भाद्रपद शुद्ध ४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) "सुखकर्ता दु:खहर्ता" श्रीगणपति !

भाद्रपद शुद्ध ४ हा दिवस गणेश-चतुर्थी म्हणून प्रसिद्ध आहे. गणेश म्हणजे गुणेश म्हणजे गुणेश. सत्व, रज, तम, या त्रिगुणांचा अधिपति म्हणजे गणेश. भारतीय संस्कृतीनें गणपतीला ’सुखकर्ता’ अशा स्वरुपाचें दैवत मानिलें आहे. सर्व शुभ संस्कारांत गणेशपूजा आरंभी करण्याची चाल आहे. मुद्गलपुराण, गणेशपुराण, गणेशभागवत या संस्कृत आणि गणेशप्रताप, गणेशलीलामृत, गणेशविजय, इत्यादी मराठी ग्रंथांतून गणपतीच्या उपपत्तीसंबंधानें अनेक कथा सांपडतात. ख्रिस्ती शकाच्या चौथ्या शतकानंतर गणपतीची उपासना भारतांत रुढ झाली असें डाँ. भांडारकरांचे मत आहे. या देवतेची भक्ति करणारा पंथ ‘गाणपत्य पंथ’ या नांवाने ओळखला जातो. महाराष्ट्रांतहि या पंथाचा प्रसार झाला होता. चिंचवडचे श्रीमोरया देव महाभक्त होऊन गेले. थोरले माधवराव पेशवे गणपतीचे उपासक होते. प्रसिद्ध अष्टविनायकांची आठ स्थानें महाराष्ट्रांतच आहेत. ऐतिहासिक दृष्टीनें पाहतां असे दिसतें कीं, वेदकालापूर्वी सुरासुरांत ज्या लढाया होत त्यांत गणपति हा सेनानायक असावा.कोणतीहिं विघ्नें आलीं तरी गणपति आपल्या सामर्थ्यानें त्यांचा नाश करतो या कल्पनेमुळें त्याला, ‘विघ्नराज’, ‘विघ्नहर्ता’ अशीं नांवे प्राप्त झालीं आहेत. नंतरच्या काळांत त्याला दैवताचें स्वरुप प्राप्त होऊन सोळा विद्या व चौसष्ट कला यांनी मंडित असणार्‍या गणपतीला बुद्धि आणि विद्या यांचें स्वामित्व प्राप्त झालें. ‘गणांनां त्वा गणपति’ हें ऋग्वेदांतील सूक्त गणपतिचें मानितात. गणपतीच्या जन्मकथांतून अनेक प्रकारचा अद्भुत रस मिसळलेला दृष्टीस पडतो. कांही अपराधावरुन शंकरांनींच याचें मस्तक तोडून टाकिलें, पण पार्वतीसाठी इंद्राच्या हत्तीचें मस्तक आणून बसविण्यांत आलें. परशुरामांशी गणपतीचें एकदां युद्ध झालें. त्या समयीं शंकराचा परशु परशुरामानें गणपतीवर फेकिला, पण तो आपल्या वडिलांचा म्हणून गणपतीने न स्वीकारतां आपल्या दांतावर झेलला. त्यामुळें गणपतीचा एक दांत मोडून गेला. ‘गणपतीच्या बाललीलाहि प्रसिद्ध आहेत.

-------------

(२) रंगो बापूजींची स्वामिनिष्ठा !

शके १७६१ च्या भाद्रपद शु. ४ रोजी सातारचे प्रतापसिंह भोसले यांचे एकनिष्ठ आणि करारी सेवक रंगो बापूजी गुप्ते हे आपल्या धन्यावरील अन्यायाची दाद मागण्यास इंग्लंडला निघाले. रंगो बापूजी रोहिडखोरेकर गुप्ते देशपांडे हे प्रतापसिंहांचे एकनिष्ठ सेवक होते. प्रतापसिंहाच्या पदच्युतीनंतर थोड्याच अवधींत रंगो बापूजी फरारी झाले. हे मोठे हरहुन्नरी होते. नाना प्रकारचे विष धारण करुन यांनीं उत्कृष्ट प्रकारें स्वामिसेवा केली आहे. लिंब येथें प्रतापसिंह इंग्रजांच्या कैदेंत असतांना ‘धन्नकधारी कावडीवाल्याच्या’ वेषांत रंगो बापूजी आपल्या धन्यास भेटले आणि थोडी मसलत करुन पुन: बेपत्ता झाले. कँप्टन कोगन यांच्या मदतीनें रंगोबांनी तीन अरब आपल्याबरोबर घेतले आणि अत्यंत गुप्तपणें वेषांतर करुन खैबरघाट, अफगाणिस्तान, इराण, इराक या मार्गानें ते बैरुटच्या बंदरांतून माल्टा येथें आले. तेथें त्यांना चाळीस दिवस अडकून पडावें लागलें. त्यानंतर विलायतेंत गेल्यावर रंगो बापूजी आपल्या धन्यासाठीं चौदा वर्षेपर्यंत झगडले. आपल्या जीविताची, प्रपंचाची तमा न धरतां रंगोबा पार्लमेंटमध्यें न्यायासाठीं लढत होते. सरावानें इंग्रजी चांगले बोलतां येऊं लागल्यावर त्यांनी व्याख्यानें, पत्रकें यांच्या द्वारा तुफानी प्रचार केला आणि सारें इंग्लंड हालवून सोडिलें. " काम फत्ते झाल्याशिवाय मी स्वदेशी येणार नाहीं, सरकार स्वारी सन्मानानें सातारला परत येईपर्यंत मी तिकडे येणार नाहीं. माझ्या धन्याला न्याय मिळेपर्यंत मी येथेंच इंग्लंडांत राहीन" असा रंगोबांचा बाणा होता. दारिद्र्य, निराशा, हालअपेष्टा यांना ते डगमगले नाहींत. परंतु रंगोबांना यश मिळावयाचें नव्हतें. ज्याच्यासाठीं एवढी खटपट तो प्रतापसिंह धनीच शके १७६९, मध्यें अत्यंत हालांत निधन पावला. थोडा वेळ रंगोबा स्तब्ध झाले; आणि त्यांनी पुन्हा आपल्या प्रयत्नांना सुरुवात केली. " राजा कैलासवासी झाला. परंतु इनसाफ मेला नाहीं. जिता आहे. " अशी यांची विचारसरणी होती. खटल्याची सर्व हकीगत या विख्यात स्वामिभक्तानें मोडी लिपीत लिहून ठेविली आहे.
- १२ सप्टेंबर १८३९

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP