श्रीशुक उवाच - कालात्मना भगवता शक्रदर्पं जिघांसता ।
प्रोक्तं निशम्य नंदाद्याः साध्वगृह्णंत तद्वचः ॥३१॥

ज्याचें सत्यसंकल्पस्फुरण । चेववी शुद्धसत्त्वाभिमान । लेववूनि ईश्वरपण । करी सर्वज्ञ अद्वैतता ॥२३०॥
जागवूनि इच्छाशक्ति । उपजवी बहुत्वाची प्रीति । तो कालात्मा भगवन्मूर्ति । गोप यज्ञार्थी प्रबोधी ॥३१॥
षड्गुणैश्वर्यसंपन्न । करावया भूभारहरण । अवतरलों हे प्रकटी खूण । सर्व सुरगण लाजवुनी ॥३२॥
ब्रह्मा ठकिला वत्साहरणीं । प्राशूनि निर्वीर्य केला वह्नि । यम लाजविला गर शोषुनी । पूतनास्तनीं शोषोनि ॥३३॥
आतां इंद्राचा दर्पभंग । करावया विश्वान्तरंग । प्रेरिता झाला अद्रियाग । तो बल्लवीं याग आदरिला ॥३४॥
भगवंताची ऐकोनि वाणी । नंदादिप्रवृद्धबल्लवगणीं । भला गा भला ऐसें म्हणोनी । अंतःकरणीं हरिखेले ॥२३५॥
एकमेकांकडे पाहती । म्हणती केवढी विशाळ मति । बोधूं विसरला प्रजापति । तेंहि याप्रति सूचलें ॥३६॥
श्रुतीसिही जें कळलें नव्हतें । बोधूं विसरलीं बहु ऋषिमतें । म्हणोनि स्मृतिपुराणांतें । यावत्काळ अविदित ॥३७॥
तें या कृष्णें आमुचे श्रवणीं । कथितां कळलें अंतःकरणीं । मग कृष्णाचे आज्ञेवरूनी । यज्ञाचरणीं प्रवर्तले ॥३८॥

तथा च व्यदधुः सर्वं यथाऽऽह मधुसूदनः । वाचयित्वा स्वस्त्ययनं तद्द्रव्येण गिरिद्विजान् ॥३२॥

जैसजैसें बोधिलें कृष्णें । तैसें ऐकोनि सर्वीं श्रवणें । विवरूनियां अंतःकरणें । यज्ञाकारणें अनुसरले ॥३९॥
इंद्रयागार्थ जे संभार । द्रव्यसामग्री पावनतर । तेचि घेऊनि गिरिअध्वर । अतिसत्वर आदरिला ॥२४०॥
वेदशास्त्रपारंगत । कर्मुपासनात्रिकाण्डनिरत । यज्ञावतार मूर्तिमंत । ते ब्राह्मण तेथें आणिले ॥४१॥
योगाभ्यासी तपोधन । महाव्रती जे उदासीन । निष्काम ज्यांचें कर्माचरण । विरक्त पूर्ण उभयत्र ॥४२॥
वैयाकरण नैयायिक । सांख्य तार्किक मीमांसक । पाञ्चरात्र वैशिपिक । वेदपाठक पुरश्चरणी ॥४३॥
वेदांतविद्यामूलपीठें । उपनिषदर्थें मुक्तकपाटें । ऐशीं द्विजरत्नें चोखटें । सप्रेमनिष्ठें प्रार्थिलीं ॥४४॥
आप्त स्वजन सुहृद्गण । आदरें आणिले सन्मानून । मग सेवूनि गोवर्धन । यज्ञसदन निर्मिलें ॥२४५॥
समान करूनि भूमिभाग । कृष्णप्रणीत विधानमार्ग । तैसतैसा तेथ याग । बल्लववर्ग आदरिती ॥४६॥
स्वस्तिवाचन नान्दीश्राद्ध । मातृका ग्रहमख यथाविध । कुंडीं अग्नि करूनि सिद्ध । द्रव्यें विविधें होमविती ॥४७॥
वसुधारा पूर्णाहुति । करूनि यज्ञाचि समाप्ति । बलिप्रदानीं श्रीकृष्णोक्ति । तैसीं अर्पिती तीं द्रव्यें ॥४८॥
अग्नीमाजि करूनि हवन । पूजिला गिरि गोवर्धन । यथोचित गोब्राह्मण । अभ्यर्चून तोषविले ॥४९॥

उपहृत्य बलीन् सर्वानादृता यवसं गवाम् । गोधनानि पुरस्कृत्य गिरिं चक्रुः प्रदक्षिणम् ॥३३॥

अन्यत्र जे जे श्वचांडाल । अनाथ पतित व्रात्यमेळ । यथायोग्य पूजूनि सकळ । सुखसुकाळ त्यां केला ॥२५०॥
परम सादर बल्लवगण । करूनि सर्वांचें पूजन । स्निग्धरसाळ कोमल तृण । गाईंलागूनि अर्पिती ॥५१॥
मग गोवर्धनप्रदक्षिणे । करिती गौळियें थोरें लाहानें । पुढें घालूनि निजगोधनें । वाद्यगर्जनें जयशब्दें ॥५२॥

अनांस्यनडुद् युक्तानि ते चारुह्य स्वलंकृताः । गोप्यश्च कृष्णवीर्याणि गायंत्यः सद्विजाशिषः ॥३४॥

बल्लवीं गोधनें शृंगारिलीं । हेमरत्नें शृंगें मढविलीं । कंठीं घंटा घागरवाळी । पृष्ठीं शोभलीं क्षौमांबरें ॥५३॥
शुभ्रचामरें विषाणीं । स्वर्णमोहरख्या जडितरत्नीं । माथाटियांवरी जडिले मणि । ते दिनमणि लाजविती ॥५४॥
कंठीं कनकाच्या शृंखळा । त्रिगुंफिता कौशल्यकळा । चरणचापल्यें खळखळा । वांकी वाळे वाजती ॥२५५॥
उत्तंभित श्रवणहारी । पुच्छें वाहूनि पृष्ठीवरी । गोधनें चारिती हुंकारगजरीं । गोप कुकारीं तोषविती ॥५६॥
शृंगें मोहरी वाद्यगजर । रसाळ वेणु सप्तस्वर । गोपगायनें त्यामाजि मधुर । नादाकार नभोगर्भ ॥५७॥
बैल जुंपूनियां गाडां । सालंकृता गोपी सुघडा । शकटीं होऊनि आरूढा । घेती पुढां निजबाळें ॥५८॥
गोधनाचिये पृष्ठभागीं । गाडे धांवती वातवेगीं । कृष्णवीर्यें काञ्चनांगी । नवरसरंगीं आळविती ॥५९॥
सप्तस्वरांचिया छंदें । तानमानें गीतप्रबंधें । क्रीडा केली जे मुकुंदें । ते गाती आनंदें गोपिका ॥२६०॥
त्यांमाजि ब्राह्मणांचे भार । विविध शाखा विविध मंत्र । पठनें आशीर्वादपर । करिती गजर प्लुतघोषें ॥६१॥
ऐसी उत्साहें प्रदक्षिणा । करूनि पातले पूर्वस्थाना । तंव आश्चर्य कुरुभूषणा । कृष्णप्रेरणा तें ऐका ॥६२॥

कृष्णस्त्वन्यतमं रूपं गोपबिश्रंभणं गतः । शैलोऽस्मीति ब्रुवन् भूरि बलिमादद्बृहद्वपुः ॥३५॥

इंद्रमखाचा करूनि भंग । कृष्णें करविला पर्वतयाग । तेथ विश्वास व्हावया चांग । दावी श्रीरंग चमत्कार ॥६३॥
आपण असूनि गोपांसमीप । दुसरें धरूनि विशाळ रूप । म्हणे गिरिवर मी जालों सकृप । शुद्ध संकल्प देखुनी ॥६४॥
मी गोवर्धन तुमची भक्ति । देखोनि प्रकटिली निजाकृति । प्रसन्न जाहलों अभीष्टप्राप्ति । तुम्हीं समस्तीं याचिजे ॥२६५॥
ऐसें वारंवार बोले । गोवळीं अन्नादि जें अर्पिलें । तें सर्वही स्वीकारिलें । हें आश्चर्य देखिलें बल्लवीं ॥६६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP