आज्ञापत्र - पत्र ३५

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


राज्यांतील वतनदार-देशमुख व देशकुलकर्णी - पाटील यांसी वतनदार म्हणावें हे प्राकृत परिभाषा मात्र आहे. ते स्वल्पच परंतु देशनायकच आहेत. सार्वभौमापासोन बलन्यूनतेनें उतरतीं परंपरा बळिवंत राखोन दुर्बळ वर्ततच आहेत. परंतु, त्यांस साधारण गणावें यैसे नाहीं. हे लोक म्हणजे राज्याचे दायादच आहेत. आहे वतन त्यांची बुद्धि नाहीं. नूतन संपादावें, बळकट व्हावें, बळकट जाले म्हणजे येकाचें घ्यावें, दावे-दरवडे करावें हा त्यांचा सहज हव्यास. राजशासन होईल हें जाणोन अगोदर दुसरियांचा आश्रय करितात, वाटा पाडितात, देश मारितात. समयीं जिवाचीहि तमा धरीत नाहींत. परचक्र आले म्हणजे वतनाचे आशेने सुलूख करितात. स्वतां भेटतात. तिकडील भेद इकडे, इकडील तिकडे करुन राज्यात शत्रूचा प्रवेश करितात. मग, तेच राज्याचे अपायभूत होऊन दु:साध्य होऊन जातात. याकरितां या लोकांचे संरक्षण परम युक्तिजन्य आहे.

इत्यादि दोष या लोकांत आहेत म्हणून यंचा द्वेष करावा. वतनें बुडवावीं म्हणतां हाहि परम अन्याय. अन्याय विशेष अनर्थाचेंच कारण. तेंहि न होतां त्यांस केवळ मोकळी वाग देईन म्हणता यांची निजप्रकृत तेव्हांच प्रगट होणार. याकरितां या दोन्ही गोष्टी कार्यास येत नाहींत. यांस स्नेह व दंड यांमध्ये संरक्षून ठेवावे लागतात. आहे वतन तें चालऊन प्रजेवरी त्यांची सत्ता असो न द्यावी. हक, इनाम आज्ञेविरहित घेऊं न द्यावा. जें चालत आलें असेल त्याहून जाजती जवभर लाजिमा तोहि होऊं न द्यावा. आणि देशाधिकारियांचे आज्ञेंत वर्तावें.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP