फाल्गुन शुद्ध १५

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) होळी पोर्णिमेचें रहस्य !
फाल्गुनी पोर्णिमेचा दिवस होळी पोर्णिमा म्हणून भारतांत प्रसिद्ध असला तरी स्थानपरत्वें त्याला शिमगा, होलिका, हुताशनीमहोत्सव, दोलायात्रा, कामदहन अशीं नांवें आहेत. या सणाच्या उत्पत्तीसंबंधीं एकवाक्यता नाहीं. वसंऋतूच्या आगमनासाठीं हा वसंतोत्सव चालू असतो असाही समज आहे. उत्तरेंतील लोक हा उत्सव कृष्णासंबंधी मानतात. बालकृष्णाला विषमय दुग्ध पाजणारी पूतना हिचें होळीच्या रात्रींच दहन करण्यांत आलें असा एक विश्वास आहे. महाराष्ट्रांतील लोक मानतात कीं, पूर्वी ढुंढानामक राक्षसीण लहान बालकांना फार पीडा देत असे, तेव्हां तिला हांकून लावण्यासाठीं बीभत्स शिव्या देऊन जिकडे तिकडे अग्नि निर्माण करण्याची बहिवाट पडली आहे. हा सण साजरा करण्याचे प्रकारहि निरनिराळे आहेत. या सणांत प्रकट होणारी अनीति व बीभत्सपणा हळूहळू नष्ट होऊन राष्ट्रवर्धक असें स्वरुप येण्यास सुरुवात झाली आहे. या दिवशीं मैदानी व मर्दानी खेळांच्या चढाओढी ठेवून एकमेकांत सामाजिक हितसंबंध निर्माण करण्याची प्रवृत्ति आजकाल वाढली आहे. होळीसणांत अश्लीलता कां शिरली असावी या प्रश्नाचें उत्तर शोधतांना श्री. काका कालेलकर मार्मिकपणें विचार करतात: - "होळी म्हणजे कामदहन. वैराग्याची साधना. विषयाला काव्याचें मोहक स्वरुप दिल्यानें तो वाढतो. त्यालाच बीभत्स रुप देऊन त्याला उघडा नागडा करुन त्याचें खरें स्वरुप समाजास दाखवून त्याविषयीं शिसारी उत्पन्न करण्याचा उद्देश तर नसेल ? सबंध हिवाळाभर ज्याच्या मोहांत आपण सांपडलों त्याची फजिती करुन, त्याला जाळून टाकून पश्चात्तापाची विभूति शरीराला चर्चून वैराग्य धारण करण्याचा उद्देश यांत असेल काय ?" आणि कामदहनाच्या कल्पनेवर आधारलेल्या या कल्पनेस पुराणांत आधार सांपडतो. मदनदहनानंतर शंकरांनीं आपल्या गणांना सांगितलें कीं, "फाल्गुन शु. १५ स मीं मदनास जाळलें आहे. तेव्हां त्याच दिवशीं सर्वांनीं होळी करावी."
------------------
(२) श्रीगौरांगप्रभूंचा जन्मदिवस !
शके १४०७ च्या फाल्गुन शु. १५ रोजीं बंगाल्यांतील विख्यात संत श्रीगौरांग ऊर्फ श्रीचैतन्यप्रभु यांचा जन्म झाला. आसाममधील श्रीहट्ट (सिल्हट) येथील प्रसिद्ध मिश्र घराण्य़ांत श्रीगौरांगांचा जन्म झाला. विद्याभ्यास करण्यासाठीं जगन्नाथ मिश्र सिल्हटहून नवद्वीप येथें आले. यांचा विवाह नीलांबर चक्रवर्ती यांची मुलगी ‘शचीदेवी’ हिच्याशीं झाला होता. या दांपत्यास लागोपाठ आठ मुली झाल्या. आणि त्या मरुनहि गेल्या. नववा मुलगा झाला त्याचें नांव विश्वरुप. आणि शके १४०७ च्या फाल्गुन शु. १५ रोजीं त्यांना दुसरा मुलगा झाला त्याचें नांव निमाई. हेच पुढें श्रीगौरांग, चैतन्यदेव, महाप्रभु अथवा निमाईभगवान्‍ म्हणून प्रसिद्धीस आले असें सांगतात. निमाई आईच्या गर्भांत तेरा महिने असल्यामुळें चांगला धष्टपुष्ट होता. ‘हरि हरि बोल, बोल हरि बोल । मुकुन्द माधव गोविंद बोल’ या पदाच्या तालावर निमाई वाढूं लागला. लहानपणापासून निमाईला भगवद्‍भक्तीचें अतोनात वेड होतें. पुढें निमाईचे थोरले बंधु विश्वरुप वैराग्य प्राप्त झाल्यामुळें घरांतून निघून गेले. वडिलांचांहि मृत्यु झाला. नंतर मात्र निमाई नेमानें विद्याभ्यास करुं लागले. बालसुलभ खोड्यांना एकदम आळा बसला. न्यायशास्त्र, व्याकरणशास्त्र यांत निमाई लौकरच मोठे पंडित झाले. त्यांचा विवाह लक्ष्मीदेवी हिच्याशीं झाला. वैष्णवांच्या कट्टरपणावर निमाई पंडित टीका करीत. त्यांच्या दुसर्‍या स्त्रीचें नांव विष्णुप्रिया असें होतें. निमाईनीं केशव भारतींकडून संन्यासदीक्षा घेतल्यानंतर ते जगन्नाथपुरीस जाण्यास निघाले. जगन्नाथाला पाहतांच त्यांच्यांत भावावेश निर्माण झाला. जगन्नाथाच्या मूर्तीला त्यांनीं मिठीच मारली. त्यानंतर त्यांनीं तीर्थयात्रा केली आणि सन १५२१ पासून राधाभावाच्या उपासनेस त्यांनीं प्रारंभ केला. स्वत:स राधा समजून अत्यंत उत्कटपणे परमेश्वराची भक्ति ते करु लागले. राधेच्या प्रेमाच्या सर्व अवस्था त्यांनी अनुभविल्या. मधुराभक्तीचा मूर्तिमंत अवतार म्हणजे गौरांगप्रभु. त्यानंतर शके १४५५ मध्यें श्रीचैतन्यांना श्रीकृष्णाच्या कालिंदी नदींतील विरहाची भावना झाली; आणि श्यामल कृष्णाशी क्रीडा करण्यासाठीं त्यांनीं समुद्रांत उडी टाकली !
- १८ फेब्रुवारी १४८६
-------------------------
(३) मराठ्यांना बाणकोट हस्तगत !
शके १६५५ च्या फाल्गुन शु. १५ रोजीं जंजिर्‍याच्या मोहिमेंतील प्रसिद्ध ठाणें बाणकोट हें मराठ्यांनीं हस्तगत केलें. जंजिर्‍याचा हबशी हा मोंगल बादशहाचा हस्तक समजला जात असल्यामुळें त्याचा उच्छेद करणें हें शिवाजीमहाराजांच्या काळापासून मराठ्यांचे मुख्य कर्तव्य होऊन बसलें होतें. बाळाजी विश्वनाथ पेशवा झाल्यावर, त्यानें आपली जन्मभूमि कोंकण प्रांत ही आपल्या असावी या हेतूने प्रयत्न केलेचे होते. स्वारीच्या उपक्रमास ब्रम्हेंद्रस्वामी कारण झाले. सन १७२७ त शिवरात्रीच्या दिवशीं जंजिर्‍याच्या सिद्दीनें परशुराम येथील देवालयावर हल्ला करुन त्या पवित्र स्थानाचा विध्वंस केला. देवालयाची, ब्राम्हणांची सर्व दौलत लुटून नेली. हें पाहून स्वामींना परमदु:ख झालें. त्यांनीं सिद्दीसातांस शाप दिला, “देव ब्राम्हणांचा तूं उच्छेद केलास, अत:पर तुझाहि उच्छेद लौकरच होईल.” त्यानंतर स्वामींचें वास्तव्य सातार्‍यानजीक धावडशी येथें होऊं लागलें. त्यांनी कांहीं मराठे सरदार व शाहू यांना भरीस घालून जंजिर्‍याची मोहीम स्वीकारण्यास प्रवृत्त केलें. वारंवार पत्रें लिहून बाजीरावासहि या गोष्टींचें महत्व स्वामींनीं पटवून दिलें. आणि याचाच परिणाम म्हणून सन १७३३ त जंजिर्‍याची मुख्य मोहिम सुरु झाली. बाणकोटच्या खाडीपासून उत्तरेस थेट रेवदंड्यापर्यंतचा सह्याद्रीच्या पायथ्याचा मुलूख सिद्दीच्या ताब्यांत होता. किनार्‍यालगतच्या मराठी मुलखावर हल्ले करुन हिंदु प्रजेस छळण्याचा उपक्रम कित्येक वर्षे सिद्दी करीत होता. तेव्हां या कामगिरीवर उदाजी पवार, बाजी भीमराव, वगैरे सरदार शाहूच्या आज्ञेनें पराक्रम करुं लागले. फाल्गुन शु. १५ रोजीं त्यांनीं बाणकोटचें प्रसिद्ध ठाणें हस्तगत केलें आणि यानंतर जंजिरा व अंजनवेल याखेरीज सर्व मुलूख मराठ्यांच्या ताब्यांत आला. शेवटीं जंजिर्‍यावरहि तोफांचा मारा सुरु झाला आणि सिद्दी, अंबर, संबूल, वगैरे सरदार अंजनवेलकडे पळून गेले.
- ८ मार्च १७३४

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP