उपगीयमानौ ललितं स्त्रीजनैर्बद्धसौहृदैः । स्वलंकृतानुलिप्तांगौ स्रग्विणौ विरजोंऽबरौ ॥२१॥

नील पीत विविध वास । विरज म्हणिजे स्वप्रकाश । मणि कुंडलें मौळि केश । मयूरपक्षे धृतकुसुमें ॥३४॥
कटकें अंगदें रत्नमुद्रिका । हार मेखळा क्षुद्रघंटिका । पदनूपुरें अंदु वांक्या । पदकें सहित सालंकृत ॥१३५॥
जवादी कर्पूर केशर । कस्तूरिका कृष्णागर । कुंकुमाक्षता मलयजसार । चर्चिती दोघे शोभाढ्य ॥३६॥
वसनें भूषणें शोभायमानें । तदनुकूल अनुलेपनें । गोपी सप्रेमें स्नेहबंधनें । गुणकीर्तनें तोषविती ॥३७॥
गांधर्ववेदोक्त प्रभेदकुसरी । ललितगायनीं गोपी चतुरी । गुणगणगमकीं उच्चस्वरीं । राममुरारी रंजविती ॥३८॥

निशामुखं मानयंतावुदितोडुपतारकम् । मल्लिकागंधमत्तालिजुष्टं कुमुदवायुना ॥२२॥

निशामुख जो संध्याकाळ । करिती सानंदें धवळ बहळ । ज्यांमाजि उदित तारकामेळ । शशिमंडळसमवेत ॥३९॥
मल्लिकाशब्दें सुमनयाति । तद्रसपानें भ्रमरपंक्ति । उन्मत्त गुंजारवें गाती । तच्छोभाढ्य निशामुख ॥१४०॥
कुमुदकाननीं शशिदर्शनीं । फुल्लारमाना कह्लारश्रेणी । तद्गत मारुत सौरभ्यखाणी । प्रसरीत घ्राणीं निशामुखीं ॥४१॥

जगतुः सर्वभूतानां मनः श्रवणमंगलम् । तौ कल्पयन्तौ युगपत्स्वरमण्डलमूर्च्छितम् ॥२३॥

खेचर भूचर जलचर वनचर । भूतमात्र चराचर । श्रवणमानसांप्रति रुचिर । होती सादर तद्वेधें ॥४२॥
प्रियतम आणि मंगळप्रद । निरसी अमंगळ अध्यस्त खेद । ऐसे अगाध गांधर्वभेद । राममुकुंद आलापिती ॥४३॥
युगपत् म्हणिजे एकेचि समयीं । स्वरमंडळें मूर्च्छना पाहीं । अनिबद्ध अद्भुत कळा कांहीं । स्ववनोद्धार गिरडिया ॥४४॥
निबद्ध म्हणिजे श्रुतिसंग्रथित । कारिका सामसूत्रसंगीत । एक समयींच कळा बहुत । अनिबद्ध अद्भुत कौशल्य ॥१४५॥
निश्वसितोद्भव ज्याच्या श्रुति । सत्यसंकल्पें अखिलोप्तत्ति । त्रिजगीं अशक्य आणिकांप्रति । युगपत् गाती अद्भुत ते ॥४६॥
स्वरमंडल मूर्च्छनायुक्त । मानसमोदक श्रवणामृत । सुरस सुललित मंगलवंत । राग अनंत आळविती ॥४७॥
ऐसी अद्भुत गायनकळा । प्रकटूनि सूचिती कवण्या फळा । तें तूं ऐकें नरशार्दूला । कौरवपाळा परीक्षिति ॥४८॥
स्वभक्ताचें मानसहरण । स्वरत करावें निजांघ्रिशरण । ऐसें कृष्णाचें अंतःकरण । गोपीमोहनविडंबें ॥४९॥

गोप्यस्तद्गीतमाकर्ण्य मूर्च्छिता नाविदन्नृप । स्रंसद्दुकूलमात्मानं स्रस्तकेशस्रजं ततः ॥२४॥

गोपी ऐकोनि अद्भुत गान । तत्काळ विसरल्या शरीरभान । गायनीं विरोनि गेलें मन । झाल्या उन्मन स्वानंदीं ॥१५०॥
कृष्णस्वरूपीं मानसें लीना । तनु नेणती नग्नानग्ना । सावरूं न शकती विगलित वसना । मां माळासुमनां कोण स्मरे ॥५१॥
सुटूनि केश मोकळे रुळती । ग्रथित सुमनें स्रवती क्षितीं । सुमनमाळा गळतां युवति । सहसा नेणती स्वरनिरता ॥५२॥
ऐसिये हरिक्रीडेमाझारीं । एक गुह्यक मोक्षाधिकारी । भय पावूनि व्रजसुंदरी । केल्या सत्वरी घाबिर्‍या ॥५३॥

एवं विक्रीडतोः स्वैरं गायतोः संप्रमत्तवत् । शंखचूड इति ख्यातो धनदानुचरोऽभ्यगात् ॥२५॥

तो तूं गुह्यक म्हणसी कोण । ऐकें राया सावधान । जो धनदाचा अनुचरगण । ज्या अभिधान शंखचूड ॥५४॥
यथेष्ट स्वेच्छा राममुरारी । क्रीडतां व्रजयुवतींमाझारीं । मधुर गाती सप्तस्वरीं । सर्वज्ञ परी प्रमत्तवत् ॥१५५॥
शंखचूडनामा तेथ । येता झाला अकस्मात । रामकृष्ण ज्याचे नाथ । तया त्रासित वधूनिचया ॥५६॥
कृष्ण आणि संकर्षण । प्रत्यक्ष करितां निरीक्षण । बळात्कारें बल्लवीगण । भयें त्रासोनि आक्रोशवी ॥५७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP