हुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


हुतात्मा बाबू गेनू याचा पोवाडा
धन्य बाबू गेनू यान्‍ झेंडा जगतांत । लावोनिया झाला ख्यात । सार्‍या मुंबई शहरात । पिकेंटिंग करण्यांत । केलि सर्वावर मात प्रियप्राण नसति कोणास । अर्पिले देश कार्यास ॥
धन्य झाली माय बाबुरावाला प्रसवून । गेले कुळ उध्दरुन हाक भूमिची ऎकून । गेला तात्काळ धाऊन । तिचे पागं हो फ़ेडून । जाहला वंद्य सकळास । या सर्व भरतखंडास ॥
चाक:- महाळुंगे पुणें प्रांतांत । सुंदर गाव हो त्यांत ॥
एकोणिसशे आठ सालांत । जन्मला बाबू विख्यात । शिक्षण दहा वर्षात । जाहलें त्याच गांवांत । पंतोजि गोपिनाथ पंत । शिकविले ज्यांनी भारत ॥
इतक्यात दिवंबंत तात । बाबूचा जाहला घात ॥
चाल:- शिक्षण थोडें झालें होते परंतू संस्कार । उच्च जाहला होता त्याचे अंतरंगीं फ़ार ॥
ऎकुनिय शिवचरित्र त्याला वाटे हुरहुर । दास्यमुक्त भूमाता करण्या जावे सत्वर ॥
शेतीवरचें लक्ष उडाले पाहुनीया माय । रागावुनि बोलली काळजी आहे तुज काय़ ॥
बाबू म्हणे आईस आमची माय असे दास्यांत । मुक्त कराया जातो आतां पाडु नको पाशांत ॥
सर्व संग सोडुनी महात्मा बैरागी झाला । कायदेभंग सुरवात कराया दांडीला गेला ॥
स्वातंत्र्याविण आश्रमि पुनरपि नाही येणार । ऎशि प्रतिज्ञा करुनि हलविला देश खरोखर ॥
हाक गांधिची ऎकुनि जाणें कर्तव्याचि माझें । कर्तव्याच्या आड नको हें वात्सल्यचि तुझे ॥
ऎकुनि उत्तर माय़ बोलली जाऊ नको बाळ । आठरा विश्चे दारिद्राचा कंठु कसा काळ ॥
दूर कराया या दैन्याला गांधी अवतरला काय करिल तो अनुयायाविण या दारिद्राला ॥
तळ हातावरी शीर घेऊनी मावळा तयार झाला । त्यांच्या मदतिनें घेता आलें स्वराज्य शिवबाला ॥
आण गळ्याची बाबू तुजला जाऊ नको आता । परोपरीने विनवु लागली बाबूला माता ॥
माय भूमिची हाक कां आईची आतां कर्तव्या कर्तव्यतेचा पेच पडे चिता ॥
चाल मोडते:- त्याच राति विचार येति बाबूच्या डोक्यांत । झोप येईना निवांत । बेत करुनि मनांत । चालू लागे रातोरात कायदेभंग वणव्यांत । काळास तोंड देण्यास । मारुनी लाथ सौख्यास  ॥जी ॥
चौक २
चाल मोडते:- बाबू गेनू आला भांडून मुंबई शहरांत । सत्याग्रह शिबिरांत । वडाळ्याच्या सेवकांत । नांव घालोनिया त्यांत । मिठागरांवर मात । करुनिया दावि शौर्यास । तत्क्षणी पकडले त्यास जी ॥
सहा महिने झालि शिक्षा नेले येरोडायास । भिती नसे अंतरास । हाल भोगोनिया खास । आला महाळूंगे गांवांस । मातोश्रीला भेटायास । भेटोनी गेला तत्काळ । हो पातला निकट तो काळ ॥
चाल बदलून:- स्वातंत्र्याच्या धर्मसंगरीं असंख्य जन ये ती स्वातंत्र्यास्तव प्राण स्वर्गाप्रती जाती ॥
नानासाहेब, तात्या टोपी, झाशी मर्दानी । गाजउनी तलवार बिजली गेली चमकोनी । बंदीजनांचे हाल पाहुनी जतींद्र तो गेला । अन्नत्याग करुनी त्याने कवटाळुनी काला ॥
तैसा बाबूगेनू विदेशी बहिष्कार काजी । प्राण अर्पुनी कैसा गेला या ऎका आजी ॥
पिकेटींग मुंबईत करिती विलायतीवर । तरुण वृध्द अबला या कार्यी असती तत्पर ॥
पिकेटिंग करतांच पकडते जुलमी सरकार । हसतमुखाने अबला तो पाहुणचार ॥
कैदखाने भरुनी जातां देति लाठिमार । पुष्पवॄष्टिसम सहन कराया कितीक तय्यार ॥
मँचेस्टर व्यापारि प्रतिनिधी जार्ज फ़्रेजर । व्यापाराने देश लुटूनिया झाला शिरजोर ॥
विलारती मालाचे गठ्ठे आणण्या मोटार । घेऊनि गेला हनुमान गल्लीमध्ये सत्वर ॥
करील कोणी आपल्यावरती पिकेटिंग म्हणुनी । गेला तो पोलिस आणण्या सरकाराकडूनी ॥
संरक्षक पोलिस घेऊनी व्यापारी आला । चाकर जणु याच्याच घरांतील ते तैनातिला ॥
नेउ लागला हनुमान गल्लीमधूनी मोटार । स्वयंसेवक म्हणती नाही आम्ही जाऊ देणार ॥
गोरा झाला लाल ऎकुनी ऎसें उत्तर । गुलाम बोलुनि चालुनी त्यांचें कोण ऎकणार ॥
आला तो तात्काळ काळबादेवी रस्त्यांत । गर्दि जनांची झाली तेथे रिघ नाही त्यांत ॥
चौक ३
कटाव:- इतक्यात स्वयंसेवक, पातले कैक । एकाचढि येक, बाबू नायक, सांगतो एक, म्हणे गोर्‍याला, हा माल परत ने कोठाराला । तात्काळ पुढें पोलिस, आले सर्वास, स्वयंसेवकास दूर करण्यास, परि सर्वास, पकडिलें खास, तोंच मोटार, घेउनि चालला गोरा तो बिनघोर ॥
इतक्यात मोटार आडवून, रस्ता रोखून, धरिला पाहून, लाठि मारुन, दिलें हाकलून मार्ग तो केला, चालली हळू मोटार पुढे रस्त्याला ॥
तात्काळ बाबु रस्त्यांत कराया पुत, देह देशांत पुन्हा सरकत, मोटार मार्गात येऊन पडला, पाहुनी हिंदु ड्रायव्हर घाबरुनि गेला ॥ ढकलून त्यास तात्काळ, बाबूचा काळ, गोरा तो लाल, जणू कलिकाळ, सोडिला ताळ, धरुनि चत्र्काला, हो दूर नाहि तर ठार करिन म्हणे त्याला, मोटार नेली त्या वरुनिं त्याच वेळेला ॥
कटाव- मोटार पुढें रस्त्याला । नेताच बाबू धरणिला । रक्तानें लाल तो झाला । रक्ताचा सडा रस्त्याला । रक्ताचा चिखल फ़ार झाला । चिळकांड्या उडती रस्त्याला । पाहुनी लोक गहिवरला । गोर्‍याचा राग फ़ार आला । स्वार्थाची धुंदी डोळ्याला । प्रांणाची पर्वा काय त्याला । समुदाय भडकुनी गेला । मारामारी चा प्रसंग आला । परी बाबू म्हणे सर्वाला । सत्याचा विजय करण्याला । शांतता धरा या काला । स्वातंत्र्य प्राप्ति करण्याला । प्राणांचें मोल देण्यांल । सिध्द व्हा त्वरित कार्याला । स्वार्थाध घेइ प्राणाला । निस्वार्थि देई प्राणाला । बोलोनी स्तब्ध तो झाला तात्काळ त्याला हो नेला । राष्ट्रीय दवाखान्याला । डाँक्टरने डोस पाजला । बांधुनी त्याचे जखमेला । उपयोग नाहीं पर झाला । बाबूगेनू कालवश झाला । देशार्थ प्राण देऊनी धन्य तो झाला  ॥जी ॥
मरणाची भीती नको मला, मरण चुकलय क कधि कोणाला, मेलो तर जाईन स्वर्गाला, चळवळ येइल जोराला, जगलो तर स्वातंत्र्याला, गोर्‍याला दिले आव्हान मोटार नेण्याला । भारतरक्त प्राशुनी लाल जो झाला । बाबूची द्या येईल कशी गोर्‍याला । प्राणाचि पर्वा काय अशा स्वार्थि गोर्‍याला ॥
चाल २- बाबूची माय पातली त्याच समयाला । नको जाऊ म्हणत मी होते माझ्या लाडक्याला । परी होता कुठे तो शब्द श्रवण करण्याला । न्हाणील दु:ख अश्रुनी आईनें त्याला । हंबरडा फ़ोडूनी तिनें शोक बहू केला । जरि यास माझ्या उदरात जन्म मी दिला । परी खरी माय भूमाता जिनें पोषिला । तो पुत्र खरा जो माय भूमिस्तव मेला । लाभोत असे सत्पुत्र भरतभूमिला । लाखोनि लोक लोटले दर्शन घेण्याला । सुमनांच्या माला अर्पूनी त्यास सजविला । फ़ुले आणि पैसे उधळती त्याचे पालखिला । किती माता पाहूनी त्यास ढाळी अश्रुला । अंतरी म्हणते सत्पुत्र असा लाभला । होईल तरिच सार्थक येऊन जन्माला । जाहले दु:ख हिरा हरपला  ॥जी॥
चाल मो:- खालीं यावा तारा जसा तारांगणांतून । क्षणामध्यें हरपुन । जावा नयना पुढून । असें भाग्य विलोकून । असे मरण यावें म्हणतात । त्यासम राष्ट्रकार्यांत ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP