अगाधतोयह्रदिनीतटोर्मिभिर्द्रवत्पुरीप्याः पुलिनैः समंततः ।
न यत्र चंडांशुकरा विषोल्बणा भुवो रसं शाद्वलितं च गृह्णते ॥६॥

राया म्हणसी ग्रीष्मकाळीं । कैंचीं शाद्वलें भूतळीं । तेही गोष्टी जाईल कथिली । तुवां ऐकिली पाहिजे ॥७२॥
ह्रदिनीं म्हणिजे नदीप्रवाहीं । अगाध जीवनें भरलीं डोहीं । ऊर्मिकल्लोळ उठतां पाहीं । पुलिनीं दोहीं धांवती ॥७३॥
तेणें पुलिनें सपंक होती । वृंदावनीं सभोंवतीं । तेणें तृणें लसलसिती । ज्यांतें म्हणती शाद्वलें ॥७४॥
ऐशिया हरिततृणाच्या ठायीं । प्रस्रवतुषारनिस्यंद मही । शीतळ पवनाचे प्रवाहीं । किरणें काहीं न तपती ॥७५॥
विषाहूनि तीव्रतर । ग्रीष्मरश्मि जे खडतर । कोणा न वाटती दुष्कर । हा प्रकार हरियोगें ॥७६॥

वनं कुसुमितं श्रीमन्नदच्चित्रमृगद्विजम् । गायन्मयूरभ्रमरं कूजत्कोकिलसारसम् ॥७॥

इत्यादिगुणीं गुणसंपन्न । लावण्यलक्ष्मीविराजमान । परम पावन वृंदावन । वेधी तनुमन जनाचें ॥७७॥
वृंदावनींच्या श्वापदश्रेणी । निसर्गनिर्वैर अंतःकरणीं । परमानंदें निर्भर मनीं । संतोषोनि गर्जती ॥७८॥
चित्रविचित्र मृगांच्या याति । सुखसंतोषें क्रीडताती । परस्परें संवादती । रोमंथिती उत्साहें ॥७९॥
तैसे चित्रविचित्र पक्षी । बैसोनियां नाना वृक्षीं । आठवूनिया हृदयसाक्षी । तो स्वचक्षीं लक्षिती ॥८०॥
जैसे मस्करी वेदांती । उपनिषद्वाक्यविवरणें गाती । तैसे हंस संवादती । श्रीकृष्णकीर्तिगुणगानें ॥८१॥
सुमनीं कमळीं विचित्र भ्रमर । हरिकीर्तनीं रुंजती मधुर । प्रेमें नाचती मत्तमयूर । मेघ सुंदर लक्षूनी ॥८२॥
कोकिळा कूंजती पंचमालापें । सारसें सरोवरीचीं आपें । लक्षूनि श्रीकृष्णसारूप्यें । भवसंतापें न तपती ॥८३॥
सुख संतोषें करिती राव । गिळोनि देहींचा अहंभव । कोटिजन्मांचें फळलें दैव । मानिती सदैव हरियोगें ॥८४॥
ऐशिया अनेक जीवश्रेणी । निष्कामभावें सुकृताचरणीं । अभेदप्रेमें मिळोनि कृष्णीं । वृंदावनीं वसताती ॥८५॥

क्रीडिष्यमाणस्तत्कृष्णो भगवान् बलसंयुतः । वेणुं विरणयन् गोपैर्गोधनैः संवृतोऽविशत् ॥८॥

ऐशिया वृंदावनाप्रति । क्रीडावयाची आवडी चित्तीं । धरूनि प्रवेशला श्रीपति । सहित सुमति बळराम ॥८६॥
आंगीं ऐश्वर्याची गरिमा । प्रकट कळों अधमा । गोपनाट्याच्या संभ्रमा - । माजीं चंद्रमा जेंवि घनीं ॥८७॥
भोंवते अनेक गोपाळ । वेणु वाजविती मंजुळ । तेणें गोधनाचा मेळ । तन्मय केवळ हरिवेधें ॥८८॥
गोप गोधनें संकर्षण । मध्यें वेष्टूनियां श्रीकृष्णा । प्रवेशले वृंदावन । गुणसंपन पूर्वोक्त ॥८९॥
तेथ क्रीडा केली कैशी । नरवैडूर्या जरी हें पुससी । अलंकारले ज्या ज्या वेशीं । तें तुजपाशीं सांगतों ॥९०॥

प्रवालबर्हस्तबकस्रग्धातुकृतभूषणाः । रामकृष्णादयो गोपा ननृतुर्युयुधुर्जगुः ॥९॥

त्रैलोक्यींचें बरवेपण । सच्चित्सुखाचें कारण । तें गोठोनियां श्रीकृष्ण । झाला सगुण सौंदर्यें ॥९१॥
कृष्णलावण्याची शोभा । सगुणपणें जये लाभा । सर्वांगींही निघती जिभा । कैवल्यगाभा चाखावया ॥९२॥
श्रीकृष्णाचें गुणलावण्य । ऐकतां तृप्त न होती श्रवण । त्वगिंद्रियासि आलिंगन । तैंण मना मनपण नुपलभे ॥९३॥
कृष्णलावण्य देखतां दिठीं । तृप्ति न बाणे नेत्रापोटीं । अधिकाधिक हांव उठी । कंदर्पकोटी फलकटें ॥९४॥
कृष्णप्रेमरसास्वादनीं । रसना लंपट लांचावोनी । रतली न परते तेथूनी । विषयसेवनीं वीटली ॥९५॥
श्रीकृष्णाचीं चरणकमळें । हृदयवक्त्रनेत्रोत्पलें । करपंकजें परागबहळें । घ्राण पांगुळें अवघ्राणीं ॥९६॥
एवं लावण्याचा राशि । सच्चित्सुखात्मा हृषीकेशी । तेणें नटोनि गोपवेषीं । निजतनूसि डवरिलें ॥९७॥
लसलशीत तरुपल्लव । ज्यावरी झळके नवलोहींव । आणि बर्हीचे सुरंग बर्ह । गुच्छ अपूर्व तयांचे ॥९८॥
मुकुटीं मनगटीं बाहुवटीं । आपादमाळा विचित्र कंठीं । फळपुष्पांचिया दाटी । शोभा गोमटी प्रकटिती ॥९९॥
श्वेत आरक्त आणि काळें । कपिश कर्बुर पाटलें फारकती हिरवे पिवळे । बाहळे निळे सुरंग ॥१००॥
ऐशिया अनेक धातुरंगीं । तनु चर्चिती यथाविभागीं । ऐशीं भूषणें आंगोआंगीं । श्रीकृष्णसंगी लेइले ॥१॥
रामकृष्णादि समस्त गोप । सालंकृत लावण्यरूप । गाती नाचती ससाक्षेप । युद्धप्रताप दाविती ॥२॥

कृष्णस्य नृत्यतः केचिज्जगुः केचिदवादयन् । वेणुपाणितलैः शृंगैः प्रशशंसुरथापरे ॥१०॥

रंगीं नाचतां श्रीकृष्ण । एक गाती तानमान । सप्तस्वरें नवरसगान । सामसमनसंगीत ॥३॥
अप्सरा किन्नर गंधर्वगण । ऐकोनि होती लज्जायमान । पक्षी चंचरीक होऊन । प्रवर्तमान अभ्यासीं ॥४॥
तेथ कित्येक धरिती ताल । पाणितलें संगीतकुशल । वेणु वाजविती रसाळ । एक मंजुळ विषाणें ॥१०५॥
एक प्रशंसिती प्रेक्षक । भला श्रीकृष्ण नाटक । नाट्यकळेचें कौतुक । वेधी त्रैलोक्य लोकनीं ॥६॥
कृष्ण नाचोनि नाचवी जगा । कृष्ण स्वरंगें ओढवी रंगा । लाघव दावोनि लपवी आंगा । कृष्ण अनंगा मोहक ॥७॥
नृत्यगीतवाद्यमेळ । भला यथोक्त घडला ताल । ऐसे परस्परें गोपाळ । प्रशंसाशीळ हरिरंगीं ॥८॥
हाचि निसर्ग सगुणांचा । महिमा वाढविजे अपरांचा । दुर्गुण तेथ पैशून्याचा । प्रवाह वाचा प्रकाशी ॥९॥
श्रीकृष्णाचे जे संवगडे । अमरभुवना सांडूनि कोडें । पहावया श्रीकृष्णक्रीडे । आले निवाडें भूलोका ॥११०॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP