अगस्त्यगीता - शुभ्रव्रत

अगस्त्य, एक वैदिक ॠषि होते. ते वशिष्ठ मुनिंचे वडील बंधू होत. यांचा जन्म श्रावण शुक्ल पंचमी (ई.पू. ३०००) ला काशीमध्ये झाला.


अध्याय पाचवा
शुभ्रव्रत
अगस्त्य म्हणाले -
हे राजा आता व्रतांमधील उत्तम व्रताविषयी ऐक, शुभ्रव्रतामुळे नि:संशयपणे विष्णुची प्राप्ती होऊ शकते. ॥१॥
याचा आरंभ मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदेपासून करणे असून दशमीला एकदाच भोजन करायचे असते. ॥२॥
दशमीच्या मध्यान्ही स्नान करून विष्णुची पूजा करावी. मग भोजन करून हे राजा, द्वादशीला पूर्वीप्रमाणेच संकल्प करावा. ॥३॥
त्या दिवशी उपवास करून ब्राम्हणांना यव हे धान्य द्यावे आणि दान, होम आणि अर्चना करीत असताना हरिनाम घ्यावे. ॥४॥
अशा प्रकारे चार महिने चालवावेत आणि चैत्रापासून पुढे याच पद्धतीने व्रत करावे. ॥५॥
मात्र यवाऐवजी सत्तूचे दान करावे. त्यानंतर श्रावणापासून तीन महिने साळीचे धान्य दान करावे. ॥६॥
कार्तिक मासातसुद्धा असेच व्रत करावे आणि द्वादशीला विष्णुची पवित्र होऊन पूजा करावी. ॥७॥
अशा प्रकारे मासनामाने भक्तिपूर्वक विष्णुचे पूजन करावे. इंद्रियसंयमन करून आणि पूर्वोक्त संकल्पानेच द्वादशीला विधी करावा. ॥८॥
एकादशीला यथाशक्ती पाताल आणि पर्वत यांनी युक्त अशी पृथ्वीची स्वर्णप्रतिमा करावी. ॥९॥
भूमिन्यासविधिपूर्वक पांढर्‍यावस्त्रांनी झाकलेली आणि सर्व धान्यांनी युक्त अशी ही प्रतिमा विष्णुपुढे स्थापन करावी. ॥।१०॥
प्रतिमेला पंचरत्न समर्पित करावे आणि रात्रभर जागरण करावे.
प्रात:काळी २४ ब्राम्हणांना बोलावून प्रत्येकाला एक गाय आणि दक्षिणा द्यावी.
त्याचप्रमाणे वस्त्रजोड, अंगठी, कडे आणि कर्णभूषणे द्यावीत.
राजा असल्यास त्याने प्रत्येक ब्राम्हणास एक गाव द्यावा. तसेच गरीब ब्राम्हणाचे यथाशक्ती पालन करावे. ॥११-१४॥
यथाशक्ती भूमी सुवर्णयुक्त करु गाईची जोडी आणि वस्त्रजोडी आपल्या क्षमतेप्रमाणे द्यावी. ॥१५॥
अलंकारांनी सजवलेली गायसुद्धा विशेष दान म्हणून देता येते. अशा प्रकारे केल्यास ईश्वर प्रसन्न होतो. ॥१६॥
पृथ्वीची प्रतिमा चांदीचीए सुद्धा करता येते आणि ती ब्राम्हणाला आपल्या ऐपतीनुसार हरिचिंतन करीत द्यावी. ॥१७॥
ब्राम्हणाला भोजन द्यावे आणि पादत्राणे व छ्त्री द्यावी. ॥१८॥
दान देताना विश्वरुप असलेला भगवान विष्णु माझ्यावर सदा प्रसन्न असो, असे म्हणावे. ॥१९॥
अशा प्रकारे अन्नदान आणि इतर दान केल्याने प्राप्त होणारे पुण्य कसे आहे हे अनेक वर्षे सांगता येत नाही. तरी त्याबाबत मी थोडे सांगतो. ॥२०॥
या व्रताने काय प्राप्त झाले त्याचे व्रत ऐका. कृतयुगी अत्यंत साधू असा दृढव्रत नावाचा राजा होता. ॥२१॥
त्याने ब्रम्हदेवाला विचारले, काय केले असता मला पुत्र होईल ? ब्रम्हाने त्याला हे व्रत सांगितले आणि त्याने ते केले. ॥२२॥
व्रताच्या शेवटी भगवान विष्णु त्याच्यासमोर उपस्थित झाले आणि त्यास वर मागण्यास सांगितले. ॥२३॥
राजा म्हणाला -
हे भगवन्‍, मल एक पुत्र द्या. तो दीर्घायुषी, कीर्तिमान, सद्‍गुणी, वेदज्ञ आणि यज्ञ करण्याची प्रवृत्ती असलेला असावा. अनेक गुणांनी युक्त आणि दोषरहित
असा पुत्र मागून राजा पुढे म्हणाला, ॥२४-२५॥
मलासुद्धा एक असे शुभ स्थान द्या की, ज्या मुनिपदाला प्राप्त झाले असता पश्चाताप करण्याचे कारण राहात नाही. ॥२६॥
इच्छित वर देऊन विष्णु अंतर्धान पावले. राजाला वत्सश्रीनामक पुत्र झाला. ॥२७॥
तो विद्वान झाला. वेदवेदांगांचा पंडित झाला. त्याने अनेक यज्ञ केले आणि त्याची कीर्ती जगभर पसरली. ॥२८॥
विष्णुच्या वरप्रसादाने असा पुत्र प्राप्त झाल्यानंतर राजा घोर तपश्चर्या करू लागला. ॥२९॥
इंद्रियनिग्रह आणि उपवास करून हिमालयात तो विष्णुचे ध्यान करु लागला आणि विष्णुची स्तुती करु लागला. ॥३०॥
भद्राश्व म्हणाला -
हे मुने, त्याने कोणत्या प्रकारे सुती केली आणि तशी स्तुती करताना त्याचे काय झाले ? ॥३१॥
दुर्वास म्हणाले - हिमालयामध्ये राहून आणि विष्णुमध्ये मन पूर्ण निमग्न करून राजाने अद्भुत कर्मे करणार्‍या त्या विष्णुची स्तुती केली. ॥३२॥
राजा म्हणाला -
हे जनार्दना, मी तुला प्रणाम करतो. तू जलरूप, नित्य, क्षीरसागरात शयन करणारा, पृथ्वी धारण करणारा, सर्वांचे अंतिम शरणस्थान, इंद्रियातीत आहेस. ॥३३॥
हे ईश्वरा, तू आदितत्व, अंतिम सत्य, सर्वव्यापी, पुरातन, पुरुषोत्तम, इंद्रियातीत, वेद्ज्ञामध्ये अग्रणी आहेस. हे शंखचक्रगदाधारी, माझे रक्षण कर. ॥३४॥
हे विष्णु ! तू अनादी, अनंत आहेस. देवसुरांच्या संकीर्तनामुळे तू जे काही केलेस ते सृष्टीसाठी. वास्तविक तूच अंतिम सत्य आहेस. ॥३५॥
आणि तरीही तू कूर्माचे रूप घेतलेस तसेच इतर प्राण्यांचे. तू अनेक जन्म घेतलेस असे म्हटले जाते. वस्तुत: ते तसे नाहे. ॥३६॥
हे नरसिंह, वामना, परशुरामा, राजा, वासुदेवा, बुद्धा, कलकी, शंभु, देवांच्या शत्रूंचा नाश करणार्‍या, मी तुला वंदन करतो. ॥३७॥
हे नारायणा, पद्मनाभा, पुरुषोत्तमा, देवांना पूज्य आणि ज्ञान्यांमध्ये अग्रणी असणार्‍या तुला माझा नमस्कार असो. ॥३८॥
हे देवा नरसिंहरुप धारण करणार्‍या पर्वताप्रमाणे विशाल, कूर्मरुप घेणार्‍या, समुद्राप्रमाणे, मत्स्यरूप घेणार्‍या आणि वराहरूपाच्या तुला मी नमन करतो॥३९॥
ही सर्व सृष्टीच्या उत्पत्तीसाठीच घेतलेली रूपे आहेत. वस्तुत: तुला कुठलेही रुप नाही. हे प्राचीन पुरुषा, ध्यानाच्या सोयीसाठी तुझ्या रूपाची कल्पना केली आहे ॥४०॥
तू स्वत:च पहिला यज्ञ आहेस. यज्ञसामुग्री आणि हवनसामुग्रीही तूच आहेस. तू यज्ञपशू, यज्ञकर्ता आणि घृत आहेस. देव आणी ऋषींचे समूह तुझ्यासाठी
यज्ञ करतात. ॥४१॥
चेतनाचेतन सर्व जग तुझ्यात आहे. तुझ्यातच देव, काल आणि अग्नी आहे. हे जनार्दना ! तू अविभक्त आहेस. माझ्या इच्छांची पूर्तता कर. ॥४२॥
हे कमलनेत्रा, सीमित आणि असीम अशा तुला माझा नमस्कार. मी तुला शरण आहे. संसाराच्या चिंतेपासून मला मुक्त कर. ॥४३॥
जेव्हा राजाने एका मोठ्या आम्रवृक्षाखाली उभे राहून अशी स्तुती केली तेव्हा भगवान फार प्रसन्न झाले. ॥४४॥
एका बुटक्या ब्राम्हणाचे रुप घेऊन ते तेथे आले. ते येताच आंब्याचे झाडही लहान झाले. ॥४५॥
हा चमत्कार पाहून राजा विचार करू लागला की हे आंब्याचे झाड लहान कसे झाले ? ॥४६॥
तेव्हा त्याला समजले की, ब्राम्हणाचे येणे हेच याचे कारण आहे. आणि त्यामुळे तो ब्राम्हण म्हणजेच भगवान आहेत. ॥४७॥
ब्राम्हणासमोर दंडवत घालून त्याने स्तुती केली.
हे प्रभू, तुम्हीच विष्णु आहात आणि मला आशीर्वाद देण्यासाठी आला आहात. कृपा करून मला तुमचे मूळ रुप दाखवा. ॥४८-४९॥
अशी प्रार्थना केल्यावर भगवान त्याच्यासमोर शंखचक्रगदाधारी रुपासह प्रकट झाले आणि म्हणाले - ॥५०॥
हे राजा ! तुला पाहिजे तो वर मागून घे. मी प्रसन्न झाल्यवर सर्व जग मला तिळाच्या दाण्याप्रमाणे आहे. ॥५१॥
देवांनी असे म्हटल्यावर राजा प्रसन्न झाला आणि त्याने केवळ मोक्षच मागितला. ॥५२॥
अशी प्रार्थना केल्यावर भगवान म्हणाले -
माझ्या प्रयत्नाने हा आम्रवृक्ष लहान झाला म्हणून यापुढे तीर्थ कुब्जाम्र म्हणून ओळखले जाईल. ब्राम्हणच नव्हे तर इतर प्राणीही जे इथे शरीर सोडतील
ते मुक्ती मिळवतील. ॥५३-५५॥
असे म्हणून भगवंतांनी शंखाच्या अग्राने राजाला स्पर्श केला आणि तो एकदम मुक्त झाला. ॥५६॥
म्हणून हे राजा, तू याच देवाला शरण जा म्हणजे तू पुन्हा शोचनीय स्थिती प्राप्त करणार नाहीस. ॥५७॥
जो ही कथा ऐकेल आणि प्रात:काळी जो हिचे पारायण करील तो मुक्त होईल. ॥५८॥
आणि हे राजा, जो हे शुभ्रव्रत करील त्याला वैभव प्राप्त होईल आणि शेवटी तो त्यांच्यात मिळून जाईल. ॥५९॥
अगस्त्यगीतेमधील शुभ्रव्रत नावाचा पाचवा अध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 04, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP