श्रीशुक उवाच - एकादश्यां निराहारः समभ्यर्च्य जनार्दनम् ।
स्नातुं नंदस्तु कालिंद्यां द्वादश्यां जलमाविशम् ॥१॥

सम्यक उचलूनि गोवर्धन । केला स्ववश संक्रंदन । आतां करूनि नंदमोक्षण । स्ववश वरुण हरि करी ॥३२॥
नंद वसूचा अवतार । विष्णुभजनीं प्रेमादर । तेणें हरिदिन निराहार । नेला साचर व्रतनियमें ॥३३॥
प्रातर्विधि शौचाचरण । स्नानसंध्या सुरार्चन । नित्याह्निक संपादून । करिपूजनव्रतांग ॥३४॥
महामहोत्साहगजरीं । अभ्यर्चूनि कैटभारि । द्विजजनसज्जनसपरिवारीं । हरिजागरीं निशा क्रमिली ॥३५॥
कळामात्र तिथीची व्याप्ति । अरुणोदयीं द्वादशी होती । म्हणोनि सादर पारणार्थीं । ब्राह्मणपंक्तिपूर्वक ॥३६॥
स्नानसंध्या औपासन । विष्णुपूजन पंचमहायज्ञ । द्विजार्चनादि करितां जाण । तिथिलंघन झणें घडे ॥३७॥
म्हणोनि शास्त्राचेनि बळें । समय जाणोनियां व्रजपाळें । यमुनेमाजीं आसुरीं वेळे । अतिचापल्यें प्रवेशला ॥३८॥
तंव वरुणाचे असुरगण । गुह्यक यक्ष राक्षस जाण । त्रिविध करिती जळरक्षण । वंदूनि शासन वरुणाचें ॥३९॥

तं गृहीत्वाऽनयनद्भृत्यो वरुनस्यासुरोंऽतिकम् । अविज्ञायाऽऽसुरीं वेलां प्रविष्टमुदकं निशि ॥२॥

त्या वरुणभृत्यें अकस्मात । जळीं नंदातें धरूनि त्वरित । आसुरी सभेसि केला प्रपत । तिहीं वृत्तांत विवरिला ॥४०॥
नेणोनि शास्त्रनिर्दिष्ट काळा । मानूनि सामान्य आसुरी वेळा । दूतें वृथा नंद आणिला । आम्हां दंडिला हा न वचे ॥४१॥
मग बांधूनि वरुणपाशीं । नंद अर्पिला वरुणापाशीं । तेणें ऐकोनि वृत्तांतासी । निजमानसीं विवरिलें ॥४२॥
नंदाचिये सोडवणें । येथ कृष्णाचें घडेल येणें । सफळ भाग्य माझें तेणें । तरी हें जिणें धन्यतर ॥४३॥
वरुणें इतुकें विवरूनि मनीं । नंद निवांत ठेविला भुवनीं । आतां येईल चक्रपाणि । मार्ग नयनीं लक्षितसे ॥४४॥
तंव येरीकडे बल्लवगण । नंदें यमुनेसि करितां स्नान । प्रथम केलें निमज्जन । उन्मज्जन न देखती ॥४५॥
तेणें घाबिरे झाले पोटीं । अंग टाकिती वाळवंटीं । एक धांविले उठाउठीं । करिती वाक्पटीं महाशंख ॥४६॥

चुक्रुशुस्तमपश्यंतः कृष्ण रामेतिगोपकाः । भगवांस्तदुपश्रुत्य पितरं वरुणाहृतम् ॥३॥

व्रजीं ऐकोनि हाहाकार । यशोदा रोहिणी सपरिवार । आणि बल्लव लहान थोर । व्रज समग्र गजबजिला ॥४७॥
एक पिटिती ललाटें । एक शंख करिती नेटें । एक हृदयीं घालती गोटे । धरूनि पोटें विलपती ॥४८॥
ऐसा सशोक व्रजींचा जन । नधरत पातला यमुनापुलिन । जेथ नंद झाला निमग्न । तेथ धुंडून पाहती ॥४९॥
कितिएक बुडिया देती जळीं । निमग्न होऊनि शोधिती तळीं । कितिएक धीवर शफरजाळीं । घालूनि घरडुळी घेताती ॥५०॥
एक म्हणती व्रजनायका । आम्हां वोपोनि महाशोका । तूं गेलासि कवण्या लोका । स्त्रियां बाळकां सांडूनी ॥५१॥
करूनि निर्जला एकादशी । हरिजागरीं सारिली निशी । उशीर झाला पारण्यासी । कां पां नयेसी व्रतस्था ॥५२॥
ब्राह्मण पूर्वीं आमंत्रिले । तेही परम क्षुधित झाले । तटस्थ पंक्तीसी बैसले । हें कां न कळे तुजलागीं ॥५३॥
गोठणीं गाई हुंबरती । लेकुरें वांसुरें आक्रंदती । गोपी आक्रोशें विलपती । कोथें व्रजपति गेलासी ॥५४॥
यशोदा म्हणे नंदराया । मोकळा केशीं झाडीन पायां । रुसोनिन वचें आणिका ठायां । आमुची माया सांडूनी ॥५५॥
रामकृष्णांची आवडी । न विसंबसी तूं अर्ध घडी । आजि काम केली अनावडी । देऊनि बुडी यमुनेंत ॥५६॥
क्षुधा लागली उभयबाळां । लोटली पारणियाची वेळा । धांवूनि येईं उताविळा । परम स्नेहाळा व्रजपते ॥५७॥
ऐसे विलपती व्रजींचे जन । तंव उपनंद आणि बृहद्भान । सुनंदसुभद्रादि वृषभान । तिहीं श्रीकृष्ण प्रार्थिला ॥५८॥
एक विनविती संकर्षणा । एक म्हणती स्वामी कृष्णा । लोकत्रयाचा तूं राणा । विदित सर्वज्ञा तुज अवघें ॥५९॥
तूं व्रजाचा नाथ शिरीं । असतां बाधी शोकलहरी । इंद्र वर्षतां धरूनि गिरि । तां व्रजपुरी वांचविली ॥६०॥
आजि येथ नंदाविणें । समस्त विलपती दीनवदनें । कळवळूनियां अनाथकरुणें । करीं धावणें कृपाळा ॥६१॥
ऐसें प्रार्थितां गोपगण । तें ऐकोनि श्रीभगवान् । षड्गुणैश्वर्यसंपन्न । करुणापूर्ण कळवळिला ॥६२॥
जरी घेतली पशुपबुंथी । तर्‍ही अचिंत्यैश्वर्यशक्ति । सर्वज्ञ विवरूनि पाहे चित्तीं । तंव देखिली भक्ति वरुणाची ॥६३॥
आपुल्या दर्शनाचिया आर्ती । वरुणें नेलें नंदाप्रति । ऐसें जाणोनियां श्रीपति । मानी विनति पशुपांची ॥६४॥
देऊनि स्वजना अभयदान । यमुनेजळीं प्रवेशोन । सवेग टाकिलें वरुणभुवन । वरुण देखोन हरिखेला ॥६५॥

तदंतिकं गतो राजन् स्वानामभयदो विभुः । प्राप्त वीक्ष्य हृषीकेशं लोकपालः सपर्यया ॥
महत्या पूजयित्वाऽऽह तद्दर्शनमहोत्सवः ॥४॥

विभु म्हणिजे ऐश्वर्यवंत । स्वसामर्थ्यें सर्वगत । भूजळअनळानिळनभांत । रिघतां संतत निर्भय तो ॥६६॥
व्रजीं ठेवूनि बळरामासी । आपण गेला वरुणापाशीं । वरुणें देखूनि श्रीकृष्णाशीं । साष्टांगेंशीं वंदिला ॥६७॥
बैसवूनियां सिंहासनीं । दिव्योपचार सिद्ध करूनी । परमानंदें निर्भर मनीं । कृष्णार्चनीं प्रवर्तला ॥६८॥
शाण्णव वाद्यांचा गजर । गंधर्व गाती साम सुस्वर । तान आलापिती किन्नर । ताल धरिती किंपुरुष ॥६९॥
रंभा मोहिनी सुकेशा । मेनका उर्वशी मंजुघोषा । घृताची तिलोत्तमा सुवेशा । अमरवेशा नाचती ॥७०॥
मखरें तोरणें दीपमाळा । रत्नमय रंगवल्ली सोज्वळा । सन्निध घेऊनि महर्षिपाळा । परम सोहळा मांडिला ॥७१॥
हेमरत्नांचे भाजनीं । श्रीकृष्णांघ्रि प्रक्षाळूनी । वरुणें सपत्नीकें वंदुनी । दिव्यासनीं प्रतिष्ठिलें ॥७२॥
दिव्यपरिमळविलेपनें । वरुणभुवनींचीं दिव्य सुमनें । ज्यांच्या सुगंधें सुरवरघ्राणें । मानिती पारणें जन्माचें ॥७३॥
मृगमदबिडालसंभवमद । अनर्घ्य सुमनांचे आमोद । सौरभ्यद्रव्यें अनेक विशद । तिहीं श्रीपद पूजिलें ॥७४॥
धूप दीप नैवेद्य नाना । फलतांबूलादि दक्षिणा । करूनि वेदोक्त नीराजना । मंत्रप्रसूना अर्पिलें ॥७५॥
नमनें करूनि साष्टांग । परिमळ द्रव्यें सांगोपांग । देऊनि कृष्णासि अभ्यंग । पुसिलें अंग शुभवसनीं ॥७६॥
अग्निधौत पीतांबरें । रत्नाभरणें मनोहरें । समर्पिलीं परमादरें । सलिलेश्वरें श्रीरंगा ॥७७॥
रत्नपादुका अर्पूनि चरणीं । बैसवूनियां दिव्यासनीं । मृगमदकेशरहरिचंदनीं । तिलक रेखिले दिव्यांगीं ॥७८॥
दिव्यसुमनांचिया माळा । आपाद वैजयंती गळां । सुगंधद्रव्यें परिमळउधळा । वरुणें गोपाळा अर्पिला ॥७९॥
धूप दीप एकारती । अनेकनैवेद्यनिष्पत्ति । समर्पूनि कृष्णाप्रति । उत्तरापोषणा अर्पिलें ॥८०॥
फल तांबूल सुदक्षिणा । पुष्पांजलि नीराजना । स्तुतिस्तवनें प्रदक्षिणा । अनेक प्रणति दंडवतें ॥८१॥
कृष्णदर्शनमहोत्सव । आंगीं आनंदाविर्भाव । बद्धांजलि पैं स्वयमेव । वासुदेव स्तवितसे ॥८२॥

वरुण उवाच - अद्य्मे निभृतो देहोऽद्यैवार्थोऽधिगतः प्रभो । त्वत्पादभाजो भगवन्नवापुः पारमध्वनः ॥५॥

वरुण म्हणे विभो समर्था । तवानुग्रह माझिये माथां । तेणें पावलों सकळ अर्था । तें यथार्थ परियेसीं ॥८३॥
आजीच देह धरिला सत्य । कीं तव पदभजन झालें प्राप्त । भजनाविण जें जीवित । तें अपवित्र प्रेत ज्यापरी ॥८४॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । तो तूं सुलभ आजि भगवान । तेणें त्रिजगीं धन्य मान्य । झालों संपूर्णविभुत्वें ॥८५॥
सर्वरत्नाकरांचा पति । कुबेरा तुल्य मत्संपत्ति । असतां दारिद्र्य माझे चित्तीं । न पवे विश्रांति ऐश्वर्यें ॥८६॥
आजि संपूर्णमनोरथ । जे कीं झालों अधिगतार्थ । सफलसाधनसंपत्तिवंत । परम पुरुषार्थ पावलों ॥८७॥
आजि साधनीं कृतार्थता । अर्थें संतृप्ति मनोरथा । आजि साफल्य मम जीविता । तुझेनि भगवंता पदभजनें ॥८८॥
पूर्णासि अर्पूं ऐसी वस्तु । पाहतां प्रज्ञा पावे अस्तु । यालागीं मौनें निवांत । माझे दंदवत तव चरणा ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP