फाल्गुन वद्य ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) “शिवाजी राजे शिवनेरीस उपजले !”

शके १५५१ च्या फाल्गुन व. ३ रोजीं शिवनेरी येथें स्वराज्यसंस्थापक श्रीशिवाजीमहाराज यांचा जन्म झाला. निजामशाहींत मराठ्यांचीं दोन घराणीं प्रसिद्धिस आलीं : एक भोसल्यांचें व दुसरें जाधवांचें. पैकीं शहाजी भोसले आपल्या पराक्रमानें सर्वत्र तळपत राहिले. त्यांचें जीवित युद्धमय स्थितींतच असल्यानें गरोदर असणारी स्त्री जिजाबाई शिवनेरी किल्ल्यावर होती. भोंवतालची परिस्थिती पाहून जिजाबाईस धाक उत्पन्न होई. तिनें शिवाईस नवल केला कीं, “मला मुलगा होऊं दे, मी त्याला तुझें नांव ठेवीन.” त्याप्रमाणें मुलगा झाल्यावर तिनें त्याचें शिवाजी असें नांव ठेविलें. जिजाबाई ही शिवाजीचा पहिला गुरु होय. तिचें शहाजीशीं विशेष सख्य नव्हतें, माहेरचाहि आधार तुटलेला, तेव्हां तिनें आपलें सारें लक्ष शिवाजीकडेच केंद्रित करुन त्याची उत्कृष्टपणें जोपासना केली. रामायण-महाभारतातील कथा सांगून तिनें त्याच्या मनांत स्वाभिमान आणि शौर्याविषयी आवड निर्माण केली. शिवाजीचा दुसरा गुरु म्हणजे दादोजी कोंडदेव मलठणकर. घोड्यावर बसणें, तिरंदाजी करणें, भाला मारणें, तलवार चालवणें, इत्यादि मर्दानी शिक्षण त्यानेंच शिवाजीला दिलें. शिवाजी लहान असतांनाच शहाजीनें त्यांना विजापूरला नेलें. तेथील सर्व प्रकार पाहून शिवरायांच्या अंगचा स्वाभिमान उफाळून वर आला. यवनांची दुष्ट कृत्यें त्यांच्या नजरेंत भरलीं, गोवध करणार्‍यांविषयीं त्यांना संताप आला. विजापूर दरबारांत शहाजीबरोबर शिवाजी गेला परंतु मुजरा न करतां तसाच उभा राहिला, तेव्हां ‘लेकरुं आहे, दरबार पाहून घाबरलें, अशी सारवणी शहाजीस करावी लागली. शिवाजीनें डोळ्यांनीं सर्व परिस्थिती पाहिली आणि यवनांच्या मगरमिठींतून देश, धर्म, लोक यांना सोडावें अशा विचारानें लहान वयांतच जिवास जीव देणारे अनेक सौंगडी जमवून त्यानें कार्यास सुरुवात केली. आणि थोड्याच अवधींत हिंदवी स्वराज्याची निर्मिती या थोर पुरुषानें केली !
- १९ फेब्रुवारी १६३०
-----------------------
(२) नाना फडणीस यांचें निधन !

शके १७२१ च्या फाल्गुन व. ३ रोजीं मराठेशाहींतील प्रसिद्ध मुत्सद्दी व राजकारणी पुरुष नाना फडणीस यांचें निधन झालें. मृत्यूपूर्वी दोन-तीन वर्षे नाना कैदेंत होते. अटकेंतील हाल अपेष्टा टाळण्यासाठीं त्यांनी केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले आणि थोडे दिवस का होईना नानांना कैद भोगावी लागल्यामुळें त्यांच्या मनास जबरदस्त धक्का बसला. त्यांची प्रकृति बिघडून दिवसेंदिवस ती खालावत गेली. माघ वद्यांत त्यांना ज्वर येऊं लागला, आणि त्यांतच फाल्गुन व. ३ रोजीं मध्यरात्रींत त्यांचा अंत झाला. “नारायणरावांच्या वधानंतर रघुनाथरावांविरुद्ध कारस्थान रचून त्या प्रकरणीं इंग्रजांशीं युद्ध सुरु झालें, त्यांत नानानें शिकस्तीचे प्रयत्न करुन केवळ बुद्धीच्या जोरावर इंग्रजांचा पाडाव केला हीच त्याची महनीय राष्ट्रीय कामगिरी होय ...... बारभाईचे कारस्थान, मोरोबाचा पाडाव, चौकडीची जूट सालबाईचा तह व सवाई माधवरावांचे लग्न, हे मुख्य प्रसंग नानाच्या कर्तबगारीचे होय .... नाना फडणिसानें मुखत्यारीनें काम चालविलें. त्याची काम करण्याची मेहनत, अक्कल, स्मरण, लिहिणें, बंदोबस्त व अप्रमाण बोलण्याविषयीं मनांत भय हे गुण चांगले होते.” जयपूरच्या राजानें त्यांच्याविषयीं अभिप्राय व्यक्त केला आहे: “ राज्यांतील सरदारांच्या चित्तांतील शुद्धता व ऐक्यता करुन त्यांस लावून घेणें व प्रजेचें पालन उत्तम करणें हें काम त्यांचेच आहे. दक्षिण हिंदुस्थानांत दुसरे कोणी नाहींत.” १७९५ मध्यें खर्ड्याच्या लढाईंत निजामाविरुद्ध मराठ्यांनीं प्रचंड विजय मिळविला, त्यानंतर मात्र नानांचें तेज फिकें झालें. महादजी शिंदे व हरिपंत फडके हे नानांचे डावे-उजवे हात मृत्यूच्या तडाख्यांत सांपडले. सवाई माधवरावांचा अंत झाला आणि नानांचा वीस वर्षांचा उद्योग नष्ट होऊन गेला. त्यांच्याबरोबर मराठेशाहीचें शहाणपणच लयास गेलें ! मराठेशाही पोरकी होऊन तिच्यांतील त्राण नाहीसें झालें !
- १३ मार्च १८००

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP