बर्हिणस्तबकधातुपलाशैर्बद्धमल्लपरिबर्हविडंबः ।
कर्हिचित्सबल आलि स गोपैर्गाः समाह्वयति यत्र मुकुंदः ॥६॥

आलि ऐसें संबोधन । अवो साजणी हें आश्चर्य गहन । जेव्हां मल्लविडंबन । करी श्रीकृष्ण अनुकरूनी ॥५८॥
बर्हिबर्हांचा किरीट । करकौशल्यें रचिला नीट । शक्रकार्मुकद्युति निघोंट । प्रभा उद्धट श्रीमुकुटीं ॥५९॥
श्वेत पीत नील कर्बुर । गैरिकादि धातु विचित्र । विविधाकृति रंजित गात्र । मल्लापरि कटिप्रतिबद्ध ॥६०॥
प्रफुल्लार कह्लारपंक्ति । विविधोत्पलांचिया जाति । कोमलपल्लवमंडित व्यक्ति । मल्लाकृति नटनाट्यें ॥६१॥
सहित गोप संकर्षण । सुधासदृश वेणुक्कणन । करूनि पाचारी धेनुगण । जेव्हां श्रीकृष्ण सखिया हो ॥६२॥

तर्हि भग्नगवतयः सरितो वै तत्पदांबुजरजोऽनिलनीतम् ।
स्पृहयतीर्वयमिवाबहुपुण्याः प्रेमवेपितभुजाः स्मितितापः ॥७॥

तेव्हां तदुत्थमधुरध्वनि । मिश्रितपवना आलिंगुनी । गतिराहित्य सरिज्जीवनीं । पदरज मनीं वांछिती ॥६३॥
परंतु सरिता आमुचेचि परि । अल्प सुकृतसंग्रह पदरीं । तेणें पदरजःप्रेम अंतरीं । परी धणीवरी न लाहती ॥६४॥
पदरजःप्रेमवेधेंचि स्मिमिता । तरंगभुजा प्रस्फुरिता । केवळ आलिंगनार्थ उदिता । तद्रसप्राप्ता समदुःखा ॥६५॥
समदुःखिता कवणे परी । स्मिमितबाष्पा व्रजनारी । भुजा स्फुरती आणि अंतरीं । वृत्तितादात्म्यें ताटस्थ्य ॥६६॥
वनविहारयोगें स्पर्शा । क्कचिल्लब्धसुखोत्कर्षा । स्मरोनि झुरती आम्हांचि सरिशा । मां आम्ही त्या निशा कें विसरों ॥६७॥
तंव अपरा म्हणती सरिता चरा । कृष्ण वेणुक्कणनावसरा । वेधी द्रुमवल्लीस्थावरां । त्या प्रकारा परिसा गे ॥६८॥

अनुचरैः समनुवर्णितवीर्य आदिपूरुष इवाचलभूतिः ।
वनचरो गिरितटेषु चरंतीर्वेणुनाऽह्वयति गाः स यदा हि ॥८॥

आदिपुरुष जो परमेश्वर । तोचि हा श्रीकृष्ण साचार । नेणोनि मुग्धा उपमापर । श्रीअनुकार कल्पिती ॥६९॥
सुरवर परमेश्वरानुयायी । बल्लवरूपीं तेथ ये ठायीं । कृष्णप्रताप वर्णिती पाहीं । पन्नगशायी समसाम्य ॥७०॥
आदिपुरुषीं अचल भूति । येर चंचल सर्वत्र वसति । कृष्णीं निश्चल देखोनि युवति । श्री उपमिति ईशेंशीं ॥७१॥
निश्चळ लक्ष्मी म्हणाल कैसी । वनवासीही श्रीकृष्णासी । सुरवर अनुचर गोपवेशीं । ऐश्वर्यासी वर्णिती ॥७२॥
आदिपुरुषाच्या श्वासानिळें । निगमगानें त्रिजग चळे । तद्वद्वेणुवादनलीले । गोगोपाळें मोहरती ॥७३॥
रसाळवेणुगायनध्वनी - । माजि धेनु निजाभिधानीं । संबोधितां चक्रपाणि । नवल ते क्षणीं होतसे ॥७४॥

वनलतास्तरव आत्मनि विष्णुं व्यंजयंत्य इव पुष्पफलाढ्याः ।
प्रणतभारविटपा मधुधाराः प्रेमहृष्टतनवः ससृजुः स्म ॥९॥

निगमवाक्यार्थांच्या श्रवणीं । निश्चल तरुसम मुनिजनध्यानीं । सुकृतसाफल्यें संकल्प सुमनीं । अमोघ लगडोनि लवले जे ॥७५॥
तैशाच पतिव्रता ज्या साध्वी । कांतसेवनव्रतलाघवी । तरुवरवेष्टित वल्ली जेंवि । पुष्पीं पल्लवीं सफळिता ॥७६॥
सफळसुकृतभारें नम्रा । त्या ज्या शाखा प्रणतभारा । निजात्मकारणकृतविचारा । बाह्योपचारा सूचिती ॥७७॥
आत्मव्यापक जो श्रीविष्णु । सर्व भूतीं जो भ्राजिष्णु । वास्तव अभेदप्रेमा गहन । प्रणत होऊनि जाणविती ॥७८॥
सिंधु बिंधुत्वें निवडुनी । गगनीं चढोनि पडला धरणी । परि प्रेमा अगाध निजात्ममिळणीं । सम्मुख धांवोनि जेंवि सुचवी ॥७९॥
किंवा पृथ्वीचे परमाणु । वायुयोगें चढल्या गगन । तथापि अभेदप्रेमा गहन । कथिती भजोन मिळणीतें ॥८०॥
त्याचि मुनिवरपतिव्रता । येथ जालिया पादपलता । नेणोनि मुग्धा गोपवनिता । सादृश्यता उपमिती ॥८१॥
विष्णु व्यापक आपुले हृदयीं । तो हा गोविंद शेषशायी । अभेदसप्रेमभावें मही । वर्षती पाही मधुधारा ॥८२॥
चंद्रदर्शनें चंद्रकांति । वास्तव वेधें पाझर द्रवती । वेणुवादनें वृक्षयाति । तैशा स्रवती सखिया हो ॥८३॥
त्या कृष्णाच्या अधरपानें । रंगलीं असतां आमुचीं मनें । वियोगदुःखाचीं वदनें । कवण्या गुणें विसरती ॥८४॥
तंव आणिका गोपी म्हणती । कृष्णवेणूची वेधकशक्ति । सरसीं सारसहंसयाति । उपरम पावती परिसोनी ॥८५॥

दर्शनीयतिलको वनमालादिव्यगंधतुलसीमधुमत्तैः ।
अलिकुलैरलघुगीतमभीष्टमाद्रियन्यर्हि संधितवेणुः ॥१०॥

लावण्यश्रीचें सौभाग्य मुख्य । तो ललाटीं केशरतिलक । वरी अक्षता जेंवि अर्क । बिंबे माणिक्यप्रभेंत ॥८६॥
तेंवि लावण्य मदनाहुनी । जें मिरविती त्रिभुवनीं । त्या दर्शनीं यांचाही अग्रणी । तिलकस्थानीं श्रीकृष्ण ॥८७॥
ऐसा लावण्यचूडामणि । विशेष विलसे दिव्याभरणीं । तुलसीगंधार्थ भ्रमरगणीं । वनमाळेसीं वेष्टिला ॥८८॥
येथ श्रोते शंका करिती । सामान्य सौरभ्य तुलसीप्रति । सांप्रत भ्रमर न वेधती । ग्रंथीं ख्याति किमर्थ ॥८९॥
तरी ये शंकेची निवृत्ति । श्रीकृष्ण अवतरला जैं क्षिती । तैं सुरस्त्रियादि दिव्य भूतीं । ऐश्वर्यें शक्ति प्रकाशिल्या ॥९०॥
निर्जर जिंकिले यातुधानीं । त्या राक्षसां समरांगणीं । कपि मर्दिती ऐसी करणीं । ऐश्वर्यें करूनि प्रभूच्या ॥९१॥
पूर्वीं अथवा इये काळीं । साधारण तो गोळांगुळीं । पारिजात तुळसी तेंवि परिमळीं । वनजें आगळीं ऐश्वर्यें ॥९२॥
म्हणोनि वनमाळामिश्रतुळसी । सेवूनि तद्गत दिव्य गंधासी । मातले मधुकर हरिगुणांसी । उच्चस्वरेंसीं आळविती ॥९३॥
श्रीकृष्णासी तोषकर । अनुलक्षूनि मुरलीस्वर । गाती आनंदें मधुकर । वेणु श्रीधर जैं वाहे ॥९४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP