भाद्रपद वद्य ९

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


शि. म. परांजपे यांचें निधन !

शके १८५१ च्या भाद्रपद व. ९ रोजी शुद्ध स्वातंत्र्याचे पहिले उपासक, मराठींतील प्रतिभाशाली लेखक आणि वक्ते, ध्येयवादी पत्रकार शि. म. परांजपे यांचे निधन झालें. ‘महाराष्ट्र काँलेजां’ त संस्कृत शिकवणार्‍या या पंडितानें १८९८ सारख्या बिकट काळांत ‘काळ’ पत्र काढलें आणि सार्‍या तरुण महाराष्ट्राला आपल्या प्रभावी लेखनशैलीनें शुद्ध स्वातंत्र्याचें मूर्तिमंत दर्शन घडविलें. प्रो. परांजपे यांनीं नाटकें लिहिलीं, कादंबर्‍या लिहिल्या, तर्कशास्त्र, अर्थशास्त्र यावर ग्रंथ लिहिले, परंतु ‘काळ’ पत्रांतील वाड्मय आपल्या तेजस्वितेनें चमकत आहे. त्यांतील ध्येयवादाचे भरारी नंतरच्या त्यांच्या वाड्मयांत ओसरली. सन १९२८ सालीं बेळगांवच्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून भाषण करीत असतांनाच शिवरामपंत दुखण्यानें भारावले होते. तेथून परत आल्यावर २४ सप्टेंबरला ते ‘मीराबाई’ नाटकांतील प्रवेश लिहीत होते आणि त्याच वेळीं दुर्दैव त्यांच्या जीवित-नाटकाचा शेवटचा प्रवेश घडवीत होतें. २५ सप्टेंबरपासून परांजपे बेशुद्धच होते. निरनिराळे डाँक्टरी इलाज चालू होते. परंतु सारे मानवी इलाज थकले - " दि. २७ सप्टेंबर रोजीं, सकाळीं सात वाजतां धुगधुगी राहिलेल्या पार्थिव शरिरांतील चैतन्याची ज्योतहि निघून गेली ! ‘काळ’ बाहेर पडत होता, पण अखेर ‘काळा’ नें दावा साधून शुक्रवारीं दि. २७ ला सकाळी त्यांनाच बाहेर काढलें. - " गांवांत बातमी पोहोचल्यावर हजारों लोक अण्णासाहेबांच्या दर्शनार्थ आले. सकाळीं अकरा वाजतां दिंड्या-भजनें यासह स्मशानयात्रा निघाली. वाटेंत शेंकडों पुष्पहार अर्पण होत होते. तीन तासांनीं यात्रा स्मशानांत पोंचली आणि गुणगौरवपर भाषणें होऊन अण्णासाहेबांच्या देहाला अग्निसंस्कार देण्यांत आला. स्वातंत्र्याचें मूर्तिमंत दर्शन घडविणारा ध्ययनिष्ठ माणूस गेल्यामुळें सर्व देशाला हळहळ वाटली. आता शिवरामपंत ‘काळांतील निवडक निबंधां’ च्या रुपानें अमर आहेत.
- २७ सप्टेंबर १९२९

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP