केशवचैतन्यकथातरु - अध्याय पांचवा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्रीगणेशायनम: ॥  नमो नमो श्रीचैतन्यमूर्ति ! । परम पावन जयाची कीर्ति । समाधिस्थ असतां भक्तांप्रति । भाषण करिते जाहले. ॥१॥उत्तम नाम नगरीं । नृसिंहभटजीची अंतुरी । लक्ष्मी नामें होती घरीं । स्वपुत्रातें रक्षुनी. ॥२॥
केशव तयाचें नामाभिधान । ठेवूनि करी लालन पालन । तयासी पांच वर्षें पूर्ण । होते जाले त्या काळीं. ॥३॥
पुत्र उत्तम सुलक्षण । सरळ नासिक सुहास्य वदन । गौर वर्ण विशाळ नयन । सर्व अवयव नेटके. ॥४॥
बुद्धी जयाची विशाळ । तपस्वियापरी जयाचे खेळ । भजनशीळ सर्वकाळ । देवपूजा करितसे ॥५॥
ऐसा पुत्रा पाहोनि सुबुद्ध । लक्ष्मीबाई करी खेद, । ‘ आतां या मुलाचा व्रतबंध । कोण करिल अरे देवा ! ॥६॥
या मुलासी अध्यायन । कोण करिल आतां येऊन ? ’ । ऐशी चिंता परम दारुण । प्रप्त जाली मातेसी. ॥७॥
तंव पुत्र करी तियेचें शांतवन, । ‘ आह्मां स्वामीविण आहे कोण ? । आमची चिंता तया संपूर्ण । खेद न करीं सर्वथा. ’ ॥८॥
लक्ष्मी म्हणे, ‘ ऐके रे मुला ! । स्वामींनीं ऐसाचि नेम केला । परि तो काळ निघोन गेला । स्वामी जाले समाधिस्थ. ॥९॥
आतां कोणापाशीं जावें ? । कोणासी स्ववृत्त सांगावें ? । कैसी धांव घेतली दैवें । नकळे काय होणार तें. ’ ॥१०॥
मग उभयतांनीं निश्चय केला. । ‘ समाधिपाशीं जाऊं चला । निवेदन करूं वृत्तांताला । स्वामीसन्निध सर्वही. ’ ॥११॥
मग घेऊनि स्वपुत्रासी । लक्ष्मी जाऊनि समाधिपासी । करिती जाली स्तवनासी । परम भावें करुनि. ॥१२॥
‘ हे स्वामी सच्चिदानंदघन ! । अखंड अव्दय परिपूर्ण ! । निर्विकार नि:संग निरंजन ! । आहांत सर्वदां. ॥१३॥
परि स्वशरणागता लागून । तुह्मी होऊनि साकार सगुण । निजभक्तांचे मनोरथ पूर्ण । करित असां अक्रियत्वें. ॥१४॥
समाधिपूर्वीं बोलिलां आपण । ‘ मी करिन या मुलाचें पाळण ’ । ते माझिया प्रत्ययालागून । आलें पाहिजे या वेळीं. ॥१५॥
याचा व्रतबंध करिल कोण ? । यासीं कोण सांगेल अध्यायन  ? । ही आज्ञा मजलागून । स्वामीराया दयाळा ! ॥१६॥
आपलें वचन प्रतिपाळावें । बोलिलें तें सिद्धीस न्यावें ’ । ऐसी प्रार्थना जीवें भावें । करिती जाली लक्षुमी. ॥१७॥
मग समाधींतुनी प्रत्युत्तर । स्वामी देते जाले परिकर, । ‘ या मुलाचा व्रतबंध सुंदर । करतिल ग्रामस्थ सर्वही. ॥१८॥
पुढें यासी घेऊनि यावें । अध्ययन सांगेन मीच बरवें । ऐसें मनीं उमजुन घ्यावें । चिंता न वाहणें सर्वर्था. ’ ॥१९॥
ऐसीं समाधींतून उत्तरें जालीं । ते लक्ष्मीनें सर्व ऐकिलीं । मग संतोषातें पावली । येती जाली गृहासी ॥२०॥
ग्रामस्थांसी वर्तमान । सांगती जाली तें संपूर्ण. । त्यांनीं उत्तम काळ पाहुन । व्रतबंध केला केशवाचा. ॥२१॥
वेंचूनी द्रव्याचीं भांडरें । व्रतबंध केला अति गजरें । वाद्यें वाजती मंगळ तुरें । ब्राह्मनभोजनें पैं केलीं. ॥२२॥
मुलासीं वस्त्रें भूषणें करून । तैसी त्याचे मातेलागुन । चार दिवसपर्यंत जाण । उत्साह केला सर्वांनीं. ॥२३॥
मुलगा बुद्धिमंत पाहून । आश्चर्य करिती सर्व ब्राह्मण । ह्मणती, ‘ हा होईल महाविव्दान । चैतन्यस्वामीप्रसादें. ’ ॥२४॥
असो कोणे एके दिवशीं । स्नान घालुनि स्वपुत्रासी । जाऊनियां समाधिपाशीं । प्रार्थना करिती जाहली. ॥२५॥
‘ जय जया जि श्रीगुरुमूर्ति, । विनंती करितें चरणांप्रती । स्वामिनीं आज्ञा केली होती । तैसा व्रतबंध जाहला. ॥२६॥
आतां यासीम अध्यायन । जालें पाहिजे संपूर्ण । आणि प्रपंचनिर्वाहालागीं धन । प्रात्प जालें पाहिजे. ’ ॥२७॥
ऐसें ऐकूनियां वचन । स्वामी ह्मणतां, ‘ हो सावधान । श्रीमद्भागवतालागून । सांगतों तें ऐक पां. ’ ॥२८॥
मग केशवें हस्त जोडिले । आणि सर्वांगाचे कर्ण केलें । ऐसें अवधान दिधलें । चकोरें जैसें मेघासीं. ॥२९॥
जे विष्णूनें ब्रह्मया कथिले । ते चार श्लोक सांगूं आदरिलें । जे वेदव्यासद्वारें आले । राघवचैतन्यापरियंत. ॥३०॥
तेचि राघवचैतन्य आपण । सांगते जाले मजलागुन, । केशवा ! तो श्लाकार्थ तुजलागुन । सांगतों तो ऐक पां. ॥३१॥
श्रीभगवान म्हणति ब्रह्मयासी, । समजून घेईं निज मानसीं । परम गुह्य होतें मजपाशीं । तें तुजप्रति सांगतों. ॥३२॥
जे श्रुतिशास्त्रपारंगता । तें ज्ञान ह्मणिजे गा मम सुता ! । मोक्षालागीं प्रमाणता । येत असे ज्यायोगें. ॥३३॥
जिवाची सुटका व्हावयासी । म्यां विचार करून मानसीं । वदता जालों श्रुतिशास्त्रांसी । हितलागीं सर्वांच्या. ॥३४॥
परि ब्रह्मानुभवाविण । नाशातें नपवे मूळ अज्ञान । जयासि म्हणती विज्ञान । तेंहि सांगेन तुजप्रति. ॥३५॥
त्या विज्ञानाची व्हावया प्राप्ती । तुज साधन सांगतों निगुती । करावी माझी नि:सीम भक्ती । रहस्य निश्चितीं जाण हें. ॥३६॥
माझें स्वरूप जितकें जेव्हडें । तें पाहूं न शकती कोणी धडफुडें ।  ईश्वरत्वाचे होती तुकडे । अनंत स्वरूप पाहतां. ॥३७॥
ऐसा हा माझा भाव। जे माझा मीच असें स्वयमेव । मज माझ्या स्वरूपाचा ठाव । न लागेचि सर्वथा. ॥३८॥
मी परमात्मा परिपूर्ण । असे सच्चिन्मात्र घन । स्वशक्तिची धरितों आंगवण । तेव्हां गुण प्रगट होती. ॥३९॥
माझ्या शक्तीचा आविष्कार । तेव्हां जगाचा उपक्रमोपसंहार । ऐसा कर्माचा प्रकार । माझे ठायीं भासतसे. ॥४०॥
स्वयें मी अरूप अनाम । सदासर्वदा निष्काम । माझे ठायीं नसे कर्म । विचारदृष्टीं पाहतां. ॥४१॥
माझ्या सत्तेच्या योगेंकरून । माया होऊनियां त्रिगुण । उत्पत्ति स्थिति संहारण । करित असे जगताचें. ॥४२॥
परि तें सर्वथा मिथ्या पाही । उगीच भासतसें माझ्या ठाईं । तिशीं मजशीं संबंध नाहीं । केवळ ब्रह्मस्वरूपी. ॥४३॥
हें माझ्या अनुग्रहेंकरून । या मायेचें तत्त्व संपूर्ण । ठाउकें पडो तुजलागुन । अनुभवपूरक विधात्या ! ॥४४॥
उखर भूमीसी भासे मृगजळ । त्यापूर्वीं भूमी असे अचळ । तैसें या जगतापूर्वीं केवळ । मीच असे निश्चयीं. ॥४५॥
जे व्यवहारकाळीं सत्य भासे । तें सत् स्थूळ माझें ठायीं नसे । असत्य सूक्ष्म जें कांहीं असे । तेंही नसे सर्वदा. ॥४६॥
सत असताहूनि जें पर । प्रधान म्हणे ज्या सांख्यशास्त्र । कारण प्रकृतीचा निर्धार । तेंही नसे सर्वदा. ॥४७॥
करितां सस्वरूपानुसंधान । तेव्हां प्रकृती होती मजमाजीं लीन ॥ पश्चात् अविनाश परिपूर्ण । मीच असें सर्वदा. ॥४८॥
ज्ञानियांचेही अनुभवेंकरून । ऐसाचि निर्धार असें जाण । मीच असे अद्वितीय घन । प्रकृती नसे ते ठायीं. ॥४९॥
संपूर्णाचा निषेध करितां । जें अवशिष्ट राहे सर्वथा । जेथें वेगळा नुरे निषेधितां । तें स्वरूप तत्वतां जाण माझें. ॥५०॥
माझिया अनुग्रहेंकरून । तुज होवो या स्वरूपाचें ज्ञान । एर्‍हवीं मम मायेचें आवरण । दूर नव्हे सर्वथा. ॥५१॥
माझी माया आहे कैसी । हें कळलें पाहिजे तुजसी । याकरितां दृष्टांतांसी । देऊनियां सांगतों. ॥५२॥
आकाशीं दिसे गंधर्वनगर । कीं दृष्टिपुढें बिंदुलयाचा पूर । कीं नीलकंठाहाक्कार । भसे नभ ज्यापरी. ॥५३॥
चालिलो मृगजळाचा पूर । सर्प भासे जैसा दोर । शुक्ति न समजोनी रौप्याकार । डोळींयासी दिसतसे. ॥५४॥
तैसें जाण हें ऋत्यर्थ । ह्मणजे संपूर्ण दृश्य पदार्थ । यांत कांहीं नसतां अर्थ । सत्य वाटती अज्ञातें. ॥५५॥
दृश्य प्रचीतीस येतें ह्मणुन । सत्य मानिती अज्ञ जन । नाहीं दुसरें प्रमाण । सत्य यासीं ह्मणावया. ॥५६॥
मृगजळ प्रचीतीस येतें । परि तयासी कोणी खरें ह्मणते । असो विचार न करितीचि ते काय सांगावे मुर्खांसी. ॥५७॥
जया पुरुषांनीं विचार केले । श्रुतीयुक्तीसी अनुसरले । ज्यांचे अहं स्थिरावले । केवळ ब्रह्मस्वरूपीं. ॥५८॥
तयांसीं आत्मयाचे ठायीं । जग सहसा दिसत नाहीं । दोर घेतां नसे अही । जयापरी सवर्था. ॥५९॥
जगत् हें ठेविलें ठायीं । दिसत असतां मिथ्या पाहीं । जैसा स्वप्नकाळींचा पदार्थ नाहीं । खरेंपण करूनि. ॥६०॥
मारीचि मृग होता जाला । तो कायत्वचा काढूं आला । तैसी मम माया संपूर्णाला । मोह करित असे पैं. ॥६१॥
हें सत् म्हणतां नये । असत् ह्मणतां शंका होय । कोणत्यापरी इचा निर्णय । केला न जाय सर्वथा. ॥६२॥
केव्हां दृश्यत्वें दिसावें । केव्हां अदृश्यही व्हावें इयेचें चेष्टित बरवें । निर्धारितां नयेची. ॥६३॥
हें आभासरूपही आहे । तमोरूप तरी स्वयमेव । हे ऐसी कीं तैसी हा ठाव । न पडे कोणासी इयेचा. ॥६४॥
ऐसी दुर्ज्ञेय ही माया । विचारें न पडेचि ठाया । आतां सांगतों एक उपाया । उपेक्षा ईची करावी. ॥६५॥
करावा माझे स्वरूपाचा विचार । जें मू अप अनळ अणीळ पारावार । जेथें कार्यासहित मायेचा विचार । नसे सर्वथा केव्हांही. ॥६६॥ जे कोणातें जाणें ना येणें जयासी नाहीं होणें जाणें । स्थूळ मध्यम ना सानें । जगतापरी नसें जें. ॥६७॥
तें स्वरूप माझें केवळ । जेथें शक्तीचा नसे मळ । सर्व व्यापून सर्वावेगळ । आपले आपण असे पैं. ॥६८॥
जैशी आकाशादि पंच महाभूतें । व्यापूनि दिसति भौक्तिकांतें । परि अप्रविष्टपणें निरुतें । आपलें आपण असती. ॥६९॥
कारण जें ब्रह्मांडांतरवतिं । पंचभूतांची असे स्थिती । दुसरा पदार्थ नसे निश्चितीं । जयापरि ब्रह्मया. ॥७०॥
तैसापरि अखंड परिपूर्ण । केवळ अव्दितीय सनातन । निर्गुण निराकार ज्ञानघन । व्यापुनी असे भूतातें. ॥७१॥
मायेस्तव भूतें होतीं जातीं । परी माझी अखंड असे स्थिती । जैशी घटांत आकाशाची व्याप्ती । पूर्वसिद्ध असे पैं. ॥७२॥
गगनीं मी ओतप्रोत । आकाश माझें ठायीं कल्पित । अवघा मीच असें; जीव भ्रांत । अभावपणें पाहती. ॥७३॥
मी भूतांचे ठायीं न प्रवेशतां । निश्चळ असें गा मम सुता ! । भूतें दिसती  गा मम सुता ! । जाण निश्चयेंकरूनी. ॥७४॥
यास्तव ते मिथ्या पाही । परी दिसती मज सत्याचे ठायीं । ह्मणुनि सत्यता त्यांसही । दिसत असे अज्ञांतें. ॥७५॥
हें पुरतें विचारूनि पाहतां । भूतें नाहीं तें हें सर्वथा । उत्पत्ती सांगितली ते कथा । वंध्यासुताचिये परि. ॥७६॥
असो माझें स्वरूप केवळ । चिदाकाश नि:संम निर्मळ । मायानिर्मित जग सकळ । नसे जया स्वरूपीं. ॥७७॥
आतां तत्त्वजिज्ञासा जया असेल । तेणें अंत:करण करून । निर्मळ हेंचि जाणावें केवळ । स्वरूप माझें निश्चयीं. ॥७८॥
परमात्मा ह्मणती जयालागुन । तो मी चिच्छक्तीच्या योगेंकरून । करितों सर्वांचे प्रकाशन । ह्मणोनि होय सर्वसाक्षी. ॥७९॥ अंत:करण उपाधिस्तव द्र्ष्टा साक्षी ऐसें नाव । माझ्या अन्वयाची बरव । अवस्थात्रयी असे पैं ॥८०॥
तुवां करुनी पंचकोशव्यतिरेक । निवडावें साक्षी स्वरूप सम्यक । जे अंतःकरण वृत्तीं प्रकाशक । होऊनि असे सर्वदा. ॥८१॥
तयाची साक्षिता सांडानी । अवशिष्ट असे जें अंत:करणीं । तें चैतन्य माझे स्वरुपाहुनी । भिन्न नसे सर्वथा. ॥८२॥
जैसें घटाकाश महादाकाश एक । तैसें प्रत्येक पूर्णासी ऐक्य । हें जाणुनि घ्यावा सम्यक । श्रीगुरुचे प्रसादें. ॥८३॥
तेव्हां देहयात्रा सरली । मी जीव हे भ्रांति गेली. । अविद्या सर्वस्वें निमाली । स्थिति जाली स्वस्वरूपीं. ॥८४॥
हें महावाक्याचें सार । तत्त्वज्ञानाचें जिव्हार । हें अभेदभक्तिचें घर । मत माझें निश्चेते. ॥८५॥
या माझ्या मताचें धारण । तुवां करावें निश्चयेंकरुन । समाधियोगें निश्चल मन । करुनियां चिंतावें. ॥८६॥
ह्मणजे नाना प्रकारची सृष्टि । तुवां रचिली जरी परोष्टीं । तरी न होशील कष्टी कर्तृत्व अंगीं आणुनी. ॥८७॥
मनोकल्पित जैसें स्वप्न । तैसी सृष्टि करी निर्माण । मग मोह न होतां तुजलागून । रमसी माझे स्वरूपीं. ’ ॥८८॥
ऐसें श्रीविष्णु ब्रह्मयासीं । सांगती अती गुह्यासीं । तो अर्थ स्मरोनि तुजसी । सांगितलें रे केशवा ! ’ ॥८९॥
जैसे केशवचैतन्य वदले । तैसें केशवासी प्राप्त झालें । तेणें सर्वांग निवालें । आनंदडोहीं बुडोनि. ॥९०॥
म्हणे, ‘ धन्य धन्य स्वामिराया ! । दूर केली दुर्घट माया । चुकवूनियां भवभया । मुक्त केलें मजलागीं. ’ ॥९१॥
मग समग्र भागवताप्रति । सांगते जाले यथानिगुती । चार दिवसांमाजीं समाप्ती । केली द्वादश स्कम्धांची. ॥९२॥
प्रतिदिवसीं करुनि स्नान । भागवतालागीं घेऊन । केशवें समाधिपासीं जाऊन । सांगा असावें पुराणासी. ॥९३॥
पुराण सांगणें जाल्यावरी । महान सर्प निघुनी बाहेरी । होन ठेवून चत्वारी । जात असावें मागुनी ॥९४॥
घेऊनि तया होनांप्रति । द्यावें मातोश्रीचे हातीं । तेणेंकरुनि यथानिगुती । प्रपंच चालूं लागला. ॥९५॥
ऐसें प्रत्यहीं चार होन । महासर्पें द्यावे आणुन । एका चंबूमाजी घालुन । ठेविती जाली मातोश्री. ॥९६॥
सांगत असतां पुराण । नित्य स्वामीनीं करावें भाषण । पावोनियां समाधान । आशीर्वचन देत जावें. ॥९७॥
एका ब्राह्मणाची कन्या । रूपवती सुशीला मान्या । केली केशवभटासी दान्या । विवाहसंभ्रम करुनि. ॥९८॥
मग कोणे एके दिवशी । माता ह्मणे केशवभटजीसी, । ‘ बाजारांत जाऊनि भाजीसी । घेऊनि ये सत्वरी. ॥९९॥
तेणें देऊनी येक होन । शेरभर भाजी आणिली जाण । सर्व लोक आश्चर्यालागुन । करिते जाले ते काळी. ॥१००॥
कोणी ह्मणति भोळा ब्राह्मण. । कोणी म्हणति याजपाशीं होन । फार आहेत म्हणुन । देतो भाजीकारणें ॥१०१॥
असो ऐसी वार्ता प्रगटली । ते जिर्णापुरीचे सुभ्यासी कळली । तेणें मुखासी अंगोळी लाविली । आणि आश्चर्य करूं लागला. ॥१०२॥ बिबिसाहेब त्याचें नांव । तेणें मनीं आणुनि दुष्ट भाव । दूत धाडोनियां केशव - । भटजीलगीं आणविलें ॥१०३॥
दूत येऊन उत्तमनगरीं । म्हणती होन आहेत ज्याचे घरीं । तो ब्राह्मण आम्हांसि सत्वरी । दाखविला पाहिजे. ’ ॥१०४॥
लोक म्हणती, ‘ विघ्न आलें, । बिबिसाहेबासी कैसें कळलें ? । कोणी दुष्टें सांगितलें । चाहाडीलागीं जाऊनी ? ’ ॥१०५॥
मग केशवभटजीसी घेऊनी । दूत चालिले तये क्षणीं । शोकालागीं त्याची जननी । करिती जाली उदंड. ॥१०६॥
दूतें बिबिसाहेबापासीं । नेऊनि पोहोंचविलें भटजीसीं । आणि चंबुभर होनांसीं । नेऊनियां दिधलें.॥१०७॥
यवन ह्मणे, ‘ तूं दिसतोसी लहान । तुजपाशीं कोठुनि आले होन ? । हें सांग, नाहीं तरी जाण । शिक्षा करिन तुजलागीं. ’ ॥१०८॥ केशव ह्मणे, ‘ देव देतो । तेव्हांचि मी होन घेतों, । त्यांजवरी निर्वाह करितों । शासन कशासी करितां ? ’ ॥१०९॥
यवन ह्मणे, ‘ जो देतो तुजसी । तो देव दाखवीं आह्मांसीं. ’ ऐसें म्हणूनि केशवासी । घेऊनि निघता जाहला. ॥११०॥
घेऊनि चतुरंग सैन्य । शिबिरारूढ जाला आपण । एक मुहूर्तामाजीं जाण । उत्तमनगरीं पातला. ॥१११॥
केशवालागीं म्हणे यवन, । ‘ जो देव देतो तुजला होन । तो आतां आह्मांसी ठिकाण । दाखविला पाहिजे. ’ ॥११२॥
मग जाऊनि समाधिपासीं । केशव दाखवी यवनासीं । तेणें विवेक न करितां मानसीं । अविवेकासीम आरंभिलें. ॥११३॥
बिबिसाहेब ह्मणे, ‘ दूता ! । उगेच तुह्मीं काय पाहतां ? । कुदळी घेऊनि या आतां । समाधीसी खणावें. ॥११४॥
जया जे होन मिळतील । तया ते बक्षीस होतील. ’ । ऐसें म्हणे ते क्षणीं तत्काळ । प्रवर्तले सर्व खणावया. ॥११५॥
समाधीवरी कुदळी मारिली । तों स्वामिचे मस्तकीं लागली, । तेणें रक्ताची धारा चालली । स्वामी क्षोभते जाहले. ॥११६॥ समाधींतुनी निघाले मुंगळे, । कांहीं आरक्त, कांहीं काळे, । भेदिले दूतांचे पादमुळें । चहुंकडे व्यापिले. ॥११७॥
आंगासीं तोडिती तडतडा । चाविती तेथें पाडिती तुकडा । अशुद्धें वाहती भडभडा । दूत पळूं लागले. ॥११८॥
आणि मोठाले भुंगे निघाले । सैन्यासीं चावूं लागले । मग सर्व यवन पळाले । समाधीसी सोडुनी. ॥११९॥
कितिएकांचे तोडिले कान । कितिएकांचे तोडिले घ्राण, । कितिएकांचे फोडिले नयन । मार्ग कांहीं मिळेना. ॥१२०॥
यवनी ह्मणती, ‘ हाय ! तोबा ! । काय करावें या गहजबा ? । आम्हांवरी झडला अरंब्बा । मुंगळे भुंगे तोडिती. ’ ॥१२१॥
हत्ती घोडे पळाले । शस्त्रें ठायींचे ठायी राहिले, । क्तिएकांचे प्राण गेले । पडते जालें मार्गांत. ॥१२२॥
कितिएक कानासीं मुरडून । नखें जिव्हांतें तोडून । ‘ गुन्हा गुन्हा ’ ऐसें ह्मणून । शिसदा करिते जाहले. ॥१२३॥
तयांतें भुंगे न तोडिती । मुंगळेही न चाविती. । कितिएकांनीं आंगांसी माती । लावूनि फकीर जाहले. ॥१२४॥
तेथुनि अर्ध कोसावरी । बिबिसाहेब गेला झडकरी । भुंगे जाऊनि तेथवरी । तोडिते जाले तयाला. ॥१२५॥
बिबिसाहेबाचा गेला प्राण, । बहुत मारिले मुसलमान, । सैन्याची करुनि धुळधाण । भुंगे अदृश्य जाहले. ॥१२६॥
असो तया स्थळालागुन । लोक ह्मणती दस्तुरखान । तेथें मशिद बांधिली ह्मणून । असे वदंता आजवरी. ॥१२७॥
वर्तमान कळतां जुन्नराला । यवनाचे घरीं कल्पांत जाहला । ह्मणती मोठा सैतान निघाला । त्याणें मारिलें सर्वांसीं. ॥१२८॥
यापरी जालिया वर्तमान । उत्तमनगरींचे जन संपूर्ण । श्रीसमाधीपासीं जाऊन । प्रार्थना करिते जाहले. ॥१२९॥
म्हणती, ‘ जय जया जी स्वामिराया ! । आम्हांवरी करावी पूर्ण दया । आम्ही समस्त पडतों पाया । क्षमा केली पाहिजे. ॥१३०॥ यवनानें अपराध केला । त्याचें फळही तो पावला । तयासीं जो दंड केला । तोही उवितचि श्रीस्वामी ! ’ ॥१३१॥
मग शिष्ठ ब्राह्मण मिळाले । स्थळशुद्धासी करिते जाले । वेदपारायण केलें । ब्राह्मणभोजन घालुनी. ॥१३२॥
मग केशवभट दुसरे दिवशीं । जाऊनियां समाधीपाशीं । सांगते जाले भागवतासी । अतिआदरें करुनी . ॥१३३॥
तंव समाधींतुनी भाषण । स्वामी न करिती आपण । करिते जाले दृढ मौन । सर्पही होन देईना. ॥१३४॥
ऐसा प्रकार जाल्यावरी । केशवभट खेदातें करी, । म्हणे, ‘ श्रीगुरु ! मजवरी । रागें नका भरूं जी ! ॥१३५॥
मी मी तुमचें लेंकरूं लहान, । तुह्मींच केलें संगोपन, । पिता पूर्वींच गेला मरून । आई बाप तुम्हीच माझे. ॥१३६॥
मीं आतां काय करावें ? । कोणालागीं शरण जावें ? । कैशी धांव घेतली दैवें ? । विपरीत काळ पातला. ’ ॥१३७॥
गडबडा लोळे धरणीवरी, । मोठ्यानें आक्रोश करी, । एकला तया वनामाझारीं । शोक करूं लागला. ॥१३८॥
सप्रेम भजन आरंभिलें । बहुतां प्रकारें स्तवन केलें, । मग समाधींतुनी बोलते जाले । केशवचैतन्य ते काळीं. ॥१३९॥
ह्मणती, ‘ लेंकुरा ! तुझें पुराण । ऐकुनि संतुष्ट माझें मन, । तुवां सप्रेम केलें भजन । तें मजसीं आवडलें. ॥१४०॥
सखया ! इतुके दिवसवरी । तुजसीं बोललों बहुतांपरी । ह्मणुनि उपाधि जाली भारी । लोक दुष्ट असती. ॥१४१॥
आतां तुजसीं बोलणार नाहीं. । तूं घरीं जाऊनि स्वस्थ राहीं । जेव्हां संकट पडेल कांहीं । तेव्हा समीप आहें मी. ’ ॥१४२॥
मग केशवभटजींनीं नमस्कर । करूनी घरीं आले सत्वर । मातेसी कथुन जाला प्रकार । स्वस्थ राहते जाहले ॥१४३॥
काशीमाजी एक ब्राह्मण । इच्छित होता स्वामिदर्शन । तयाचे मनोरथ केलें पूर्ण । काशींत प्रगट होऊनी. ॥१४४॥
पुढें शत वर्षांनंतर । होता जाला चमत्कार । तो षष्ठाघ्यायीं परिकार । वर्णियेला जाईल पैं. ॥१४५॥
निरंजन रघुनाथ जनस्थानवासी । कथा वर्णीली पुण्यराशी । श्रवणमात्रें गुरूभक्तांसी । आल्हाददायक निश्चयीं. ॥१४६॥ श्रीचैतन्यविजयकल्पतरु । संपूर्ण फलदायनी उदारु । श्रवणपठणें दु:खपरिहारू । होईल श्रोत्यांवक्त्यांचा. ॥१४७॥
॥ श्रीराघवचैतन्य केशवचैतन्यार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP