भाद्रपद शुद्ध ३

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


भगवान वराहांचा जन्म !

भाद्रपद शु. ३ या दिवशीं दशावतारांतील तिसरा अवतार, भगवान्‍ वराह यांचा जन्म झाला. या विष्णुच्या अवताराचें मूळ वेदांतहि सांपडतें. वराहाला इंद्रानें मारल्याचा उल्लेख ऋग्वेदांत आहे. पृथ्वी निर्माण होण्यापूर्वी सर्वत्र पाणी होतें. ब्रह्मदेव वायुरुपानें हिंडत असतां त्याला त्याला पाण्याच्या पोटांत पृथ्वी दिसली. ही पृथ्वी प्रजापतीनें वराहरुपानें वर काढली; व ती कोरडी करुन मग त्यानें देव वगैरे निर्माण केले. पाण्यामध्ये अमलाच्या देठांला असणारा चिखल ब्रह्मदेवानें वराहाच्या रुपानें वर आणला व तो कमळाच्या पानावर पसरला. तीच पृथ्वी होय. याखेरीज पुराणग्रंथातून यासंबंधी अनेक कथा सांपडतात. हिरण्याक्ष व हिरण्यकशिपु ही भावाभावांची जोडी प्रसिद्धच आहे. हे दोघे प्रथम वैकुंठामध्यें विष्णूच्या घरीं विजय आणि जय या नावांनी द्वारपाल होते. एकदां यांनीं ब्रह्मदेवाचे मानसपुत्र सनक, सनन्दन यांना दारांतच हटकून अपशब्द बोलण्यास सुरुवात केली, तेव्हां या ऋषींनी त्याना शाप दिला. त्यामुळें या दोन्ही भावांना दैत्य होण्याची पाळी आली होती. हिरण्याक्ष दैत्य तर श्रीहरीचा अवतार जो वराह याच्याशींच लढण्यास तयार झाला. जलमग्न झालेली पृथ्वी वर कशी काढावी या चिंतेत ब्रह्मदेव असतांनाच त्यांच्या नाकांतून अंगढ्याएवढा एक वराह बाहेर आला. आणि वाढत वाढत जाऊन त्याचा आकार हत्तीएवढा झाला; आणि या वराहानें पृथ्वी बाहेर काढण्यासाठी पाण्यांत मुसंडी मारिली. परंतु हिरण्याक्ष दैत्यानें पृथ्वी पाण्याबाहेर काढण्यास विरोध करुन लढण्यास सुरुवात केली. परंतु भगवान्‍ वराहांनीं आपल्या दातांवर पृथ्वी धारण केली आणि तिला पाण्याबाहेर काढून तिची स्थापना शेषाच्या मस्तकावर केली. या समयी वराह आणि हिरण्याक्ष यांचा मोठाच संभ्रम झाला. शेवटीं आपल्या सुदर्शन चक्रानें भगवानांनीं हिरण्याक्षाचा नाश केला. या वराहाचें वर्णन चतुर्बाहु, चतुष्पाद, चतुर्नेत्र व चतुर्मुख असें केलें जातें. ज्या ठिकाणीं यानें पृथ्वी वर आणिली त्या स्थानास वराहतीर्थ असें नांव असून हें ठिकाण बंगालमध्यें नाथपूरनजीक त्रिवेणीं नदीजवळ आहे.

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP