श्री समर्थ रामदास स्वामींचा पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


धन्य धन्य समर्थ रामदास । चिरंतन वास । सज्जनगडास । यात्रा वद्य नवमी माघ मासास । समाधि दर्शने मोदचित्तास । वाटे आत्मारामतनय शाहिरास ॥
श्रीराम प्रभू जन्मला । चैत्र नवमीला । दुपारी माध्यान्हिला । त्याच वेळि समर्थ आले जन्मास । रामोपासना त्यांचे वंशास । "रामफळ" जणूं समर्थ रामदास ॥
आठवे वर्षि वडिल बंधूला । नारायण म्हणाला । उपासना मला । द्या असा हट्ट धरुनी बसला, रुसूनी देवळात जाऊनी निजला उठवुनी रामे मंत्र दिधला ॥
यशोदेनें पाहुनी कृष्णाला । लोण्याचा गोळा । घेऊनी खाल्ला । पळू लागता धरला गुलामास । उघड बघू तोंड म्हणे कृष्णास । पाहूनी चकित विश्वरुपास ॥
थेट तस्सा अनुभव आला । राणुबाईला । पाहूने नारायणाला । म्हणे काय करतोस अंधारात । ऐका उत्तर दिले तोर्‍यात । चिंता विश्वाचि करितो चित्तांत ॥
द्विज जेव्हां वदले सावधान । ऐकूने कोण । सावध होऊन पळाले फक्त रामदास । नाना प्रुरश्चरणे गोदातीरास  सूर्योपासना केली नाशकास ॥

चाल :- १
तेरा कोटी राम नाम जपले । पुरश्चरण गायित्री केले ॥
बारा वर्षे तप तिथे केले । रविसम तेज प्रगटले ॥
ग्रंथांचे ज्ञान मिळविले । वैराग्य शुकासम लाभले ॥
हरि कीर्तन निरुपण केले । कीर्तनी लोक डुलवीले ॥

चाल :-२
पंचाग्नि साधने "सोन्यासम" तळपले ।
वरि सूर्य खाली गोदेंत उभे तप असले ।
समर्थाचे पाय माशांनि पार कुरतडले ।
पाहुनि घोर तपश्चर्या चकित जन झाले ।
कृपादृष्टी रामरायाची, दर्शन घडले ।
रामाज्ञे तीर्थाटन पायीं त्यांनी सुरुं केले ।
चाल मोडते :
आसेतु हिमाचल भ्रमण । तीर्थाटन करुन । उठले पेटून । अन्नाविण तडफडणारे पाहुण । मंदिरे उध्वस्त गेली होऊन ।
हृदय समर्थांचे गेले पिळवटून ॥

चौक २ रा
यवनांनी मूर्ती फोडिल्या । स्त्रिया भ्रष्टविल्या । ऐकूनी किंकाळ्या । यवन सेनेचा पाहुनि धुमाकुळ । हिंदूंचा केला अनन्वित छळ । अंतरी ज्वालामुखीचा लोळ ॥
यवनांनी हिंदु बाटवून । स्त्रिया पळवून । गायि कापून । हिंदू राजांच्या राण्या पळवून । मंदिरांच्या मशिदि केल्या पाहून । उठले तत्काळ समर्थ खडबडून ॥
प्राणिमात्र जाहले दु:खी । नाही कुणीं सुखी । निनयिका । असे सूर चित्र पाहून । उदासी वृत्ती गेली होऊन । स्वराज्य मार्ग काढला शोधून ॥

चाल :-१
डोळ्यांची झोप उडाली । जलावीण जशी मासोळी ।
चिंतेत समर्थ माऊली । कृष्णाकाठिं होति बैसली ॥
दृष्टांत होता उडि घाली । अंगावरी मूर्ती सांपडली ॥
मिरवीत मूर्ति आणिली । चाफळी स्थापना केली ॥
रघुवीर समर्थ आरोळी । महाराष्ट्रिं त्यांनी घुमविली ॥
बलहीन जनाना पटली । हनुमान मूर्ती महाबळी ॥

चाल:-२
रात्रीत आकरा मारुती केली स्थापना ॥
गांवोगावि घुमविती तरुण तालिमखाना ॥
बजरंग बलीच्या तरुण करिति गर्जना ॥
बाराशे मठ स्थापूनि महंत योजना ॥
दासबोध ग्रंथाचे सतत चाले पारायणा ॥
क्रांतिकारि योगि सत्पुरुष भेटले शिवबाना ॥
इटलीस मेंझिनी इथे समर्थ राणा ॥
"यंग इटली’ त्यांची, समर्थांची महंत संघटना ॥
"कुबडीत गुप्ती" तशी करा " गुप्त संघटना" ॥
फेकुनी टाळ, तलवार दाखवा यवनांना ॥
वाघाचे बच्चे तुम्ही भिता काय शत्रुना ॥
गवसले समुद्र-मंथनी अमृत देवांना ॥
स्वातंत्र्य अमृत गवसले समर्थ शिवबांना ॥
मिळविण्या मोक्ष घ्या "रामनाम" साधना ॥
राष्ट्राचा साधण्या मोक्ष करा नामी संघटना ॥

चाल मोडते :-
रामजन्म उत्सव सुरु केले । प्रभावित झाले । क्षात्र तेजें दिपले । रामोपासना महाराष्ट्रात । घरोघर गेली जन हृदयात । झळकू लागली तरुण रक्तांत ॥

॥ चौक ३ रा ॥
राम राय देव देवांचा । ज्यांने रावणाचा । वध केला त्याचा । आदर्श समर्थांनी दिला शिवबास । भेट दोघांची चाफळ गांवास ।
रामोपासना त्याच्या समयांस ॥
जनशक्ती तोंड देण्याला । राज्य घेण्याला । सिद्ध शिवबाला । वानरसेना जशी रामास । मावळी सेना तशी शिवबास । हड्डि यवनांचि नरम करण्य़ास ॥
समर्थ शहाजि भेट नाशकाला । अंतरि मेळ जमला । कारवाई करण्याला । शिवबाला जोर त्यांने चढलां । कडेकोट किल्ले बांधण्याला । राष्ट्राची शक्ती वाढण्याला ॥

चाल : १
सकळ जनांतरिचा देव । उठविला रिताना ठाव ॥
शोधला असा उपाय । जन हृदयिं मिळाला वाव ॥
जेव्हां धर्म येतो धोक्यांत । राजशक्ति हवी हातांत ॥
शिवसमर्थ जोडि मिळाली । कृष्णार्जून ती वाटली ॥
रणभेरी त्याची गर्जिली । स्वराज्याचि यांचि आरोळी ॥
स्वप्राणबळें घुमविली । स्वातंत्र्य ज्योत फुलविली ॥
जनशक्ती तरारुनी उठली । जोडिच्या पाठि ठाकली ॥

चाल: - ३
समर्थांची तेजस्वी मूर्ती । तपे तलपती । बुद्धीवान अती । प्रभावित होती हो । जनता भोंवती ॥
समर्थांछि अमोघवाणी । चैतन्यखनी । ऐकूनी कर्णी । रंगली कीर्तई हो । तरुण मंडळी ॥

इटालीचे स्वातंत्र्य उद्‍गाते । मेंझिनी होते । तसेच भारताचे । रामदास होते हो । शंका ना तिथे ॥
समर्थांची पुण्याई मोठी । प्रत्यक्ष राम म्हणति । " प्रसंग हा तडातडी । करा विवेक तातडी । उठा उठा करा कृति । लोकोद्धारासाठी हो । मी आहे पाठी" ॥

चाल :-२
सांगूनि गीता अर्जुना युद्धा उठविले
दासबोध सांगुनी (समर्थे) जना जागृत केले ।
रामानी दुष्ट रावणाचे हनन केले ।
शिवबांनी औरंग्यासम कैक लोळविले ।
भवानीच्या कृपेने राज्य स्थापन केले ।
थाटात राज्यारोहण रायगडीं केले ।
जिजाईंचे डोळे आनंद अश्रूनी भरले ।
"जाहले उदंड पाणि" समर्थ वदले ।
भवानिला " सुवर्ण पुष्प" त्यांनी वाहिले ।
"वाढवी तुझा तू राजा" मागणें केले ।

चौक ४ था
समर्थ भक्त श्री. देव अलौकिक । मोठे संशोधक । ध्यास त्या एक । लावणे शोध " शिवथर घळिचा" । लागता वाटेहा शोधचि स्वर्गाचा । आनंद मावेना गगनि त्यांचा ॥
जिथें दासबोध गंगा अवतरली । भूमी, ती सगळी । पावन झाली । नाना साहेबानी स्वर्ग समजून । तेथ शिव समर्थांना वंदून । पवित्र मातीत घेतले लोळून ॥

चाल :- ४
हिमगिरि शंकर करि हरि चिंतन । समर्थ प्रभु चिंतन तसें करि शिवथर घळि बैसून ॥
निसर्ग सुंदर त्याच घळीचे । "सुंदर मठ" म्हणून । समर्थे नांव दिले ठेऊन ॥
इथेचि केली गुप्त खलबते । शिव समर्थ जोडिनं । बांधिले स्वराज्याचे तोरण ॥

चाल :-१
करा आधि प्रपंच नेटका । मग परमार्थाचे विवेका ॥
दासबोध, क्रांतिकारी ग्रंथ । साधका आधार स्तंभ ॥
परमार्थ प्रपंच सांगड । कांहि संत म्हणती हे बंड ॥
सांगडीचे समर्थ तत्वज्ञान । वाटे अंमृत जनाजीवन ॥
स्थापक वैद्य बाबुरावांना होति तळमळ ॥

चाल :- २
हा दीप स्तंभ घेऊन समर्थ मंडळ ।
मालखीच दर्शन होता खूष जवाहरलाल ॥
त्रिशताब्दि उत्सवी केला हलकल्लोळ ।
त्यासाठी ख्यात श्री समर्थ सेवामंडळ ।
लाखोनि लोक लोटले घेण्या दर्शन ।
व्याख्यान, लेखनाद्वारे जनजागरण ।
कीर्तन, भजन आणि दासबोध पारायण ।
जन होति थक्क उत्सव थाट पाहून ।
उत्सवी भगवा शोभतो मोठ्या डौलाने
फडकविला तोच वैकुंठी रामदासानं ।
वैकुंठि लाविली ध्वजा रामदासानं ।
वैकुंठि भक्तिची ध्वजा लाविली त्यानं ।
चाल मोडली :-
महापुरुष योगि रामदा । महाराष्ट्रास । गुरु शिवबास । आत्म आणि क्षात्र तेज समयास । लाभले स्वतंत्र देश करण्यास । नमन शाहिरांचे समर्थ चरणास.
 --- समाप्त ---

N/A

References : N/A
Last Updated : January 09, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP