चिद्बोधरामायण - चतुर्थ सर्ग

बालकांड
निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


(श्रीरामजन्म - किशोरक्रीडा)
(पृथ्वी)
सती श्रवण तूं करीं सरस हे कथा विस्तरीं,
दिनेश-कुळ-भूपती दशरथें अयोध्यापुरीं ।
वसोनि धरणीवरी परमवीर हा केसरी
प्रसिद्ध सुरशेखरीं अवनिशासिता या परी ॥१॥
नसेचि सुत त्याजला, म्हणुनि फार चिंतावला
सुखासि तरि वीटला, अफळ जन्मसा वाटला ।
सखेद मनिं दाटला, गुरु वशिष्ट त्या भेटला
दुजा विधिच वाटला चरणपंकजीं लोटला ॥२॥
पुजोनि बरव्या रिती बसविला महाआसनी
निबद्धकरसंपुटें विनविलें तया ते क्षणीं ।
"कुमार नसती  मला म्हणुनि संपदा थोरली
असौख्यकर वाटते सुरवरीं जरी वानिली ॥३॥
कसे घडति पुत्रे ते, परम वृद्ध झालों गुरु
उपाय करुं कोणता गमत देह हा अस्थिरु ।
समस्तशुभलक्षणी मज कुमार होती जसें,
उपाय कथिजे तसा करिन, यत्न लोकीं असे ॥४॥
तुम्हांविण दुजा मला कवण घोरचिंतार्णवीं
करील परपार तो म्हणवि धन्य मातें भवीं । "
अशी मुनिवरें गिरि परिसतां वदे, "भूपती
त्यजीं परम घोर तो, करिशि दीर्घ चिंता किती ? ॥५॥
"तुला कुमर चांगले सबळ लोकपाळां परी
चतुष्टय तुझ्या कुशीं सरस जन्मती लौकरी ।
विभांडसुत आणवी मुनिवरेण्य शांतापती
तदा सफळ सर्वही घडत चिंतिलें, सन्मती ॥६॥
"अम्ही ऋषिसमेत कीं करुं सुपुत्रकामेष्टितें,
समस्त करि सिद्ध तूं यजनवस्तु जें लागतें ।
प्रधान मग पाठवी मुनिस आणवी सादरें,
मखासि करि सिद्धता किमपि विघ्न तैं नासरे " ॥७॥

भुजंगप्रयात.
ऋषि-शृंग संप्रार्थितां यज्ञकामीं यजी अश्वमेधें हरीयज्ञनामी, ।
करी जातवेदासि संतुष्ट राजा तदा वोपिलें पायसान्नासि वोजा ॥८॥
जटा तप्तजांबूनदाकार माथा दिसे चंद्रसूर्याहुनी तेजधर्ता, ।
उदेला स्वयें यज्ञनामें हरी तो कृपें पूर्णकामी नृपातें करीतों ॥९॥
श्रद्धावता धर्मगुणानुरक्ता पवित्रशीळा गुरुभक्तिमंता ।
प्रसन्न झाला हरि यज्ञभोक्ता अर्पी स्वयें पायस भूमिनाथा ॥१०॥

वसंततिलका.
तें दिव्य पायस निरीक्षुनि भूभुजाला संतोष फार हृदयीं अनुपम्य झाला ।
आज्ञा करी ऋषिसमेत वसिष्ट यातें " दे दिव्यरुप परमान्न वर स्त्रियांतें " ॥११॥

शिखरिणी.
तदा वांटी राजा हवि वडिल पत्नीस अरधें
दुजा कैकेयीतें सम करुनि दे स्नेहविशदें ।
स्वभागीं कौसल्या सकरुण सुमित्रेस अरधें
तसें दे कैकेयी अति विमल भागा परमुदें ॥१२॥

भुजंगप्रयात.
चरु भक्षितां गर्भिणी राजदारा विराजेति देवांगनाशा उदारा ।
कपोलद्वयीं पांडुता केतकीची वरी शोमली गौरता कांचनाची ॥१३॥

पृथ्वी
दिशा प्रसवती जशा रविशशांक तैशा परी
सती प्रसवल्या सुखें सुतचतुष्टया सुंदरी ।
वडील महिषी बरी प्रसवली रमानायका
कनिष्ट सुत कैकयी प्रसवली स्वभाग्यें निका ॥१४॥

मालिनी.
यमलसुत सुमित्रा जन्मवी पुण्यखाणी विलसत चहुं रुपें येकला चक्रपाणी ।
सुखकर मधुमासीं शुक्लपक्षीं दुपारां नवमितिथिसुकाळीं जन्मला रामहीरा ॥१५॥

उपजाति.
पुनर्वसूकर्कट लग्नकाळीं पंच ग्रहीं उच्चपदांतराळी ।
मेषीं वसे भानु, अशा सुयोगीं उत्पन्न झाला विभु पूर्वभागीं ॥१६॥

भुजंगप्रयात.
जगन्नाथ भूभार संहारणार्था उदेला स्वमायातनू लोकधर्ता ।
घन:श्याम लावण्यरुपी परात्मा चतुर्भुज पीतांबरु सच्चिदात्मा ॥१७॥

चित्रलिला.
जलजदलांतविलोचनाभिरामें जडितझषाकृतिकुंडलें ललामें ।
अमितशशीतपनोपमें किरीटें अलिकुलनील गुडालकें सुदाटें ॥१८॥
करकमळीं धृतशंखचक्र-पद्मा दितिसुतसंहरिणी गदा महात्मा ।
अभिनव कौस्तुभ रत्न कंठदेशीं विलसत सुंदर वैजयंति कैशी ॥१९॥

वसंततिलका.
श्रीवत्स हार पदकें कटकांगदेशी नाना विचित्र मणि भूषण अंग देशीं
कांचीकलाप लघुकिंकिणियुक्त साजे पायीं सुहेमनवनूपुरही विराजे ॥२०॥
सर्वांग सुंदर मनोहर दिव्य मूर्ती कंदर्पकोटिसदृशाकृति रत्नकांती ।
देखे दिठी जननि या रमणीयरुपा मायाविलासकृतविग्रह त्या अलेपा ॥२१॥

शार्दूलविक्रीडित.
कौसल्या नयनी निरीक्षुनि महा आश्चर्य मानी मनीं
चिन्हें दिव्य विलोकितां मग गणी विष्णु च हा सद्‍गुणी ।
झाला भूभरवारणार्थ नियमें जाणोनियां अंतरीं
तेव्हां ते अतिभक्तिनम्रमनसा सद्वंदनातें करी ॥२२॥

वसंततिलका.
हर्षाश्रुपूर्णनयना पुलकाचितांगी कंठी सुमंद रव केवळ सन्नतांगी ।
सस्वेद कंपयुत अष्टहि भावपूर्णा झाली विलोकुनि विभूप्रति नित्यपूर्णा ॥२३॥

भुजंगप्रयात.
करी स्तोत्र तै " देवदेवा अनंता, गदाशंखचक्राब्जसंयुक्तहस्ता ।
अनादि प्रभू अक्षरा वेदवेद्या नमो वाग्विदूरा परा नित्यशुद्धा ॥२४॥

मदिरा.
" वेदविदीं तुज जाणितलें परिपूर्ण चिदात्मक सत्य सुखात्मा
निर्मिसि पाळिसि अंत निरंतर तूं करिसी, परमेश परात्मा ।
मायिक हे गुणभाव, अमायिक तूं, तुज नाहिंत कीं जगदात्मा
तूं तरि रज्जुभुजंग तसा नसतां दिसणें, म्हणणें अखिलात्मा ॥२५॥
"पाहसि तूं परि पाहसिना, मग ऐकुनि, नाइकसी, नचलोनी
चालसि तूं वचनावळि बोलुनि बोलसिना, न करिसि करोनी ।
बैससि ऊठसि बैसत नूठत धांवसि तूं नवजोनि पदांनीं,
सर्वहि हें गुणचेष्टित निर्गुणिं मानिजतें तुजला न कळोनि " ॥२६॥
"प्राणमनेंद्रियभावसमस्तहि तूं, म्हणुनी श्रुति गाति समस्ता
निर्मळ तूं परि शुद्ध निरंजन सर्व समान असोनि अनंता ।
राहसि या जड-जंगम - भीतरिं राहसि हें न घडे विभु आतां
अज्ञतमोघन या नुमजे, उमजे गुरु-गुह्य सुनिश्चळ चित्ता " ॥२७॥
"लक्षशतेंद्रुहिणांडवळी दिसती परमाणु तशा तव पोटी
तूं असला घनरुप, ममोदरसंभव हे म्हणणें जगजेठी ।
लोकविडंबन वांचुनि आणिक काय असे दुसरी तरि गोष्टि,
भक्तपराधिनता तुझि निश्चय जाणवली मज आजिच मोठी" ॥२८॥
"संसृतिसागर फारचि दुस्तर, यांत पडोनि सुसंभ्रमचित्तें
पुत्र पति प्रिय बांध हे मति लाहुनि गुंतुनि चंचळ वित्तें ।
निश्चळ बुद्धि शरीर विनाशक तें अविनाश गणोनि अनर्थे
बूडतसो, परवारनिदर्शक सद्‍गुरु नाविक तूंचि अशांतें ॥२९॥
"त्वच्चरणांबुरुहा शरणागत निश्चित मी तरि जाण अनंता,
शक्ति तुझी भ्रमवील मला न कधींच असें करि बा प्रभु आतां ।
आंवरि हें अति रुप महाद्‍भुत, लौकिकबाळक हो मम ताता
पाहुनि घेउनि सेउनि लालुनि पावन संसृति बंधनिवृत्ता ॥३०॥
"हेचि मनोहरमूर्ति मनोमय रत्नगृहांत सदोदित राहो,
याविण हे दिठि वस्तु दुजी जगतीत कदापि कदापि न पाहों ।
कोमल बालक होउनि दाखवि रुप तुझें मज लागिं सुबाहो,
देखुनि देहिं अलिंगुनि बाहुनिं गाउनि पाळुनि घेइन लाहो" ॥३१॥

भुजंगप्रयात.
तदा चक्रपाणी म्हणे,  "ऐक माये, जसें इच्छिसी तेंचि होईल पाहें ।
मला प्रार्थिले ब्रह्मदेवें धरेचा महाभार वारावया राक्षसांचा" ॥३२॥

उपजाति.
जगत्रया रावण दु:खदाता असे मुनींला सगळाची खाता ।
देवांदिकां दंडुनि बंदिशाळे ठेवोनि वर्ते असुरेंद्रमेळें ॥३३॥
"रात्रिंचराधीशविनाशनार्था मी जाहलों भूवरि जाण माता, ।
मनुष्यरुपें निवटोनि त्याला प्रख्यात कीजे जगतींत लीला ॥३४॥

मालिनी.
"दशरथनृपतीनें माय त्वां फार मातें कठिण तप करोनी तोषवीलें सुचित्तें, ।
कुमर मजचि तुम्ही इच्छिलें, याजसाठीं जननि उपजलों मी साच तुझ्याच पोटीं ॥३५॥

वसंततिलका.
"हे पूर्वजन्मकृत तत्समरणार्थ माये म्यां दाविले परमरुप तुला सुकाये ।
मद्ददर्शनें विमल मोक्ष घडे जनाला भक्तीविना कठिण, साध्य नसे दुजाला ॥३६॥
"संवाद हा पठण जो करि नित्य भावें मद्भक्तियोग अति दुर्लभ त्यासि फावे ।
सारुप्यलाभ मदनुस्मृति जीवयानीं ऐसें घडे जननि गोष्टि यथार्थ मानी ॥३७॥

भुजंगप्रयात.
असें बोलुनी देव तो गुप्त झाला, रडे मानवी डिंभ तैसें स्वलीला,
विशालाक्ष देवेंद्र नीलांगकांती दिसे कोटिकंदर्प लावण्यदीप्ती ॥३८॥

शार्दूलविक्रीडित.
बालादित्यसम प्रकाश विलसे, अत्यंत जो साजिरा
कैकेयीसुत सर्वलक्षणमणी सर्वांपरी गोजिरा ।
दोघे पुत्र सुरेंद्रसे प्रसवली राज्ञी सुमित्रा सती
विष्णू चक्र फणींद्र शंख चवघे उत्पन्न झाले क्षिती ॥३९॥
संतोषें परिचारिकीं विनविले भूपाळका-शेखरा
झाले पुत्रमणी असें परिसतां आला गृहाभीतरा
होतां मंगळमज्जनासि, गुरुला अकारिलें सादरें
केलें सुंदर जातकर्म विधिनें भूपें प्रमोदोत्करें ॥४०॥
आनंदांबुधिमग्न होउनि महाराये द्विजां गोधनें
ग्रामें अश्व रथ प्रमत्त गज ही सद्रत्न वस्त्रें धनें
दिल्हीं तैं अमितें सुतोषमनसें प्रेमें उदारें तदा
संतोषा उपमा नसेचि दुसरी ब्रह्मांडगर्भी कदा ॥४१॥
योजी नाम तयासि सद्‍गुरुमुखें विज्ञानराशी बरा,
" हा श्रीराम वडील पुत्र नृपती सर्वां गुणें साजिरा ।
प्रेमें निर्भर नित्य मुक्त रमती योगींद्र ज्याचे पदीं
योग्यांच्या हृदयारविंदसदनीं जो कां रमे श्रीनिधी " ॥४२॥
" हा तो लक्षणयुक्त लक्ष्मण अशा नामें विराजो बरा "
" हा पृथ्वीभरणीं समर्थ, भरता जाणें नृपा सुंदरा" ।
"शत्रू सर्व निपात हा करिल जी शत्रूघ्न, चौघे असे
तूझे पुत्र जगत्‍त्रयीं मिरवती, प्रख्यात विष्णु तसे" ॥४३॥

इंद्रवज्रा.
"जैसा हविर्भाग तसाचि जाण रामार्थ तो लक्ष्मण कीं सुजाण, ।
शत्रुघ्न झाला भरतार्धभागीं " तैएचि ते वर्तति सानुरागीं ॥४४॥

स्त्रग्धरा.
बालक्रीडाप्रसंगी रघुकुलतिलकें लक्ष्मणें सर्वदांही
क्रीडावें तोषवावें जनकजननितें बोबड्या बोलण्यांहीं ।
शत्रुघ्नासी सदांही नृपवर भरतें खेळणें, तोक चारी
ऐसें भूपाळकातें रमविति बहुधा लोकलीलानुकारी ॥४५॥
शार्दूलविक्रीडित.

भाळीं पिंपळनाम रम्य विलसे संयुक्त मुक्तामणी,
कंठी कृष्णरिठे मणी परि बरी शोभा दिसे भूषणीं ।
मोठी व्याघ्रनखें सुहेमजडितें, माणिक्य मुक्ताफळें
हस्ती अंगद बिंदली मणगटी जांबूनदें सोज्वळें ॥४६॥
कानी सुंदर भोंकरे विलसती, ते भीकबाळी वरी,
वक्षी शोभति पद्मरागपदकें जीं बाळसूर्यापरी, ।
माजीं सत्कटिसूत्र रम्य विलसे, त्या घागर्‍या वाजटा
वांकी तोडर पादुकांसि मिरवे, शोभा दिसे उद्धटा ॥४७॥

उपजाति.
विचित्र तोकाभरणीं विराजे सर्वांहुनी राम विशेष साजे ।
तारांगणी श्रेष्ठ सुधांशु जैसा भासे जनां श्रीरघुराज तैसा ॥४८॥

स्त्रग्धरा.
कौसल्या राजराणी निरखुनि नयनीं सादरें चक्रपाणी
खेळे तो विश्वखाणी विविधपरि मनी तोष अत्यंत मानी ।
त्या प्रेमा कोण वाणी समरत जननी ते सुमित्रा स्वपाणी
पुत्रांतें जेववोनी निजउनि शयनीं पूर्ण झाली शिराणी ॥४९॥

रथोद्धता.
बोबडे सरस बोल कोंवळे, इंद्रनीळमणिकांति सांवळे ।
दंतमौक्तिकसुपंक्ति साजिरी शोभली वदनशुक्तिकांतरी ॥५०॥

मत्तमयूर.
एका मागें एक सुनीलोत्पलपंक्ती चौघे रांगो लागाते, गेहांगणवर्ती ।
भिंती टेंके घेति उभे राहति तोषें सौख्या देतो मातापित्यालागि विशेषें ॥५१॥
वत्सांची ते सूक्ष्म सुपुच्छें निज हातीं वोढोनीयां धांवति, मागें न पहाती, ।
माता धांवो लागति पुत्रां वरजाया विश्वाचे जे रक्षक त्यांते, हरि माया ! ॥५२॥
भूपाळानें भोजनकाळीं प्रियरामा बाहे वेगी "जेवुनि जाई सुखधामा " ।
क्रीडासक्ता ओढूनि आणी मग माता बाळा संगे खेळत लीला गुणवंता ॥५३॥
धांवो लागे माय धरों ‘ये’ ह्नणऊनि धांवे पाठी पुण्यवती पंकजपाणी, ।
योगींद्रातें साध्य नव्हे त्याप्रति राणी हातीं वोढी भक्तिबळें चित्सुखखाणी ॥५४॥
हांसे वेगीं दाटुनि, येतो, कवळाते घेतो, जातो धाउनि मागें जनकातें ।
दावी ऐसा खेळ तदा कर्दमपाणी, भूपाळाचें दैव जगी मापिलें कोणी ! ॥५५॥
जो विश्वाते निर्मुनि पाळी मग गाळी मायाधारी तो परमात्मा वनमाळी ।
नित्यानंदी चिन्मय लोकां सुखहेतू क्रीडाव्याजें दंपतिचित्ता सुख देतू ॥५६॥

भुजंगप्रयात.
असे बाळ भावी स्वमायाविलास जगाचे परी खेळ दावीत तोषें, ।
पुढें प्राप्त कौमारकाळीं तयाला पिता तो करी मौंजिकबधादिकाला ॥५७॥
तयां वेदविद्या धनुर्वेदविद्या महाशास्त्रविद्या सुखशास्त्र विद्या, ।
गुरु सर्व सांगे स्वविद्याश्रयाला कळा सर्वही चित्कळा पूर्ण त्याला ॥५८॥

शार्दूलविक्रीडित.
झाले दक्ष समस्त वेद शिकले क्रीडा मनुष्याकृती
मायावी जनमोहनार्थ विविधा क्रीडा जगीं दाविती ।
जाती हे मृगयेसी लक्ष्मणसवें श्रीराम तो एकदां
शत्रुघ्नें भरतासवें विचरणें नाना वनांती मुदा ॥५९॥
मारी दुष्ट मृगांसि राघव वनीं शार्दूल सिंहादिकां
वाराहा शशशल्यकांसि हरिणा सर्षा शृगाला वृका
प्रात:स्नानविधान सर्व करुनी वंदोनि माता पिता
लोकाचार विचार सर्वहि करी जो योग्य पृथ्वीभृता ॥६०॥
सारी भोजा बंधुमित्रसुहृदीं सद्‍ब्राह्मणांचें गणीं
सर्वां तोषवि दानमानविभवें, श्रीराम लोकाग्रणी ।
नाना शास्त्रविचार धर्म अवघे आणी मनीं सादरें
भूपातें अतियोग्य जे सुखद जे स्वर्गासि देती बरे ॥६१॥

उपजाति.
असा परात्मा मनुजावतारी मानुष्यलोकानुगुणें विहारी ।
जो निर्विकारी परिणामहीन कांही करीना सुविचार्यमाण ॥६२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP