स चुक्रोशाहिना ग्रस्तः कृष्ण महानयम् । सर्पो मां ग्रसते तात प्रपन्नं परिमोचय ॥६॥

नंद असतां सुखनिद्रिस्त । सर्पें ग्रासिला नाभिपर्यंत । जागृत झाला अकस्मात । आक्रोश करित महाभयें ॥५६॥
लागतां अजगराचें गरळ । तनुसामर्थ्य झालें शिथिल । तेणें भयें उताविळ । स्मरे गोपाळ आकांतीं ॥५७॥
धांव धांव बापा कृष्णा । मी वरपडलों सर्पवदना । महासर्प हा क्षणक्षणां । करी ग्रसना कालवत् ॥५८॥
कृष्णा आपुला शरणागत । सोडवी कृपेनें अंकित । प्राण न वचतां धांवें त्वरित । ऐसा भयभीत आक्रंदे ॥५९॥

तस्य चाक्रंदितं श्रुत्वा गोपालाः सहसोत्थिताः । ग्रस्तं च दृष्ट्वा संभ्रांताः सर्पं विव्यधुरुल्मुकैः ॥७॥

ऐसा नंदाचा आर्त शब्द । समस्तीं ऐकोनि आक्रंद । सवेग धांविला बल्लाववृंद । करावया वध सर्पाचा ॥६०॥
अकस्मात उठिले सर्व । ग्रस्त देखोनि पशुपराव । मारिती सर्पावरी घाव । जळत उल्मुकें घेऊनी ॥६१॥
संभ्रांत म्हणिजे उताविळ । घाबिरे झाले बल्लव सकळ । म्हणती अजगरें व्रजपाळ । गिळिला केवळ काळरूपें ॥६२॥

अलातैर्दह्यमानोऽपि नामुंचत्तमुरंगमः । तमस्पृशत्पदाऽभ्येत्य भगवानात्वतां पतिः ॥८॥

ऐसें म्हणोनि जळत भितीं । घेऊनि सर्पा पोळविती । जाळितां ताडितां बहुतां हस्तीं । नंदाप्रति अहि नुगळी ॥६३॥
ऐकोनि नंदाचें आर्त्तवचन । षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो पातला श्रीभगवान । करुणापूर्ण भक्तपति ॥६४॥
सवेग येऊनि गोपीनाथें । चरण स्पर्शितां अजगरातें । महदाश्चर्य वर्त्तलें तेथें । सांगे नृपातें शुकमुनि ॥६५॥

स वै भगवतः श्रीमत्पादस्पर्शहताशुभः । भेजे सप्रवपुर्हित्वा रूपं विद्याधरार्चितम् ॥९॥

भगवंताचा श्रीमच्चरण । त्रिपथगेचें जन्मस्थान । सकळ मंगळां एकायतन । जो अघशमन संस्पर्शें ॥६६॥
तया चरणाच्या संस्पर्शमात्रें । निष्पाप झालीं सर्व गात्रें । सर्पशरीर क्षणार्धमात्रें । त्यागूनि पवित्र तनु भजला ॥६७॥
विमानारूढ विद्याधरीं । पूजिला जैसा शक्र अमरीं । तयातें श्रीकृष्ण पृच्छा करी । मुग्धापरी नरनाट्यें ॥६८॥

तमपृच्छद्हृषीकेशः प्रणतं समुपस्थितम् । दीप्यमानेन वपुषा पुरुषं हेममालिनम् ॥१०॥

अचिंत्यैश्वर्यमहिमा आपुला । जाणाया बल्लवां सकळां । पृच्छा करी घनसांवला । प्राकृतां अबळां सारिखी ॥६९॥
जो कां अखिलब्रह्मांडाधीश । विष्णुविरिंचिहरप्रजेश । सकळां पाळक यां हृषीकेश । तो जगदीश श्रीकृष्ण ॥७०॥
सांडूनियां सर्पतनु । दिव्यपुरुष देदीप्यमान । निघाला त्यातें तो भगवान । पुसता झाला वृत्तांत ॥७१॥
देदीप्यमान कैसा पुरुष । मुकुट कुंडलें माळा सुवास । साळंकृत सुंदर वेश । वंदी कृष्णास अतिविनयें ॥७२॥
कृष्णापुढें नम्रमूर्ध्नि । बद्धांजलिमंडितपाणि । उभा ठाकला त्यालागुनी । कोण म्हणोनि पुसे हरि ॥७३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP