श्रीमद्गोविंदात्मने नमः ॥
सच्चित्सुखासि उपादान । गोविंदसद्गुरु सनातन । नामरूपात्मक निमित्त पूर्ण । मायावरणगुणगरिमा ॥१॥
संततसप्तदसत्तामात्र । असन्निरसन त्याचें गात्र । तत्प्रकाशक सद्गुरुवक्त्र । चित्पद स्वतंत्र तैं तेंचि ॥२॥
असन्निरसन जिये काळीं । तैं तें आत्मोपलब्धानंदउजळी । सच्चिदानंद त्रिपदावळी । ते संचली गुरुमूर्ति ॥३॥
तेथ अनन्यभक्तिप्रेम । द्विधा नहोनि जालें ब्रह्म । तये चिच्छक्ती माया नाम । जे गुणसाम्य प्रधान ॥४॥
वास्तव नसोनि कार्य होणें । कालत्रयींही अविनाशपनें । वर्तिजे उपादानकारणें । उदाहरणें अवगमिजे ॥५॥
हेम ननसोनि होय नग । स्थितिलयप्रभवीं नग हेमांग । कार्यरूपे वर्त्ततां चांग । नग अव्यंग हेमचि ॥६॥
कार्य कारणीं अविकारपण । कार्य कारणेंसीं अभिन्न । यया नांव उपादान । निमित्तलक्षण तें परिसा ॥७॥
भक्तनिमित्त अवतरे देव । देवानिमित्त भक्तसद्भाव । परस्परें प्रेमगौरव । मायालाघव तें ऐसें ॥८॥
शिष्य आत्मत्व गुरुत्वीं पाहे । गुरु आत्मत्वें छात्रीं लाहे । एवं सच्चिदानंद सबाह्य । प्रेमप्रतापें लुंठतसे ॥९॥
अविद्याभ्रमें विषयनिष्ठ । दारपुत्रादिकीं प्रविष्ट । तेणें करी स्थानभ्रष्ट । अमृताविष्ट गुरुभजने ॥१०॥
जेणें अन्वयसंवेदन । त्या नांव बोलिजे गोगण । एवं गोगण विंदमान । गोविंद अभिधानधारक तूं ॥११॥
तन्मयत्वचि जेथ नाहीं । ते असन्मय माया पाहीं । सत्पदाविण गुरुत्व केंहीं । कैं कोण्हाही नावगमे ॥१२॥
यालागीं सन्मार्ग तूं सद्गुरु । येर असन्मात्र लघुतरु । गोविंद ऐसा नामोच्चारु । सच्चित्सुखकरविग्रही ॥१३॥
ऐसें नित्यत्वें गुरुत्व तुझें । विशेष भ्रमितां जडाचें वोझें । भवाब्धीमाजि तारिसी पैं जे । हें लाघव सहजें पदभजनीं ॥१४॥
इत्यादि गुरुत्वलघुत्व कोटी । विरंच्यादिकां अकथ्य गोठी । अणोरणीय या परिपाटीं । महत्त्वमुकुटीं वेदोक्त ॥१५॥
ऐसिया अनंतगुणपरिपूर्णा । अभेदबोधें नमितां चरणां । दाय पसाव ते हे अज्ञा । पूर्वोक्त सूचना ग्रंथाची ॥१६॥
दशमस्कंध कृतव्याख्यान । सत्तेचाळिसावा अध्याय पूर्ण । वाखाणिला तो करूनि श्रवण । श्रोते सुरगण संतुष्ट ॥१७॥
यावरी अठ्ठेचाळिसावा । क्रमें अध्याय वाखाणावा । तेथ सैरंध्रीसद्भावा । माजि केशव अनुकरण ॥१८॥
कुब्जासद्भावऋणोत्तीर्णा । पूर्ण कर्रूनि तत्कामना । अक्रूराचिया जाऊनि सदना । प्रेरी हस्तिनाह्वयनगरा ॥१९॥
ये अध्यायीं इतुकी कथा । शुक निरूपी कौरवनाथा । श्रोतीं आणितां श्रवणपथा । हे भवव्यथा खंडील ॥२०॥
पूर्वाध्यायीं व्रजार्तिहरण । केलें उद्धव पाठवून । त्यानंतरें श्रीभगवान् । कुब्जादैन्य मनीं स्मरे ॥२१॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । यास्तव सर्वात्मा सर्वदर्शन । द्रष्टा साक्षी सर्वज्ञ पूर्ण । भक्तकारुण्यें कळवळिला ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP