ततः प्रववृते युद्धं शाल्वानां यदुभिः सह । यथाऽसुराणाम बिबुद्धैस्तुमुलं लोमहर्षणम् ॥१६॥

असुरांविबुधांमाजी जेंवि । तारकामयसंग्राम पूर्वीं । तुमुल झाला तयाची ठेवी । व्यासादि कवि या उपमिती ॥४॥
महाभीषण रौद्र घोर । ऐकतां रोमाञ्चित शरीर । होय ऐसा संग्राम क्रूर । परस्पर आरंभला ॥१०५॥
सौभाश्रयें शाल्वसेना । दिसे न दिसे माजी गगना । तेथूनि वर्षती शस्त्रास्त्रघना । यादवपृतना भूभागीं ॥६॥
प्रबळ वळिवांचे थेंबुटे । तैसे बाण सणसणाटें । पडती आणि कडकडाटें । महा अस्त्रें सुटताती ॥७॥
महायंत्रांचिया मारें । भंगती प्रासाद पुरगोपुरें । हें देखोनि रुक्मिणीकुमरें । भिडिजे निकरें तें ऐका ॥८॥

ताश्च सौभपतेर्माया दिव्यास्त्रै रुक्मिणीसुतः । क्षणेन नाशयामास नैशं तम इवोष्णगुः ॥१७॥

महाप्रयोगकृताभिचारें । सौभ साधिलें शंकरवरें । मायामय ज्याचे अंधारें । पडतां भास्करें हारपिजे ॥९॥
निबिड मेहुहीं दाटतां गगनीं । विशेष अमावास्येची रजनी । सौभमायेचें तम त्याहुनी । अलक्ष्य नयनीं सुरासुरां ॥११०॥
तेथ रुक्मिणीजठरींचा ज्येष्ठ । प्रद्युम्ननामा वीर वरिष्ठ । तेणें सौभमायेचें कपट । केलें सपाट क्षणमात्रें ॥११॥
पूर्वीं शंबरसमरीं युद्धा । शस्त्रदेवता जिया शुद्धा । मन्मथें मंत्रूनि तया क्रुद्धा । सोडूनि विरुद्धा निखंडिलें ॥१२॥
वैष्णवस्त्र तेजःपुञ्ज । सोडितां गगनीं न समाय तेज । सौभतमाचा तिमिरपुञ्ज । लिपला सहज तत्तेजें ॥१३॥
परम दिव्यास्त्रें देदीप्यमानें । प्रेरितां समरंगीं प्रद्युम्नें । निशीतमातें विकर्तनें । तेंवि नाशिलें सौभतमा ॥१४॥
सौभमाया जे तामसी । दिव्यास्त्रांच्या महाप्रकाशीं । भंगितां प्रद्युम्नें आपैसी । गोचर झाली शाल्वचमू ॥११५॥
प्रकट दिसतां शाल्वकटक । यदुवीरांतें न वटे अटक । वृष्णिभोजान्ध वीर सुटंक । भिडती नेटक चुटक्यानें ॥१६॥
यादव अवनीं सौभ गगनी । तथापि यदुवीराच्या बाणीं । अर्दिली शाल्याची अनीकिनी । देखती नयनीं सुरासुर ॥१७॥
तिएय समयीं रुक्मिणीकुमर । समरीं धाल्वासि म्हणे स्थिर । डोळे झांकूनियां आंधार । करूनि वीर म्हणविसी तूं ॥१८॥
प्रद्युम्नाशीं गांठी । आतां रिघसी कवणा पाठीं । सौभमायेच्या विसरें गोठी । साहें काठी धीर धरीं ॥१९॥
ऐसें बोलूनि रौक्मिणेय । समरीं करिता झाला काय । तिये कथेचा अभिप्राय । कथिता होय शुक राया ॥१२०॥

विव्याध पंचविंशत्या स्वर्णपुंखैरयोमुखैः । शाल्वस्य ध्वजिनीपालं शरैः सन्नतपर्वभिः ॥१८॥

शाल्वा पाचारी मन्मथ । तंव शाल्वाचा सेनानाथ । पुढें घालूनि आपुला रथ । रुक्मिणीसुत पडखळिला ॥२१॥
शाल्बसैनिक झाला पुढें । देखूनि प्रद्युम्नें निवाडें । पंचविंशति कुर्‍हाडें । विंधिलें रोकडें त्या हृदयीं ॥२२॥
तीक्ष्ण तिखयांचीं नाराजें । सुवर्ण पुङ्ख झळकती तेजें । ऐसे सायक मकरध्वजें । भेदिले पैजे रिपुहृदयीं ॥२३॥
पर्वें म्हणीजे शरांच्या ग्रंथी । सुदृढ विश्वकर्म्यानें निगुती । सज्जिल्या तिंहीं शरीं दळपती । भेदोनि रथी लोळविला ॥२४॥
जो शाल्वाचा ध्वजिनीपाळ । द्युमन्नामा महाप्रबळ । त्यातें भंगूनि रुक्मिणीबाळ । शाल्वा तत्काळ पाचारी ॥१२५॥

शतेनाताडयच्छाल्वमेकैकेनास्य सैनिकान् । दशभिर्दशभिर्नेतॄत्वाहनानि त्रिभिस्त्रिभिः ॥१९॥

प्रद्युम्नवीरें समराङ्गणीं । शाल्व विन्धिला शतबाणीं । शाल्वनिकटीं वीरश्रेणी । एकैक शरीं ताडियल्या ॥२६॥
महावीरांचे सारथि । दश दश बाणीं पृथगाप्रति । भेदूनि पाडिले समरक्षिति । तीं तीं शरीं तुरंगम ॥२७॥
यानें सारथि रथी सुभट । भेदिले वर्षोनि बाणसंघाट । प्रद्युम्नयोद्धा महावरिष्ठ । देखोनि श्रेष्ठ मानवले ॥२८॥

तद्द्भुतं महत्कर्म प्रद्युम्नस्य महात्मनः । दृष्ट्वा तं पूजयामासुः सर्वे स्वपरसैनिकाः ॥२०॥

विशाळ मनाचा निर्धार । तो हा प्रद्युम्न रुक्मिणीकुमर । त्याचें कर्म हें अद्भुततर । देखोनि स्वपर भला म्हणती ॥२९॥
भला रे भला रुक्मिणीतनया । अक्रूरप्रमुख म्हणती तया । भंगूनि शाल्वसेनाचिया । आश्चर्य डोळ्यां दाखविलें ॥१३०॥
आसंगादि गद सारण । प्रद्युम्नाची आंगवण । देखोनि म्हणती धन्य धन्य । केवळ श्रीकृष्ण अपर हा ॥३१॥
शाल्वसैनिक शाल्वें सहित । प्रद्युम्नाचें कर्म अद्भुत । देखोनि म्हणती प्रतापवंत । शौर्यें समर्थ हा योद्धा ॥३२॥
धन्य म्हणोनि उभय दळीं । प्रद्युम्न पूजिला तिये काळीं । त्यावरी शाल्वें कपटमेळीं । माया दाविली ते ऐका ॥३३॥

N/A

References : N/A
Last Updated : June 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP