण ग्राम बळ भंजी छंदें ॥२॥
सर्वा ठायीं दंड मना हातीं दिला । कीं लांवा बैसला रामजपीं ॥३॥
तुका ह्मणे गोष्टी फुकट न साधे । विरळा कोटिमध्यें योगीरावो ॥४॥

॥७४९२॥
धारणा युक्ति गुरुमुखें साधी । सहज समाधी प्राप्त होय ॥१॥
नव्हे गाढ मूढ लोक रंजवणें । तटस्थता येणें देहावरी ॥२॥
ताटस्थ्यते नाम समाधी बोलती । उघड फजीती जनामध्यें ॥३॥
येथें स्वरुपांत प्रवेश हळु हळु । स्थिर मन मेळु चिन्मात्रीं च ॥४॥
कांहीं न चिंतावें मग पेंठा झाल्या । तुका ह्मणे आल्या तिन्ही लोक ॥५॥

॥७४९३॥
ज्या ज्या पैं पदार्थी चित्ताचें चळण । निघे तेथें ज्ञान शुद्ध ठेवी ॥१॥
मन हें अस्थिर चंचळ पांडवा । याचा नित्य दावा परमार्थी ॥२॥
म्हणोनि जें पाहे तेथें आत्मा लावी । वशत्वें वळवी मनोवृत्ती ॥३॥
त्यांतची असतां विसरलें पुरे । करावें जागें रे तुका ह्मणे ॥४॥

॥७४९४॥
ऐसे या चित्तातें प्रशांत दशेला । योग्य भासे मला सुख पार्था ॥१॥
साधे रज तमा अतीत ब्रह्मता । रुप अकर्मता तुका ह्मणे ॥२॥

॥७४९५॥
चित्त सदा योजी जैसा कामी वधू । किंवा लक्ष व्याधु धरी वनीं ॥१॥
योगी तो पांडवा दुजी न वासना । मायेवीण तान्हा सुखा नेणे ॥२॥
ब्रह्म स्पर्शे निवे सायासें वेंचला । अत्यंत सुखाला भोक्ता तोची ॥३॥
इतर तीं सोंगें नव्हे संपादणी । तुका ते काहाणी ऐकेचिना ॥४॥

॥७४९६॥
सर्व भूतांमध्यें आत्मा असे एक । भूतें सकळिक आत्मयांत ॥१॥
नित्य योगी चित्त ऐसा ठेवी जरी । सर्व नेत्रद्वारीं समदर्शी ॥२॥
योग नव्हे तरी ऐसा मार्ग चाले । येणे योगें फोल नव्हे साधु ॥३॥
तुका ह्मणे क्रुष्ण एक नवल सांगे । तो श्लोक प्रसंगें ऐकीजे हो ॥४॥

॥७४९७॥
मातें सर्वत्रांत जो पाहे अर्जुना । जगाची भावना न दिसे जया ॥१॥
मज आंत विश्व घेतुं हा अन्वयो । व्यतिरेकें सेव्यो योगची तो ॥२॥
सोडी ना मी मग त्याचा त्यास झाल्या । सृष्टि प्रळय गेल्या रसातळीं ॥३॥
तो हि मज मग सोडीना सहसा । तुका ह्मणे कैसा लाभची हा ॥४॥

॥७४९८॥
सर्व भूतस्था त्या मातें जाणोनियां । भजे एकत्वीं त्या भाव धरी ॥१॥
मजमध्यें चि तो योगीया जाणपा । तेज गर्भी आपा वस्ती जैशी ॥२॥
जरी तो प्रपंचीं सर्वथा गुंतला । तरी मुक्तत्वाला काय वाणूं ॥३॥
तुका ह्मणे ब्रह्मलोकींचे रहिवासी । आले या धरेशी साकारत्वें ॥४॥

॥७४९९॥
समदृष्टी सर्व भूतें । जो का पाहे मद्रूपातें ॥१॥
मजसमान जाणिजे । योगी अर्जुना वंदिजे ॥२॥
देहीं सुख दु:ख लागे । त्याचा निखर न पावेगे ॥३॥
देव ह्मणे माझ्या बोलें । श्रेष्ठ तुकया कळलें ॥४॥

॥७५००॥
करांजळी जोडोनियां । अर्जुन पुसे कृष्णराया ॥१॥
आतां योग बोलिलासी । साम्यें श्लोक चतुष्टयासी ॥२॥
स्थिर मी याच्या स्थिती । न देखें हे कोण गती ॥३॥
सांग मातें मधुसूदना । तुका ह्मणे जगजीवना ॥४॥

॥७५०१॥
मन हेंची कृष्णदेवा । चंचळ वागवी स्वभावा ॥१॥
इंद्रियांत बलोत्तर । ब्रह्महरां अगोचर ॥२॥
याचा निग्रह वायूची । मोट बांधु शक्ती कैंची ॥३॥
तुका येतो काकुलती । येवढी वारावी फजिती ॥४॥

॥७५०२॥
हास्य मुखें दैत्यध्वंस । वदे खरेंच प्रश्नास ॥१॥
तुवां केलें धनुर्धरा । महाबाहो पार्थ वीरा ॥२॥
मन चंचळ दुर्जय । आहे मजला प्रत्यय ॥३॥
तरी अभ्यास वैराग्यें । मन वळिजे संतसंगें ॥४॥
जिंकिजेल जेव्हां मन । तुका तेव्हां समाधान ॥५॥

॥७५०३॥
हेचि बुद्धि कीरें । योग नोहे साकारे ॥१॥
मन नाटोपे जंववरी । योगसिद्धि न त्यावरी ॥२॥
ह्मणोनि प्रयत्नशीळानें वश्य कीजे या साधनें ॥३॥
यत्नशीळा पूढें किती । मग या दुर्मनाची ख्याती ॥४॥
वृथा भय इंद्रियांचें । तुकया बाळा बागुलाचें ॥५॥

॥७५०४॥
अर्जुन पुन्हा विनवितो । एक ऐके हा शब्द तो ॥१॥
निष्ठा असोनि अळसें । नाहीं केला पूर्णाभ्यास ॥२॥
पुढें साधनीं बैसतां । गेलें आयुष्य अनंता ॥३॥
चळे मन दोहीं पक्षीं । ना तो प्रपंच कमळाक्षी ॥४॥

॥७५०५॥
तो काय उभय भ्रष्ट । मेघ थिरगळ पैं नष्ट ॥१॥
अपकें मोह पावे । ब्रह्म मार्गी न त्या पावे ॥२॥
महा भुज देव राजा । मतें आमुचें या काजा ॥३॥
तुका म्हणे हेंच भय । वाटे साधका निश्चय ॥४॥

॥७५०६॥
नि:शेष या संशयासी । उरों नेदी हे विवसी ॥१॥
तूं एक छेदिशी श्रीकृष्णा । आहे भरंवसा सहिष्ण ॥२॥
संहर्ता या संशयाचा । ऐसा प्रताप कोणाचा ॥३॥
गुरु न दिसे तुजवीण । तुका वाहे आपुली आण ॥४॥

॥७५०७॥
हर्षे बोले भगवान । वायां न जाय साधन ॥१॥
येथें अथवा स्वर्गांत । बाधा त्यासि अपीडित ॥२॥
मार्ग कल्याणदायक । कोणी दीन नव्हे लोक ॥३॥
बापा न जाय दुर्गती । तुका ह्मणे याची गती ॥४॥

॥७५०८॥
पुण्यलोकातें पावोनी । राहे अमृत सेवुनी ॥१॥
हर्षे भोग कल्पवरी । त्याची सत्ता सुरांवरी ॥२॥
मग इचू फिरलिया । पावे मृत्युलोकीं येया ॥३॥
शुचि श्रीमंत घरांत । योगभ्रष्ट तुका सुत ॥४॥

॥७५०९॥
किंवा योगियांचे पोटीं । योगभ्रष्ट पावे हटी ॥१॥
अथवा भले कुळीं लोक । तेथें होय प्रकाशक ॥२॥
जन्म दुर्लभ ईशाना । ऐसा लोभ ज्या सज्जना ॥३॥
माता पिता उभय पक्षीं । तुका वदे देव साक्षी ॥४॥

॥७५१०॥
या देहीं पूर्वाभ्यासा । निज मानसा पावेल ॥१॥
पावे बुद्धिचा संयोग । पुन्हा योग आरंभी ॥२॥
मग मोक्ष बहु यत्नें । वेंचि रत्नें मतीचीं ॥३॥
कुरुनंदना सायास । तुका बहुस स्वीकारी ॥४॥

॥७५११॥
अभ्यास तो त्याला पूर्व । बाळ सर्व पावतो ॥१॥
बाळ योजी चित्त जोडे । भ्रांती उडे मायिक ॥२॥
जिज्ञासु वेदागमा । शब्द ब्रह्मा मिळाला ॥३॥
न पडे धन दार पालवीं । तुका याचवी लागल्या ॥४॥

॥७५१२॥
योग साधितां प्रयत्नें । अलभ्य रत्नें हातिये ॥१॥
जया वासना पातकी । काया निकीं प्रक्षाळी ॥२॥
अनेक जन्में क्रियमाणा । मुक्ति राणा वरी तो ॥३॥
तुका ह्मणे हित दिसे । तरि अनयासें ऐकावें ॥४॥

॥७५१३॥
तपियांहुनी थोर । योगीश्वर वंदिजे ॥१॥
माझ्या मतें ह्मणे हरी । ज्ञान्याशिरीं हा दिसे ॥२॥
कर्म योग्याहुनी श्रेष्ठ । हो तन्निष्ठ तस्मात्तूं ॥३॥
योगी होय तूं अर्जुना । मागे दान तुकया ॥४॥

॥७५१४॥
स्वरुपीं निष्ठचित्तें जो कां । लोक लोका माझारी ॥१॥
या सर्व योगियांत । मज मानत तो सांगूं ॥२॥
भक्तियोगें मातें भजे । जो विराजे प्रेमळ ॥३॥
योगी थोर वंदावा तो । तुका देतो अभय ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP