आज्ञापत्र - पत्र ५१

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


राज्य संरक्षणाचे मुख्य कारण ते किले. ते देशोदेशी स्थळें पाहून बांधावें. किल्यासमीप दुसरा पर्वत किल्यास मुर्दई असो नये. कदाचित असला तरी सुरंग लाऊन पाहून गडाचे आहारी आणावा. सुरंगास असाध्य असला तरी तोहि जागा मोकळा न सोडितां बांधोन मजबूद करावा. गडाची इमारत गर्जेची करु नये. तट बुरुज चिलखतें, पाहरे, पडकोट जेथें जेथें असावें ते बरे मजबूद बांधावें. नाजुद जागे असतील ते सुरंगहि प्रेत्नें अवघड करुन पक्की इमारत बांधोन गडाचा ऐब टाळावा. दरवाजे बांधावे ते खालील मारा चुकऊन, पुढें बुरुज देऊन, येताजातां सर्व बुरुजांचे आहारी पडोन दरवाजे बांधावें. किल्याचा येक दरवाजा हा ऐब थोरलाच आहे. याकरिता गड पाहोन येक, दोन, तीन दरवाजे, तैशाच थोर दिंड्या करुन ठेवाव्या. इमारतीवर मामलेदार गौडे आद्किरुन ठेवणें ते बरे शाहाणे, कृतकर्मे, निरालस्य पाहून ठेऊन गडाची इमारत मुस्तेद करावी.

कितेक किले प्रत्येक पर्वतच आहेत. कितेक पर्वत थोर, त्याचा यखादा कोन-उपराची जागा पाहून बांधावा लागतो. त्यास दरवाजापुढें अथवा तटाखालें मैदान भूमि लागते. म्हणजे तो गड भुईकोटादाखल जाहला. आला गनिम त्यांणें दरवाजास अथवा तटास लागावें यैसे होतें. हे गोष्ट बरी नव्हे. याकरिता ये जातीचा जो किला असेल त्यास आधीं सर्व प्रेत्ने दरवाज्यापुढें तटाखालतें जितके मैदान असेल तितका खंदक खोल आणि रुंद खाणून तटाचे पायीं दुसरा परकोट मजबूद बांधोन त्यावरी भांडी, जुंबरे ठेऊन खंदकाचे कडेस येकायेकीं परकी फौज येऊं न पावे यैसे करावें.

गडास यावयाचे मार्ग असतील ते सुगम नसावे. सुगम असिले तरी ते मोडून त्यावरी झाडी वाढवून आणखीकडे परके फौजेस जातां कठीण यैसे मार्ग घालावे. याविरहित बलीकुबलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालो देऊं नयेत. समयास तेच दिंडी अथवा दरवाजा याचा राबता करुन सामान सर्वदां नेत जावें. गडाची राखण म्हणजे कमरग्याची झाडी. ते झाडी प्रयत्ने वाढवावी. त्यामध्यें येक काठी तेहि तोडूं न द्यावी. बलकुबलीस या झाडीमध्ये हशम, बंदुखी घालावयाकारणें जागे असो द्यावे. गडासभोवती नेहमी मेटें असावी. घेरियाची गस्त करीत जावी. गस्तीचा जाब मेटेकरी यांणी देत जावा. गडाखालतें इमारतीचें घर किंवा घराभोवतें दगडाचे कुसू सर्वथैव असो न द्यावे. तैसेच गडावरी आधी उदक पाहून किला बांधावा. पाणी नाही आणी ते स्थळ तर आवश्यक बांधणे प्राप्त जाले तरी आधीं खडक फोडून तळीं-टाकीं पर्जन्यकाळपर्यंत संपूर्ण गडास पाणी पुरे यैसीं मजबूद बांधावी. गडावरी झराहि आहे, जैसे तैसे पाणीहि पुरते, म्हणोन तितक्यावर निश्चिती न मानिता उद्योग करावा. किंनिमित्त कीं, जुझामध्ये भांडियाचे आवाजाखालें झरें स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरिता तैसे जागां जकेरियाचे आवाजाखाले झरे स्वल्प होतात आणि पाणियाचा खर्च विशेष लागतो, तेव्हां संकट पडतें. याकरिता तैसे जागां जकेरियाचे पाणी म्हणोन, दोन-चार तळीं - टाकीं बांधोन त्यांतील पाणी खर्च होऊं न द्यावे. गडाचें पाणी बहुत जतन राखावें.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP