भाद्रपद शुद्ध ११

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


निजामशाहीची अखेर !

शके १८७० च्या भाद्रपद शु. ११ या दिवशीं हिंदुस्थान सरकारनें हैद्राबाद संस्थानांत तीनहि दिशांनी आपल्या फौजा घुसविल्या. १५ आँगस्ट १७४७ या दिवशीं भारत देश स्वतंत्र झाला. वास्तविक पाहतां हैदराबादनें आतां हिंदी संघराज्याचा एक अवयव म्हणून वागणें योग्य होतें. परंतु, २७ आँगस्ट १९४७ रोजीं निजामानें आपलें स्वातंत्र्य घोषित केलें. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याला आणि राष्ट्रध्वजाला मान्यता देण्याचें दूर राहून मोंगलाईंत दडपशाहीच सुरु झाली. जातीयतेचें थैमान सुरु होऊन निजामसाहेब कासीम रझवी वगैरे अत्याचारी लोकांच्या हातांतील बाहुलें बनले. हिंद सरकारशीं झालेल्या ‘जैसे थे’ च्या कराराचा भंग पदोपदीं होऊं लागला. त्यामुळें हिंद सरकारला स्वारी करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आणि शेवटीं भाद्रपद शु. ११ ला हिंदी सैन्य निजामच्या राज्यांत घुसलें. या पोलिसी मोहिमेचा परिणाम अवघ्या पांचच दिवसांत दिसून आला. दि. १७ सप्टेंबर रोजींच निजामानें शरणागति जाहीर केली. याच दिवशीं दुपारी दीडच्या सुमारास हिंदी सैन्याच्या तुकड्या सोलापूरच्या बाजूनें तुफानी वेगांत शिकंदराबादपासून अवघ्या पंचवीस मैलांवर येऊन ठेपल्या होत्या. या मोहिमेचे सरसेनापति मे.ज.महाराज राजेंद्रसिहजी यांनीं हैद्राबादच्या सेनापतीला अखेरचा निर्वाणीचा संदेश दिला. आणि दुपारीं पांच वाजतां नभोवाणीवरुन हैदराबादचे निजाम आला हजरत यांनीं आपल्या शरणागतीचें निवेदन केलें. हैदराबादची जनता क्लेशांतून मुक्त झाली. सर्व देशास विजयानंदाचें भरतें आलें. मराठेशाहींत निजाम एक शत्रुच होऊन बसला होता. अनेक वेळेला पराभव करुनहि त्याचें अस्तित्व भक्कमच राहिलें होतें. परंतु हिंद सरकारच्या या विजयामुळें निजामाला चांगलीच अद्दल घडली. संपत्तीच्या जोरावर निजाम अद्ययावत्‍ यंत्रसामग्री गोळा करीत होता. रझाकार संघटणेचें सामर्थ्य लोकांना त्रासदायक होत होतें, अशा वेळीं निजामची सत्ता संपुष्टांत येणार म्हणून सर्व जनतेला संतोष वाटला. हिंदी सेनेचें आणि सेनानी राजेंद्रसिंहाचें सर्वत्र अभिनंदन करण्यांत आलें.
- १३ सप्टेंबर १९४८

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP