सरसि सारसहंसविहंगाश्चारुगेतहृतचेतस एत्य ।
हरिमुपासत ते यतचित्ता हंत मीलितदृशो धृतमौनाः ॥११॥

तें ऐकोनि वेणुगान । सारसहंसादि पक्षिगण । चारुगायनें अंतःकरण । तन्मय होऊन उपरमती ॥९५॥
विष्णुसान्निध्यें जे सत्त्वस्थिती । पासूनि दूरतमो याति । अंडजयोनीमाजि वसती । ते उपरमती तेथूनी ॥९६॥
मुरलीरवें हतमानस । सांडूनि संसारसरोवरवास । होऊनि विरक्त परमहंस । कृष्णसहवास वांछिती ॥९७॥
ऐसे हरिमुरलीच्या स्वरें । पक्षी सांडिती सरोवरें । कृष्णा भजती अत्यादरें । निकट निर्धारें प्रवेशती ॥९८॥
विषादें म्हणती विहंग धन्य । तत्सान्निध्यें सुखसंपन्न । आमुचें दुर्भाग्य परम गहन । कीम वियोगें करून जाचतसों ॥९९॥
हरिसुरताचा न पडे विसर । विरह तावी अभ्यंतर । युगसम गमतसे वासर । न सरे सत्वर हा सखिये ॥१००॥
अपराध म्हणती मुरलीस्वन । परिसोनि वेधें पक्षिगण । भ्रमर करिती अनु गायन । नवल कोण पैं याचें ॥१॥
याहूनि अद्भुत नवलपरी । कृष्ण मुरलीक्कणनें करी । ते हे परिसोनि वो सुंदरी । विश्वांतरीं सुखदा जे ॥२॥

सहबलः स्रगवतंसविलासः सानुषु क्षितिभृतो व्रजदेव्यः ।
हर्षयन्यर्हि वेणुरवेण जातहर्ष उपरंभति विश्वम् ॥१२॥

व्रजदेवी या संबोधनें । गोपिकांतें ऐका म्हणे । मुकुटकुंडलें दिव्याभरणें । सालंकरणें बलकृष्णें ॥३॥
मुक्ताफळांचे हार कंठीं । दिव्य मणींच्या दीप्ति मुकुटीं । श्रवणीं अवतंसाची दाटी । नटांगयष्टि सविलास ॥४॥
ऐसा ललितलावण्यवेश । अधिष्ठूनि गिरितटदेश । त्रिजग ओपितसे संतोष । परमोह्लास पावोनी ॥१०५॥
ऐशिया आनंदाचे भरीं । जेव्हां वेणु अधरीं धरी । वेणुरवें त्या आनंदलहरी । विश्वांतरीं पूरितसे ॥६॥
जैं त्या वेणुस्वनें गगन । पूर्ण परमानंदें करून । ते काळींचें अद्भुतचिन्ह । ऐका संपूर्ण सखिया हो ॥७॥

महदतिक्रमनशंकितचेता मंदमंदमनुगर्जति मेघः ।
सुहृदमभ्यवर्षत्सुमनओभिश्छायया च विदधत्प्रतपत्रम् ॥१३॥

महान् अखिलानंदप्रद । जाणोनि साशंक अंबुद । नातिक्रमवेच गोविंद । समर्याद सेवेसी ॥८॥
कृष्णचरणांचिये आवडी । मेघ मर्यादा वाहे गाढी । कृष्णापुढें न करी वाढी । न गडगडी उच्चस्वरें ॥९॥
कृष्णमुरलीचिया नादा । अनुलक्षूनि करी शब्दा । मुरजादिका वाद्यभेदा । गायनीं ध्रुवपदा पडिपाडें ॥११०॥
आपुला आत्मसखा श्रीहरि । सबाह्य आत्मत्वें सम सरी । लक्षूनि सुमनवृष्टि करी । सुधातुषारीं सुखकंद ॥११॥
सबाह्य आत्मसाम्यता कैसी । तरी कृष्ण जीवन या त्रिजगासी । मेघही जीवनें आर्ति नासी । विश्रांतीसी अर्पुनि ॥१२॥
कृष्ण समत्वें सर्वांतरीं । मेघही विषम भावा न धरी । समान वर्षे सर्वांतरी । दयादाक्षिण्यें उभयत्र ॥१३॥
श्यामकांति समसमान । विद्युल्लता पीतवसन । स्वभक्तचातकां पोषण । क्षोभें कल्याणप्रद दोघे ॥१४॥
ऐसा लक्षूनि सुहृद्भाव । करी सुमनांचा वर्षाव । कीं मेघा आडूनि वर्षती देव । त्याचेंचि नांव पुष्पघन ॥११५॥
सुमनासमान अंबुकण । समसमान अभिवर्षोन । कडतर ताविती भास्करकिरण । करी म्हणोन आतपत्र ॥१६॥
आतापापासूनि करी त्राण । म्हणोनि आतपत्र हें अभिधान । मेघ स्वच्छाये करून । करी वारण आतपाचें ॥१७॥
ऐसा अफाट जो अंबुद । तोही ऐकोनि वेणुनाद । सेवी आत्मत्वें मुकुंद । आम्हां दुःखद तद्विरह ॥१८॥
मेघादि अनावर कृष्णानुरक्त । तेथ वधूगण तत्संगभुक्त । वियोगदुःखें अतिसंतप्त । दिन समस्त आहळतसों ॥१९॥
तंव त्या व्रजांगना प्रौढा । जाऊनि वदती यशोदे पुढां । वेणुनादें लाविलें वेडा । ब्रह्मादिमूढां सारिखें ॥१२०॥
जारक्रीडा यशोदेपासीं । आम्हीं प्रकट बोलिजे कैसी । हें नाठवेचि गोपिकांसीं । मानसें पिशीं हरिविरहें ॥२१॥
जेंवि कनकबीजभक्षण । करितां विसरवी देहभान । गुह्यार्थही करी जल्पन । तेंवि वधूगण हरिविरहें ॥२२॥

विविधगोपचरणेषु विदग्धो वेणुवाद्य उरुधा निजशिक्षाः ।
तव सुतः सति यदाऽधरबिंबे दत्तवेणुरनयस्त्वरजातीः ॥१४॥

म्हणती यशोदे सुंदरी । गोवळक्रीडा नानापरी । स्वकौशल्यें प्रकट करी । तो हा मुरारि तव तनय ॥२३॥
विविधा परींचें गोवळाचरण । तद्विषयीं हा परम निपुण । क्रीडाकौतुकें मनांतून । प्रकटी नूतन अलौकिकें ॥२४॥
तैसीच वेणुवादनविषयीं । त्याची चतुरता कथिजे कायी । कोण्हापाशीं शिकला बाई । आपुले हृदयींहुनी प्रकटी ॥१२५॥
घेऊनि अचेत वेणुकांड । करी नादमय ब्रह्मांड । स्वरजातीचे भेद उदंड । सवनविभागें विस्तारीं ॥२६॥
मन्द्रमध्यमतारभेद । प्रथममध्यमोत्तम विशद । सवनविभाग ऐसे त्रिविध । मूर्च्छना विविध तद्गर्भीं ॥२७॥
षड्ज ऋषभ आणि गांधार । मध्यम प्म्चम धैवत स्वर । आलापी उच्चउच्चतर । निषादादिक सातही ॥२८॥
स्वरजातिसवनविभाग । भेदें उत्पन्न करी राग । तेथ त्रिजग सानुराग । विषयी विराग पावोनि ॥२९॥
तुझा तनय हा बिंबाधरीं । जेव्हां ठकार वेणु धरी । आरोहअवरोहजातिस्वरीं । ब्रह्मांड करी नादमय ॥१३०॥

सवनशस्तदुपधार्य सुरेशाः शक्रशर्व परमेष्ठिपुरोगाः ।
कवय आनतकंधरचित्ताः कश्मलं ययुनिश्चिततत्त्वाः ॥१५॥

कीचककांडाचें मात्र मिष । नादब्रह्मामृत जें सुरस । श्रवणीं पडतां मुनिवर त्रिदश । विधिहर सुरेश वेधती ॥३१॥
बाह्यविषयांचिया प्रवृत्ति । सांडोनि एकाग्र होती वृत्ति । मनोमस्तकें नम्र होतीं । आत्मस्थिती सुखलाभें ॥३२॥
परम कोविद सनकादिक । तेही होती श्रवणोन्मुख । तद्रसपानें सच्चित्सुख - । लाभें विमुख तनुधर्मीं ॥३३॥
आम्ही कोण कोणे ठायीं । कोण अवस्था कोणे समयीं । ऐसी स्मृतीच न धरे देहीं । मोहप्रवाह्रीं मज्जती ॥३४॥
सच्चित्सुखात्मकप्रत्यय । तेथ मोह तो कैसा काय । तरी येथींचा अभिप्राय । निःसंशय अवधारा ॥१३५॥
भूत भविष्य वर्तमान । कालत्रयात्मक सर्वज्ञ । विधिहरेंद्रमुनिवर पूर्ण । तद्विहीन ते जाले ॥३६॥
वेणुश्रवणें थकल्या वृत्ति । पदाभिमानाची विस्मृति । वेणुध्वनीची अगाध शक्ति । विवशस्थिति सुखलाभ ॥३७॥
कृष्णमुरली मोही तत्त्वता । विधिहरेंद्रमुनि समस्तां । आम्ही तत्पदप्रेमासक्ता । केंवि मोहिता न हों पां ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP