वनपर्व - अध्याय तेरावा

मोरेश्वर रामजी पराडकर (१७२९–१७९४), हे महाराष्ट्रात मोरोपंत अथवा मयूर पंडित नावाने ओळखले जातात.


धर्म पुन्हां त्यासि म्हणे, ‘ मार्कंडेया मुनीश्वरा ! आर्या !
आढळली तुज लोकीं सत्वाढ्या आमुची जसी भार्या ? ’ ॥१॥
मुनि त्यासि म्हणे, “ होती सावित्रीनाम अश्वपतितनया,
तच्चरित श्रवण करीं, ऐकाया योग्य, साधु, पतित, न या. ॥२॥
होय प्राप्त विधिस्त्रीसावित्रीच्या वरें चि ती राया,
यत्कीर्ति जना म्हणती, ‘ कर देत्यें, रे ! अघाब्धितीरा या. ’ ॥३॥
झाली भक्तसुता ती श्रीसावित्री च उद्धरायाला,
श्री क्षीरधिला जन्मुनि जें दे यश तें च शुद्ध रायाला. ॥४॥
बहु लाजवी वरांला तीचा कुलशीलरूपमहिमा, गा !
‘ मागा ’ म्हणे गिरिश चि, ‘ न जडगिरि स्वस्तरूपमहिमागा. ’ ॥५॥
अश्वपति म्हणे, ‘ वत्से ! चिंता मज हे चि एक परमा, गे !
झालीस दानयोग्या, परि कोण्ही ही तुला न वर मागे. ॥६॥
जा, शोधुनि ये, वत्से ! वरुनि मनें मानल्या कुलीनातें,
कीं तुजकडे चि आहे शतपुत्रांचें हि गे ! मुली ! नातें. ’ ॥७॥
‘ स्ववर पहा, जा, ’ ऐसें योग्य जनीं तो चि तीस चि वदाया.
गुरुच्या वचनें गेली आपण घेवूनि ती सचिव दाया. ॥८॥
अनुरूप वर विलोकुनि आली तों, त्या नृपा परमहर्षी
सांगत होता सुकथा श्रीनारद जो कृपावर महर्षी. ॥९॥
ती दोघांतें वंदी, तों तीस ब्रह्मकायभू पाहे,
सस्मित असें पुसे कीं, ‘ त्वत्तनया होय काय भूपा ! हे ? ॥१०॥
कोठें गेली होती ? श्वशुरगृहाहूनि काय आणविली ?
हा ! सचिवानीं आझुनि दानोचितता इची न जानविली. ’ ॥११॥
भूप म्हणे, “ परिसावें तें चि तुवां सर्वसाधुकुलगीतें,
म्या पाठविलें होतें स्ववर पहाया स्वयें स्वमुलगीतें. ॥१२॥
वद वत्से ! काय कसें ? वर बरवा पाहिला ? न लाजावें,
या गुरुनें ‘ धन्य ’ असें म्हणुनि स्वमुखें तुला मला, जावें. ” ॥१३॥
सांगे ती सावित्री, ‘ नृप द्युमत्सेस्न शाल्वपति आहे,
जरि वृद्ध अंध रिपुहृतराज्य वनस्थ हि न काळजी वाहे, ॥१४॥
कुलशीलसत्वगुणनिधि तो पुत्रकलत्रमात्रपरिवार,
परि वार सर्व सण त्या; कीं, मथिला स्वांतरस्थ अरिवार. ॥१५॥
तो श्वशुर मानला मज, चित्तें त्याचा कुमार म्यां वरिला;
जरि लाजविति सख्या, अनुसरली गौरी हरा, न त्या हरिला. ’ ॥१६॥
नारद म्हणे, ‘ नृपा ! हे चुकली योजूनि सत्यवान् नवरा;
न वरावा जरि गुणवान्, योजू अन्या, असे उणें न वरा. ’ ॥१७॥
भूप म्हणे, ‘ सर्वज्ञा ! देवा ! उमजे असें चि सांग मला,
गुणवान् युवा कुलज वर जरि, तरि हि तुम्हां अयोग्य कां गमला ? ॥१८॥
काय इणें न धरावें अधनत्वें भूपज नवरा जीवीं ?
कां न प्राशावें मधु मधुपीनें कूपजनवराजीवीं ? ’ ॥१९॥
मुनि सांगे, ‘ वर्षांतीं येइल त्या भूपपुत्रका व्यसुता;
अन्य वरू, वृत हि कच त्यजुनि, वरी भूपपुत्र काव्यसुता. ’ ॥२०॥
भूप म्हणे, ‘ न वरावा वत्से ! जर्‍हि सुगुणसागर लवायु;
शीतल मंद सुगंध हि वद सेवावा कसा गरलवायु ? ’ ॥२१॥
ती सुमति म्हणे, ‘ ताता ! न त्यजुनि पयोधिला नदी परते,
न पतंगचित्तवृत्ति क्षण ही रत्नीं, त्यजूनि दीप, रते. ॥२२॥
वरिला तो वरिला चि, स्पर्शावा या न अन्य कायातें;
हा दृढ निश्चय माझा, स्तवितील कुलीन कन्यका यातें. ॥२३॥
आयुष्य असो कितितरि, मज तदितर पुरुष तुजसम चि राया !
मन न चळेल चि, येइल जरि चरचर हा गळा यम चिराया. ’ ॥२४॥
देवर्षि म्हणे, ‘ त्यास चि दे साध्वीव्रतपरा सुता, राया !
शुचिनिश्चयाहुनि अधिक अमृतरस नसे परासु ताराया. ॥२५॥
हे बहु धन्या कन्या अन्यायन्यायधर्मभावज्ञा
किंबहुना स्वल्पा तरि करि आद्यसती हि वल्लभावज्ञा. ॥२६॥
होतें सद्धर्माच्या कासेला लागतां सदा शिव, हो !
येतों, बसा, प्रसन्न प्रभु मृत्युंजय तुम्हां सदाशिव हो. ’ ॥२७॥
गेला मुनि जो भगवत्कीर्तिमहाकामधेनुचा दुहिता;
नेउनि दिली नृपें ती सद्विधिनें सत्यवत्करीं दुहिता. ॥२८॥
माता तात परततां बहु रडती, परि रडे न सावित्री
सुमृदु सुमंत्री हि म्हणुनि, त्यासि म्हणे, ‘ नामगा नसावि त्री. ’ ॥२९॥
झाली तपोवनांत स्वीकारुनि वल्क तापसी ते तें
अद्भुत सत्व तिचें बा !, तितका नव्हता चि ताप सीतेतें. ॥३०॥
वेद श्वशुर, श्वश्रू स्मृति, ती स्वाचारपद्धती च सती,
मुनि म्हणति ‘ या नृपाच्या उटजीं सिद्धि स्नुषामिषें वसती. ’ ॥३१॥
तो सत्यवान् म्हणे, ‘ हे पितृराज्यश्री तपोवनांत पती
हो आपन्मुक्त म्हणुनि बहुधा आपण हि या मिषें तपती. ’ ॥३२॥
तत्सद्गुणें प्रमुदितें झालीं केवळ मनांत न तिघें तीं,
सकळें सदेवतापसवृंदें हि तपोवनांत नति घेतीं. ॥३३॥
ती स्वमनांत म्हणे, ‘ तुज तनु रडविल सर्वकाळ, जीवा ! हे,
सोड इला, वेड्या ! बुध न कुसंगति धरुनि काळजी वाहे. ॥३४॥
आध्यनळें हृन्मणिकीं काळाचा कवळ व्हावया सिजसी,
जीवा ! क्रिया सुटेना, केली जें प्राप्त व्हावयासि जसी. ’ ॥३५॥
ऐसें चिंती, वाळे, मोजी उर्वरित दिवस महिने ती;
नसतें तसें, तरि सुखें, वय, भोगुनि तदधिक श्रम हि, नेती. ॥३६॥
उरतां च्यार दिवस ती करि वांचाया पति व्रतारंभा.
तन्नियमीं प्रियवाक् कीं शुकीं विलोकी न तीव्रता रंभा ! ॥३७॥
श्वशुर म्हणे, ‘ त्रिदिनव्रत झालें कीं ! वंश धन्य केला गे !
कर पारणा, ‘ क्षुधा बहु पूर्ववयामाजि कन्यके ! लागे. ’ ॥३८॥
ती, ‘ संकल्पीं आहे सूर्यास्तीं पारणा करायाची, ’
ऐसें श्वशुरश्वश्रूचरणांतें जोडुनी करा याची. ॥३९॥
फळमूळार्थ निघे पति, त्यासि म्हणे, ‘ मज हि सत्तमा ! न्या, हो !
वन पाहेन, तुम्हां हे न प्रथम प्रार्थना अमान्या हो. ’ ॥४०॥
चित्राश्व म्हणे, ‘ दयिते ! गमली वनसरणि काय कोमळ ती ?
श्रमसिल शिबिकास्था ही, दुर्गवनपथांत बायको मळती. ॥४१॥
उपवास तीं दिसांचा, तूं आधीं च प्रिये सुमृदुला गे !
न्यावें कसें ? चरणयुग नवनीतापरिस ही सुमृदु लागे. ॥४२॥
मज सोसेल कसी, जी न पहावे स्त्रीव्यथा नरा नीच्या ?
श्रमदा प्रमदाहृदया कथिती हि कवी कथा न रानींच्या. ॥४३॥
येणार चि तरि साध्वि ! श्वश्रूश्वशुरांसि पूस, मग ये, तें
योग्य तुज मज हि, मानिति गुर्वाज्ञाधिक सुबुद्धि न गयेतें. ’ ॥४४॥
सावित्री त्यांच्या ही आज्ञेतें तत्प्रसाद साधुनि घे;
उटजांतूनि सतीसह वंदुनि तो स्वपितृपाद साधु निघे. ॥४५॥
ती न स्त्री, रक्षाया त्यासि निघे आत्तमूर्ति जनकाशी,
परमशिव जींत नांदे म्हणुनि जिला म्हणति सुज्ञजन ‘ काशी. ’ ॥४६॥
जे पक्षी, जे श्वापदसंघ अधिष्ठूनि कानना वसती,
त्यांचें तद्वचनामृतपानार्थ पुसेल कां न नाव सती ? ॥४७॥
पात्र भरूनि फळानीं काष्ठें फोडी वनांत, सत्वर तें
पाहूनि तत्काळत्रें स्मरलें मुनिवच मनांत सत्वरतें. ॥४८॥
जों साध्वी हळु च म्हणे, ‘ हा नाथा ! नियतमानदा ! रुचिरा
मुर्ति श्रमत्ये, भ्रमत्ये मति, कीं जी ! प्रियतमा ! न दारु चिरा. ’ ॥४९॥
तों चि म्हणे तो, ‘ उठल्या करित्या स्मृतिहानि वेदना, लागे
शूलशत शिरीं, जाणों सखि ! अक्षम हा निवेदनाला गे ! ॥५०॥
तुझिया मृदुशीतांकीं शिर ठेवुनि वाटतें निजावें गे !
त्वत्स्पर्श अमृत म्हणउनि या मत्तापें पळोनि जावें गे ! ’ ॥५१॥
मांडी देवुनि पतिचें मस्तक हस्तकमळें सुधी रगडी,
दे धैर्य सतीस तिचा निजनिश्चय, जो खरा सुधीर गडी. ॥५२॥
सीता दशकंठा जसि तसि सत्वें भी न तीव्रतापा हे;
तों पाशपाणिपुरुषाप्रति पतिपार्श्वीं पतिव्रता पाहे. ॥५३॥
क्षितिवरि पतिशिर उतरुनि, सविनय झडकरि उठोनि, कर जोडी,
नमुनि म्हणे, ‘ देव ! तुम्हीं, असि कैंची अन्यदर्शनीं गोडी ? ॥५४॥
केलें चि धन्य दर्शनदानें, येवूनि कानना, मातें,
अजि देवेश ! निवावे बहु हे सेवूनि कान नामातें. ’ ॥५५॥
देव म्हणे, ‘ सति ! यम मीम, ’ ‘ कां आलां ? ’ ‘ न्यावया तुझ्या पतितें, ’
‘ हें दूतकार्य कीं जी ! ’ ‘ जें सेवककृत्य वेगळें सति ! तें. ॥५६॥
हा सत्यवान् सुकृतवान् गुणवान् न्यावा न सेवकानीं कीं,
ज्या कर्मीं योग्यत्व स्वामीचें तें न सेवकानीकीं. ’ ॥५७॥
अंगुष्ठमात्रपुरुषाप्रति यम पाशेंकरूनि आकर्षी,
तैं ‘ हाय ! हाय ! ’ म्हणती बहु गद्गदकंठ साश्रु नाकर्षी. ॥५८॥
त्यातें बांधुनि घेउनि यमधर्म प्रभु निघे अवाचीतें,
भ्याला सतीस बहुधा, जें ब्रह्मलिखित बरें न वाची तें. ॥५९॥
त्यामागें ती हि निघे, धर्म म्हणे, ‘ भागलीस, जा परत;
स्नेहऋण फेडिलें त्वां, करुनि स्वपतिक्रिया, रहा स्मरत. ’ ॥६०॥
साध्वी म्हणे, “ प्रभो ! पति जिकडे जावी च मूर्ति हे तिकडे,
स्वगुरुव्रतप्रसादें मद्गतिसि न रोधितील हेति कडे. ॥६१॥
संत म्हणति, ‘ सप्तपदें सहवासें सख्य साधुसीं घडतें, ’
सन्मित्र चि न व्यसनीं, अन्याखिलमित्र संकटीं पडतें. ॥६२॥
तुज संत म्हणति, ‘ पितृपति समवर्ती धर्मराज बापा ! हें
सत्य यश, म्हणुनि या ही कन्येसि दया करूनि बा ! पाहें. ” ॥६३॥
ऐसें सती वदे; ते बोल शशी, देव तो हि सागरसा
प्रेमें उचंबळे, हो ! धरि कारुण्यें द्रवासि साग रसा. ॥६४॥
धर्म म्हणे, ‘ साध्वि ! बहु श्रमलीस; स्वाश्रमासि जा मागें.
जो मागसील तो वर देतों, घे, इष्ट तें मला मागें. ’ ॥६५॥
‘ देवा ! व्हावे चक्षुस्तेजःसंपन्न आश्रमामाजी
मामाजी ऐसें द्या; मति साहेना चि त्या श्रमा माजी. ’ ॥६६॥
‘ दिधलें ’ धर्म म्हणे, परि जात चि होती तसी च मागूनि;
देव म्हणे पुनरपि, ‘ जा, वत्से ! घे वर दुजा हि मागूनि. ’ ॥६७॥
ती सुमति म्हणे, ‘ राज्यभ्रंशें बहु खिन्न सासुरा होतो,
पावुनि भवत्प्रसादें निजपद बहुकाळ सासु रहो तो. ’ ॥६८॥
‘ होइल जा ’ धर्म म्हणे, परि करि अनुगमन सबहुमान सती;
कीं जीं हंसी हंसावांचुनि मानील न बहु मानस ती. ॥६९॥
पुनरपि मार्गीं काढी जें धर्मरहस्य जेंवि नव पुसती,
तें होय वशीकरण चि, कीं भासों दे तयासि न वपु सती. ॥७०॥
धर्म म्हणे, ‘ गे बाई ! करिसी कां व्यर्थ का श्रमास ? तिजा
वर घे, नको चि भागों, आलीस सुदूर, आश्रमा सति ! जा. ’ ॥७१॥
त्यासि म्हणे सावित्रे, ‘ संपन्न असो पिता सुतनयशतें. ’
हा लक्ष्मीसुतकवि किति लिहिल ? सतीचें उमासुत न यश तें. ॥७२॥
उडुपा उडुसें धर्मौदार्या लाजोनि अभ्र मुरडे, हो !
सावित्रीच्या सुयशीं न दिसे पति म्हणुनि अभ्रमु रडे हो ! ॥७३॥
ऐसें शिरोनि चित्तीं, घेउनि भारी हि तीन वर, देवा
सोडीना, सोडविल्यावांचूनियां ती सती नवरदेवा. ॥७४॥
देव म्हणे, ‘ तूं स्वच्छा स्वच्छायासी च; मागतीस तिघे
वर घेउनि ज्या चवथ्या, देतों, मागोनि मागती सति ! घे. ’ ॥७५॥
नमुनि म्हणे ती वरदा, “ तुजला अति भार न चवथा, न पित्या,
स्वरगा आधि सुरभिचें भागे द्यायासि न चव थान पित्या. ॥७६॥
व्हा सुप्रसन्न, ‘ वत्से ! तुज हो सुतशत ’ असें वदा, न्या हो !
सुयशोराशि स्वर्गीं; लज्जाप्रद सुरनगा वदान्या हो. ” ॥७७॥
भुलला धर्म द्युतिला धृतिला मतिला तिच्या तथा स्तुतिला,
न करुनि विचार, जावी मागें म्हणवुनि, म्हणे ‘ तथास्तु ’ तिला. ॥७८॥
हळु चि म्हणे सावित्री, ‘ पावेन वरेंकरूनि संततिला,
तुमचा प्रसाद म्हणुनि प्रेमें गातील सर्व संत तिला; ॥७९॥
तरि पत्पति मज द्या कीं तुमची पावेल मान सत्या गी,
यश रक्षाया प्राण हि सत्यगुणासक्तमानस त्यागी. ’ ॥८०॥
रोमांचित धर्म म्हणे, ‘ बाई ! गातिल तुझा प्रभाव सती,
पतिसीं अविनाभावें वससिल, रविसीं जसी प्रभा वसती. ॥८१॥
राज्य चतुःशत वत्सर करिल तुझा कांत, सोडिला, जा, गे !
हा त्वन्महिमा जागो, सीतेनें जेंवि जोडिला जगे. ’ ॥८२॥
तें वृत्त वर्तमान स्वल्प हि न तिच्या कळे वरा पाशीं,
जातां यम, सावित्री धांवत आला कळेवरापाशीं. ॥८३॥
पुनरपि तसी च बसली अंकीं घेवूनियां स्वपतिशिर ती;
जसि चेतना धवांगीं होय, इची जीवितांत मति शिरती. ॥८४॥
वनदेवता म्हणती त्या, ‘ बा ! गा ! मूर्च्छोत्थिता चकोरा ! हो
स्वस्थ, ज्योत्स्ना कीं हे, द्रुत उठति, नमावया नको राहो. ’ ॥८५॥
नेत्रें उघडुनि पाहे तो दयितेच्या मुखास चि वनीं, ती
दे त्यासि, जसि नृपासि व्यसनीं देती सुखा सचिवनीती. ॥८६॥
स्त्रीस म्हणे, ‘ सुभगे ! त्वां मृदु मांडी मांडिली उशी, रमला
आत्मा निद्रेसीं, रवि मावळला, लागला उशीर मला. ॥८७॥
पुरुष श्याम महौजा ओढित होता बळें चि मजला जो,
तो कोण ? पुसेंन तया; नसतां, स्वप्नोत्तमर्णमज लाजो. ’ ॥८८॥
‘ कथिन उद्यां, झाली बहु रात्रि, बळ असेल तरि उठा, राया !
देत्यें हात, चला, जी ! घेत्यें फळभाजना कुठारा या. ’ ॥८९॥
नेत्रें पुसोनि पदरें पतिस म्हणे, ‘ भेटतील मामाजी
बाई ! म्हणतां, रडतां, पडतां दाटूनि कां श्रमामाजी ? ॥९०॥
भेटवित्यें ताताला मातेला, या, उठा, ’ असें वदली,
आली घेउनि, अद्भुत वाटे कलभासि सांवरी कदली. ॥९१॥
ये स्नेहहंस जाणों ईप्रति सोडुनि तदीय मातेला,
कीं दूर वाहवुनि ने ती सत्वमहानदी यमा तेला. ॥९२॥
आला प्रकाश नेत्रीं, अंधत्वाचा वरें नुरे गंध.
परि भूप पुत्रमोहें केला पहिल्यापरीस ही अंध. ॥९३॥
त्याला म्हणती गौतम दाल्भ्य भरद्वाज धौम्य तापस, ‘ हा !
बा ! गा ! उगा, मुहूर्तप्रस्थित दुर्दैवदत्त ताप सहा. ॥९४॥
सावित्री शुभलक्षणगुणसंपन्ना महासती, बा ! हे.
जी जी साध्वी स्वधवानुमतें द्वास्था महास ती बाहे. ॥९५॥
वाखाणिति बहु, पाहति मुनिदार हि भासुरव्रत तिला जे.
साध्वी च देवतार्हा, साध्वीला बा ! सुरव्रतति लाजे. ॥९६॥
शोकें रडतां डोळे जावे, गेले कधीं न यावे, गा !
दिसतें कल्याण पुढें, होवूं चि नको अधीन या वेगा. ’ ॥९७॥
ऐसें समजाविति त्या राज्याला जों दयापर महर्षी,
तों झाले, अवलोकुनि सावित्रीसह तया, परमहर्षी. ॥९८॥
मुनि म्हणती, ‘ हा आला, नेत्रें उघडुनि पहा, सदरा या,
मोटा भाग्याचा तूं प्रमुदित यांसह रहा सदा, राया ! ॥९९॥
दे आलिंगन, अंकीं घे, मस्तकपद्म हुंग, वाराया
आत्मात्मजतापातें, दे आशी, राजसत्तमा ! राया ! ’ ॥१००॥
पुसतां विलंबकारण, ‘ चित्राश्व म्हणे, ‘ शिरोव्यथा - शयन, ’
मुनि म्हणति, ‘ हें नव्हे, वद वत्से !, हो तूं चि आमुचें नयन. ’ ॥१०१॥
सावित्रीनें कथिलें तें वृत्त अशेष साधुसद नमुनीं,
तेव्हां झाले अतुलप्रीतिक्रेडेसि केलिसदन मुनी. ॥१०२॥
मार्कंडेय म्हणे, ‘ बहु वर्णावें काय ? जेंवि शिवसेवा
मज काळापासुनि तसि, मुक्त करी त्यासि ती मनुजदेवा ! ’ ॥१०३॥
दुसरे दिवसीं प्रकृति प्रार्थिती येवूनि आपुल्या पतितें,
‘ या, राज्य करा, सचिवें वधिला, हरिली स्वभूमि ज्या पतितें. ’ ॥१०४॥
मुनि म्हणति, ‘ अनुभवावें स्वस्थमनें राज्यपद, नता राया !
न तपोवन वर तुज बहु सावित्रीयुक्त सदन ताराया. ’ ॥१०५॥
सिंहासनीं बसविला सावित्रीच्या व्रतें चि, हा नियम;
वरसामर्थ्य म्हणा, परि गेला होता करूनि हानि यम. ॥१०६॥
सावित्रीनें केला उभयकुळोद्धार हा असा, राज्या !
कृष्णा हि असी च, स्तुति येती न मुखासि या असारा ज्या. ” ॥१०७॥
रामधनमयूर म्हणे, ‘ निववाल चि सुरसिकासि केकां हो !
शंभु हि म्हणे ‘ न सेविति मंद म्हणुनि झुरसि कासिके ! कां ? हो ! ’ ” ॥१०८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP