शाल्वामात्यो द्युमान्नाम प्रद्युम्नं प्राक्प्रपीडितः । आसाद्य गदया मौर्व्या व्याहत्य व्यनदद्वली ॥२६॥

शाल्वप्रधान तो समरंगीं । पूर्वीं प्रद्युम्नें ज्या लागीं । पंचविशति शरीं आंगीं । भंगिला होता भेदूनियां ॥६३॥
प्रद्युम्नाचा रथ ते काळीं । आला देखूनि घाया तळीं । गदघातें हृदयकमळीं । म्हणोनि बळी लोळविला ॥६४॥
प्रद्युम्नाच्या हृदयावरी । कठोर गदाप्रहारें वैरी । हाणितां मूर्च्छा दाटली गात्रीं । आली आंधारी स्मरनयना ॥१६५॥
लोहजातीमाजी जें तीक्ष्ण । मौर्वी गदा ते तन्मय जाण । तिणें हृदयीं कृष्णनंदन । ताडूनि दुर्जन गर्जिन्नला ॥६६॥
पद्युम्नासी गदा कठोर । लागतां विकळ रहंवरीं गात्र । पडतां सारथि दारुकपुत्र । करी चरित्र तें ऐका ॥६७॥

प्रद्युम्नं गदया शीर्णवक्षस्थलमरिंदमम् । अपोवाह रणात्सूतो धर्मविद्दारुकात्मजः ॥२७॥

गदाप्रहारें हृदय चूर्ण । रथीं मूर्छीत हरिनंदन । दारुकात्मजें हें जाणोन । रथ तेथून परतविला ॥६८॥
अरिमर्दना भो परीक्षिती । घायें मूर्च्छित जाणोनि रथी । कुशलधर्मवेत्ता सारथी । समरक्षिती त्यजूनि निघे ॥६९॥
संग्रामभूमि सांडूनि वेगें । सवेग रहंवर फिरविला मार्गे । स्वसैन्याच्या पृष्ठभागें । अति लगबगें तो आला ॥१७०॥
फिरूनि पाठिमोरी जे गति । अपोवाह म्हणिजे तियेप्रति । तीतें अनुसरला सारथि । मूर्च्छित रथी जाणोनियां ॥७१॥
मुहुर्तें मूर्छना सावरून । प्रद्युम्न झाला लब्धसंज्ञ । पुसे सारथिया कोपून । तें व्याख्यान अवधारा ॥७२॥

लब्धसंज्ञो मुहूर्तेन कार्ष्णिः सारथिमब्रवीत् । अहो असाध्विदं सूत यद्रणान्मेऽपसर्पणम् ॥२८॥

सारथियासि पुसे कार्ष्णि । कां अधिष्ठिली सेनापार्ष्णि । अपोवाह समराङ्गणीं । अनर्ह करणी हे तुझी ॥७३॥
अहो ऐशा खेदेंकरून । म्हणे सारथि या प्रद्युम्न । रणापासूनि जें पलायन । मजलागून अयोग्य हें ॥७४॥
डाग लाविला तां मम शौर्या । केंव मुख म्यां दाविजे आर्या । आचरलास असाधुकार्या । समरीं धैर्या सांडूनी ॥१७५॥

न यदूनां कुले जातः श्रूयते रणविच्युतः । विना मत्वलीबचित्तेन सूतेन प्राप्तकल्मषात् ॥२९॥

आमुचे यदुकुळं जन्मला । समर सांडूनियां पळाला । ऐसा कोण्हीच न ऐकिला । मजवेगळा भूतभावीं ॥७६॥
पुरुषार्थरहिता नरा कारणें । अधैर्यास्तव क्लीव म्हणणें । सारथियानें अधैर्यमनें । मज ही दूषणें पावविलीं ॥७७॥
पळतां देखोनि माझा रथ । शत्रु मिरविती पुरुषार्थ । समरीं हांसती वीर समर्थ । तैं हें व्यर्थ जीवितही ॥७८॥
असो परवीरांची कथा । येतां देखूनि पिता चुलता । त्यांप्रति जाऊनि म्यां भेटतां । काय त्यां पुसतां जय सांगूं ॥७९॥

किं नु वक्ष्येऽभिसंगम्य पितरो रामकेशवो । युद्धात्सम्यगपाक्रातः पृष्टस्तत्राऽऽत्मनः क्षमम् ॥३०॥

कोण्या तोंडें भेटों तयां । कोण्या साधिलें सांगूं जया । पळालों जीव वाचवावया । समरीं अपजया लाहोनी ॥१८०॥
कोण ते सांगू स्वयोग्यता । कोणतें क्षेम प्रशंसूं ताता । इहपरकल्याण समरीं मरतां । अपयशें वांचतां धिक्कार ॥८१॥
रामकृष्णांची असो कथा । पराजयें मम सदना जातां । माझिया भाउजया समस्ता । हांसती तत्वता मजलागीं ॥८२॥

व्यक्तं मे कथयिष्यंति हसंत्यो भ्रातृजाभयः । क्लैब्यं कथं कथं वीर तवान्यैः कथ्यतां मृधे ॥३१॥

माझिया बंधूच्या अंगना । परस्परें उपहासवचना । नर्मोक्ति त्या समान बाणा । माझिया श्रवणा कडतरती ॥८३॥
ज्येष्ठा म्हणती भो देवरा । तुम्हांसि पाहूं द्या नोवरा । येथूनि तुम्ही म्हणवा दारा । सहसा संगरा न वचावें ॥८४॥
वलयें भरा म्हणती एकी । अपरा म्हणती घ्या कंचुकी । कज्जल कुङ्कुम हरिद्रा मुखीं । शोभवा नाकीं मुक्ताफळ ॥१८५॥
व्यक्त म्हणिजे निश्चयेंसीं । मम क्लीबत्व या उपहासीं । भ्रातृजाया सुहृदांपासीं । अनुकारेंसीं प्रकाशिती ॥८६॥
कैसे भावोजी समरंगीं । तुम्हीं पलायन केलें वेगीं । क्लीबत्व शोभविलें निजाङ्गीं । कीर्ति त्रिजगीं रूढविली ॥८७॥
सांगा सांगा कैसें समरीं । ग्लानिवचनें शत्रुनिकरीं । कैशीं वदलां निजवैखरी । किंवा नारी म्हणविलें ॥८८॥
प्राण रक्षूनि आलां सदनीं । येथें प्रताप बोला वदनीं । बहुत शत्रु मारिले कदनीं । किंवा रदनीं तृण धरिलें ॥८९॥
ऐशा मेहुण्या भाउजया । मज देखूनि करिती रळिया । ते वाग्बाण सहावया होय । दिधली मज सूता ॥१९०॥
प्रद्युन्म ऐसा सारथियातें । रसससोनियां विषादें बहुतें । निखंदूनि संतप्त चित्तें । म्हणे अनुचित त्वां हें केले ॥९१॥
हें ऐकूनि सारथि वदे । स्वामी वदलां जें विषादें । ऐसें वदावें अकोविदें । क्षत्रियवृंदें नादरिती ॥९२॥

सारथिरुवाच - धर्म विजानताऽयुष्मन्कृतमेतन्मया विभो । सूतः कृच्छ्रगतं रक्षेद्रथिनं सारथिं रथी ॥३२॥

विभो समार्था भो भो मदना । कालिमा न लवीं माझिया वदना । समरीं केलें अपसर्पणा । धर्माचरणा जाणूनि ॥९३॥
धर्म जाणता मी जो तेणें । समरा पासूनि तुज परतवणें । अधर्म नोहे ऐसें मनें । बहुता गुणें जाणावें ॥९४॥
रथी जर्जर होऊनि घायीं । वीर मूर्च्छित पडते समयीं । सूतें तया प्रति विषम ठायीं । अपोवाही करावें ॥१९५॥
घायीं विकळ पडतां रथी । रक्षणा समर्थ तेथ सारथी । रथ पळविजे पवनगती । समरक्षिती सांडूनियां ॥९६॥
नीतिशास्त्रीं हे सारथिशिक्षा । विदित आहे क्षत्रियां दक्षां । पात्र नोहें मी अधर्मपक्षा । विवरूनि लक्षा आणावें ॥९७॥
सारथियाचा धर्म ऐसा । रथी पावल्या वैकल्यदशा । अपोवाहित करूनि सहसा । टाळिजे वळसा मूर्च्छेचा ॥९८॥
पुढती झालिया लब्धस्मरण । रथिया युद्धाची आंगवण । असतां पुढती कीजे रण । सहसा दूषण येथ नसे ॥९९॥
सारथि विकळ पडतां घायीं । रथस्थें रक्षिजे तिये समयीं । ऐसा प्राचीन धर्म पाहीं । स्मृतिकर्त्यांही लिहिलासे ॥२००॥

एतद्विदित्वा तु भवान्मयाऽपोवाहितो रणात् । उपसृष्टः परेणेति मूर्च्छितो गदया हतः ॥३३॥

ऐसें शास्त्राचें निर्णीत । आणोनि म्यां तिरोहित । समरीं करूनि आणिलें येथ । हें अनुचित न मनावें ॥१॥
शत्रुप्रहारें विशीर्ण हृदय । मूर्च्छोपसर्गें विकळ देह । निःसंज्ञ जाणोनि अपोवाह । करणें अर्हं मज स्वामी ॥२॥
सहसा नव्हे हा मम अन्याय । मन्वादिस्मृतिसंमत हा न्याय । या वरी शत्रूंचा समुदाय । भंगूनि विजय वरा सुखें ॥३॥
ऐसें दारुकसुत बोलिला । ऐकूनि प्रद्युम्न मानवला । म्हणे सारथिया भला भला । समय रक्षिला यथोचित तां ॥४॥
इतुकी श्रीशुकगंगातटी । परीक्षितीचे कर्णपुटीं । कथा कथिली ते मर्‍हाठी । वदला गोठी दयार्णव ॥२०५॥
यावरी सांवरूनि मूर्च्छना । मन्मथ करील समराङ्गणा । पुढिले अध्यायीं त्या कथना । केजे श्रवणा सत्पुरुषीं ॥६॥
एकनाथ एक दुसरा नाहीं । अधिष्ठानीं निविष्ठ पाहीं । प्रतिष्ठानीं सगुनविग्रही । देशिकाग्रणी जगदीश ॥७॥
प्रणता चिदानंददानी । मग ते होती सानंदखाणी । गोविन्दनामाच्या चिन्तनीं । सायुज्यभुवनीं विराजती ॥८॥
गोविन्दनामस्मरणोत्सव । लाहतां परिपूर्ण दयार्णव । कृष्णकीर्तीचें गौरव । कथनीं अर्ह तो झाला ॥९॥
तें हें हरिवरदव्याख्यान । भावें करिती श्रवण पठन । त्याचें दुर्घट भयखंडन । करील आपण हरिवरदें ॥२१०॥
श्रीमद्भागवत दशमस्कंध । टीका हरिवरद अगाध । दयार्णवकृत परम विशुद्ध । अध्याय प्रसिद्ध षट्सप्ततितम ॥२११॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्त्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां शाल्वप्रद्युम्नसमरवर्णनं नाम षट्सप्तत्मोऽध्यायः ॥७६॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥३३॥ ओवी संख्या ॥२११॥ एवं संख्या ॥२४४॥ ( शहात्तरावा अध्याय मिळून ओवी संख्या ३४७९६ )

कालयुक्ताक्षिके शुक्ले नवम्यामसिते कुजे । शाल्वमन्मथयोयुद्धं पूर्णं पिपिलिकापुरे ॥१॥

शहात्तरावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP