फाल्गुन शुद्ध ८

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


देवगिरीच्या रामदेवरावाचें दैव !

शके १२१६ च्या फाल्गुन सु. ८ रोजीं अल्लाउद्दीन खिलजी यानें देवगिरीचा वैभवशाली सम्राट्‍ रामदेवराव यादव याचा पराभव केला. अल्लाउद्देन शके १२१५ मध्यें आठ हजार फौज घेऊन कुराहून निघाला आणि बुंदेलखंडाच्या जंगली आठ हजार फौज घेऊन कुराहुन निघाला आणि बुंदेलखंडाच्या जंगली प्रदेशांतून तो थेट दक्षिणेंत आला. "चुलत्याशीं भांडून मी नोकरी करण्यासाठीं तेलंगणाच्या राजाकडे राजमहेंद्रीस चाललों आहे." असें तो सांगत असे. विंध्याद्रि उतरुन तो एकदम देवगिरीपाशीं येऊन धडकला. रामदेवरावास कल्पना सुद्धां नव्हती. तो शहराबाहेर देवदर्शनास गेला होता. तेथें त्याला ही बातमी समजली ! त्याला मोठी चिंता वाटली. लढाईची तयारी नाहीं; फौज बाहेरगांवी गेलेली. अशा अवस्थेंत नागरिकांतूनच कांही सैन्य तयार करुन त्यानें अल्लाउद्दीनास तोंड दिलें. परंतु त्याचा काय प्रभाव पडणार ? रामदेवरावाचा पराभव झाला. देवगिरीची लुटालूट सुरु झाली. ‘बादशहाची फौज मागाहून येत आहे’ असें अल्लाउद्दीनानें उठवलें. रामदेवरावानें आतां धडगत नाहींसें ओळखलें. किल्ल्यांत धान्याऐवजीं मिठाची पोतीं भरलीं गेल्याचे पाहून त्याचा ध्रीर सुटला व त्यानें अल्लाउद्दीनाशीं तह केला. इतक्यांत रामदेवरावाचा मुलगा शंकरदेव हा मोठी फौज घेऊन आला व तह अमान्य करुन त्यानें अल्लाउद्दीनवर निकराचा हल्ला केला. "तुम्हांला जिवाची आशा असेल तर येथें लुटलेली सर्व चीजवस्तु परत द्या आणि जीव वांचला म्हणून सुखानें निघून जा" असा निरोप शंकरदेवानें अल्लाउद्दीनास पाठविला. अर्थातच मुसलमान खवळले. त्यांनींहि जोराचा सामना दिला. परंतु शंकरदेवाच्या विलक्षण धैर्यापुढें त्यांचा टिकाव लागला नाहीं. मराठ्यांना विजय तों दैव पालटलें, मुलाच्या मदतीस रामदेवराव फौज घेऊन येत होता. शंकरदेवाच्या लोकांना वाटलें, "येणार, येणार, म्हणून गाजत होती ती बादशहाची फौज आली. " सर्वच रंग पालटला आणि शंकरदेवाचाहि पराभव झाला. अशा प्रकारें केवळ दैवानें पाठ फिरविली म्हणूनच देवगिरीचा पाडाव झाला.

- ५ फेब्रुवारी १२९४

N/A

References : N/A
Last Updated : October 05, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP